अध्याय २१ वा - श्लोक ११ ते १५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
धन्याः स्म मूढमतयोऽपि हरिण्य एता या नंदनंदनमुपात्तविचित्रवेषम् ।
आकर्ण्य वेणुरणितं सहकृष्णसाराः पूजां दधुर्विरजितां प्रणयावलोकैः ॥११॥
ऐका सखिया हो कौतुक । योनि पावोनिही तिर्यक् । इह जन्माचें सार्थक । केलें सम्यक् तें ऐका ॥८६॥
पहा वो पैल कुरंगयुवति । तिर्यग्योनि मूढमति । वेणु ऐकोनि शीघ्रगति । कृष्णाप्रति अनुसरल्या ॥८७॥
जो कां नंदाचा नंदन । नटवरवेश करूनि ग्रहण । मिरवी विचित्रलावण्य । वणि धन्य निरखिती ॥८८॥
वेणुवेधें तन्मयचित्त । कांतासहित विकल्परहित । विनयपूर्वक अवलोकित । श्रीकृष्णनाथ पूजिती ॥८९॥
आपुल्या नेत्रांचें लावण्य । कृशःणनयनेंशीं तुळितां गौण । विशेष परिसोनि वेणुगान । तनुमनप्राणें वेधल्या ॥१९०॥
आविर्भवती अष्टभाव । तेंचि तयांचें पूजाद्रव्य । प्रणयसन्मान गौरव । इहीं केशव पूजिती ॥९१॥
यालागीं यांचें सार्थक जन्म । आमुचें कर्म याहूनि विषम । आमचे भर्तार क्षुद्र परम । आत्माराम नोळखती ॥९२॥
कृष्णीं आमुचें प्रेम गहन । देखों न शकती बल्लवगण । मा प्रत्यक्ष पूजितां नंदनंदन । घेती प्राण सक्रोधें ॥९३॥
गोपी बोलती ऐशा एकी । हें ऐकोनि म्हणती आणिकी । याहूनि आश्चर्य देवलोकीं । नंदतोकीं दाविलें ॥९४॥
कृष्णं निरीक्ष्य वनितोत्सवरूपशीलं श्रुत्वा च तत्क्क्णितवेणुविचित्रगीतम् ।
देव्यो विमानगतयः स्मरनुन्नसारा भ्रश्यत्प्रसूनकबरा मुमुहुर्विनीव्यः ॥१२॥
मृत्युलोकींचे भुलती प्राणी । हें आश्चर्य केतुलें कृष्णीं । परी देवता भुलविल्या विमानीं । हे अगाध करणी कृष्णाची ॥१९५॥
श्रीकृष्णाचें वेणुक्कणित । नवरस सप्तस्वरसंगीत । विचित्ररगांगें मूर्च्छनायुक्त । ऐकोनि मोहित सुरवनिता ॥९६॥
वेणुश्रवणें मोहित पोटीं । सादर होवोनि पाहती दृष्टीं । श्रीकृष्णाची अंगयष्टि । मन्मथकोटी लावण्य ॥९७॥
चटुल चाटु विचेष्टितें । सविलास कटाक्ष ईक्षितें । रूपलावण्यइंगितें । भुलवी चित्तें वनितांचीं ॥९८॥
रूपलावण्यवैभव । पाहोनि वनितांसि उत्सव । तो देखोनि वासुदेव । देवी मोह पावल्या ॥९९॥
रूपलावण्यवेणुगीता । देखोनि ऐकोनि देववनिता । विमानयानें गगनीं जातां । मोह सकांता पावल्या ॥२००॥
बसल्या असतांही निर्जराअंकीं । स्मरमोहिता एकाएकीं । धैर्यें सांडवल्या कामुकी । स्थितिवोळखी मूकल्या ॥१॥
तींचि ऐका मोहचिह्नें । कबरी सुटोनि विखुरलीं सुमनें । फिटोनि गेलीं परिधानवसनें । परी निजमनें नेणती ॥२॥
कृष्णविलासें निर्जरवनिता । जालिया ऐशा स्मरमोहिता । आणिकी श्रीकृष्णाच्या चरिता । आश्चर्यता वर्णिती ॥३॥
गावश्च कृष्णमुखनिर्गतवेनुगीतपीयूषमुत्तभितकर्णपुटैः पिबन्त्यः ।
शावास्नुतस्तनपयःकवलाः स्म तस्थुर्गोविंदमात्मनिदृशाऽश्रुकलाः स्पृशन्त्यः ॥१३॥
देवी मन्मथविलासचतुरा । कृष्णलावण्या मुरलीस्वरा । भुलोनि जालिया स्मरातुरा । आश्चर्य न करा येविषयीं ॥४॥
परंतु पशुयोनि या गाईं । तैशींच तान्हीं वांसुरें तींही । श्रीकृष्णनादरूप जें परमामृत । सेविती समस्त गोवत्सें ॥६॥
झणें क्षरेल पृथ्वीवरी । म्हणोनि उभारल्या कर्णविवरीं । विमुख विस्मृत निजव्यापारीं । प्राशन करीत होत्सातीं ॥७॥
तृणकवळें त्यजिती धेनु । वेणुगीतामृता वेधून । विशेष वत्सें मुखींचे स्तन । करितां प्राशन सोडिती ॥८॥
क्षुधित होत्सातीं वांसुरें । स्तन प्राशिती अत्यादरें । अकस्मात वेणुस्वरें । वेधितां न स्फुरे पयःपान ॥९॥
ते पयाचे कवळ तैसेचि वदनीं । मुखें स्तनींचीं आसंडोनि । नादामृत रुचलें मनीं । तैं सेविती कर्णीं उभारल्या ॥२१०॥
करितां क्षुधितही स्तनपान । त्याहूनि विशेष कृष्णगान । रुचतां वेधलें तनुमन । देहभान मग कैंचें ॥११॥
वृत्तिवेधाचें कारण । नेत्रद्वारा प्राशूनि कृष्ण । मनें देतां आलिंगन । सोडिती नयन हर्षाश्रु ॥१२॥
म्हणोनि तटस्थ गाईवत्सें । उत्तंभित कर्णपुच्छें । कृष्णप्रेमापुढें तुच्छें । अपरें सौख्यें कुत्सितें ॥१३॥
अमृतापुढें मृगजळपान । तैसें विषयसुखाचें भान । कृष्णप्रेमापुढें गौण । जानोनि निमग्न तद्रसीं ॥१४॥
तंव आणिका गोपकामिनी । म्हणती परिसा अहो जननी । कृष्णप्रेमें महामुनि । पक्षी ये वनीं जाहले ॥२१५॥
प्रायो बतांब विहगा मुनयो वनेऽस्मिन् क्रुष्णेक्षितं तदुदितं कलवेणुगीतम् ।
आरुह्य ये द्रुमभुजान् रुचिरप्रवालान् शृण्वन्त्यमीलितदृशो विगतान्यवाचः ॥१४॥
गोपी म्हणती अहो आई । कृष्णवेणुगीतनवाई । पक्षी वेधले ठायींच्या ठायीं । होती काई मुनिवर हे ॥१६॥
बहुतकरोनि गमतें मनीं । पक्षी होऊं शकती मुनि । उपलक्षिजे उपलक्षणीं । क्रियाचरणीं समसाम्य ॥१७॥
फलपुष्पादि आशारहित । वृक्ष कोमल प्रवाळवंत । तयांच्या शाखावरी स्वस्थ । दर्शनासक्त श्रीकृष्णीं ॥१८॥
कृष्ण अधरामृतेंकरून । विस्तारितां वेणुगान । तद्रसाचें करिती पान । होती उन्मन सुखलाभें ॥१९॥
कृष्णस्वरूपीं वेधले नयन । वेणुगायनें मन उन्मन । तेणें होतां सुखसंपन्न । देहभान विसरले ॥२२०॥
सबाह्य कृष्णीं वेधले कैसें । उघड्या नयनीं विश्व न दिसे । कृष्णप्रेमसुखाचें पिसे । विषयसोसें सांडवले ॥२१॥
वाचा विसरली शब्दरचना । अन्य रसांतें मुकली रसना । अन्य रूप न फवे नयनां । शब्दीं श्रवणा अनोळखी ॥२२॥
वेणुगायनें मन उन्मन । तेणें झालें संकल्पशून्य । कैचें त्वचेसि संस्पर्शन । क्रियाविहीन प्राणादि ॥२३॥
तैसेचि मुनिही विषयविरक्त । श्रीकृष्णदर्शनीं परम आसक्त । काम्यनिषिद्धकर्मरहित । चित्तशुद्ध्यर्थ स्वकर्मीं ॥२४॥
फलपुष्पाढ्य सांडूनि द्रुम । कोमळ प्रवाळीं विहंगम । तेंवि वेदशाखासंस्थित कर्म । निष्कामकाम आचरती ॥२२५॥
निष्कामकर्म जें कां अमळ । ते वेदशाखेचे अफळ प्रवाळ । तदाश्रयें सर्व काळ । ध्याती गोपाळ हृत्कमळीं ॥२६॥
जैसें विहंगम वेणुगायनीं । अंतर्मुख आनंदोनी । तैसेचि मुनिही श्रीकृष्णगुणीं । सुखावोनि एकाग्र ॥२७॥
श्रवण गोवूनि अनाहतीं । अचंचल नेत्रपातीं । कृष्ण चिन्मात्र लक्षिताती । बाह्यवृत्ति उपरमे ॥२८॥
बाह्य लोपला दृश्यभाग । कृष्णमयचि झालें जग । नयनीं रंगला श्रीकृष्णरंग । भोगिती अभंत समाधि ॥२९॥
तेचि केवळ इये वनीं । पक्षी झाले गमती मुनि । उभयसाम्य उपलक्षणीं । समान कृष्णीं अनुराग ॥२३०॥
यदर्थीं सखिये नवल कोण । जें कां केवळ भगवद्गान । तें भागवत भावें श्रवण । करितां भगवान होऊं शकती ॥३१॥
कृष्णगानें कृष्णध्यान । कृष्णप्रेमरसाचें पान । रुचतां सबाह्य श्रीकृष्ण । होतां कोण आशंका ॥३२॥
कृष्णीं रतलेंचि पाहिजे मन । मग कृष्ण होणें दुर्लभ कोण । कृष्णप्रेमाचें महिमान । न्यून पूर्ण न ठेवी ॥३३॥
यालागीं या पक्षियाति । नयनें प्राशिती कृष्णमूर्ति । मनें रंगले कृष्णगीतीं । केवळ यति तपोधन ॥३४॥
मृगपश्वादि पक्षिगण । हे तों जीव सचेतन । कृष्णप्रेमें रंगले पूर्ण । नवल कोण पैं याचें ॥२३५॥
नद्यस्तदा तदुपधार्य मुकुंदगीतमावर्तलक्षितमनोभवभग्नवेगाः ।
आलिंगनस्थगितमूर्मिभुजैर्मुरारेर्गृह्णन्ति पादयुगलं कमलोपहाराः ॥१५॥
परंतु पहा वो पैल सरिता । ऐकोनियां श्रीकृष्णगीता । कृष्णप्रेमें सकामचित्ता । जाल्या व्याप्ता मन्मथें ॥३६॥
नद्यांमाजी भ्रमणशीळ । भ्रमती आवर्त विशाल । कृष्णमन्मथें व्याकुळ । चिह्नीं सकळ जाणवती ॥३७॥
कृष्णकाम भरला चित्तीं । तेणें खुंटल्या प्रवाहगति । नीरें तुंवोनि तीरें बुजती । त्या आलिंगिती कृष्णातें ॥३८॥
प्रतिबिंबित जे कृष्णमूर्ति । हृदयीं गाढ आलिंगिती । तेणें सुखें भग्नगति । आत्मस्थिति स्थिरावल्या ॥३९॥
ऊर्मिरूप पसरोनि भुजा । घेऊनि विकसितां विविधां जलजां । तीं अर्पूनि पादपूजा । हरिपादाब्जा दृढ धरिती ॥२४०॥
जैशा पतिव्रता सुंदरा । घेऊनि कुसुमादि उपचारां । जाऊनि कांताच्या शेजारा । होती सादरा पदभजनीं ॥४१॥
तैशा ऐकोनि वेणुगीता । कृष्णरूपीं वेधल्या सरिता । परमाश्चर्य गमे पाहतां । अन्य वृत्तांता परिसा वो ॥४२॥
N/A
References : N/A
Last Updated : May 01, 2017
TOP