एवं शशांकांशुविराजिता निशाः स सत्यकामोऽनुरताबलागणः ।
सिषेव आत्मन्यवरुद्धसौरतः सर्वाः शरत्काव्यकथारसाश्रयाः ॥२६॥

एवं पूर्वोक्तप्रकारीं । सर्वा शरत्काळींच्या रात्री । सत्यसंकल्प गिरिवरधारी । व्रजसुंदरींसह सेवी ॥२४०॥
ज्याच्या संकल्प अव्याहत । ब्रह्मांडकोटि निमेषा आंत । विस्तारूनि जेथींच्या तेथ । करी गुप्त ऐश्वर्यें ॥४१॥
स्वपदानुरक्ता जाणोनि ललना । तो हा श्रीकृष्ण त्रैलोक्यराणा । फेडावया वरदऋणा । रासक्रीडना अनुसरला ॥४२॥
निजानुरक्ता गोपीगणा - । माजि मधुकरनिभ । यदुराणा । करी समस्त दोषासेवना । शरत्कालीना शृंगारें ॥४३॥
दोषाकरभारांजित दोषा । शरत्काव्यकथारसा । आश्रयभूता ज्या अशेषा । तितुक्या परेशा प्रियरूपा ॥४४॥
शरत्काळाचें वर्णन । कथारूपें काव्यग्रथन । करिती कविवर विचक्षण । नवरससंपन्न सुखकारी ॥२४५॥
आश्रय तया काव्यरसा । ज्या ज्या शरत्काळींच्या निशा । अनुरक्तगोपीगणविलासा । करूनि कृष्णें सेविल्या ॥४६॥
गोपीगणेंशीं विलास कृष्णें । कामजयार्थ मुख्य करणें । स्वधर्मभंगें व्यभिचारणें । हें बोलणें अघटित ॥४७॥
तरी कां क्रीडला गोपीगणीं । ऐसी शंका मानिती कोण्ही । तिहीं श्लोकींचय तृतीय चरणीं । मूळव्याख्यानीं पहावें ॥४८॥
श्लोकींचा तृतीय चरण । ‘ सिषेव आत्मन्यवरुद्धसौरतः ’ । - आत्मनि म्हणिजे आपुले ठायीं । रमण सुष्ठुत्वें सर्वदाही । स्खलितविषयेंद्रियप्रवाहीं । नोहे कदाही विक्षेपें ॥४९॥
शबलमायेच्या आवरणें । आत्मविस्मृति तमोगुणें । मलिनसत्त्वें विक्षेपणें । विषयीं करणें तैं भ्रमती ॥२५०॥
ऐसा त्रिगुणीं निबद्ध जीव । तो सत्य मानी विषयभाव । तेथ रमणार्थ धरी हांव । लंघूनि सींव धर्माची ॥५१॥
श्रीकृष्ण केवळ परब्रह्म । त्यासी न बाधी अविद्याम्रम । अजिंक जिंकावया काम । गोपीसंगम नटनाट्य ॥५२॥
जो न वचेचि समरमही । तयासी कोह्णी न म्हणती विजयी । अलोट शस्त्रास्त्रांच्या घायीं । शौर्यें तो तैं वाखाणे ॥५३॥
तैसी शत्रूची आंगवण । बुद्धि प्रताप होय जों क्षीण । तोंवरी धैर्यें करी सहन । भयभंजन भगवंत ॥५४॥
देह असता भूतात्मक । तरी तो धरिता शत्रुधाक । सर्वात्मका शत्रुषट्क । म्हणतां विवेक पांगुळे ॥२५५॥
पूर्णानुभवें क्षमाशीळ । तेथ शत्रूचें न वचे बळ । ये वतारीं श्रीगोपाळ । दावी केवळ वर्तूनी ॥५६॥
पूतनेचें दुर्जर क्ष्वेड । प्राशी हळाहळ जैसा मृड । धैर्यभंगें करी तडफड । मरणा वरपड ते जाली ॥५७॥
तृणावर्त्तें गगना नेला । त्यासि तैसाचि अनुकूळ झाला । गुरुतर नुचलतां तो मेला । परी कृष्णें न केला प्रतिकार ॥५८॥
शकटभंजन पदचालनें । परी आपण न चळे तया भेणें । यमलार्जुनांतें उन्मळणें । परी प्रपातविघ्नें न डंडळी ॥५९॥
बकें गिळितां तो कंठीं पोळे । परी आपण तया भेणें न पळे । वत्सासुराचे कपटलीले । न कीजे गोपाळें प्रतियत्न ॥२६०॥
अघासुरें वत्सें वत्सप । गिळूनि केले प्रेतरूप । जाणोनि तयाचा कपटाटोप । शंकाकल्प हरि न धरी ॥६१॥
तयाच्या मनोरथाचि सरिसा । करितां तद्वदनीं प्रवेशा । गिळितां अडकला त्याचिया घसां । पावला नाशा अघ तेणें ॥६२॥
ब्राह्मी माया विस्तारून । वत्स वत्सपां लपवी द्रुहिण । वयस्य वांसुरें होऊनि आपण । लज्जायमान तो केला ॥६३॥
कालियसप्रें शतैकतोंडें । डंखितां शरीरीं विषोर्मि न चढे । सर्वांग कर्षिलें घालूनि वेढे । तरी न कोंडे धृति ज्याची ॥६४॥
कालियफणांवरी नर्त्तन । तेणेंचि सर्पदर्पापहरण । वनवा गिळूनि साहिला पूर्ण । परी न करी प्रशमन जलवर्षें ॥२६५॥
इंद्र वर्षतां शिलाधारीं । गोकुळावरी धरिला गिरि । निश्चळ राहूनि सप्त रात्री । सहस्रनेत्री लाजविला ॥६६॥
वरुणें स्वलोका नेला नंद । पातला सोडवणें मुकुंद । तेणें पूजूनि आनंदकंद । परमानंद पावला ॥६७॥
त्रिजग जिंकूनि स्वप्रतापें । वरिली विजयश्री कंदर्पें । तो सांडविला येथ दर्पें । पूतनागरपें रतिसमरीं ॥६८॥
कांता एकांतकांतारीं । शरच्छशिभांकित शर्वरी । सुगंधसुमनीं सप्तस्वरीं । जिंके समरीं स्मर त्रिजगा ॥६९॥
नग्नावयवा नातरी ललना । नवयौवना नलिनेक्षणा । नागेंद्रगामिनी नाट्यनिपुणा । नमिती चरणां नम्रत्वें ॥२७०॥
चाटु चाटुल चातुर्यखाणी । चंपकगौरा चंद्राननी । चपळा चमकती सजळघनीं । चारुभाषणी चार्वंगी ॥७१॥
ऐसियांचिये कटाक्षबाणीं । न पडे मन्मथसमरांगणीं । ऐसा ऐकिला नाहीं कोण्ही । कृष्णा वांचूनि त्रिकाळीं ॥७२॥
मित्र परीक्षिजे व्यसन पडतां । धनक्षयीं साध्वी कांता । दुर्भिक्षकाळीं निवडे दाता । कळे निर्ममता सुतनिधनीं ॥७३॥
शूर निवडे समरांगणीं । सुवर्ण निवडे पावकवदनीं । हिरा निवडे मारितां घनीं । निवडे ज्ञानी निर्मोहें ॥७४॥
कांता एकांतीं अनुकूल । प्रार्थनापूर्वक घडल्या मेळ । निवडे ब्रह्मचर्यादिकांचें शील । हृदय अमल अविकृत ॥२७५॥
शौर्यवल्गना बैसोनि सदनीं । औदार्यकथन ब्रह्मारण्यीं । ब्रह्मचर्यादि सभास्थानीं । कथिजे जनीं सर्वत्र ॥७६॥
ते तंव वृथाचि विकत्थना । म्हणोनि श्रीकृष्ण त्रैलोक्यराणा । मन्मथसमरीं अजिंक जाना । विरहिणीगणा वश नोहे ॥७७॥
प्रियतमगोपींहीं प्रार्थिला । न वचे कंदर्पें भुलविला । रासमंडळीं नाचविला । परी तो दादुला स्मरविजयी ॥७८॥
स्मरण कीर्त्तन संक्रीडन । सादर ईक्षण गुह्य प्रश्न । संकल्प उद्योग लिंगमेलन । अष्टांगमैथुन या नांव ॥७९॥
तरुणतरुणींशीं एकत्र । घडतां एकांतीं वसति मात्र । मन्मथबाणें भंगे गात्र । ऐसें चरित्र मदनाचें ॥२८०॥
तेथ लिंगसंघट्टयोगें । गोपी भोगितां सप्रेमरंगें । ज्याचें ब्रह्मचर्य न भंगे । न वचे अनंगें जिंकिला ॥८१॥
चरमधातु म्हणिजे शुक्र । न द्रवे रमतां वनिताचक्र । नवनीत न लभे मथितां तक्र । तैसा अवक्र आत्मरत ॥८२॥
आत्मसुरत ज्यासी फावे । तो कां विषयां रमों धावे । ध्वान्तान्तकें रोहिणीमावे । प्राशनहांवे धरिजे कैं ॥८३॥
तस्मात् कंदर्पक्रीडासमरीं । कृष्ण अजिंक निर्विकारी । तयासि म्हणती जे व्यभिचारी । ते संसारीं भवरुग्ण ॥८४॥
कृष्ण म्हणती व्यभिचारला । त्यांचा परमार्थ वृथा गेला । यथार्थ बोध नाहींच झाला । म्हणोनि विषयाला प्रतिपादिती ॥२८५॥
कृष्णविरहें स्मरचि जर्जर । कृष्णा न बधी मन्मथशर । म्हणोनि संकल्प करी मार । कृष्णकुमार व्हावया ॥८६॥
कृष्णात्मजतालाभें प्रसिद्ध । रूपचातुर्यसद्गुणवृंद । कृष्णातुल्य लाहेन विशद । ऐसा सादर स्मर हृदयीं ॥८७॥
आदिनारायणावतारीं । वसंत मन्मथ सह अप्सरीं । तपोभंगार्थ साही वैरी । मघवा प्रेरी आश्रमा ॥८८॥
तें जाणोनि सर्वात्मक । नोहे सक्रोध ना कामुक । स्वऐश्वर्यें केलीं मशक । शक्रप्रमुख सम्मानें ॥८९॥
स्वसुखशांति न भंगतां । तपोनिष्ठा नुल्लंघितां । संतोषवूनि अभ्यगतां । अमरनाथा लाजविलें ॥२९०॥
तोचि हा येथ श्रीमुरारि । रासरसिक क्रीडाकुसरी । मन्मथ जिंकावया समरीं । वधू श्रृंगारी ऐश्वर्यें ॥९१॥
पांचभौतिक कर्दमगोळे । कृष्णें स्वमायायोगबळें । शृंगारूनि वधूंचे पाळे । केले स्वलीले अनुकूल ॥९२॥
अचेत काष्ठाची वल्लकी । स्वकौशल्यें तौर्यत्रिकीं । कीजे अनुकूल तांडवविखीं । तेंवि वनौकी व्रजनाथें ॥९३॥
अचिंत्यानंतैश्वर्यखाणी । कामजयार्थ चक्रपाणि । सबाह्य सज्जिला लावण्यगुणीं । व्रजकामिनीस्मररंगीं ॥९४॥
एरवीं विपरीत वस्त्राभरणा । तनु नेणती नग्नानग्ना । कृष्णवेधें धांविल्या ललना । पूर्वीं कथना या केलें ॥२९५॥
बाह्य षाण्मासिका रजनी । शरत्काळींच्या अवघ्या करूनी । योगियां भयद ज्या कामिनी । तन्मैथुनीं अस्खलित ॥९६॥
ललनालावण्यरसिकराशि । कृष्णें वेधिलें सुरवरांसि । गोपिकावेषें कैलासवासी । रासक्रीडेसी पातला ॥९७॥
तंव यकैक गोपी एकैक कृष्ण । ऐसें रचिलें रासकंकण । शंभूसि नवजोडे सन्निधान । मग चरणांमधूनि रिघे चक्रीं ॥९८॥
गोपीवेष देखोनि हर । कृष्ण म्हणे हो गोपीश्वर । किमर्थ केला स्त्रीशृंगार । ऐकोनि शंकर लाजिला ॥९९॥
अद्यापि पहा वृंदावनीं । गोपीश्वर शूळपाणि । शृंगारयुक्तवनिताभरणीं । रासस्थानीं जग वंदी ॥३००॥
मथुरामाहात्म्यीं हें आख्यान । यात्राप्रसंगें देखती जन । ऐसें कृष्णाचें विंदान । त्रिजगत्संपूर्ण वेधिलें ॥१॥
निजगुणैश्वर्य वनिताआंगीं । सबाह्य लेववूनि रतिरंगीं । गोपी तोषवूनि तितुकें वेगीं । पुन्हां निजांगीं सांठविलें ॥२॥
राजस गोपी अधरींचे रंग । चुंबनमिसें हरी श्रीरंग । सबाष्प तामस अंजनवोघ । हरी सवेग करस्पर्शें ॥३॥
बुक्का चंदन पुष्पमाळा । सत्त्वसंपत्ति ज्या बहळा । गोपी आळंगितां गोपाळा । सुरतीं सकळा त्या हरिल्या ॥४॥
कंचुकीमिसें चिज्जडग्रंथि । नीवीमोक्षणें नित्यमुक्ति । सुरतानंदें पूर्णस्थिति । सायुज्यप्राप्ति गोपीतें ॥३०५॥
कृष्णा कंठीं घालुनि हात । रतान्तीं गोपी स्वानंदभरित । पूर्णासमान निजात्मरत । गोपी संतत स्वानंदें ॥६॥
ऐसा रासरसोह्लास । शुकें कथितां कुरुवर्यास । तया मानसीं शंकालेश । म्हणोनि प्रश्नास आदरीं ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : May 04, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP