अध्याय २२ वा - श्लोक ११ ते १५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
न मयोदितपूर्वं वा अनृतं तदिमे विदुः । एकैकशः प्रतीच्छध्वं सहैवोत सुमध्यमाः ॥११॥
जें पूर्वींच वेदोदित । माझें बोलणें नाहीं अनृत । देवांश हे गोप समस्त । इत्थंभूत जाणती ॥११०॥
प्रमादें अज्ञानें एकांतीं । घडल्या पातकाच्या निवृत्ति । ऐकोनि सर्वज्ञाची उक्ति । प्रायश्चित्तीं प्रवर्तिजे ॥११॥
श्रुति स्मृति सर्वज्ञोक्ति । दोषादोषांची व्यावृत्ति । विवरूनि जें जें निरूपिती । तें यथार्थ चित्तीं मानूनी ॥१२॥
निःशंक होऊनि अनुष्टितां । निरसे कर्मवैगुण्यता । यालागीं तुमची व्रतसाङ्गता । अच्छिद्र तत्त्वता मम वाक्यें ॥१३॥
रहसि प्रमादीं दुष्कृत । त्यासी प्रकट प्रायश्चित्त । तें हें जाणोनि प्रेमोदित । तुम्ही समस्त अनुष्ठा ॥१४॥
देहबुद्धीची शंका दुरी । सांडूनि अवघ्या या बाहेरी । तेव्हां तुमचीं व्रतें खरीं । स्वेच्छा स्वकरीं घ्या वत्रें ॥११५॥
एकी एकी पृथक् पृथाका । येऊनि वस्त्रें घ्या निःशंका । अथवा अवघ्या होऊनि एका । स्वेच्छा अंशुका स्वीकरा ॥१६॥
यदर्थीं अग्रह न करूं आम्ही । व्रतसाङ्गता लक्षूनि तुम्हीं । माझे आज्ञेचिया नेमीं । मनोधर्मीं दृढ व्हावें ॥१७॥
मध्यभाग सुष्ठु म्हणोन । सुष्ठ देखोनि सर्वाचरण । सुमध्यमा हें संबोधन । करी सर्वज्ञ गोविंद ॥१८॥
तस्य तत्क्ष्वेलितं दृष्ट्वा गोप्यः प्रेमपरिप्लुताः । व्रीडिताः प्रेक्ष्य चान्योन्यं जातहासा न निर्ययुः ॥१२॥
जेवीं नृपाचें दर्शन । दुर्लभ इच्छिती सामान्य जन । तेणें सप्रेमें लालन । करितां तनुमन आह्लादे ॥१९॥
तेंवि गोपिका कृष्णकामा । ब्रह्मांडपाळका मेघश्यामा । देखोनि त्याच्या विनोदकर्मा । मनोधर्मा भूलल्या ॥१२०॥
भगवत्कृपेच्या प्रेमरसें । निमग्र होत्सात्या निजमानसें । बाह्य स्त्रीजात्या लज्जावशें । म्हणती कैसें करावें ॥२१॥
श्रीकृष्णाच्या विनोदवचनें । आनंदनिर्भर झाल्या मनें । सलज्ज पाहती अन्योन्यवदनें । जगज्जीवनें वेधिल्या ॥२२॥
उपहासिल्या विनोदवचनीं । तेणें शंका पावल्या मनीं । बाहिर न निघती लाजोनी । यमुनाजीवनीं बैसल्या ॥२३॥
एवं ब्रुवति गोविंदे नर्मणा क्षिप्तचेतसः । आकंठमग्नाः शीतोदे वेपमानास्तमब्रुवन् ॥१३॥
ऐसें बोलत असतां हरि । विनोदें लज्जिता अभ्यंतरीं । आकंठमग्ना जलांतरीं । सहसा बाहेरी न निघती ॥२४॥
तंव तें हेमंतकाळींचें शीत । विशेष अनुदित प्रभात । सूर्योदयीं मंदवात । तेणें शीतार्त गोपिका ॥१२५॥
थरथरां कांपती शरीरें । खडखडां वाजती दांतारें । मग कृष्णातें आर्तस्वरें । मधुरोत्तरें प्रार्थिती ॥२६॥
स्त्रिय ऊचु - माऽनयं भोः कृथास्त्वां तु नंदगोपसुतं प्रियम् ।
जानीमोंऽग व्रजश्लाघ्यं देहि वासांसि वेपिताः ॥१४॥
भोः श्रीकृष्ण ऐसें म्हणती । अंग म्हणोनि संबोधिती । बद्धांजलि संप्रार्थिती । तें भूपते अवधारीं ॥२७॥
नंदनंदना तूंतें आम्ही । श्लाध्य जाणों कीं व्रजस्वामी । झणें ऐशिये अन्यायकर्मीं । मनोधर्मीं न प्रवर्ते ॥२८॥
नंदादि आम्ही व्रजनिवासी । आम्हां प्रिय तूं हृषीकेशी । म्हणोनी ऐशिये अन्यायासी । तुवां मानसीं न धरावें ॥२९॥
व्रजपतीचा तूं नंदन । तुवां करावें व्रजपालन । तेणें करूनि श्लाघ्यपण । करितां छलन अन्याय ॥१३०॥
तस्करीं कीजे वस्त्राहरण । नृपें करावें त्यांचें दमन । करूनि दुःखाचें उपशमन । प्रजापालन सुखदानें ॥३१॥
तो तूं हरूनि आमुच्या चीरा । अनयसंमत होऊनि चोरां । शीतार्दितां दुःखपरां । पाहणें श्रीधरा उचित कीं ॥३२॥
येणें श्लाघ्यत्व न राहे । म्हणोनि न करीं हा अन्याय । आतां आमुतें सुखद होय । कृपेनें पाहें निजपोष्यां ॥३३॥
शीतें कांपतसों थरथरां । शंका जाकळी मंदवारा । वस्त्रें देईं करुणाकरा । ऐशा सुंदरा विनविती ॥३४॥
अस्पृष्टयौवना मुग्धा नारी । तिहीं विनविला ऐसा हरि । आतां प्रौढा ज्या गोपकुमारी । त्यांची वैखरी अवधारा ॥१३५॥
श्यामसुंदर ते दास्यः करवाम तवोदितम् । देहि वासांसि धर्मज्ञ नोचेद्राज्ञे ब्रुवामहे ॥१५॥
प्रौढा म्हणती दामोदरा । श्यामसुंदर मनोहरा । आम्ही किंकरी आज्ञाधारा । जाणोनि करा आज्ञेतें ॥३६॥
तुझी आज्ञा वंदूनि शिरीं । सत्य मानीं हे वैखरी । आमुचीं वस्त्रें देईं हरि । धर्म विचारीं धर्मज्ञा ॥३७॥
आम्हां स्त्रीजातीचें जिणें । लोकीं अश्लाघ्य वस्त्रांविणें । तूं जाणसी सर्वज्ञपणें । काय सांगणें तुज आम्हीं ॥३८॥
तुजसारिखा धर्मवेत्ता । आणिक न देखों तत्त्वता । सर्व परिज्ञाता । कीं नेणसी वृत्तांता आमुचिया ॥३९॥
याहीवरी करिसी रळी । वस्त्रें न देतां वनमाळी । आम्ही सांगों रायाजवळी । वाढेल कलि तैं थोर ॥१४०॥
ऐसें ऐकिल्या नंदरायें । तेव्हां तुझें महत्त्व काय । विशेष कंसाचेंही भय । झणें हें होय त्या विदित ॥४१॥
एवं ऐकोनि गोपीवचना । षड्गुणैश्वर्याचा राणा । वेधी तयांच्या अंतःकरणा । धर्माचरणा बोधूनी ॥४२॥
N/A
References : N/A
Last Updated : May 01, 2017
TOP