अध्याय ३३ वा - श्लोक १ ते ५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
इत्थं भगवतो गोप्यः श्रुत्वा वाचः सुपेशलाः । जहुर्विरहजं तापं तदंगोपचिताशिषः ॥१॥
नृपातें म्हणे बादरायणि । ऐकोनि गोपीं ही भगवद्वाणी । विरहसंताप टाकूनी । हृदयभुवनीं तोषल्या ॥१६॥
इत्थं म्हणिजे पूर्वाध्यायीं । जें बोलिला क्षीराब्धिशायी । लाघव घेऊनि आपुलें ठायीं । वनिताहृदयीं तोषद ॥१७॥
तुमच्या सप्रेमभक्तिऋणा । समर्थ नोहें मी उत्तीर्णा । आतां तुम्हीचि उदारगुणा । कीजे मोक्षणा आनृण्यें ॥१८॥
तुमच्या ऋणें मी बांधला । आज्ञाधारक मी अंकिला । तुमचा सर्वस्वें विकिला । विशेष बोला न बोलवे ॥१९॥
ऐसिया मधुरा सुपेशला । ऐकोनि भगवंताचिया बोला । विरहदुःखें संताप झाला । तो टाकिला गोपींहीं ॥२०॥
श्रीरंगाच्या अंगस्पर्शें । निवलीं गोपींचीं मानसें । चंद्रें कुमुदकानन जैसें । टाकी संताप दिवसाचा ॥२१॥
कुरुकिरीटविराजरत्ना । अंग या कोमळ आमंत्रणा । संबोधूनि योगिराणा । रासक्रीडना निरूपी ॥२२॥
अंकिला विकिला तुमचा ऋणी । ऐसी जे कां भगवद्वाणी । सत्यत्व दावी तिये लागुनी । स्वयें नाचोनि तच्छंदें ॥२३॥
तत्राऽरभत गोविंदो रासक्रीडामनुव्रतैः । स्त्रीरत्नैरन्वितः प्रीतैरन्योन्याबद्धबाहुभिः ॥२॥
गोविंद जो कां ब्रह्मांडपति । तये यमुनापुलिनाप्रति । रासक्रीडा परम प्रीति । आरंभिता जाहला ॥२४॥
रास शब्दें म्हणाल काय । कुशल नर्त्तकींचा समुदाय । तिहींसहित जो विलास होय । नृत्यविशेष तो रास ॥२५॥
रासमंडित जे कां क्रीडा । ते बोलिजे रासक्रीडा । गोपीप्रेमाच्या कैवाडा । आदरी रोकडा श्रीकृष्ण ॥२६॥
ह्रदिनीं विकसित कुमुदोत्पलीं । मधुरशब्दें गुंजती अळि । जलाश्रितविहंगांची मंडळी । सुखसुकाळीं कुंजती ॥२७॥
वनीं कुसुमित वल्लि तरु । शब्दित चंचरीकांचा भारु । तेणें मुखरित जलकांतारु । सुमनोहरु शोभतसे ॥२८॥
सिंहावलोकें शृंगाररचना । पूर्वोक्त चतुरां केली सूचना । यावरी रासमंडळग्रथना । परिसा व्याख्याना श्लोकोक्त ॥२९॥
काष्ठपुत्रिका सूत्रतंत्रा । जर्ही दिसती त्या नर्त्तनपरा । तर्ही नव्हती त्या स्वतंत्रा । तेंवि सुंदरा अनुवृत्ता ॥३०॥
जेंवि कां हरळ वैरागरें । वेधितां प्रभेच्या अत्यादरें । तैं ते होती अनर्घ हिरे । तेंवि यदुवीरं व्रजललना ॥३१॥
घुरुटा रानटा आभीरवनिता । कृष्णसांनिध्यें सप्रेमभरिता । शोभती सुरांगनांच्या माथां । ललनाललामा हरिवेधें ॥३२॥
तिहींर स्त्रीरत्नीं अन्वित । प्रीतिपूर्वक रमाकांत । परस्परें बाहुग्रथित । रासक्रीडा आरंभी ॥३३॥
रासोत्सवः संप्रवृत्तो गोपीमंडलमंडितः । योगेश्वरेण कृष्णेन तासां मध्ये द्वयोर्द्वयोः ॥३॥
प्रविष्टेन गृहितानां कंठे स्वनिकटं स्त्रियः । यं मन्येरन्नभस्तावद्विमानशतसंकुलम् ॥
दिवौकसां सदाराणामौत्सुक्यनिभृतात्मनाम् ॥४॥
रासोत्सवाचें साहित्य । अभिनय म्हणिजे कौतुकयुक्त । रसिकनम्रता सुरशिक्षित । हावभाव अपांगीं ॥३४॥
चौं अक्षरीं क्रियापद । दिढा श्लोका सहित विशद । मंडळरूपें गोपीवृंद । सह गोविंद वेंठला ॥३५॥
उभयपार्श्वीं गोपीयुगळ । तडिद्भासुर गौर अमळ । मध्यें मिरवे मेघसुनीळ । कचकरतळसंस्पर्शी ॥३६॥
दक्षिणभागीं वल्लवप्रमदा । कृष्ण तिचिया दक्षिणखांदा । स्वबाहु ठेवूनि वदनारविंदा । पाववी मोदा संस्पर्शें ॥३७॥
वामभागींची वामनयना । वामबाहूच्या करूनि ग्रथना । वामउरोजसंस्पर्शना । सह आनना प्रोत्साही ॥३८॥
तैशाच गोपी उभयभागीं । बाहुयुगळें श्रीशार्ङ्गी । आकळूनियां स्निग्धापांगीं । रासप्रसंगीं मोदती ॥३९॥
दोहीं गोपीं माजि हरि । कृष्णयुगळीं एकी सुंदरी । रासमंडळ ऐसियापरी । रची मुरारि सप्रेमें ॥४०॥
व्रजवासिनी अनेक गोपी । कृष्ण एकला लावण्यरूपी । गोपीयुगळें स्वप्रतापीं । केंवि आटोपी पृथक्त्वें ॥४१॥
गोपी पृथत्वें नाचती । तितुक्या कैंच्या श्रीकृष्णमूर्ति । ऐसी शंका न कीजे श्रोतीं । तो योगपति जगदात्मा ॥४२॥
योगेश्वरेण ऐसा हेतु । देऊनि वदला व्याससुतु । जे योगमाया अंगीकृत अवतारचरित विस्तारी ॥४३॥
दों दों गोपींत एकैक कृष्ण । दों दों कृष्णीं प्रमदारत्न । ऐसें रचूनि रासकंकण । करीं नर्तन स्वच्छंदें ॥४४॥
दों दों गोपींत एकैक हरि । दोहींचियाही स्कंधांवरी । बाहु घालूनि उरोज धरी । स्पर्शे अधरीं अनुगल्लीं ॥४५॥
चटुल चाटु चमत्कारीं । ऐशा मोहिता व्रजसुंदरी । जे ते मानी मज मुरारि । सप्रेमभरीं आळंगी ॥४६॥
मज एकीतें फावला कृष्ण । कृष्णकंठीं मी संलग्न । माझेंचि भाग्य त्रिजगीं गहन । ऐशा संपूर्ण भाविती ॥४७॥
दोहीं भागीं दोघी जणी । परी त्या नेणती अंतःकरणीं । आपणा वांचूनि चक्रपाणि । अन्य कामिनी कवळी हें ॥४८॥
कृष्णमौळींचे चूडामणि । गोपीमौळाभरणरत्नीं । देदीप्यमान ललामश्रेणी । रासकंकणीं प्रकाशे ॥४९॥
ललनाललाटीं कुंकुमांक । कृष्णनिडळीं केशरतिलक । नीलकुंतल कुसुमस्तबक । बाजीराजित रासोत्थ ॥५०॥
कृष्णकुंडलें मकराकृति । गोपीश्रवणीं भूषापंक्ति । गंडमंडित मिथा दीप्ति । वलयपंक्ति रासांगीं ॥५१॥
गोपीकटाक्षस्निग्धानंग । श्रीकृष्णाचे कृपापांग । नयनपंक्तीं रासरंग । वलय सांग सुघटित ॥५२॥
तरळ भ्रूलतांचें वलय । मध्यें गोंदिलीं पाचप्राय । कृष्णभ्रूमध्य ज्योतिर्मय । चंदनबिंदु इंदुत्वें ॥५३॥
सरळनासिकांचिया श्रेणी । तरळ तळपती मौक्तिकमणि । दशनदीप्तींचीं चांदिणीं । स्मितभाषणीं फांकती ॥५४॥
तांबूलरंगें रंगले अधर । शोभे वलय तें विद्रुमाकार । दानोदकाचे पुलक प्रचुर । वदनशीतकर शोभविती ॥५५॥
इंद्रनीळांची वर्तुळ श्रेणी । माजि एकैक स्वर्णमणि । चारु चंचल रासांगणीं । हनु कपोलें नर्तती ॥५६॥
कंठाभरणें संलग्न कंठीं । जडित निष्कमणींची दाटी । अंसवेष्टित बाहुमिठी । भूषणकोटि झळकती त्या ॥५७॥
नववनितांचे कुच उन्नत । मध्यें वैडूर्यमणिमंडित । श्रीनिकेतन कौस्तुभयुक्त । श्रीवत्स भासुर हरिहृदयीं ॥५८॥
मणिबंध मणिगणवलयान्वित । कंबुकंकणीं श्रीकृष्णहस्त । करमुद्रिका रत्नजडित । नर्त्तनताळें तरळती ॥५९॥
कुचपट्टिका सोत्तरीयें । रविशशिविद्युत्प्रभामयें । पल्लव चंचळ चपलान्यायें । सजळजलदीं झळकती ॥६०॥
हरिपरिधानी पीतवसनें । दिव्यांशुकें वधूपरिधानें । जडितमेखळा विचित्ररत्नें । संमिश्रकिरणें प्रकाशती ॥६१॥
जानुश्रेणी मंडळाकार । रासप्रसंगीं नर्त्तनपर । गुल्फप्रदेशीं मणिमंजीर । वांकी नूपुर पदकटकें ॥६२॥
दशांगुलियें पद्भूषणें । भूमि उज्वळिती तद्गतरत्नें । पदविन्यासें नूपुरस्वनें । संगीतमानें उतरती ॥६३॥
ऐसिया रासोत्सवमंडळीं । जे ते मानी बल्लवबाळी । प्रियतम आकळला वनमाळी । प्रेमागळी मी यातें ॥६४॥
मजचि कवळूनि नाचे हरि । कृष्णप्रेमा मजचिवरी । ऐशा समस्ता व्रजसुंदरी । पृथगाकारीं मानिती ॥६५॥
यमुनापुलिनीं रासोत्सव । ऐसा रचितां श्रीकेशव । अतिऔत्सुक्यें गगनीं देव । कृष्णलाघवें वेधिले ॥६६॥
रसिकरासोत्सवाचे क्षणीं । गगनीं दाटल्या विमानश्रेणी । सभार्यकां सुरांच्या मनीं । मनसिजग्लानि हरिवेधें ॥६७॥
हरिक्रीडनें व्याप्तमनें । ऐशीं सदार सुरविमानें । शतसहस्रप्रयुतमानें । संकीर्ण तेणें नभोवलय ॥६८॥
रासरसिकोत्सवनर्त्तन । सकळसुरवर अनुलक्षून । तदनुकूल यथोपकरण । सद्य घेऊन पातले ॥६९॥
ततो दुंदुभयो नेदुर्निपेतुः पुष्पवृष्टयः । जगुर्गंधर्वपतयः सस्त्रीकास्तद्यशोऽमलम् ॥५॥
त्यानंतरें निर्जरगणीं । हर्षें दुंदुभि ठोकिल्या गगनीं । चैत्रनंदनोद्भवां सुमनीं । रासरंगणीं वर्षती ॥७०॥
श्रीकृष्णाचीं यशें अमळ । स्त्रियांसहित गंधर्वपाळ । संगीतस्वरजाति सुताळ । गाती केवळ उत्कर्षें ॥७१॥
तेथ मृदंग अचेतन । म्हणती मृत्युलोकीं जन्मोन । नेणती गोपींची प्रेमखुण । धिक्तान् धिक्कार ॥७२॥
धिकिटि धिमिकिटि थोंगि थोंगि । इत्यादि ध्वनि ज्या मृदंगीं । याज्ञिकां धिक्कारिती स्वर्गीं । कृष्णवियोगीं धिग्धिक्तान् ॥७३॥
धित्लान्धित्लान् ऐसिया ध्वनि । उपासकां उपहासुनी । म्हणती ठकलां भेदभजनीं । व्रजकामिनींसम न नचां ॥७४॥
अतद्व्यावृत्ति तन्न तन्न । सराग विपंचीमाजि स्वन । ताल प्रकटी श्रुतिव्याख्यान । असन्निरसनव्यतिरेकें ॥७५॥
तत्तत्तालें तत्त्वावबोध । रासनर्तनीं अन्वय शुद्ध । श्रुति प्रतिपादिती प्रसिद्ध । नाट्य करपद्विन्यासीं ॥७६॥
दुंदुभिघोषें जारकर्म । त्रिजगद्विख्यातकर्ता परम । तो एक श्रीकृष्ण पुरुषोत्तम । येर अधम दंडार्ह ॥७७॥
रुदत ललना लागती पाठीं । विवश हुडकिती वनसंकटीं । विलाप करिती वाळवंटीं । परि स्मरकाठी ज्या न बधी ॥७८॥
कंदर्प दर्परहित झाला । निर्जित लज्जित जठरा आला । तो एक श्रीकृष्ण दादुला । अद्भुत लीला विस्तारी ॥७९॥
शिवासि झालें लिंगपतन । चंद्र झाला सलांछन । अहल्यादोषें संक्रंदन । सहस्रनयन भगांकी ॥८०॥
वालखिल्यांची जननकुटी । बैसली ब्रह्मयाचे ललाटीं । सामान्य सुर नर कोट्यानकोटि । स्मरें संकटीं लोळविले ॥८१॥
ऐशा सदंड्य स्मरलांछनीं । सुरनरमुनीश्वरांच्या श्रेणी । दुंदुभिघोषें चक्रपाणि । स्मर जिंकोनि नाचतसे ॥८२॥
रडत ललना लागतां पाठीं । परी ज्या न लगे मन्मथकाठी । यास्तव मारुति शुक धूर्जटि । वंदिती मुकुटीं कृष्णातें ॥८३॥
गोपीसुकृतप्रादुर्भाव । कीं हा मन्मथविजयोत्सव । जारकर्में श्रीकेशव । स्वरतानुभव त्रिजगा दे ॥८४॥
दुंदुभिपणवानकनिःस्वनीं । नभा गाजविती निर्जरश्रेणी । संतत वर्षती दिव्यप्रसूनीं । तो सुगंध धरणी न समाये ॥८५॥
सस्त्रीक गंधर्वांचे पति । संगीततानमानाच्या रीति । हरियश बहळ अमळ गाती । वनिता धरिती करताळा ॥८६॥
विमानश्रेणिसंकुलनभीं । निर्जरीं त्राहाटितां दुंदुभि । तदनुलक्षें भूगोळगर्भीं । तुमुलध्वनि कोंदला ॥८७॥
N/A
References : N/A
Last Updated : May 04, 2017
TOP