इति प्रवालस्तबकफलपुष्पदलोत्करैः । तरूणां नम्रशाखानां मध्येन यमुनां गतः ॥३६॥

ऐसे द्रुमांचे सद्गुण । सदयसज्जनेंशीं उपमून । पथीं चालतां द्रुमांमधून । स्वमुखें भगवान प्रशंसी ॥२९०॥
सदय रसाळ कोंवळे । विनयनम्रतेंकरूनि लवले । अभेदबोधार्जवें सरळे । जे फुलले सुकृतौलीं ॥९१॥
निर्मळ सत्क्रियाप्रवाळ । वाड्माधुर्यें सकोमळ । सुरभिसत्कीर्ति सुपरिमळ । सदय घोंसाळ सुशांत ॥९२॥
ऐशिया निबिड पादपीं हरि । प्रवेशोनि गोगोपभारीं । अभेदभक्ति यमुनातीरीं । स्वानंदगजरीं पातले ॥९३॥

तत्र गाः पाययित्वाऽपः सुमृष्टाः शीतलाः शिवाः । ततो नृप स्वयं गोपाः कामं स्वादु पपुर्जलम् ॥३७॥

मग ते यमुनेचिये ठायीं । सप्रेमजळीं पाजिल्या गायी । सुमृष्टा सुखावल्या पाहीं । शीतळ देहीं सुशांता ॥९४॥
शिवा म्हणिजे कल्याणवती । सुमंगला गोधनपंक्ति । प्राशितां यमुना अभेदभक्ती । निजविश्रांति पावल्या ॥२९५॥
ऐकें परीक्षिति नरपालका । सेवितां सप्रेम यमुनोदका । गाई पावल्या अक्षय सुखा । तो महिम असिका आपाचा ॥९६॥
भक्तियमुनेचें विशुद्धजळ । सुमृष्ट सबाह्य निर्मळ । तापत्रयहर सुशीतळ । परम मंगळ शिवरूप ॥९७॥
गज गणिका कां अजामिळ । ऐसे अनेक जे कां समळ । तिहीं सेवितां जेथींचें जळ । झाले निर्मळ सुमृष्ट ॥९८॥
कदर्यादि त्रितापतप्त । तयांसि होतां जें जल प्राप्त । झाले सुशीतल संतृप्त । पुन्हा अलिप्त भवतापा ॥९९॥
भेद तितुका अमंगळ । तो हा संसार दावानळ । सप्रेमभक्ति यमुनाजळ । करी मंगळ मज्जनें ॥३००॥
ऐशा सुमृष्ट शीतळ शिवा । आपा पाजूनि गोरुवां । रामकृष्ण प्राशिती तेव्हां । सहित अवघा गोपगण ॥१॥
रसाळ शीतळ अमृतवारि । यथास्वेच्छा कैटभारि । बलरामेंशीं गोपभारीं । प्राशूनि उपवनीं पातले ॥२॥

तस्या उपवने कामं चारयंतः पशून् नृप । कृष्णरामावुपागम्य क्षुधार्ता इदमब्रुवन् ॥३८॥

मग ते यमुनेचे उपवनीं । पशु स्वेच्छा स्वादु तृणीं । चारित असतां गोपगणीं । केली जाचणी क्षुधेनें ॥३॥
सुबळ आणि स्तोककृष्ण । अंशु श्रीदामा अर्जुन । ऋषभ विशाळ विवस्वान । देवप्रस्थ वरूथप ॥४॥
इत्यादि संवगडियांचा मेळा । क्षुधार्त होतां मध्याह्नकाळा । समीप येऊनि रामगोपाळां । कथिती सकळा वृत्तांत ॥३०५॥
म्हणती ऐकें गा श्रीहरि । आम्हां न घेतां सिदोरी । घेऊनि आलासि सत्वरीं । गोपकुमारी ठकावया ॥६॥
गोपकुमारींच्या उपहास्यें । आम्हां गोविलें कौतुकावेशें । पुढां तैसेच सुखसंतोषें । गोधनासरिसे विहरलों ॥७॥
नुगवतांच पुरता दिन । गोपकुमारी पाहिल्या नग्न । यास्तव आम्हां न मिळे अन्न । क्षुधेनें प्राण जाताती ॥८॥
कृष्णा तुझें जें जें करणें । तें तें तुजसी श्लाघ्यवाणें । आम्ही विचंबू जिवें प्राणें । तुज कारुण्यें कींव भाकूं ॥९॥
प्रभातें गोपी दाविल्या नग्न । तेणें आम्हांसि आजि लंघन । आतां कृष्णा देईं अन्न । वांचवीं प्राण क्षुधितांचे ॥३१०॥
ऐशी गोपाळमंडळी । येऊनि रामकृष्णांजवळी । क्षुधापहरणार्थ ते काळीं । करिती बोली ते ऐका ॥११॥
शुक म्हणे गा कुरुपुंगवा । कृष्णपवाडा नित्य नवा । ऐकतां तृप्ति न बणे जीवा । पुढें परिसावा वाटे कीं ॥१२॥
हें ऐकोनि मुनीचें वचन । परमानंदें नित्य निमग्न । म्हणे जाणसी माझें मन । सर्वज्ञ पूर्ण तूं योगी ॥१३॥
इतुकी कथा निरोपूनी । संपली द्वितीया एकादशिनी । पुढिले कथेच्या व्याख्यानीं । द्यावें सज्जनीं अवधान ॥१४॥
यज्वपत्न्यांसि अनुग्रहण । याज्ञिकांचें मदापहरण । अन्न याचवूनि रमारमण । करील पूर्ण तद्व्याजें ॥३१५॥
तो तेविसावा अध्याय पुढां । व्यासऔरस नृपापुढां । सांगेल तेथींचा अर्थ उघडा । बोलीं बोबड्या वदिजेल ॥१६॥
तयाचे श्रवणीं श्रद्धावंत । अपारसुकृती सादर संत । देखोनि सद्गुरु आज्ञापित । स्वानंदभरित निजवदनें ॥१७॥
भूवैकुंठप्रतिष्ठानीं । शांतिसुखाचे सिंहासनीं । साधनसंपन्ननिर्जरगणीं । जो अनुदिनीं सुपूज्य ॥१८॥
चिदानंदाचीं भूषणें । त्यांवरी स्वानंदाचीं सुमनें । गोविंदपादांबु सांठवणें । पूर्ण करणें दयार्णवा ॥१९॥
तया एकनाथाचिया तीर्था । तीर्थें वोडविती माथा । अघौघहारिणी ते हे कथा । अखिलपुरुषार्थदायिनी ॥३२०॥
श्रवणें करितां इचें पान । ओपी कैवल्यसोपान । तुच्छ करूनि सोमपान । म्हणवी धन्य सुरपूज्य ॥२१॥
तें हें श्रीमद्भागवत । महापुराण विख्यात । अष्टादशसहस्रगणित । रमती तेथ परमहंस ॥२२॥
त्यांतील हा दशमस्कंध । कात्यायनीव्रत प्रसिद्ध । गोपीवस्त्रापहरण विशद । अध्याय शुद्ध बाविसावा ॥२३॥
दयार्णवाची इतुकी विनति । सप्रेमश्रीकृष्णचरणीं रमती । रंगोनि श्रवणीं सादर होती । ते नाकळती कळिकाळा ॥२४॥
अभीष्टलाभाचें भाजन । तेचि होती धन्यमान । कृष्णप्रेमें ज्यांचें मन । श्रवणीं रंगोनि सुख भोगी ॥३२५॥
इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां कात्यायनीव्रतगोपीवस्त्रापहरणं नाम द्वाविंशतितमोऽध्यायः ॥२२॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥३८॥ टीका ओव्या ॥३२५॥ एवं संख्या ॥३६३॥ श्रीगुरुशिवाय नमः ॥ ( बाविसावा अध्याय मिळून ओवीसंख्या ११६५० )

बाविसावा अध्याय समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : May 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP