अध्याय ३२ वा - श्लोक २१ ते २२
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
एवं मदर्थोज्झितलोकवेदस्वानां हि वो मय्यनुवृत्तयेऽबलाः ।
मया परोक्षं भजता तिरोहितं माऽसूयितुं माऽर्हथ तत्प्रियं प्रियाः ॥२१॥
पूर्वोक्त बोलिले जे भजक । तेंवि मजकारणें सम्यक । तुम्हींच सांडिला लौकिक । प्रवृत्तिविवेकपरित्यागें ॥२३॥
अस्ताव्यस्त वस्त्राभरणें । सर्वविस्मृतकर्माचरणें । युक्तायुक्त विचारणें । सांडूनि वना पातलां ॥२४॥
यास्तव लौकिकाचा त्याग । तुम्हांपासूनि घडला सांग । वेद म्हणजे स्वधर्ममार्ग । मदर्थ तोही त्यागिला ॥२२५॥
सासुश्वशुरपतिसेवनें । अतिथिअभ्यागतपूजनें । नित्यनैमित्तीं सादर होणें । व्रतोद्यापनें त्यागिलीं ॥२६॥
अपत्यांच्या लालनासी । स्वपोष्यांच्या पोषणासी । वेदप्रतीत स्वधर्मासी । त्यागूनि मजपाशीं पातलां ॥२७॥
स्वकीयाप्त ज्ञाति गोत्र । सकळ सुहृद इष्ट मित्र । त्यांचें भंगूनि स्नेहसूत्र । आलां सत्वर मजपाशीं ॥२८॥
लौकिक स्वधर्म आणि स्वजन । मजकारणें त्यागिलें पूर्ण । ऐसिया तुम्ही पदेकशरण । त्या तुमचें कल्याण म्यां कीजे ॥२९॥
ग्रंथि देऊनि वोढी घेणें । विशेष दृढता होय तेणें । तैसेंचि म्यांही अदर्शनें । तुम्हां निजध्यानें वेधिलें ॥२३०॥
तुम्हांसि देऊनि निजात्मरति । प्रेमा दृढाविला म्यां चित्तीं । विरहवर्धनें गुप्तस्थिति । सप्रेम उक्ति परिसिल्या ॥३१॥
गुप्त होऊनि भजलों तुम्हां । तेणें म्या वाढविला सुदृढ प्रेमा । दोषदृष्टि पाहणें आम्हां । हें अनुचित तुम्हां अबळा हो ॥३२॥
म्यां जें गुप्त होऊनि वनीं । ध्यान वोपिलें तुमच्या मनीं । हेंचि प्रिय केलें जाणोनि । मज लागूनि न दूषावें ॥३३॥
इतुका तदुक्तिपरिहार । बोलूनि अंतरीं कमळावर । निष्कापट्यें करुणापर । चमत्कारूनि बोलतसे ॥३४॥
शरदुत्पलाली फुल्लारा । उषसि शशिस्रावि जलधारा । सांडिती तेंवि नयनद्वारां । आले श्रीधरा प्रेमाश्रु ॥२३५॥
थरथरां कांपे अंगयष्टि । श्वास न सांठवेचि पोटीं । उकसाबुकसीं सद्गुरुकंठीं । शब्द वोठीं न फुटती ॥३६॥
रोमांच आले थरथरोनी । पुलकस्वेदाची गवसणी । स्वभक्तप्रेमें चक्रपाणि । बांधोनि ऋणीं वश केला ॥३७॥
गोपींसि म्हणे सांडोनि श्वास । करूं न शके परिहारास । ब्रह्मायुपर्यंत होतां दास । आनृण्यास असमर्थ ॥३८॥
न पारयेऽहं निरवद्यसंयुजां स्वसाधुकृत्यं विबुधायुषाऽपि वः ।
या माऽभजन्दुर्जरगेहशृंखलाः संवृश्च्य तद्वः प्रतियातु साधुना ॥२२॥
तुमचा संयोग निर्दूषण । अनुच्छिष्टचि आत्मार्पण । तुम्हीं केलें मजलागुन । जन्मापासून गोपी हो ॥३९॥
बाळपणींच खेळतां मातें । तुम्हीं अर्पिलीं आपुलीं चित्तें । क्षणभंगुरा भवसुखातें । सकाम आस्थे नातळलां ॥२४०॥
मदर्थ विसरलां मातापिता । मदर्थ त्यजिलें सुहृदां आप्तां । मदर्थ त्यजूनि भगिनीभ्राता । मदेकचित्ता हों सरलां ॥४१॥
मदर्थ त्यजिले सासुश्वशुर । मदर्थ त्यजिले भावे देवर । मदर्थ त्यजिले ज्ञातिगोत्र । मजहीं स्वतन्त्र अनुसरलां ॥४२॥
मदर्थ विसरला अन्नपान । मदर्थ विसरलां भूषण वसन । मदर्थ विसरलां श्रवण पठन । मदर्थ सम्मान विसरलां ॥४३॥
मदर्थ त्यजिलें निरीक्षण । मदर्थ त्यजिलें गन्धग्रहण । मदर्थ त्यजिलें निन्दास्तवन । केलें मदर्पण सर्वस्व ॥४४॥
मदर्थ त्यजिला काम क्रोध । मदर्थ त्यजिला प्रपंचबोध । मदर्थ त्यजिला द्वेष विरोध । मत्सरदुर्मददम्भादि ॥२४५॥
मदर्थ त्यजिला लोभ मोह । ममता तृष्णाशोकसमूह । वृत्ति क्षेत्र देह गेह । भवप्रवाह विसरलां ॥४६॥
अहंता ममता द्विकंकणीं । रागद्वेषकीलकमिळणीं । निगडशृंखळा रजोगुणीं । घातली निर्मूनि नरामरां ॥४७॥
अहंदेहत्वें ठाके उभा । पदार्थममता चढे क्षोभा । देहवेहवृत्तिलाभा । रागद्वेषें खळखळित ॥४८॥
तापत्रयाचें लागतां उष्ण । बेडी तापतां पोळे चरण । तेणें तळमळिती सम्पूर्ण । परी बेडी खंडून न संडवे ॥४९॥
कुटुम्बचिन्ता मागें वोढी । लौकिकलज्जा पुढे आडी । ऐसी उभयत्र सांकडी । द्विधा चरफडी चालतां ॥२५०॥
ऐसी देहगेहात्मबेडी । पडोनि असुरसुरनरकोडी । बळेंचि पडिल्या बांदवडी । मोहसांकडी माजिवड्या ॥५१॥
तुम्ही अनन्यभावें करूनी । मातें भजतं अभेदभजनीं । खंडूं न शकती जीतें कोण्ही । ते बेडी खंडूनि सांडिली ॥५२॥
आदिब्रह्म्याचे प्रथमदिनीं । प्रथम घटिकेचि पासूनी । चरणीं पडली परंतु कोण्हीं । नाहीं खंडूनि टाकिली ॥५३॥
कल्पानुकल्प गेले फार । परी जीर्ण नोहेचि अणुमात्र । नित्य नूतन जे दृढतर । तुम्ही ते सत्वर छेदिली ॥५४॥
मदेकशरण सप्रेम खङ्ग । घेऊनि दृढतर सानुराग । देहगेहात्मशृंखळाभंग । तुम्हीं सवेग पैं केला ॥२५५॥
त्रैवर्गिक तोडिती कडी । संन्यास सवातें लडबडी । नाना अभ्यासें चरफडी । चालतां अडी स्वपदातें ॥५६॥
गेहशृंखळा दुर्जर ऐसी । तुम्हीं मद्भजनप्रेमेंशीं । निःशेष छेदूनि टाकिली कैसी । गगनें जैसी वातोर्भि ॥५७॥
यालागीं मदर्थ तुमचें जिणें । मदेक शरणा जीवें प्राणें । तुम्हांसि काय म्यां उत्तीर्ण होणें । कवण्या गुणें कोठवरी ॥५८॥
अमळ अनवद्य संगम तुमचा । किती म्हणोनि वर्णूं वाचा । यालागिं तुमचे उत्तीर्णतेचा । प्रताप टांचा मज आंगीं ॥५९॥
ब्रह्मा सकळविबुधा शिरीं । त्या ब्रह्म्याचे आयुष्यवरी । म्यां श्रमतांही प्रत्युपकारी । नोहे निर्धारीं कृतकृत्य ॥२६०॥
मातें भजती बहुत भक्त । तितुक्यां पाशीं माझें चित्त । तुम्ही सप्रेम मदेकनिरत । यालागिं अजित जिंकलों मी ॥६१॥
मी बहुतांचा प्रेमपोसणा । तुम्ही अव्यभिचार मदेकशरणा । यालागिं असमर्थ उत्तीर्णा । विकिलों ऋणामाजि तुम्हां ॥६२॥
यालागिं तुमचिया उपकारा । उत्तीर्ण व्हावयालागिं मी अपुरा । आतां तुम्हीच मजहुनि थोरा । म्हणवूनि करा आनृण्य ॥६३॥
आपणाहूनि बहुता गुणें । तुम्हांसि स्तवितां थोरपणें । इतुकेंचि माझें उत्तीर्ण होणें । जें सर्वस्व उणें स्वीकेलें ॥६४॥
तुम्ही आपुल्या सुशीलपणें । इतुकेन्मातें अनृणी करणें । येर्हवीं म्यां काय तुम्हांसि देणें । अनन्यपणें जिणिलों मी ॥२६५॥
ऐसा अनन्यभावें हरि । स्ववश केला सर्वापरी । पुन्हां नाडील गर्वलहरी । म्हणोनि नारी भयचकिता ॥६६॥
गर्वें निधान हातींचें गेलें । दैवें पुढतीं हाता आलें । अगर्वप्रयत्नपूर्वक भलें । म्हणती रक्षिलें पाहिजे ॥६७॥
शुक म्हणे गा इरारमणा । व्रजवनितांच्या अनन्यभजना । उत्तीर्ण व्हावया त्रैलोक्यराणा । रासनर्तना मांडील ॥६८॥
पुढिले अध्यायीं ते कथा । सावध ऐकें कौरवनाथा । जिच्या श्रवणें कलिमलव्यथा । आकल्पदुरितासह नाशे ॥६९॥
इतुकें श्रीमद्भागवतीं । अठरा सहस्र संहितागणिती । दशमस्कंधीं परीक्षिति । परिसे निश्चिती शुकमुखें ॥२७०॥
तो हा अध्याय बत्तिसावा । हृदयीं धरूनि भक्तिभावा । पडतां पावे कैवल्यठेवा । भ आघवा वोसरे ॥७१॥
श्रीएकनाथ क्षीराब्धि अमळ । चिदानंद चित्कल्लोळ । स्वानन्दसुखाचें अगाध जळ । प्रभा सोज्वळ गोविंद ॥७२॥
क्षीराब्धिशायी गोपीरमण । लोकत्रयाचें कल्याण । केवळ दयार्णव स्वपदशरण । रक्षी संपूर्ण कारुण्यें ॥७३॥
श्रोतयां विनवी दयार्णव । भक्तऋणिया वासुदेव । सांडूनिया साधनाची हांव । धरा सद्भाव पदभजनीं ॥२७४॥
इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां गोपीविरहाभिभूतरुदितश्रीकृष्णदर्शनहर्षावाप्तिकथनं नाम द्वात्रिंशत्तमोऽध्यायः ॥३२॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥२२॥ टीका ओव्या ॥२७४॥ एवं संख्या ॥२९६॥ ( बत्तिसावा अध्याय मिळून ओवीसंख्या १५८९२ )
बत्तिसावा अध्याय समाप्त.
N/A
References : N/A
Last Updated : May 04, 2017
TOP