श्रीशुक उवाच :- इति गोप्यः प्रगायंत्यः प्रलपंत्यश्च चित्रधा ।
रुरुदुः सुस्वरं राजन्कृष्णदर्शनलालसाः ॥१॥

अलंकारार्थ पूर्विलाध्यार्यी । श्लोकद्वयें कथिलें पाहीं । पुन्हा प्रारंभीं ये अध्यायीं । तें युग्मकही आदरिलें ॥२०॥
शुक म्हणे गा मात्स्यीरमणा । ऐशा पुलिनीं बल्लवललना । कृष्णवेधें विचित्रगाना । करिती रुदना विवशत्वें ॥२१॥
देवतासंचारें झाड वाजे । तेंवि बल्लवी विवश म्हणिजे । येथ गायनविकार जे जे । श्रीकृष्णतेजें प्रस्फुरित ॥२२॥
राग हिंगुळ मालकौशिक । मेघमह्लार दीपक । दारापुत्रेंशीं भैरवप्रमुख । गाती सम्यक बल्लवी ॥२३॥
शुकें कथिलें सुमुखवृत्त । परी त्या विचित्रछंदें बहुत । पद्यें प्रबंध सुश्वरगीत । तालसंगीत गुणमिश्र ॥२४॥
कीं तें जाणों विरहगान । कीं गोपींचें आर्तरुदन । कीं तें श्रीकृष्णगुणकीर्तन वेधी तनुमन श्रीपठनें ॥२५॥
हृदयीं कृष्नदर्शनआर्ति । येर विवश तनुमनस्मृति । सर्वव्यापी सर्वज्ञमूर्ति । जाणोनि चित्तीं कळवळिला ॥२६॥

तासामाविरभूच्छौरिः स्ययमानमुखांबुजः । पीतांबरधरः स्रग्वी साक्षान्मन्मथमन्मथः ॥२॥

प्रेमा उरवूनि आयासपरा । आदर न होतां पाठिमोरा । विवशवृत्ति श्रमनिर्भरा । वेधें श्रीधरा जाकळिलें ॥२७॥
मग त्या बल्लवी सप्रेम रुदिता । सांत्वनार्थ क्लेशनिहंता । प्रकट झाला मन्मथजनिता । अकस्मात त्यांमाजी ॥२८॥
रातोत्पलदलपदतलमृदुल । इंद्रोत्पलनिभ तनुभा सुनीळ । घोंटी वर्तुळ सकोमळ । अंगुळें केवळ नवकळिका ॥२९॥
गुल्फप्रांतीं वांकी वाळे । अंदूनूपुरध्वनि सुताळें । गर्जताती सोहंमेळे । बिरुदमाळे समवेत ॥३०॥
शरणागतां अभयंकर । निजपदभजकां वज्रपंजर । नामस्मरणें भवकुंजर । भंगी तोडर पदपद्मीं ॥३१॥
नाभीपासूनि गुल्फवरी । चंचल चपल चमत्कारीं । शोभा विचित्र पीतांबरीं । वरी साजिरी मेखळा ॥३२॥
अनेकभक्तजनांच्या व्यक्ति । सहित चरित्रें अवतारपंक्ति । मेखळे खेवणा वोप देती । क्षुद्रघंटिका किंकिणी ॥३३॥
मेखळामध्यमणीची प्रभा । उमाणी हृदयींच्या कौस्तुभा । मध्यलोहींव पंकजनाभा । त्रिजगद्गर्भा रजरंगें ॥३४॥
रोमराजी कोमलतर । जे शोभवी वय किशोर । वैजयंती वैडुर्यहार । वनशृंगार त्या उपरी ॥३५॥
श्रीवत्सांकित वक्षःस्थळ । कमलानिवासनिकेत अमळ । अनर्घ्यमौक्तिकमणींची माळ । कंठीं झळाळ दावितसे ॥३६॥
बाहु सुपीन सोज्वळ सरळ । कूर्परमणिबंध करतळ । सुरेख सामुद्रिकादिमेळ । नख वर्तुअळ रत्नाभ ॥३७॥
केयूरांगदें बाहुवटीं । जडीत कटकें द्वयमनगटीं । रत्नजडित मुद्रिकादाटी । दोहीं बोटीं मिरवतसे ॥३८॥
उदार हनुवटी गंडयुगळ । कंबुकंठ जो निगममूळ । अधरपल्लव सकोमळ । नासिका सरळ जलजाक्ष ॥३९॥
नयन आकर्ण श्रवणशोभा । कुंतलमंडित कुंडलप्रभा । ललाटपट्टिकेचिया गर्भा । भावी भासुर भागवत ॥४०॥
मयूरबर्हवलयवळित । चंचच्चामीकरमंडित । विचित्रप्रभावैडूर्यजडित । मुकुट मिरवत मस्तकीं ॥४१॥
गुंजावतंस सुरंगसुमनें । कर्णीं कर्णिकारें विद्रुमारुणें । दशनदीप्तीचें चांदिणे । स्मित भाषणें फांकतसे ॥४२॥
केशरमृगमदचंदनतिलक । माणिक्यरंगीं अक्षतसुरेख । दक्षिणगल्लीं अंजनांक । दृक्संपर्कभयहरणा ॥४३॥
तांबूलचर्चित सुक्किणीभाग । अधर रसना दशन सुरंग । साग्र रसाळ कार्मुक चांग । मिरवी सांग वामकरीं ॥४४॥
सपूर तगटी पटप्रवारण । दक्षिणहस्तीं लीलेंकरून । धरिले पंच कुसुमबाण । जनमोहन जगदात्मा ॥४५॥
कामिनी वेधती काममार्गणें । कीं मानिनी मन्मथबाणें । कंदर्पकोटि तेंवि भुलवणें । कटाक्षमोक्षणें ज्याचेनी ॥४६॥
रसाळ रस जैं रसना चरे । तैं कामना कामिकां स्फुरे । सुरतरहस्यें मन्मथ विचरे । तैं रुचिकरें रतिलास्यें ॥४७॥
तो जगज्जीवन त्रिजगद्भर्त्ता । रस रसज्ञा रससंवेत्ता । कंदर्पकोटीतें भुलविता । मन्मथजनिता वनमाळी ॥४८॥
मदनदाहक जो मदनारि । तो भुलविला प्रमदाकारीं । नटोनि निमिषामाझारी । थैथैकारीं नाचविला ॥४९॥
साक्षान्मन्मथाचा मन्मथ । तो प्रमदाप्रणयप्रणतनाथ । प्रकट झाला अकस्मात । वधूकुमुदांत शशी पूर्ण ॥५०॥
कृष्णदर्शनीं गोपिकांसी । अद्भुत उत्साह जो मानसीं । कोंदला तो नृपापाशीं । आनंदेंशीं शुक सांगे ॥५१॥

तं विलोक्यागतं प्रेष्ठं प्रीत्युत्फुल्लदृशोऽबलाः । उत्तस्थुर्युगपत्सर्वास्तन्वः प्राणमिवागतम् ॥३॥

प्रकर्षेंकरूनि जो कां इष्ट । तो एक आत्मा सुखसंतुष्ट । म्हणोनि त्यातें बोलिजे प्रेष्ठ । गोपी तन्निष्ठ सप्रेमें ॥५२॥
परमप्रेष्ठ श्रीकृष्णातें । गोपी चिंतितां सप्रेमचित्तें । अवचित देखोनि उत्फुल्लितें । झालीं सनेत्र मुखकमळें ॥५३॥
युगपत् म्हणिजे एके क्षणीं । अवघ्या उठिल्या खडबडोनी । जैशा तनु प्राणागमनीं । चेतना लाहोनि टवटविती ॥५४॥
चंद्र प्रकटतां कुमुदिनी । कीं सूर्यदर्शनीं पद्मिनी । कीं गजयूथपाच्या आगमनीं । मत्त करिणी प्रोल्लसिता ॥५५॥
तैशा उह्लासभरें अबळा । जाऊनि कवळिती तमाळनीळा । पृथगावयवीं गोपी सकळा । तें भूपाळा अवधारीं ॥५६॥

काचित्करांबुजं शौरेर्जगृहेंऽजलिना मुदा । काचिद्दधार तद्बाहुमंसे चंदनभूषितम् ॥४॥

उह्लास संभ्रमाच्या भरें । कोण्ही एकी प्रेमादरें । कृष्णकराब्ज उभयकरें । धरिती सत्वर स्मितवक्त्रा ॥५७॥
बद्धांजलि द्वयकरतळ । माजि कवळिती हरिकरकमळ । वदन करूनियां अळिउळ । प्रेमविह्वळ चुंबिती ॥५८॥
प्रेमसुभरें कोण्ही प्रमदा । चंदनचर्चितशुभमकरंदा । सहित श्रीकृष्णबाहु खांदा । धरूनि मोदा पावती ॥५९॥

काचिदंजलिनागृह्णात्तन्वी तांबूलचर्वितम् । एका तदंघ्रिकमलं संतप्तस्तनयोरधात् ॥५॥

बद्धांजलिकराब्जयुगळा । वोढवूनि एकी वेल्हाळा । चर्वित हरिमुखींच्या तांबूला । घेती झाली सप्रेमें ॥६०॥
मनसिजतापें स्तन संतप्त । हृदयीं कठोर व्यथाभूत । एकी तन्वी तच्छमनार्थ । शंतम धरित पदकंज ॥६१॥
हृच्छयरूपी हृद्भव गर । जाची केवळ शमनाकार । हरिपदकंज शीतळतर । धरितां सत्वर त्या शमवी ॥६२॥
एकी उताविळिया बाळा । वक्षीं स्पर्शिती हरिकरकमळा । एकी चुंबिती वदनोत्पळा । पादाब्जयुगळा पैं एकी ॥६३॥
एकी हरिभुज आपुले खांदा । चंदनचर्चित धरिती मुग्धा । चर्चित तांबूल एकी प्रमदा । घेऊनि मोदा पावती ॥६४॥
ऐसिया निकट संघट्टनीं । मिनल्या औत्सुक्यें विरहिणी । प्रेमसंभ्रमें संतोषूनि । हरिमुख नयनीं निरखिती ॥६५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 04, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP