अध्याय २४ वा - आरंभ
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
श्रीगोविंदपरब्रह्मणे नमः ॥
भवविरागें विभवप्रदा । निर्विकारा आनंदकंदा । चिदात्मका चिन्मकरंदा । नमो गोविंदा सद्गुरो ॥१॥
करणहरिणां भवमृगजल । वृथा भासोनि भ्रमवी पघळ । तदर्थ धांवतां कोरडे माळ । करिती तळमळ विकळत्वें ॥२॥
बैल वोढितां गाडा पुढें । आरूढा तैसेंचि जाणें पडे । करणनिर्दिष्टविषयचाडे । तेंचि अवघडे चैतन्य ॥३॥
अनादिमुक्तता विसरूनी । देहात्मता पांघरोनी । पवाडे बाह्यविषयाचरणीं । साचारपणीं सुखलाभें ॥४॥
ऐशिया अनंतजन्मखेपा । करूनि भोगितां पापतापा । जेव्हां तुजला येईल कृपा । तैं विवेकदीपा उजळिसी ॥५॥
विवेकें उजळतां अभ्यंतर । उपजे सत्संगीं आदर । सत्कथाश्रवणीं स्फुरे विचार । तैं असाचार भव उमजे ॥६॥
फिटतां रुपेपणाची भ्रांति । कोणा रुचती फुकटा शुक्ति । इहामुष्मिकविषयांप्रति । तेंवि विरक्ति मिथ्यात्वें ॥७॥
साउली भावूनि निजशरीर । कवळूं धांवतां शिणले फार । तया श्रमाचा परिहार । निजांगें साचार उमजतां ॥८॥
श्रमनिरासें आनंदमात्र । पूर्वींच आहे कीं सवतंत्र । ऐसें अभेदीं भेदचरित्र । दाविसी विचित्र नटनाट्यें ॥९॥
तया नमो गोगोपका । श्रीगोविंदा विश्वात्मका । सप्रेमभजनें मनःशशांका । प्रमेयपीयूखा अभिवृद्धि ॥१०॥
विनयभावें लोटांगणीं । संतां विनवीं जोडूनि पाणि । मज गोविंदें तुमच्या चरणीं । निजनिर्याणीं निरविलें ॥११॥
सौम्यवत्सरीं शरत्काळीं । जरिका प्रकटली भूमंडळीं । तेणें तनू विकळ झाली । म्हणोनि अंतरली पंढरी ॥१२॥
भूमंडळीं वलयांकित । मनुष्यमात्र जरिकाग्रस्त । मास पक्ष रात्री सप्त । झाले व्याप्त ज्वरशीतें ॥१३॥
मग कार्तिकशुद्धपक्षीं । प्रयाण केलें पंढरीसी । तैं कात्यायनीव्रतव्याख्येसी । मार्गीं जातां विवरिलें ॥१४॥
तंव येरीकडे मार्गशिर । शुद्धतृतीया बुधवार । शूळयोग मूळनक्षत्र । अरुणोदयीं शुभवेळे ॥१५॥
वंजरे समीप उत्तरे ग्राम । खळविरें ऐसें जयासि नाम । तेव्हां तेथ कैवल्यधाम । सद्गुरुनाथें स्वीकेलें ॥१६॥
चंद्रमंडळामाजि गुरु । गगनीं झाले जैं एकत्र । तेव्हां गोविंदें स्थूल गात्र । सोडूनि चिन्मात्र निवडिलें ॥१७॥
मास एक अनशनव्रत । केलें घेऊनि प्रायश्चित्त । अभ्यासमार्गें स्वानंदभरित । निजएकांत पावले ॥१८॥
तयेसमयीं माझें स्मरण । करूनि संतांसि निरविलें पूर्ण । समीप नसतां मज हे खूण । बोधिली दर्शन देऊनी ॥१९॥
आतां माझे सद्गुरुनाथ । सगुणविरही संत समर्थ । पूर्ण प्रकाशूनि परमार्थ । गोविंद जेथ वसिन्नला ॥२०॥
गोविंदाचें सगुण ध्यान । आतां कोठूनि पाहती नयन । झालों पोरटा हीन दीन । न वचे शीण हृदयींचा ॥२१॥
विरहें प्रेमा भरला गहन । कोण चालवी व्याख्यान । तेव्हां गोविंदें येऊन । हरीला शीण अंतरींचा ॥२२॥
अभिन्न सद्गुरुसंतमूर्ति । श्रवणीं सांगूनि दिधली स्फूर्ति । ते हे व्याख्या सप्रेमभक्ति । सावध श्रोतीं परिसिजे ॥२३॥
यज्ञपत्न्यांसी मागोनि अन्नें । केला अनुग्रह जनार्दनें । ये अध्यायीं मधुसूदनें । मद भंगणें इंद्राचा ॥२४॥
हेतुवादाच्या अनेक युक्ति । बोधूनियां नंदाप्रति । गोवर्धनाख्यमखप्रवृत्ति । करवी निवृत्ति शक्रमखा ॥२५॥
तो गोवर्धनमखोत्सव । कृष्णें प्रेरितां ते बल्लव । वनीं संपादूनियां सर्व । आले स्वयमेव व्रजभुवना ॥२६॥
चोविसाव्या अध्यायांत । परीक्षितीसि व्याससुत । इतुकी कथा निरूपित । भाषा प्राकृत ते ऐका ॥२७॥
N/A
References : N/A
Last Updated : May 02, 2017
TOP