अध्याय २५ वा - आरंभ
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
श्रीगोविंदसद्गुरवे नमः ।
स्तवनीं मौनावले वेद । कथनीं शेषा रसनाभेद । सप्रेमभावें श्रीगोविंद । नमनें वरद वालभां ॥१॥
करूनि मायेचा निषेध । अतन्निरसनमुखें शोध । करितां देखिला अगाध । महिमा अगाध भक्तीचा ॥२॥
अभेदभजनप्रेमासाठीं । अनंत ऐश्वर्याचे मुकुटीं । बैसोनि मिरविजे फळकटीं । निगमचावटी तैं कुंठे ॥३॥
माया मिथ्या म्हणतां नये । प्रेमें सन्मात्र कवळूनि ठाये । सत्य म्हणतां द्वैत होय । कैसें काय वदावें ॥४॥
निर्गुण आणि निर्विकार । ऐसाचि धरूनि राहतां भार । तरी मायेचा मिथ्याकार । देऊनि परिहार झाडिता ॥५॥
लटकी माया म्हणों जातां । सप्रेम भजनें ती आतौता । आतुडे तेव्हां लाजे वक्ता । निजगुह्यार्था लोपोनि ॥६॥
सत्य म्हणोनि प्रतिपादन । असत्य म्हणोनि निषेधन । करावयासि सामर्थ्यहीन । धरिलें मौन तैं निगमीम ॥७॥
अनंतगुणगणनेचा धंदा । अवलंबूनि गुणानुवादा । करितां जिह्वा पावल्या भेदा । तर्हीं गोविंदा न वर्णवे ॥८॥
अनंतवदनें अनंतकल्प । अनंतगुण गणितां अल्प । नुमाणती मग होऊनि तळप । सोडी संकल्प कथनाचा ॥९॥
तो तूं सप्रेमभजनासाठीं । सद्गुरु स्वमुखें सांगतां गोठी । सच्छिष्यांचे श्रवणपुटीं । उठाउठीं सांठवसी ॥१०॥
महत्त्वें टाकितां नव्हसी गगना । तो साकल्यें अणूच्या मना - । माजीं वससी या महिमाना । तुजवीण कोणा जाणिव ॥११॥
महत्त्व लाघव तुजचि तुझें । येर जाणीव वृथा वोझें । तो तूं मानस वसविसी माझें । हें मी बुझें तव वरें ॥१२॥
आज्ञेवरूनि दशमस्कंध । भाषाव्याख्यान चालतां शुद्ध । क्रमेंचि उदेला प्रसिद्ध । पंचविसावा अध्याय ॥१३॥
चोविसामाजि इंद्रमख । करितां वारिले नंदप्रमुख । गोद्विजाद्रियज्ञें दुःख । शत्रु सम्यक पावला ॥१४॥
पंचविसाव्या अध्यायीं तेणें । अत्यंत क्रोधें संक्रंदनें । गोकुलनाशार्थ प्रलयघनें । उपलजीवनें वर्षतां ॥१५॥
भयें त्रासले गाईगोप । मिळाले श्रीकृष्णा समीप । करितां शतक्रतूचा कोप । झाला सकृप जगदात्मा ॥१६॥
प्रभुत्वें उचलोनि गोवर्धन । केलें गोकुळसंरक्षण । ये अध्यायीं इतुकें कथन । व्यासनंदन निरूपी ॥१७॥
N/A
References : N/A
Last Updated : May 02, 2017
TOP