अध्याय ३५ वा - आरंभ
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
श्रीगोपालकृष्णाय नमः ।
गवर्ण तो गजानन । अकार तो श्रीभगवान । उकार तो उमारमण । एवमादि मिळूनि गोकार ॥१॥
मकार म्हणिजे धिषणापति । जे कां रजोगुणाची व्यक्ति । मातृकामात्रीं ज्याची वसती । तो अकार निश्चितीं वासुदेव ॥२॥
उकार केवळ उमारमण । हें बीजनिघंटीं प्रशंसन । जाणती मंत्रविद्याभिज्ञ । एवं प्रणवपूर्ण गोकार ॥३॥
प्रणव आदिबीजा नाम । एकाक्षर नादब्रह्म । जेथूनि स्वरवर्णाचा जन्म । निगमोद्गम तद्योगें ॥४॥
तेथूनि आगमस्मृतिपुराणें । सूत्रें पद्धति विहिताचरणें । तव नामाच्या प्रथमवर्णें । केलें शाहणें ब्रह्मांड ॥५॥
तया प्रणवाचा अभिज्ञ । सन्मात्र तूं सच्चित्सुखघन । विंदतीति वेत्ता म्हणोन । वदे व्याकरण गोविंद ॥६॥
तव वेत्तृत्वें विण प्रणव । प्रसवे चौर्यांशी लक्ष जीव । जंव न पवती ते तुझा ठाव । तंव ते भवभ्रमग्रस्त ॥७॥
यालागिं प्रणवप्रावतिया । प्रणतपाळा प्रणयप्रिया । अगुणा आद्या सद्गुणनिलया । वेदवेत्तया विदग्धा ॥८॥
प्रणवरूपा प्रणवात्मका । प्रणवरहस्यप्रकाशका । प्रणवाभिज्ञाखिलबोधका । नमो देशिका गोविंदा ॥९॥
करूनि तव पदप्रणति मात्र । तव कृपेचें झालों पात्र । यालागिं संवित्प्रचुरगात्र । करूनि चरित्र वदविसी ॥१०॥
इंधन अधिष्ठितां अनळें । जर्हीं तें इंधनाकृतिही कळे । परंतु न धरे तद्विटाळें । निवडे केवळ अनळत्वें ॥११॥
तेंवि भूतां गुणांचा समुदाव । तेथ प्रकटोनि स्वसद्भाव । देहभावाचें पुसूनि नांव । केला ठाव स्वबोधा ॥१२॥
दशमस्कंधाचें व्याख्यान । भाषाबद्ध निरूपण । प्रेमळ भक्त जे अव्युत्पन्न । त्यांतें श्रवण करावया ॥१३॥
निरूपीं म्हणोनि स्पर्शिलें करीं । ते श्रीआज्ञा वंदूनि शिरीं । दयार्णवाची वैखरी । दशमावरी प्रवर्त्तली ॥१४॥
तेथ रासक्रीडान्त पडिले । चौतीस अध्याय वाखाणिले । स्वेच्छा गोपींहीं भोगिलें । रतिसौभाग्य कृष्णेंशीं ॥१५॥
परंतु गोपींची जीवदशा । साक्षी होऊनि तत्सुखावेशा । वरपडलिया पावती भ्रंशा । यास्तव परेशा कींव आली ॥१६॥
मग उदया आणूनि वियोगरवि । सत्रप ईषणात्रय जागवी । सप्रेम वेधें विषय लावी । पुढती गोवी विधिविहितीं ॥१७॥
परी तो हरि विरहाचा आंगीं । साक्षित्व जीवदशा जों भंगी । तोंवरी वर्त्तती भवविरागी । सानुरागी श्रीकृष्णीं ॥१८॥
तेंचि सानुरागलक्षण । कृष्णभुक्तरात्रि स्मरोन । वियोगदुःखाचें दिनमान । क्रमी वधूगण गुणकथनें ॥१९॥
स्वागतादि छंदें द्वादशयुगळीं । मिथा गोपींची मंडळी । संवादली तें नृपाजवळी । कथनशाली शुक सांगे ॥२०॥
N/A
References : N/A
Last Updated : May 10, 2017
TOP