विषवीर्यमदाविष्टः काद्रवेयस्तु कालियः । कदर्थीकृत्य गरुडं स्वयं तं बुभुजे बलिम् ॥४॥

परम दुर्जर ज्याचें गरळ । तैसें उग्र ज्याचें बल । दोहीं मदें प्रचंड व्याळ । महाप्रबळ मातला ॥८२॥
काद्रवेय तो कद्रुतनय । गरुडा लेखूनि तृणप्राय । नागीं अर्पिलें उपहार्य । भक्षी स्वयें अवघें तें ॥८३॥
आपण कदापि नेदी कांहीं । पर्वीं अर्पिती इतर अहि । बळेंचि भक्षी तें अवघेंही । गरुडा कांहीं न गणूनी ॥८४॥
नाग म्हणती कालियासी । गरूडकृत नेमा भंगिसी तुझिया द्वेषें तो आम्हांसी । समस्तांसी भक्षील ॥८५॥
कालिय नायके त्यांचें वचन । मग ते गरुडासि गेले शरण । कालिय टाकिला निवडून । सर्वां कल्याण चिंतिलें ॥८६॥

तच्छ्रुत्वा कुपितो राजन्भगवान्भगवत्प्रियः । विजिघांसुर्महावेगः कालियं समुपाद्रवत् ॥५॥

ज्याचें अचिंत्य ऐश्वर्य । त्या हरीच्या गरुड प्रिय । नागीं निवेदिताम अनार्थ । शत्रु कालिय तो मानी ॥८७॥
अभय ओपूनि इतरां नागां । पर्वणि अर्पिती जे स्वभागा । कालिय आणूनि समरंगा । दुर्मदभंगा प्रवर्तला ॥८८॥
कालियाची मानहाणी । करावया अंतःकरणीं । क्रोधें क्षोभूनि गगनींहूनी । झड मारूनि उतरला ॥८९॥
रिघोनि कालियाचे सदनीं । बळें कवळूं पाहे चरणीं । हें देखोनि समरांगणीं । महाफणी मिसळला ॥९०॥

तमापतंतं तरसा विषायुधः प्रत्यभ्ययादुच्छ्रितनैकमस्तकः ।
दद्भिः सुपर्णं व्यदशद्ददायुधः करालजिह्वोच्छ्वसितोग्रलोचनः ॥६॥

यावा देखोनि खगपतीचा । प्रचंड क्रोध कालियाचा । वर्षाव करीत विषशास्त्राचा । गरुडासन्मुख धांवला ॥९१॥
अनेक मस्तकें उभारूनी । कडकडा झोंबे गरुडाचरणीं । दंतायुध ऊर्मी । नेत्रद्वारें धूम्र व्योमीं । प्रलयरूप कोंडला ॥९३॥
प्राणिमात्रासि प्रळयकाळ । क्रोधें करितां कालियव्याळ । तें देखोनि विनताबाळ । क्षोभें तात्काळ खवळला ॥९४॥

तं तार्क्ष्यपुत्रः स निरत्यमन्युमान् प्रचंडवेगो मधुसूदनासनः ।
पक्षेण सव्येन हिरण्यरोचिषा जघान कद्रूसुतमुग्रविक्रमः ॥७॥

देखोनि कालियाचें उत्थापन । ज्यावरी मधुसूदनाचें आसन । तया गरुडाचा आवेश गहन । जैसा कृशान प्रलयींचा ॥९५॥
तप्तचामीकराची कांति । त्या सव्यपक्षें सर्पाप्रति । क्षोभें हाणितां निष्ठुर घातीं । कद्रूसंतति व्याकुळ ॥९६॥
उतरोनि गेला मदाभिमान । धैर्य विक्रम हारपोन । मरणावीण न चुके आन । महानिर्वाण ओढवलें ॥९७॥
तेव्हां आठविला हृदयीं पिता । तेणें रहस्य स्मरलें चित्ता । रिघोनि कालिंदीआतौता । पळे कृतांतापासुनी ॥९८॥

सुपर्णपक्षाभिहतः कालियोऽतीव विह्वलः । ह्रदं विवेश कालिंद्यास्तदगम्यं दुरासदम् ॥८॥

सोडूनि द्वीप रमणक । यमुना वसवी कां पन्नक । या प्रश्नाचा विवेक । तुज सम्यक कलला कीं ॥९९॥
सांडूनि दुर्गम नागभुवन । यमुनाह्रदीं विशेष कोण । या प्रश्नाचें निरूपण । ऐकें येथून कुरुवर्या ॥१००॥
अवघ्या सर्पांवेगळें काय । केलें येणेंचि अनार्य । त्याचा कथिला अभिप्राय । तो तुज प्रत्यय आला कीं ॥१॥
गरळें न जळेचि खगपति । चरणचंचुपुटें दंतीं । काळयाची खुंटली शक्ति । महाविपत्ति पावला ॥२॥
गरुड प्रतापें हाणितां झडे । नखीं विदीर्ण होती फडे । चंचुप्रहाराभेणें दडे । पळे चहूंकडे घाबिरा ॥३॥
पक्ष हाणितां निश्चेष्टित । म्हणे मांडला निर्वाणमृत्य । तंव पितृस्मरणें अकस्मात् । निर्भय एकांत सूचला ॥४॥
अगम्य गरुडातें जें स्थान । तें आठवलें दैवेंकरून । हृदयकमळीं विवंचून । गरुडापासून पळाला ॥१०५॥
सिंधु लंघूनि दाटोदाटीं । प्रवेशूनि यमुनापोटीं । चुकवूनि गरुडभयाची घरटी । ह्रदापोटीं तो वसला ॥६॥
ऐसें ऐकोनि विचक्षण । पुन्हा परीक्षिति करी प्रश्न । गरुडा अगम्य कोणतें स्थान । तें विवरून मज सांगा ॥७॥
गरुडाआंगींची प्रतापशक्ति । जाणोनि सुर नर असुर भिती । केसरिगंधें कुंजरपंक्ति । जेवीं न धरिती आंगवणें ॥८॥
जो विष्णूचा पक्षपाती । लोकत्रयीं अमोघ गति । दुर्गम ऐशिया गरुडाप्रति । कोणे उक्ति स्थळ कोण ॥९॥
ऐसें पुसतां मात्स्यीवत्सें । कल्पद्रुम जो याचकइच्छे । संशयरुग्णाचे चिकित्से । धन्वंतरि जो दुसरा ॥११०॥
तो निरूपी व्यासतोक । म्हणे कुरुमंडना हें ऐक । विष्णु वाहे श्रीवत्सांक । आज्ञाधारक जयाचा ॥११॥
आज्ञा लंघूं न शके हरि । तेथ गरुडाची कायसी थोरी । ज्यांच्या आशीर्वादावारी । दासी करी लक्ष्मीसी ॥१२॥
ऐसे ब्राह्मण तपोधन । जैसे प्रलयहुताशन । शापज्वाळा प्रज्वळून । क्षोभें त्रिभुवन जाळिती ॥१३॥
प्रसन्न तरी जे जगत्पति । लक्ष्मीसहित हाती देती । ईश्वराची ऐश्वर्यप्राप्ति । ज्यांचे भक्तीस्तव जोडे ॥१४॥
ऐशिया ब्राह्मणांचा शाप । ऐकोनि गरुडासी चळकांप । यास्तव ययुनाह्रदीं सर्प । निर्भयरूप राहिला ॥११५॥
तो तूं म्हणसी ब्राह्मण कोण । काय शापासि कारण । तें संक्षेपें इतिहासकथन । करीं श्रवण सर्वज्ञा ॥१६॥

N/A

References : N/A
Last Updated : May 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP