अरिष्टे निहते दैत्ये कृष्णेनाद्भुतकर्मणा । कंसायाथाऽह भगवान्नारदो देवदर्शनः ॥१६॥

अद्भुतकर्म प्रकटूनि सृष्टि । कृष्णें मारिला अरिष्ट गोष्ठीं । यानंतरें नारद गोष्टी । सांगे श्रुतिपुटीं कंसाचे ॥१६॥
जिवलग विश्वासवंत चार । परम सूक्ष्म समाचार । सांगे शत्रुकृत विचार । तेंवि मुनिवर कंसातें ॥१७॥
पूर्वीं ऐकोनि गगनवाणी । कंस प्रवर्त्तला देवकीहननीं । वसुदेवें तैं गर्भार्पणीं । भाष देऊनि थांबविला ॥१८॥
प्रथम गर्भ कीर्तिमंत । अर्पितां कंस करुणावंत । झाला देखोनि ब्रह्मसुत । सांगतां वृत्तांत कंसातें ॥१९॥
तैं मारिलें गर्भषट्क । वासुदेवदेवकीसि करूनि अटक । विध्वंसूनि यादवकटक । पिता निष्टंक निग्रहिला ॥१२०॥
सप्तमगर्भपाताची बोली । अष्टम कन्या गगना गेली । कंसप्रज्ञा कुंठित झाली । काजळी धरिली मरणाची ॥२१॥
पूतनादि प्रेरिले दूत । निष्फळ यत्न ते समस्त । यावरी कंस अंतरांत । होता विस्मित अनुपायें ॥२२॥
गगनवाणीची वृथा गोष्टी । कन्या जन्मली देवकीपोटीं । तेही गगनीं झाली पैठी । भ्रामक चावटी जल्पोनी ॥२३॥
शत्रु आहे अन्यस्थळीं । म्हणोनि प्रेरिले दैत्यबळी । तितुक्यांची ही झाली होळी । कोणे काळीं नुदैजे ॥२४॥
एवं वृथाचि हें अवघें । होणार होवोनि गेलें मागें । साच असता तरी प्रसंगें । लागवेगें तो येता ॥१२५॥
ऐसें मानूनि कंसासुर । करूनि निश्चिंत अभ्यंतर । मृत्युचिंतेचा पडला विसर । यास्तव मुनिवर पुन्हा आला ॥२६॥
दिव्य देवर्षि ब्राह्मण । यास्तव म्हणिजे देवदर्शन । भूत भविष्य वर्तमान । देवदर्शनविदितत्वें ॥२७॥
अथवा ब्रह्मादिसभास्थानीं । वृत्तांत देखिला ऐकिला कानीं । यालागीं देवदर्शनमुनि । शुक वाखाणी यथार्थ ॥२८॥
त्या नारदें कंसापासी । येऊनि बोधिलें वृत्तांतासी । चिंता कंसाचे मानसीं । स्मरण देऊनि जागविली ॥२९॥
काय कैसें दिधलें स्मरण । तें ऐकावें सावधान । जेणें क्षोभोनि कंसमन । करी प्रयत्न हरिहनना ॥१३०॥

यशोदायाः सुतां कन्यां देवक्याः कृष्णमेव च । रामं च रोहिणीपुत्रं वसुदेवेन बिभ्यता ।
न्यस्तौस्वमित्रे नंदे वै याभ्यां ते पुरुषा हताः ॥१७॥

पूर्वीं नारदें वृत्तांत । सांगूनि आपुला कल्याणार्थ । वांछिला येऊनि परमगुप्त । यास्तव आप्त कंस मानी ॥३१॥
येतां देखोनि नारदासी । सम्मानूनि पूजिलें त्यासी । मग बैसोनि येकांतावासीं । मुनिआक्यासी अवधारी ॥३२॥
नारद म्हणे गा भोजेंद्रा । आझूनि कायसा निदसुरा । सांगोनि गेलों त्या विचारा । कां प्रतिकारा न केलें ॥३३॥
कंसें कथिलें सविस्तर । स्वामी यत्न केला फार । परंतु अद्यापि गोचर । शत्रु साचार नाडळे ॥३४॥
देवकीसप्तमगर्भपात । आठवी कन्या झाली अद्भुत । मारितां गेली गगना आंत । मज चिंतेंत घालुनी ॥१३५॥
अन्यस्थळीं आहे शत्रु । ऐसा बोलिली गूढमंत्रु । तदर्थ प्रेरिले महावीर । परी कोठें साचार नुमटे तो ॥३६॥
हें ऐकोनि नारदमुनि । वृत्तांत सांगे कंसाकानीं । कंस आप्तोक्ति मानूनी । सादर होऊनि अवधारी ॥३७॥
नारद म्हणे कंसराया । देवकीची जे म्हणसी तनया । ते यशोदा नंदजाया । तिचे जठरीं जन्मली ॥३८॥
देवकीचा अष्टम सुत । वसुदेवें तो नेऊनि गुप्त । यशोदेपाशीं ठेवूनि त्वरित । कन्या येथ आणिली ॥३९॥
ते त्वां वधितां गगना गेली । शत्रुवार्ता गूढ कथिली । ध्वनितार्थत्वें तुज नुमजली । ते म्यां बोलिली प्रसिद्ध ॥१४०॥
सातवा म्हणसी गर्भपात । अवघाचि मृषा तो वृत्तांत । नंदसदनीं रोहिणीसुत । ठेविला गुप्त वसुदेवें ॥४१॥
पूर्वीं मारिले गर्भ साही । तैसेचि वधिसी हे दोघेही । यालागीं ठेवी नंदगेहीं । भेणें कोण्हाही न कळतां ॥४२॥
नंद मानूनी परम मित्र । तेथें ठेविले देवकीपुत्र । दिवसेंदिवस प्रौढगात्र । झाले विचित्र प्रतापी ॥४३॥
तुवां जितुके प्रेरिले पुरुष । त्यां दोघांहीं तावक नाश । केला ऐसिया वृत्तांतास । तुज निःशेशः न सांगती ॥४४॥
इतुकें प्रकट कथिल्यावरी । आतां आपुलें स्वहित करीं । ऐकतां कंसाचे अंतरीं । क्रोधलहरी प्रज्वळली ॥१४५॥

निशम्य तद्भोजपतिः कोपात्प्रचलितेंद्रियः । निशातमसिमादत्त वसुदेवजिघांसया ॥१८॥

ऐकोनि मुनिवराची वाणी । भोजेंद्र दुर्मति अविचारखाणी । क्रोध ओसंडे सर्वां करणीं । अविहित करणी आदरिली ॥४६॥
खङ्ग घेऊनि तीक्ष्णीकृत । वसुदेवाचिया वधार्थ । धांवतां नारदें धरिला हात । बोधिला वृत्तांत तो ऐका ॥४७॥

निवारितो नारदेन तत्सुतौ मृत्युमात्मनः । ज्ञात्वा लोहमयैः पाशैर्बबंध सह भार्यया ॥१९॥

नारद म्हणे रे भोजपति । ऐसी आहे राजनीति । कार्यसाधक तो पुरुषार्थी । कार्यघाती तो मूर्ख ॥४८॥
दोघे वासुदेवाचे कुमर । व्रजीं वाढती प्रबळतर । तुझ्या वधास्तव अवतार । धरूनि सुरवर पातले ॥४९॥
ते न करितां हस्तगत । वसुदेवाचा करिसी घात । त्यांसि वृत्तांत झालिया विदित । तेथूनि त्वरित निघती ते ॥१५०॥
कारागृहींचीं बाळकें नेलीं । तुज तीं नाहीं विदित झालीं । आतां व्रजामाजी मोकळीं । कोण आकळी तयांतें ॥५१॥
वसुदेवदेवकीचिया मरणीं । निर्मम निष्ठुर होती दोन्ही । मग प्रवर्त्तती तुझिये हननीं । नानायत्नीं प्रतापें ॥५२॥
यालागिं सांवरूनियां क्रोध । त्या दोहींचा योजीं वध । तंववरी वसुदेवा निरोध । निगडबंध करीं राया ॥५३॥
ऐसा नारदें कंसासुर । वारिला बोधूनि नीतिविचार । मग तो म्हणे वसुदेवकुमर । मृत्यु साचार हे माझे ॥५४॥
वसुदेवसुतापासूनि मृत्यु । आपणा कथिला दैवप्रणीत । हें जाणोनि कंस धूर्त । काय करिता जाहला ॥१५५॥
वसुदेव धरूनि देवकीसहित । निगडबंधनीं निग्रहीकृत । कारागारीं रक्षणयुक्त । रोधिता झाला प्रयत्नें ॥५६॥
नारदाचिये आज्ञेवरून । रक्षिले वसुदेवाचे प्राण । कारागारीं संस्थापून । मानिलें वचन मुनीचें ॥५७॥
यानंतरें नारदमुनि । आज्ञा कंसाची घेऊनी । कृष्णदर्शनालागुनी । आनंदोनि निघाला ॥५८॥
ते पुढारीं सांगों कथा । प्रस्तुत ऐका कंसचरिता । रामकृष्णांचिया घाता । उपाय योजिता पैं झाला ॥५९॥

प्रतियाते तु देवर्षौ कंस आभाष्य केशिनम् । प्रेषयामास हन्येतां भवता रामकेशवौ ॥२०॥

आज्ञा घेऊनि नारद गेला । कंसें केशी पाचारिला । वृत्ताम्त तयासि निरूपिला । नारदें कथिला जैसा तो ॥१६०॥
केशीसि म्हणे कंसासुर । तुजविण जिवलग नाहीं अपर । तुवां प्रवेशोनि व्रजपुर । वसुदेवकुमर मारावे ॥६१॥
रामकृष्ण नामें दोन्ही । माझे शत्रु नंदसदनीं । गुप्त वाढती त्यांच्या हननीं । प्राणदानी मज होई ॥६२॥
जंव पेटला नाहीं अनळ । तंव विझविजे वोतूनि जळ । रामकेशव माझे काळ । तूं तत्काळ वधीं तैसे ॥६३॥
काम्टा काढी जो पायींचा उपकार फेडूं न शकवे त्याचा । मां भंग केलिया मच्छत्रूचा । तात साचा तो तूं कीं ॥६४॥
एक तो वीर्यें उत्पन्न करी । दुजा उपनयनें संस्कारी । तिसरा विद्याप्रबोध करी । क्षुधा निवारी तो चौथा ॥१६५॥
पांचवा भयापासूनि त्राता । आड निघूनि प्राण रक्षिता । रामकृष्णांच्या केलिया घाता । तो तूं तत्त्वता मज जनक ॥६६॥
ऐसा उपकार माझिये शिरीं । केलिया तुझी हे धरित्री । मी होईन आज्ञाधारी । ऐशा प्रकारीं गौरविला ॥६७॥
देऊनि स्वहस्तें तांबूल । वधावया केशवबाळ । व्रजा धाडिला केशी खळ । पुन्हा कुटिल काय करी ॥६८॥

N/A

References : N/A
Last Updated : May 04, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP