इति वेणुरवं राजन् सर्वभूतमनोहरम् । श्रुत्वा व्रजस्त्रियः सर्वा वर्णयन्त्योऽभिरेभिरे ॥६॥

ऐसा वेणूचा सुधारव । राया ऐकतां प्राणी सर्व । विसरोनि गेले देहभाव । सुख वास्तव भजिन्नले ॥१४॥
कृष्णवेणूच्या सुधास्वनें । सर्वभूतांचीं हरैलीं मनें । मग तीं सहजचि उन्मनें । सच्चित्सुखघनें वेधलीं ॥११५॥
कृष्ण केवळ परब्रह्म । तेथें प्रकटतां नादब्रह्म । विरोनि भूतभेदाचा भ्रम । अभेद आब्रह्म समाधि ॥१६॥
अनाहत ध्वनींचें लक्ष । धरोनि योगी साधिती मोक्ष । तें एथ नादब्रह्मचि प्रत्यक्ष । विश्वीं अपरोक्ष प्रकाशी ॥१७॥
तृषितांमुखीं बळेंचि सुधा । रिघोनि तृषेची हरी बाधा । तें ते पात्र अमरानंदा । होवोनि खेदा न त्यजिती ? ॥१८॥
किंवा गोरक्षकांचिये वदनीं । बळेंचि प्रकटे निजमजननी । तैं ते बृहस्पतीचिया श्रेणी । जिणोनि गुरुपणीं न तोषती ? ॥१९॥
तेवीं ब्रह्मरसाचा सुधोद्गार । हरितां सर्वभूतांतर । ब्रह्मानंद चराचर । भोगी विकार विसरोनी ॥१२०॥
ऐशी श्रीकृष्णसुधाध्वनि । ऐकोनि गोपिका व्रजःभुवनीं । नटवरवपु भरोनि ध्यानीं । सर्वांकरणीं हरि रुचला ॥२१॥
मग त्या सम सुकृता सर्वी । समवयस्का समानुभवी । समरस प्रेम गुणगौरवीं । वासुदेवीं अभिरमती ॥२२॥
रमत्या जाहल्या सर्वप्रकारीं । कैशा म्हणसी राया जरी । परमानंदमूर्ति श्रीहरि । अभ्यंतरीं आकळिती ॥२३॥
कृष्णक्रीडागुणानुकथनें । विरहश्रृंगाररसवर्णनें । परमानंदा आलिंगनें । स्वचैतन्यें अभिरमती ॥२४॥
तेंचि कैसें अभिवर्णन । तेरा श्लोकीं शुक भगवान । निरूपील तें सावधान । श्रोते सर्वज्ञ परिसोत ॥१२५॥

गोप्य ऊचु :- अक्षण्वतां फलमिदं न परं विदामः सख्यः पशूननु विवेशयतोर्वयस्यैः ।
वक्त्रं व्रजेशसुतयोरनुवेणु जुष्टं यैर्वा निपीतमनुरक्तकटाक्षमोक्षम् ॥७॥

परस्परें मिळोनि गोपी । ज्या वेधल्या परमानंदरूपीं । कृष्णविलासक्रीडाकल्पीं । विरहजल्पीं जल्पती ॥२६॥
गोपी म्हणिजे सप्रेमळ । अद्यापि त्यांचा विरहरोळ । भगवद्गीते तो श्रीगोपाळ । बोधी प्रांजळ पार्थातें ॥२७॥
मच्चित्ता मद्गतप्राना । परस्परें बोधिती जाणा । कथिती नित्यत्वें मद्गुणां । संतोषोनि अभिरमती ॥२८॥
गोपी म्हणती अवो साजणी । महद्भाग्य हें डोळसपणीं । याहूनि देखणेपणाची धणी । कोण उमाणी ब्रह्मांडी ॥२९॥
प्रियदर्शनें नेत्र सफळ । नेत्रवंतां हें दुर्लभ फळ । अन्य न जाणों केवळ । याहूनि विशाळ दृक्सुख ॥१३०॥
करणद्वारा अंतःकरणीं । प्रियवैशिष्ट्यें भजती प्राणी । नेत्र सफळ तद्दर्शनीं । हा चित्सुखखाणी श्रीकृष्ण ॥३१॥
इष्ट मित्र दुहिता पुत्र । भर्ता अथवा मातापितर । यांच्या दर्शनें निवती नेत्र । मा हा चिन्मात्र श्रीकृष्ण ॥३२॥
सकळ प्रियदर्शनाची सीमा । तो हा श्रीकृष्णपरमात्मा । डोळसपणें आलिया जन्मा । भाग्यमहिमा दुर्लभ हा ॥३३॥
तेंचि भाग्य कैसें म्हणसी । वना जातां गोगोपेंशीं । रामकृष्णांचा वदनशशी । जिहीं चकोरप्राय प्राशिला ॥३४॥
अनुलक्षूनि वेणुरंध्र । किंचित् कुंचित कोमलाधर । मदोन्नत भृकुटिनेत्र । चंचलतर सविलास ॥१३५॥
एवंविध वदनकमळ । वना नेतां गोगोपमेळ । पाहोनि निवती जे पुण्यशीळ । जन्म सफळ तयांचें ॥३६॥
नेत्र लाधलियाचें फळ । तिहींच भोगिलें केवळ । येर जें कां दृश्य टवाळ । तें निर्फळ देखणें ॥३७॥
जिहीं रामकृष्णांचें वदन । अनुरक्त कटाक्षीं सुलक्षण । नेत्रवंतीं केलें पान । सकळ धन्य ते नेत्र ॥३८॥
बर्हापीडादि ठाणमाण । सप्रेम स्मरले कृष्णध्यान । ऐसें प्राशिती ज्यांचे नयन । म्हणती धन्य त्यां गोपी ॥३९॥
हें ऐकोनि अन्य गोपी । प्रेमें रंगोनि श्रीकृष्णरूपीं । सानुरागें विरहजल्पीं । बोलती साक्षेपीं सखियांसी ॥१४०॥

चूतप्रवालबर्हस्तबकोत्पलाब्जमालानुपृक्तपरिधानविचित्रवेषौ ।
मध्ये विरेजतुरलं पशुपालगोष्ठ्यां रंगे यथा नटवरौ क्क च गायमानौ ॥८॥

गोपी म्हणती सखियां प्रति । बलराम आणि कमलापति । विचित्र वेषींच्या लेवूनि बुंथी । बरवताती गोपसभे ॥४१॥
तेचि कैसे वेष विचित्र । आम्रप्रवाल परम पवित्र । मयूरपिच्छ जें सुनेत्र । कृतकोंटीर सुस्तबक ॥४२॥
त्यामाजीं विकसित सुढाळ कमळें । जलजें स्थलजें सकोमळें । विचित्ररंगीं रसाळ दळें । मुकुटीं माळे श्रवणींही ॥४३॥
आम्रप्रवाळ बर्होत्पळें । लावण्य वनमाळेआगळें । नीलपीतांबराच्या मेळें । एकत्र रुळे संलग्न ॥४४॥
ऐसे विचित्र वेश उजवट । ठाणमाण ठकारें नीट । गोपसभेमाजीं वरिष्ठ । शोभती उत्कट ऐश्वर्यें ॥१४५॥
जैसे रंगीं नट वरिष्ट । तैसें बळरामवैकुंठ । मुरली मधुरगायननिष्ठ । विश्व संतुष्ट रसपानें ॥४६॥
ऐशियांचे संनिधानीं । गोप बैसोनि सभास्थानीं । लावण्यरस प्राशिती नयनीं । सुकृतश्रेनिसाफल्यें ॥४७॥
हें ऐकोनि गोपी अपर । म्हणती ऐका वो सादर । काय वेणूचें सुकृतसार । तें सत्वर सांगा वो ॥४८॥

गोप्यः किमाचरदयं कुशलं स्म वेणुर्दामोदराधरसुधामपि गोपिकानाम् ।
भुंक्ते स्वयं यदवशिष्टरसं ह्रदिन्यो हृप्यत्त्वचोऽश्रु मुमुचुस्तरवो यथाऽऽर्याः ॥९॥

आम्ही ब्रह्मयाचेनि वरें । श्रीकृष्णप्रियचिकीर्षादरें । झालों गौळ्यांचीं लेंकुरें । सकामभरें हरिरक्ता ॥४९॥
म्हणोनि दामोदरची अधरसुधा । सेवनार्ह आम्हां स्निग्धां । ते आमुतें न लभे कदा । वेणु सर्वदा आस्वादी ॥१५०॥
कृष्ण भुलवूनि स्वमधुरता । स्वतंत्र सेवी अधरामृता । न धरी लोकेषणेची वार्ता । आम्ही लज्जिता विरहिणी ॥५१॥
केवळ रस मात्र अवशिष्ट । कैवल्यसुख जें परमश्रेष्ठ । श्रीकृष्णाचे चुंबूनि ओष्ठ । वेणु यथेष्ट ते सेवी ॥५२॥
पैल पहा वो साजणी । या वेणूची जनकजननी । आर्यांपरी सत्पौत्र गुणी । देखोनि मनीं संतुष्ट ॥५३॥
ज्या सरितांचें पयःप्राशन । केलें वेणूनें संपूर्ण । तेणें पावला तनुपोषण । यास्तव नंदन तयाचा ॥५४॥
कृष्णीं सप्रेम जडला वेणु । श्रीकृष्णाधरसुधेचा स्वनु । सरिता तोषल्या ऐकोन । निजनंदन हरिनिष्ठ ॥१५५॥
कमलवनें उत्फुल्लित । त्या संहृष्ट रोमांचित । कंजें स्रवती मदोदित । ते र्पशस्त हर्षाश्रु ॥५६॥
जलाश्रयीं पक्षिकुल । वेणुस्वरें झालें निश्चळ । तेणें सरिता सद्गदशीळ । शब्द पांउळ होऊनी ॥५७॥
कृष्णवेणूचा सेवूनि स्वर । ठेला जळचरीं संचार । तेणें सरिता सुखनिर्भर । वृत्ति स्थिर ज्यापरी ॥५८॥
तैसाचि जये वंशीं वेणु । जन्मोनि सेवी सप्रेम कृष्ण । म्हणोनि तरुवर आनंदोनी । वंशोद्धरण जाणोनी ॥५९॥
आपुले वंशींचा तरला कृष्णीं । म्हणोनि तरुवरव आनंदोनी । मधुधारा ज्या सोडिती धरणी । ते त्यां नयनीं हर्षाश्रु ॥१६०॥
पत्रें टवटवीत थरकती । हर्षरोमांच ते त्यांप्रति । मंद मंद जे डोलती । ते माथे तुकती सुखसौख्यें ॥६१॥
जैसे वंशीं वृद्ध आर्य वंशज देखोनि भगवत्प्रिय । अष्टभावीं आनंदमय । धन्य अन्वय मानिती ॥६२॥
हें ऐकोनि अपरा कोण्ही । गोपी म्हणती वो साजणी । स्वर्ग जाणोनि वृंदावनीं । कीर्ति अवनीं पावली ॥६३॥

वृंदावन सखि भुवो वितनोति कीर्तिं यद्देवकीसुतपदांबुजलब्धलक्ष्मि ।
गोविंदवेणुमनु मत्तमयूरनृत्यं प्रेक्षाद्रिसान्वपरतान्यसमस्तसत्त्वम् ॥१०॥

भूमिगर्भी वृंदावन । यास्तव तेंही भूसंतान । कीर्ति विस्तारी परम गहन । स्वर्गाहून धरणीची ॥६४॥
तरी तें कैसें वृंदावन । कोणा योगें कीर्ति विस्तीर्ण । भूमंडळींची स्वर्गाहून । करी संपूर्ण तें ऐका ॥१६५॥
मुख्य इतुक्या कारणास्तव । जे देवकीतनय वासुदेव । राम गोगोपसमुदाव । घेऊनि स्वयमेव क्रीडतसे ॥६६॥
मलयागराचे संगतीं । काष्ठें सांडूनि पूर्व स्थिति । दिव्यसौरभ्यें लाहोनि कीर्ति । निढळीं बैसती अमरांचे ॥६७॥
कीं स्पर्शमणीचें संस्पर्शन । निरसी लोहदशेचें दैन्य । इंद्रादिकां दिव्याभरण । तें होय कांचन देदीप्यमान ॥६८॥
तैशीं श्रीकृष्नपादकमळें । वृंदावनीं क्रीडती स्वलीलें । वैभव त्रिदिवाहूनि आगळें । भूमंडळें वरिलें पैं ॥६९॥
कृष्णचरणींच्या रेणूंसाठीं । तापस कर्मठ योगी हट्टी । साधनें करिती कोट्यानकोटी । परमसंकटीं दुर्लभ त्यां ॥१७०॥
श्रीकृष्णपादाब्जरजःकणिका । कमलाकपर्दिकंजजप्रमुखां । परम दुर्लभ सनकादिकां । वृंदारका कैंची ते ॥७१॥
ते श्रीकृष्णपादाब्जलक्ष्मी । वृंदावनीं लाधली भूमि । साम्य करितां त्रिदशधामीं । अतुल व्योमीं न समाये ॥७२॥
ज्योतिष्टोमादिकें स्वर्ग । करूनि भोगिती अमरभोग । पुण्यक्षयीं अधोमार्ग । गर्भप्रसंग चुकेना ॥७३॥
निष्काम पुण्याचिया श्रेणी । तैं वैराग्य विषयाचरणीं । कर्मत्यागें स्वचिंतनीं । कैवल्यसदनीं समरसती ॥७४॥
परम दुर्लभ ब्राह्मणयोनि । त्यामाजीं दुर्लभ विहिताचरणी । त्याहूनि दुर्लभ उभयभुवनीं । विरक्त होऊनि निवृत्त ॥१७५॥
या वेगळ्या सर्व याति । त्यांची चुकेना पुनरावृत्ति । ऐशी दुर्लभ कैवल्यप्राप्ति । ते सुलभ ये क्षितीं सर्वांतें ॥७६॥
कृष्ण केवळ कैवल्यधाम । वृंदावनीं क्रीडाकाम । पाहतां वृत्तीचा उपरम । सहजचि कर्मनिवृत्ति ॥७७॥
जें वैराग्य दुर्लभ जनीं । सर्व सत्त्वांतें वृंदावनीं । कर्मीं निवृत्त होऊनी । सप्रेम कृष्णीं अनुरक्त ॥७८॥
कृष्णवेणूचा मधुर नाद । गुहागह्वरीं घुमतां मंद । मेघ मानूनि श्रीगोविंद । मयूरवृंद नाचती ॥७९॥
मेघश्याम मुरलीधर । विद्युल्लता पीतांबर । मेघगर्जना वेणुस्वर । मानूनि मयूर नाचती ॥१८०॥
उन्मत्तमयूरनर्तन । देखोनि समस्त प्राणिगण । स्वकर्मसंन्यस्त होऊन । कृष्णीं उमन वेधती ॥८१॥
खेचर भूचर स्थावर जंतु । पृथक् पृथक् एकीभूत । शिखरोशिखरीं कर्मनिवृत्त । वेणुस्वनित सेविती ॥८२॥
ऐशी वृंदावनींच्या ठायीं । कैवल्यसुखाची नवाई । सर्वीं सुलभ तेणें मही । स्वर्गाहुनीही प्रख्यात ॥८३॥
कृष्णचरणांचेनि लाभें । वृंदावनीं पावली शोभें । ते भूकीतींचिये प्रभे - । पुढें न शोभे स्वर्गादि ॥८४॥
वृंदावन ऐशियापरी । कीर्ति पृथ्वीची विस्तारी । तंव आणिकी गोपनारी । सप्रेमभरी बोलती ॥१८५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP