अध्याय ३६ वा - श्लोक ११ ते १५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
गृहीत्वा शृंगयोस्तं वा अष्टादश पदानि सः । प्रत्यपोवाह भगवान्गजः प्रतिगजः यथा ॥११॥
वज्रकल्लोळ जैसा तुटे । तैसी मुसांडी आंगीं झगटे । यावा सांवरूनि वैकुंठें । शृंगें बळकटें धरूनियां ॥८४॥
अरिष्ट झाडितां न सुटे वेगें । बळें लोटितां मेघरंगें । अठरा पांड सारिला मागें । नाग प्रतिनागें ज्यापरी ॥८५॥
अरिष्टातें क्षेपितां हरि । उलथोनि पडिला पृथ्वीवरी । अठरा पांडपर्यंत दुरी । पुन्हा सांवरी तो आपणा ॥८६॥
सोऽपविद्धो भगवता पुनरुत्थाय सत्वरः । आपतत्स्विन्नसर्वांगो निःश्वसन्क्रोधमूर्छितः ॥१२॥
कृष्णें अरिष्ट निक्षेपितां । उलथोनि पडिला पृथ्वीवरुता । पुन्हा धरूनि क्रूर अहंता । जाला उठता सवेग ॥८७॥
आंगीं क्रोधाग्नि प्रज्वळला । श्वासासरिशा निघती ज्वाला । घामें सर्वांगीं डवडविला । सुस्नात झाला निर्वाणीं ॥८८॥
ऐसा सक्रोध कृष्णावरी । अरिष्ट पडला वज्रापरी । पडतां कृष्णें तो शृंगाग्रीं । धरूनि करीं मुरडिला ॥८९॥
तमापतंतं स निगृह्य शृंगयोः पदा समाक्रम्य निपात्य भूतले ।
निष्पीडयामास यथाऽर्द्रमंबरं कृत्वा विषाणेन जघान सोऽपतत् ॥१३॥
शृंगें रगडोनि दोहीं करीं । लात मारिली कुक्षीवरी । उलथूनि पाडिला धरित्री । चरणप्रहारीं दडपिला ॥९०॥
दीर्घवस्त्र धुवोनि नारी । पायें दडपोनि पिळिती करीं । कृष्णें अरिष्ट तैसिया परी । पिळिला भूवरी दडपोनि ॥९१॥
रगडूनि पायें दडपिला मही । शृंगें पिळिलीं हातें दोहीं उपटोनि हाता आलीं तेही । मग तद्घायीं ताडिला ॥९२॥
निष्ठुर लागतां शृंगप्रहार । विकळ पडला अरिष्टासुर । यावरी प्राणप्रयाणपर । अन्य व्यापार विसरला ॥९३॥
असृग्वमन्मूत्रशकृत्समुत्सृजन्क्षिपंश्च पादाननवस्थितेक्षणः ।
जगाम कृच्छ्रं निरृतेरथ क्षयं पुष्पैः किरंतो हरिमीडिरे सुराः ॥१४॥
कंथ वाजतसे घडघडां । अशुद्ध वमितसे भडभडां । पाय खोडितसे खडखडां । झाडी तडफडां सर्वांग ॥९४॥
तनुवैकल्यें मूत्रलोंढें । गांडीवाटे पडती लेंडें । नेत्र फिरवी वांकडे वेडे । पसरी जाभाडें क्षणक्षणा ॥९५॥
देहममता सहसा न सुटे । अहंता धरूनि देहीं वेठे । यास्तव कष्ट होती मोठे । युगान्त वाटे तनुत्यागीं ॥९६॥
येक येके रोमरंध्रीं । वृश्चिकवेदना सहस्रवरी । तथापि अहंममता धरी । हांव पसरी वांचावया ॥९७॥
जितुकी ज्याची अहंता प्रबळ । तितुका दुःखद अंतकाळ । म्हणोनि अरिष्ट क्लेशबहळ । भोगी व्याकुळ प्राणांतीं ॥९८॥
विवेकसंपन्न निरहंकृति । अंतीं कृष्णस्मरण करिती । ते पावती सायुज्यमुक्ति । पुन्हा संसृति त्यां नाहीं ॥९९॥
त्या कृष्णाच्या हातें मरण । अरिष्ट पावला असतां जान । परंतु प्रबळ देहाभिमान । न पवे निर्वाण यास्तव तो ॥१००॥
देहांतूनि प्राण निघतां । अरिष्टें भोगिली क्रूर व्यथा । वारंवार देहाहंता । जाची तत्त्वता जीवातें ॥१॥
जीवमात्र चैतन्यघन । परंतु अध्यस्त देहाभिमान । तेणें भ्रमती प्राणिगण । जन्ममरणभवचक्रीं ॥२॥
यास्तव कृष्णहस्तें हनन । जालें असतां क्लेश गहन । भोगूनि पावला मृत्युस्थान । हें व्याख्यान शुकें केलें ॥३॥
देहाहंता जंव जंव सुटे । तंव तंव क्लेशसमुद्र आटे । निःशेष आत्मत्वें जैं निवटे । तैं तो वेठे पूर्णत्वें ॥४॥
जेथ ज्ञानाचा अंकुर । तोचि नररूपें ईश्वर । ज्ञानविहीन पशु पामर । तो प्रत्यक्ष असुर वृषभात्मा ॥१०५॥
कृच्छ्रं जगाम ऐसें पद । तें हें वाखाणिलें विशद । यानंतरें तो दुर्मद । मृत्युचें पद पावला ॥६॥
कृष्णहस्तें पावोनि मरण । आणि अरिष्टा मृत्युसदन । ऐसिये शंकेचें खंडन । हें व्याख्यान परिसतां ॥७॥
ऐसा अरिष्टासुराचा वध । केला श्रीकृष्णें प्रसिद्ध । देखोनि किन्नर गंधर्व सिद्ध । समस्त विबुध हरिखेले ॥८॥
जयजयकार दुंदुभिगजरीं । पुष्पवृष्टि करिती शिरीं । कीर्ति गाती सप्तस्वरीं । आणि अप्सरी नाचती ॥९॥
भारापनयनें धरादेवी । परमानंदें हृदयीं भावी । अरिष्टनाशें सर्वत्र सर्वीं । सदयार्णवीं निमज्जिजे ॥११०॥
संपलें अरिष्टासुराख्यान । येथूनि कंसासुरानुसंधान । गोविंदसद्गुरुवरदें वदन । दयार्णवाचें वदेल ॥११॥
एवं ककुद्मिनं हत्वा स्तूयमानः स्वजातिभिः । विवेश गोष्ठं सबलो गोपीनां नयनोत्सवः ॥१५॥
ऐसिया प्रकारींख वृषभासुर । मर्दूनि यशस्वी श्रीधर । संकर्षणेंसी गोपभार । धेनुपुरःसर पातला ॥१२॥
गोपीनयनां उत्सवरूप । संवगडे वर्णिती नवप्रताप । प्राचीन कीर्ति गाती पशुप । आल्हाद अमूप व्रजभुवनीं ॥१३॥
ऐसा मर्दूनि अरिष्ट बळी । व्रजीं प्रवेशला वनमाळी । आनंद अमरांचे मंडळीं । दैत्यां काजळी उदेली ॥१४॥
व्रजीं स्वच्छंदें मुकुंद । क्रीडत असतां आनंदकंद । कंसा भेटोनि नारद । करी अनुवाद तो ऐका ॥११५॥
N/A
References : N/A
Last Updated : May 04, 2017
TOP