ते त्वौत्सुक्यधियो राजन् मत्वा गोपास्तमीश्वरम् । अपि नः स्वगतिं सूक्श्मामुपाधास्यदधीश्वरः ॥११॥

शुक म्हणे गा मात्स्यीवत्सा । ऐकोनि नंदवाक्यां स्वच्छां । समस्त गोपांतें उत्कट इच्छा । वांछिजे अच्छापदलाभा ॥१४०॥
उताविळ सप्रेमळ । उत्सुकमति गोप सकळ । कृष्णस्वधाम जें जें निर्मळ । आम्हां तें स्थळ दावो कां ॥४१॥
कृष्ण केवळ परमेश्वर । भाग्यें आम्हांसि सुलभतर । झाला असतां कैवल्यसार । आम्हां साचार वोपील ॥४२॥
अचिंत्यऐश्वर्याची शक्ति । नश्वर न मागावें याप्रति । आम्हां करावी स्वपदप्राप्ति । हा संकल्प चित्तीं गोपांचे ॥४३॥
बैसल्या सुरतरुतळवटीं । कां पां परजावी नरोटी । परमसाम्राज्यैश्वर्यमुकुटी । बैसोनि सृष्टी न असावें ॥४४॥
कीं परमामृताच्या सागरीं । कांजी पिऊनिया चूळ भरी । भोगिजे दैन्याची सामग्री । कां अमृतलहरी न पियावी ॥१४५॥
ईश्वरेश्वराचा स्वामी । कृष्ण जाणूनियांही आम्ही सरते न हों जरी परब्रह्मीं । तरी भवभ्रमीं अनुगुंडूं ॥४६॥
नेणोनि राखविलीं गोधनें । गोरस विकूनि जोडिलीं धनें । कृष्णमहिमा देखोनि नयनें । कैवल्य नमगणें कां पां या ॥४७॥
ऐसा गोपांचा संकल्प । विश्वद्रष्टा कंदर्पबाप । जाणोनि तत्सिद्धीचा दीप । ससाक्षेप प्रकाशी ॥४८॥

इति स्वानां स भगवान् । विज्ञानाखिलदृक् स्वयम् । संकल्पसिद्धेय तेषां कृपयैतदचिंतयत् ॥१३॥

मग स्वजनाचिये कृपेकरून । कळवळूनियां श्रीभगवान । हृदयीं चिंतिता झाला पूर्ण । अभीष्टकारण तयांचें ॥४९॥

जनो वै लोक एतस्मिन्नविद्याकामकर्मभिः । उचावचासु गतिषु न वेद स्वां गतिं भ्रमन् ॥१४॥

आपुल्या चित्तीं म्हणे कृष्ण । येथ मृत्यूलोकींचा हा जन । अविद्याकामकर्मेंकरून । बद्ध होऊनि परिभ्रमे ॥१५०॥
वास्तव विसरूनि आत्मस्थिति । देहाद्यहंममप्रतीति । पूर्वसंस्कारें पावे व्यक्ति । संकल्पप्रवृत्ति तेथुनी ॥५१॥
मग तो संकल्पप्रभव काम । विषयाध्यासें वाढवी प्रेम । तदुपलब्धीचा उद्यम । त्रिविध कर्म विस्तारी ॥५२॥
सात्त्विककर्में सुकृताचरण । तें स्वर्गादि उचगतिकारण । तामसकर्में दुष्कृताचरण । तें कारण नरकाचें ॥५३॥
रजोऽभिलाषें कर्माचरण । तें सुखदुःखाचें होय भाजन । देवतिर्यगादि मनुष्यपण । या गति जाण उच्चावच ॥५४॥
उच्चावच त्रिविधा गति । याच्या विविध प्रकृतिविकृति । लक्षचौर्‍यांशींपर्यंत जाती । त्यामाजि व्यक्ति बहुफार ॥१५५॥
ऐशा उच्चावच गति । अविद्याकामकर्मप्रवृत्ति । येथींचा लोक भ्रमतां भ्रांति । निजात्मगति अनोळख ॥५६॥
म्हणोनि मर्त्यलोकींच्या जना । प्राप्ति दुर्लभ कैवल्यसदना । तरी या पशुपां मदेकशरणां । निजात्मभुवना दाविजे ॥५७॥

इति संचिंत्य भगवान् महाकारुणिको हरिः । दर्शयामास लोकं स्वं गोपानां तमसः परम् ॥१५॥

ऐसें विचारूनियां मनीं । अनंतैश्वर्याची खाणी । तो श्रीभगवान्करुणावचनीं । स्वजनालागूनि कळवळिला ॥५८॥
महाकरुणेचा सागर । तो श्रीहरि जगदाधार । स्वकीय लोक तमसःपर । दावी साचार पशुपांतें ॥५९॥
लंघूनि प्रकृतीचा अंधार । गुणात्मकां जो अगोचर । ज्यातें नुजळिती शशिभास्कर । तमसःपर परब्रह्म ॥१६०॥

N/A

References : N/A
Last Updated : May 02, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP