अध्याय ३५ वा - श्लोक २१ ते २६
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
मंदवायुरुपवात्यनुकूलं मानयन्मलयजस्पर्शेन ।
बंदिनस्तमुपदेवगणा ये वाद्यगीतबलिभिः परिवव्रुः ॥२१॥
मलयज म्हणिजे मलयागर । तदुत्थ शीतळ सुगंध समीर । कृष्णासि भजे सम्मानपर । व्यजनाकार मृदुस्पर्शें ॥८७॥
अथवा मलयजदक्षिणपवन । कीं मलयज कृष्णाचें विलेपन । त्याच्या संस्पर्शें सम्मान । ओपी समीरण सर्वत्र ॥८८॥
जेवीं बंदिजनांच्या पंक्ति । स्तवनीं तोषविती भूपती । तेंवीं कृष्णाचीं यशें गाती । विशाळमति सिद्धगण ॥८९॥
गंधर्व किन्नर चारण सिद्ध । वाद्यगीत सुतालबद्ध । वटिका प्रास पद प्रबंध । वर्णिती शुद्ध हरिचरितें ॥१९०॥
ऐसे अनेक निर्जरगण । सेवत्वें करिती सेवन । तत्संगाचें अनुस्मरण । करी तनुमन संतप्त ॥९१॥
ऐशा वदती यशोदेप्रति । तंव अष्टांश उरला गभस्ती । समीप कृष्ण आला म्हणती । अनुवादती तद्योगें ॥९२॥
त्या कृष्णाचें सदयपण । पथीं व्रजाप्रति आगमन । अनुगस्तवन वेणुक्कणन । आनंदोन वधू कथिती ॥९३॥
धेनु स्मरोनि वत्सें शब्द । करिती पावोनि परमानंद । तेव्हां संतुष्ट गोपीवृंद । वर्णी मुकुंद तें ऐका ॥९४॥
जैसीं दोहनोन्मुख वासुरें । चळवळ करितीं उत्साहभरें । कीं दोहनकाळीं प्रेमादरें । होती तत्परें बिडाळें ॥१९५॥
तैसीं गोपींचीं अंतरें । कृष्णागमनीं स्नेहसुभरें । होऊनि ठाती क्रुष्णाकारें । वाग्व्यापारें ते वदती ॥९६॥
वत्सलो व्रजगवां यदगध्रो वंद्यमानचरणः पथिवृद्धैः ।
कृत्स्नगोधनमुपोह्य दिनांते गीतवेणुरनुगेडितकीर्तिः ॥२२॥
गोपी म्हणती अवो बाई । कृष्णवात्सल्य सांगों काई । व्रजीं वत्सें जियें बांधिलीं गेहीं । स्मरे त्यांतेंही हृत्कमळीं ॥९७॥
व्रजवासी जे निजरत जन । विषयीं विमुख तद्गोगण । त्यांसि करावया उपबृंहण । वत्सल पूर्ण हितकर्ता ॥९८॥
वेदाज्ञेच्या सुदृढ दोरें । कर्मखुंटा जीं बांधिलीं ढोरें । तच्छ्रमहरणार्थ श्रीधरें । करुणाभरें द्रवोनी ॥९९॥
पूर्ण परामर्ष केला सजणी । यालागिं परतोनि अस्तमानीं । आमुची जाणूनि हृदयग्लानि । चक्रपाणी येतसे ॥२००॥
स्मरसंतप्त गोपीजन । मरतां मद्विरहें आहळोन । ऐसिये करुणे कळवळून । जाणा श्रीकृष्ण परतला ॥१॥
कृष्णहृदय गे सदय कैसें । प्रेमळांचें या परम पिसें । तोषतयांच्या संतोषें । द्रवे मानसें तद्दुःखें ॥२॥
काळीय मथूनि कृष्ण आला । भेटोनि व्रजजन सुखी केला । तैं रात्रीं जळता वणवा प्याला । स्वजन रक्षिला कारुण्यें ॥३॥
यज्ञार्थ करवी पशूंचें हनन । तेणें पावे तोष गहन । मग याज्ञिकां होय प्रसन्न । ऐसा निर्घृण जो मघवा ॥४॥
कृष्ण केवळ पशुरक्षक । मघवा जाणोनि पशुहिंसक । कृष्णें वर्जिला त्याचा मख । स्मरोनि दुःख तो क्षोभे ॥२०५॥
प्रळयमेघ शिळाधारीं । पडतां कृपाळु श्रीहरि । गोकुळावरी धरिला गिरि । सप्तरात्रीं निजहस्तें ॥६॥
झणें जाचती स्वकीय जन । म्हणोनिं धरी जो गोवर्धन । तो येतसे जाणोनि शीण । गोपीगोगणतोषार्थ ॥७॥
सदय अगध्र श्रीहरि । परतला स्वजनार्थ झडकरी । परंतु मार्गीं नमस्कारीं । वृद्धीं सुरवरीं गोविला ॥८॥
शिवविरंचिशक्रादिक । वृद्ध मुनिवर नारदप्रमुख । मार्गीं नमनाचें करिती अटक । चालों निष्टंक न लाहे ॥९॥
म्हणाल गोविला नमस्कारीं । तैं गोधनें कोण सांवरी । तरी जो त्रिजगातें मोहरी । स्वयें मोहरी वाजवुनी ॥२१०॥
जाणोनि दिवसाचें अवसान । गोधनाचा समूह पूर्ण । मुरलीरवें गोळा करून । मग व्रजभुवन प्रवेशे ॥११॥
तो हा प्रवेशकालींचा गजर । वेणुगायन मनोहर । कीर्ति वर्णिती अनुचर । छंदें सुस्वरें हरिचरितें ॥१२॥
लहानें बाकें जेंवि राहणीं । बसविती मुद्रा लावुनी । मग तीं देहभाना विसरोनी । वदती काहणी भूतभावी ॥१३॥
तैशा विसरोनि देहस्मृति । गोपवनिता यशोदेप्रति । देवकीजठरींचा चंद्र श्रीपति । म्हणोनि वदती बरळत्वें ॥१४॥
कीं देवकीजठरोद्भव शशी । तो बलराम गोपवेशी । म्हणोनि वदती यशोदेपासी । उत्साहेंसी व्रजललना ॥२१५॥
उत्सवं श्रमरुचाऽपि दृशीनामुन्नयन्खुररजश्र्छुरितस्रक् ।
दित्सयैति सुहृदाशिष एष देवकीजठरभूरुडुराजः ॥२३॥
देवकीजठरींचा निशारमण । तो हा सकृष्ण संकर्षण । श्रमाक्त कांतिही करून । करिती कारुण्यें कटाक्षें ॥१६॥
गोपींसहित स्निग्ध जन । त्यांचे उत्साहवंत नयन । श्रमित कांतिही करून । तोषवी नयन पहात्यांचे ॥१७॥
गोरजधूसर सकुंतला । हास्ययुक्ता वदनकमला । धूसर कंठींच्या वनमाला । घनसांवळा शोभवी ॥१८॥
आम्हां सुहृदां जो प्रियतमा । करित कृपेची पूर्णिमा । मोहरे चकोरां चंद्रमा । तेवीं परमात्मा येतसे ॥१९॥
मनोरथ करावया आमुचे पूर्ण । संतप्त जाणोनि विरहिणीगण । येतसे श्रीकृष्ण सर्वज्ञ । श्रमापहरण करावया ॥२२०॥
तंव अतिसमीप आलिया कृष्णा । संभ्रमें उताविळ्या वदती आना । श्रीकृष्णाच्या सुंदर ध्याना । सदयचिह्नांसमवेत ॥२१॥
मदविधूर्णितलोचन ईषन्मानदः स्वसुहृदां वनमाली । बदरपांडुवदनो मृदुगंडं मंडयन्कनककुंडललक्ष्म्या ॥२४॥
ईषत्तारुण्याची छाया । तया मिरवी कैशोरवया । मदघूर्णिता लोचनाचिया प्रांतांमाजी उमटली ॥२२॥
जैसें अल्पपक्क बोर । तैसें वदनपंकज गौर । हो कां संकर्षण श्रीधर । बदरपांडुर लावण्यें ॥२३॥
म्हणाल सुनीळ कृष्णवदन । बदरपांडुर हे उपमा गौण । सरुक्मणिकुंडलभा पूर्ण । गंडमंडन शशितुल्य ॥२४॥
पाच ठेवितां शुभ्रवस्त्रीं । हिरवी प्रभा भासे नेत्रीं । तेवीं रत्नकुंडललक्ष्मी वक्त्रीं । बदरपांडुर प्रकाशे ॥२२५॥
ईषत्पक्क तें लाहतां बोर । हिरवें टळटळित उद्दाम रुचिर । तैसे कुंडलप्रभाभासुर । बदरपांडुर मृदुगंड ॥२६॥
ऐसें मिरवी वदनारविंद । तो स्वसुहृदां लागीं मानद । वनमाळाधर श्रीमुकुंद । आनंदकंद यदुवर्य ॥२७॥
यदुपतिर्द्विरदराजविहारो यामिनीपतिरिवैष दिनांते ।
मुदितवक्त्र उपयाति दुरंतं मोचयन्वजगवां दिनतापम् ॥२५॥
यशोदेपासीं गोपवनितां यदुपति म्हणती कृष्णनाथा । तेथ संकर्षणप्रमुखता । देवकीसुतादि वाक्यार्थीं ॥२८॥
अथवा गर्गवाक्यावरून । पूर्वीं वसुदेवसुत श्रीकृष्ण । यास्तव यदुपति म्हणून । कथिती वधूगण यशोदे ॥२९॥
कीं व्रजवनिता या सुरांगना । जाणती मूळींच्या विधिवरदाना । यास्तव यदुपति म्हणती कृष्णा । संकल्पसंज्ञा जाणोनी ॥२३०॥
गजेंद्रलीलालक्षण जें जें । तो द्विरदराजविहार म्हणिजे । तैसें क्रीडिजे यदुराजें । व्रजीं साजे प्रवेशतां ॥३१॥
पूर्णिमेचा यामिनीपति । चकोरकुमुदादिकांची आर्ति । भंगोनि जेंवि दे विश्रांति । स्वयें दिनांतीं प्रकटूनी ॥३२॥
तेवीं गोगोपींची आर्ति । दुरंत भाविली तिहीं जे चित्तीं । करित होत्सातां तद्विमुक्ति । ये यदुपति शशिवदन ॥३३॥
पैल समीप आला हरि । वदनचंद्रींच्या अमृतधारीं । अपांगमोक्षणेम त्रिताप हरी । स्वानंदलहरी दे आम्हां ॥३४॥
कृष्णवियोगविरहें दुःख । युगासमान वाटे निमेख । दुरंत म्हणणें यास्तव देख । कीं जो निष्टंक अनंत ॥२३५॥
एके श्रीकृष्णप्राप्तिविण । करितां कोटिसाधनीं शीण । नोहे दःखाब्धिलंघन । यास्तव गहन दुरंत ॥३६॥
ऐसा दुःखाब्धि दुरत्यय । निरसी कृपाळु देवकीतनय । करूनि स्वमुखचंद्रोदय । वधूसमुहाद्य तोषवितो ॥३७॥
श्रीश्क व्यासाचा औरस । सावध करूनि कुरुनरेश । गोपिकांचा प्रेमोत्कर्ष । उपसंहरी तें ऐका ॥३८॥
श्रीशुक उवाच :- एवं व्रजस्त्रियो राजन्कृष्णलीलानुगायतीः ।
रेमिरेऽहःसु तच्चित्तास्तन्मनस्का महोदयाः ॥२६॥
शुक म्हणे गा नृपोत्तमा । गोपिकांचा भाग्यमहिमा । वर्णूं न शके शतपथ ब्रह्मा । भुजंगमासमवेत ॥३९॥
कृष्णीं जडावया प्रेम । मुनिवर करिती साधनश्रम । परि तें विधिहरां दुर्गम । कीं रजतमव्याप्तत्वें ॥२४०॥
विशुद्धसत्त्वात्मक गोपिका । म्हणोनि कृष्णीं प्रेमा निका । कृष्णवियोगें तन्मनस्का । बाह्यविवेका विसरल्या ॥४१॥
कृष्णरूप अंतःकरण । कीं स्मिमितत्वें भोगिती कृष्ण । कृष्णमयचि ज्यांचें मन । करिती ध्यान संकल्पें ॥४२॥
कृष्णनिश्चयें व्यवसितबुद्धि । म्हणोनि निरसल्याभवोपाधि । कृष्णान्संधानात्मकसिद्धि । जे कृष्णीं समाधि नित्यत्वें ॥४३॥
कृष्णीं रमला अहंभाव । विरहकातरा तोचि ठाव । जारप्रेमाचें लाघव । कृष्णीं सर्व समविषम ॥४४॥
हांसणें रुसणें उदास होणें । उपकृति कारुण्य स्नेह स्मरणें । स्वानुभूतरति चिंतणें । हें जारलक्षणें कृष्णेंसीं ॥२४५॥
एवं कृष्णीं अहंकार । ज्यांचा सर्वस्वें कृष्णपर । स्र्वेंद्रियांचे व्यापार । कृष्णाकार सर्वदा ॥४६॥
कृष्ण व्यभिचारी अव्यभिचारा । कीं सर्वस्वें कृष्णपरा । कृष्णावेगळा न घेती वारा । येरां पामरां कुणपांचा ॥४७॥
कृष्ण चैतन्य सर्वगत । कृष्णावेगळें अवघें प्रेत । यालागीं गोपिका कृष्णीं निरत । झाल्या विरत गुणभूतां ॥४८॥
विरहदुःखादि माजि गोपी । ऐशा सप्रेम कृष्णरूपीं । कृष्णगुणांच्या कीर्तनजल्पीं । भवविकल्पीं विमुक्ता ॥४९॥
केवढें आश्चर्य कौरवराजा । हरिवियोगीं बल्लवभाजा । गुणकीर्तनें गरुडध्वजा । भजल्या ओजा दुःखार्ता ॥२५०॥
म्हणोनि यांचा भाग्योदय । अमरेंद्राहोनि वरिष्ठ होय । विधिहर ज्याचे न लाहती पाय । तो अनपाय ज्यां साध्य ॥५१॥
ऐशा हरिविरहें वेल्हाळा । रजनीभुक्ता बल्लवबाळा । भोगिती दिवसाही घननीळा । तद्गुणलीला वर्णूनियां ॥५२॥
एवं रासरसामृत गोड । गोपिकांचा सुखसुरवाड । भंगितां दुष्ट शंखचूड । केला दुखंड श्रीकृष्णें ॥५३॥
मग गोपींचा हर्षोत्कृष्ट । असाह्य मानूनि करितां अरिष्ट । कृष्णें भंगिला तो अरिष्ट । अध्याय प्रगट यावरी तो ॥५४॥
तें हें श्रीमद्भागवत । अठरा सहस्त्र व्यासकृत । परमहंसप्रिय वेदांत । सुनिश्चित भक्तितत्त्वें ॥२५५॥
त्यामाजिल स्कंध दशम । श्रीकृष्णाचें जन्मकर्म । शुकपरीक्षितिसंवाद परम । अध्यय परम पंचतिसावा ॥५६॥
एका जनार्दनान्वयप्रवर । गोविंदसद्गुरूचा किंकर । कृष्णदयार्णव श्रवणीं सादर । मागे अवसर श्रोतयां ॥२५७॥
इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां युग्मगीतकथनं नाम पंचत्रिंशत्तमोऽध्यायः ॥३५॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥२६॥ टीका ओव्या ॥२५७॥ एवं संख्या ॥२८३॥ ( पस्तिसावा अध्याय मिळून ओवीसंख्या १६६३२ )
पस्तिसावा अध्याय समाप्त.
N/A
References : N/A
Last Updated : May 04, 2017
TOP