श्रीगोविंदात्मने नमः । गोविंदा जी अंतरंगा । अंतर्बाह्यरहितलिंगा । लिंगवर्जिता भेदभंगा । नमो अभंगा सन्मात्रा ॥१॥
गोशब्दार्थें बोलिजे स्वर्ग । तो शुद्धसुकृतसुखविभाग । येर प्राकृत दुःख भोग । प्रसवे अस्वर्ग्य असुकृत ॥२॥
महादैत्यांच्या आगमनीं । स्वर्गौकसां होय पळणी । परस्परें समरांगणीं । झोंटधरणी भीडती ॥३॥
हाहाकार पराजय । होतां वैभव दःखमय । लायागीं शुद्धसुकृतालय । स्वर्ग होय तव धाम ॥४॥
तो सच्चित्सुखात्मा अभिन्न । अंतरंग श्रीभगवान । वरीवर्तित्वसंबोधन । जी म्हणोन सूचिलें ॥५॥
स्वर्ग आणि स्वर्गवासी । भिन्न म्हणोनि पतन त्यांसी । तूं सच्चित्सुखघनराशि । भेदग्रासी अभिन्न ॥६॥
एकरसाचें तूं लिंग । तेथ कैंचे सबाह्यभाग । मिथ्या अविद्याकल्पनायोग । तो बहिरंग भवबोध ॥७॥
मोतीं फोडोनि डांक देणें । विशेष श्लघ्यता तद्भूषणें । किंवा शोभे अखंडपणें । हें विवरणें मतिमंतीं ॥८॥
मायाजनित रूप नाम । गुणमयी हें मायेसि नाम । गुणचिह्नांचा अनुक्रम । भवसंभ्रम अवघा हा ॥९॥
चिह्न म्हणिजे गुणांचें लिंग । गुणविनाशें पावे भंग । अगुण अगोचर अभंग । नित्य निःसंग निर्मल तूं ॥१०॥
एवं वर्तसी सन्मात्रपणें । तिये तव प्राप्तीकारणें । विविधापरींचीं विधिसाधनें । शास्त्रें पुराणें प्रशंसिती ॥११॥
घेतां तयांचा मागोवा । अधिका अधिका पडे गोवा । मग श्रुतीनें तुझा धांवा । केला कणवा अबळांच्या ॥१२॥
अबळें अनाथें भाविकें । भ्रमलीं दृश्यें काल्पिनिकें । नोहे बाह्य हें ठावुकें । अंतर्विवेकें सांडवलीं ॥१३॥
ऐसियांची ये काकुलती । तुझा धांवा करिती श्रुति । तैं तूं गुणांची घेऊनि बुंथी । धरिसी व्यक्ति गुरुवर्या ॥१४॥
मग ते तुझिया चरणसेव । लाहती अभेदसन्मात्र ठेवा । सभाग्य म्हणोनि येरां हेवा । भवीं निर्दैवां प्रयत्नें ॥१५॥
ऐसियां दुर्लभ तुझी प्राप्ति । सदैवभाग्यें संमुख होती । त्यां तूं बोधूनि निजात्मयुक्ति । बाह्यप्रवृत्ति सांडविसी ॥१६॥
ते निजात्मयुक्तिबळें । निःशेष छेदूनि अविद्यामूळें । सांडितां कल्पनेचे उमाळे । एके वेळे हारपती ॥१७॥
मग सबाह्य भेदरहित । भोगिती अद्वैतपद अच्युत । तो तूं आम्हां करुणावंत । निज एकांत बोधिसी ॥१८॥
तंव सद्गुरु म्हणती असो । या स्तवनाचा पैं अतिसो । आज्ञापिले कार्यीं वसो । आन नुमसो तव प्रज्ञा ॥१९॥
ब्रह्मांडसाम्राज्यपट्टाभिषेक । अमरीं कृष्णासि सम्यक । करितां देखोनि नंदप्रमुख । पशुप सकळिक तोषले ॥२०॥
नंदनंदन नोहे हरि । ज्याच्या ऐश्वर्याची थोरी । वंदिजे ब्रह्मादि निर्जरीं । तो व्रजपुरीं गोगोप्ता ॥२१॥
इतुकी सत्ताविसाव्यांमाजीं । कथा कथिली नृपसमाजीं । यावरी काय वर्तलें व्रजीं । जें गदित मुखाब्जीं शुकाचे ॥२२॥
त्याची उपलवूनिया टीका । प्रकट परिसवीं भाविकां । हरिगुणश्रवणें अक्षयसुखा । पाववीं लोकां हरिवरें ॥२३॥
ऐसी आज्ञा सद्गुरुवदनीं । निघतां सवेग धरूनि मूर्ध्नीं । श्रीपद हृत्कमळीं चिंतूनी । केली व्याख्यानीं प्रवृत्ति ॥२४॥
मग म्हणें जी देशिकोत्तमा । अखिल अविकार तूं विश्वात्मा । श्रोतृत्व वक्तृत्व उभयप्रेमा - । माजि स्वधामा अवतरवीं ॥२५॥
इतुक्या भांडवलाचेनि बळें । प्रज्ञा व्याख्यानीं पाल्हाळे । प्रमेयच्छाये सुशीतळे । श्रवनसोहळे प्रेमळां ॥२६॥
यावरी अठ्ठाविसाव्यामाजीं । अल्पद्वादशीसाधनकाजीं । यमुनाजीवनीं नंद सहजीं । स्नान करितां निशिगर्भीं ॥२७॥
ते जाणूनि आसुरी वेळा । वरुणदूतीं नंद नेला । कृष्णें जाऊनि तो आणिला । तैं कृष्ण पूजिला वरुणानें ॥२८॥
नंदें स्वजना इतुकें कथितां । तिहीं प्रार्थिलें कृष्णनाथा । जाणौनि त्यांचिया मनोरथा । दावी तत्त्वता वैकुंठ ॥२९॥
इतुकी कथा ये अध्यायीं । श्रवणद्वारें हृदयालयीं । सांठवितां शेषशायी । होणें कायी उरलेंसे ॥३०॥
ते कथेच्या निरूपणीं । शुक म्हणे कुरुकुळतरणि । सावध होऊनियां श्रवणीं । ऐकें करणी कृष्णाची ॥३१॥

N/A

References : N/A
Last Updated : May 02, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP