राजोवाच :- नागालयं रमणकं कस्मात्तत्याज कालियः । कृतं किं वा सुपर्णस्य तेनैकेनासमंजसम् ॥१॥

सकळनागांचें नागालय । रमणकद्वीप जें रमणीय । तें टाकूनि कां कालिय । करी निलय यमुनेंत ॥४२॥
गरुडा भेणें म्हणसी जरी । तरी गरुड सर्पमात्रांचा वैरी । त्यांतूनि कालिय सपरिवारीं । ह्रदोदरीं कां वसला ॥४३॥
किंवा अवघ्या सर्पांहुनी । वेगळा एकचि कालियफणी । गरुडा समरीं नाटोपोनी । वैरी होऊनि निवडला ॥४४॥
पडल्या बलिष्ठेशीं वैर । स्वपक्ष आश्रयिती विवेकचतुर । स्वकुळ सांडूनि हा विखार । कां पां दूर दुरावला ॥४५॥
भंवतें अगाध सिंधूदक । त्यामाजीं द्वीप जें रमणक । तेथ अवघा नागलोक । नांदे निःशंक निर्भय ॥४६॥
दुर्गम निर्भय आपुलें भुवन । सांडूनि पक्षपाती स्वजन । यमुनागर्भीं विशेष कोण । कां हें स्थान वसविलें ॥४७॥
येणें एकलेनि गरुडाचा । काय अपराध केला साचा । संशय त्रिविधा प्रश्नाचा । निरसा स्ववाचा स्वामिया ॥३८॥
ऐसा ऐकोनि नृपाचा प्रश्न । वक्ता श्रीशुक सर्वज्ञ । करिता झाला निरूपण । आनंदोन सप्रेमेम ॥४९॥

श्रीशुक उवाच :- उपहार्यैः सर्पजनैर्मासि मासीह यो बलिः ।
वानस्पत्यो महाबाहो नागानां प्राङ्निरूपितः ॥२॥

शुक म्हणे गा कौरवराया । कद्रु विनता कश्यपभार्या । सापत्नच्छळें रवीच्या हया । बोधावया प्रवर्तल्या ॥५०॥
हें आख्यान आदिपर्वीं । व्यासोक्त जाणिजे सर्वत्र सर्वीं । येथ अन्वयार्थ पैं आघवी । सूचना जाणावी कथेची ॥५१॥
परस्परें सूर्यसप्ति । अनुवादतां वर्णकांति । श्वेत कृष्ण ऐसें म्ह्णती । दोघी सवती पैजांशीं ॥५२॥
विनता म्हणे शुक्लवर्ण । कद्रु निषेधूनि म्हणे कृष्ण । जीस येईल लटिकेपण । दासी होऊनि ते राहो ॥५३॥
ऐशी परस्परें प्रतिज्ञा केली । मग कद्रु स्वसुतां पुसों गेली । तिहीं श्वेतकांति कथिली । ऐकोनि दचकली हृत्कमळीं ॥५४॥
मग पुत्रांसि सांगे गोठी । तुम्ही असतां माझे पोटीं । दास्यक्रिया हे वोखटी । मी करंटी पावलें ॥५५॥
त्यामाजि सवतीची दासी होणें । परम निंद्य हें लाजिरवाणें । म्यां जोडिलें प्रतिज्ञापणें । कोण्या गुणें हें निरसे ॥५६॥
सर्प म्हणती अहो जननी । न विचारितां गोविली वाणी । अदृष्टाची हे अलोट करणी । यत्न कोणी न चाले ॥५७॥
हें ऐकोनि क्षोभली माय । तुमचा होईल कुलक्षय । माझा न निरसां अपाय । परिसतां भय सर्पांसी ॥५८॥
मग म्हणती वो गरलबळें । श्रवणपुच्छ करूं काळें । विनतेपासूनि प्रतिज्ञाछळें । दास्या वेगळें तुज करूं ॥५९॥
ऐशिया छलणें सर्पी कपटी । कद्रु सोडविली संकटीं । विनता परतोनि केली चेटी । हे तुज गोठी कळली कीं ॥६०॥
मग ते विनता कद्रुघरीं । दास्यकर्मीं जन्मवरी । कपटप्रतिज्ञापाशसूत्रीं । सर्पीं यावरी गोविली ॥६१॥
तेणें संतोषली माय । म्हणे होतां कुळक्षय । तेव्हां रक्षील भागिनेय । कांहीं समुदाय पै तुमचा ॥६२॥
दास्यीं गुंतल्या विनता सती । ग्लानि तोषवूनि निजपति । तत्प्रसादें पुत्रवती होऊनि मुक्ति पावली ॥६३॥
विनतेपोटीं झाला गरुड । तेणें जाणोनि पण अवघड । माता सोडवणेंसी वाड । केलें कैवाड तें ऐका ॥६४॥
दास्यकर्माच्या पालटें । अमृत देऊं केलें कपटें । शठासि गौरविलें प्रतिशठें । महाबलिष्ठें खगेंद्रें ॥६५॥
स्वर्गींहूनि आणितां सुधा । देव गरुडेंशीं मिसळले युद्धा । त्यांसि जिंकितां तिहीं भेदा । करूनि विविधा रोधिलें ॥६६॥
गरुडें देवांच्या अनुमतें । सुधा दावितां पन्नगांतें । मुक्त करविलें विनतेतें । सर्पीं सुधेतें देखोनी ॥६७॥
सर्पीं करितां सुधापाना । देवीं हरिले करूनि विघ्ना । तैहूनि गरुडा कद्रुनंदना । वैरभावना अभंग ॥६८॥
सर्प स्वभावें भुजंगम । गरुड केवळ विहंगम । यालागिं सर्पासि तो दुर्गम । कांहीं विक्रम न चाले ॥६९॥
गरुड भक्षी सर्पकुळा । समरीं न जिंकवे तो व्याळां । तिहीं सांडूनि भूमंडळा । मग पाताळा वसविलें ॥७०॥
रमनकद्वीप सिंधुपोटीं । जेथें वसिजेत कर्कोटीं । त्यांतें भक्षी गरुड हठीं । महासंकटीं पडिले पै ॥७१॥
तिहीं कश्यपा कथूनि श्रम । भयें गरुडासि केलें साम । तेणें दाऊनि दिधला द्रुम । नेमिला नेम उभयतां ॥७२॥
यया वनस्पतीच्या मुळीं । तुम्हीं समस्तीं मिळूनि व्याळीं । आपुलाली येतां पाळी । द्यावा बळि गरुडातें ॥७३॥
ऐशी प्रतिमासीं पन्नकीं । बलिअर्पणीं न कीजे चुकी । गरुड निर्वैर तुमचे विखीं । हें निष्टंकीं नेमिले ॥७४॥
गरुडासि निरूपिलें भोजन । दिव्य फळें दिव्य पक्वान्न । तैं अर्पिती सर्पजन । मृत्युपासून निर्भय ॥७५॥
अथवा गरुडासी भक्ष्यरूप । प्रतिमासीं एकैक सर्प । अर्पूनि वनस्पती समीप । निर्विकल्प नांदिजे ॥७६॥
नागांसि निरूपिलें हें पूर्वीं । तैसें वर्ततां सर्वत्र सर्वीं । कालिय नायके महागर्वीं । वारितां दर्वींकर सारे ॥७७॥

स्वं स्वं भागं प्रयच्छंति नागाः पर्वणि पर्वणि । गोपीथायात्मनः सर्वे सुपर्णाय महात्मने ॥३॥

नाग आपुलाले भाग । मासानुक्रमें अर्पिती साङ्ग । आपुल्या रक्षणाकारणें चांग । नेम अभंग चालविती ॥७८॥
गरुड विष्णूचें वाहन । विशेष महर्षिनंदन । तेणें जिंकिले सुपर्वाण । तो सुपर्ण माहात्मा ॥७९॥
शरणागता संरक्षण । दुष्टां दुर्मदां दंडन । या विचारें अभयदान । दिधलें संपूर्ण सर्पांसी ॥८०॥
त्या गरुडातें सर्पीं सर्वी । भाग अर्पितां पर्वीं पर्वीं । त्यातें न मानी कालिय गर्वीं । भंगिला पूर्वीं कृतनेम ॥८१॥

N/A

References : N/A
Last Updated : May 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP