अत्यासारातिवातेन पशवो जातवेपनाः । गोपा गोप्यश्च शीतार्ता गोविंदं शरणं ययुः ॥११॥

इतुका वृष्टीचा उत्कर्ष । होत असतां नंदघोष । न साहवेचि वातवर्ष । पशु निःशेष कांपती ॥८१॥
सुदृढ सौधें खचोनि जाती । झाडें मोडोनि पडती क्षिती । गोपगोपीगोधनांप्रति । कैची वसति ते काळीं ॥८२॥
गोपगोपी लहानें थोरें । गुरें वासुरें वृद्धें लेंकुरें । थरथरां कांपती शैत्यभरें । शक्रें निकरें त्रासितां ॥८३॥
तृषार्त मरतां चिंती जळ । किंवा बुभुक्षु अन्नकवळ । तैसे गोपीगोपाळ । चित्तीं घननीळ चिंतिती ॥८४॥
प्राणप्रयाणीं योगीश्वर । जेंवि सेविती कमलावर । तैसे व्रजवासी समग्र । नंदकिशोर आश्रयिती ॥८५॥
गौळियें नर नारी लेंकुरें । कृष्ण स्मरती दीर्घ स्वरें । कैसीं शरण आलीं गुरें । तें नृपवरें परिसावें ॥८६॥

शिरः सुतांश्च कायेन प्रच्छाद्यासारपीडिताः । वेषमाना भगवतः पादमूलमुपाययुः ॥१२॥

अधोमुख कदली कमळें । तैशा धेनु लवविती मौळें । श्रवणपुच्छें कदलीदळें । वाळोनि गळितें ज्यापरी ॥८७॥
कंप दाटला सर्वशरीरीं । जेंवि काळमृत्यूचीं शारीं । मुखें घालूनि चरणांतरीं । पाठीमोरीं जळवर्षीं ॥८८॥
वत्सें गाई आड निघती । न सोसवे वर्षविपत्ति । कृष्णचरणांची विश्रांति । लक्षूनि येती हरीपाशीं ॥८९॥
चतुष्पाद पश्वादिगण । यालागीं करूं न शकती स्तवन । आश्रयूनि श्रीकृष्णचरण । कृपाकारुण्यें भाकिती ॥९०॥
दीनवदनें सभय नेत्र । पाहती श्रीकृष्णाचें वस्त्र । तैसेचि गौळी सपुत्रकलत्र । करिती स्तोत्र कृष्णाचें ॥९१॥

कृष्ण कृष्ण महाभाग त्वन्नाथं गोकुलं प्रभो । त्रातुमर्हसि देवान्नः कुपिताद्भक्तवत्सल ॥१३॥

आम्रेडितें म्हणती कृष्ण । काल कालात्मा तूं पूर्ण । तुझें करितां चरणस्मरण । विघ्नें भंगोन नाशती ॥९२॥
प्रभो म्हणोनि संबोधन । प्रभुत्वें पूतनाशोषण । प्रभुत्वें केलें कालियमथन । दावाग्निप्राशन प्रभुत्वें ॥९३॥
प्रभुत्वें वधिला अघासुर । प्रभुत्वें केला गुह्यकोद्धार । तुझ्या प्रभुत्वाचा विचार । गर्गमुनिवर बोलिला ॥९४॥
महाभाग हें संबोधन । तुज म्हणतसों याकारणें । आमुचें सभाग्य झालें जिणें । तुझें जन्मणें जैंहुनी ॥९५॥
पूर्वीं गौळियें अनाथ । तुझेनि गोकुळ सनाथ । आतां प्रकटूनि स्वसामर्थ्य । महा अनर्थ हा निरसीं ॥९६॥
वंशपरंपरा धेनुकूळ । तें हें नंदाचें गोकुळ । त्याचा नाथ तूं गोपाळ । असतां विकळ होतसे ॥९७॥
व्याकुळतेसि काय कारण । ऐसा जरी तूं करिसी प्रश्न । इंद्र कोपला दारुण । आमुचे प्राण घ्यावया ॥९८॥
सक्रोध इंद्रापासूनि आम्हां । रक्षावयासि मेघश्यामा । समर्थ तूंचि पुरुषोत्तमा । प्रभु परमात्मा परिपूर्ण ॥९९॥
म्हणसी इंद्रें केलें विघ्न । तरी इंद्रासीच रिघा शरण । भक्तवत्सल हें संबोधन । भक्ताभिमानवहनार्थ ॥१००॥
स्वपादशरणताणकर्ता । तुजविण कैंचा श्रीभगवंता । म्हणऊनि आम्हां इंद्रत्रस्तां । रक्षीं समर्था प्रभुत्वें ॥१॥
अनन्यबाळकाची ग्लानि । माता पाहों न शके नयनीं । तेंवि कारुण्यें चक्रपाणि । अंतःकरणीं कळवळिला ॥२॥
ऐकें कुरुकुळकोटीरमणि । पार्थपौत्रा पार्थिवाग्रणी । निगमगोप्ता गोगोपग्लानि । देखोनि मनीं विवरीतसे ॥३॥

शिलावर्षनिपातेन हन्यमानमचेतनम् । निरीक्ष्य भगवान् मेने कुपितेंद्रकृतं हरिः ॥१४॥

गोगोपगोपी प्रार्थिती हरि । त्याहूनि पूर्वींच निजांतरीं । कुपितकृत्य हें पौरंदरी । जाणूनि करी तदुपाय ॥४॥
विशाळ वर्षती जलोपल । मुसळधारा अखंडजळ । तेणें अचेतन गोकुळ । झालें विकळ मुमूर्षु ॥१०५॥
ऐसें देखोनि श्रीभगवान । षड्गुणैश्वर्यसंपन्न । गोपगोधनें दीनवदन । पाहतां संपूर्ण कळवळिला ॥६॥

अपर्त्वत्युल्बणं वर्षमतिवातं शिलामयम् । स्वयागे निहतेऽस्माभिरिंद्रो नाशाय वर्षति ॥१५॥

नंदप्रमुख बल्लवगणीं । अथवा आपुले अंतःकरणीं । श्रीकृष्ण बोले आश्चर्यवचनीं । इंद्रकरणी मखभंगें ॥७॥
अहो गेला वर्षाऋतु । पाठीं शरत्सह हेमंतु । शिशिरकाळीं जलोत्पात । हें दुष्ट कृत्य इंद्राचें ॥८॥
मार्गें बहुत अतिवृष्टि । वृद्धवृद्धीं देखिल्या दृष्टि । ऐसी कोण्ही न वदे गोष्टी । इंद्रराहटीसारखी ॥९॥
व्याघ्र पोशिला बळिअर्पणीं । न पवतां खवळे प्राणग्रहणीं । तेवीं मखभंगें निर्जरमणि । गोकुळहननीं वर्षतसे ॥११०॥
दस्यु न पवतां दायितें । पल्लीभंगार्थ प्रवर्ते । तेंवि इंद्रें वर्षतां वातें । व्रजक्षयातें आदरिलें ॥११॥
जैसी पल्ली पल्लीनाथें । संरक्षिलीया स्वसामर्थ्यें । दीनवदनें दस्यु तेथें । जाय विजयार्थें सांडवला ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : May 02, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP