अध्याय ४६ वा - श्लोक ३१ ते ३५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
एतौ हि विश्वस्थ च बीजयोनी रामो मुकुन्दः पुरुषः प्रधानम् ।
अन्वीय भूतेषु विलक्षणास्य ज्ञानस्य चेशात इमौ पुराणौ ॥३१॥
राममुकुन्द हे सहोदर । निखिल विश्वाचे मातापितर । बीजशब्दें जनकोच्चार । मातृजठर त योनि ॥३२॥
नंदा म्हणसी प्रकृतिपुरुषें । इयें विश्वाचीं जननीजनकें । तेचि हे राममुकुन्दवेखें । प्रधानपुरुष जाणावे ॥३३॥
हेंचि कानडें वाटेल जरी । तरी निमित्तोपादनभेदकुसरी । वाखाणिजे वेदांतशास्त्रीं । ते हे निर्धारीं बळकृष्ण ॥३४॥
निमित्तकारण संकर्षण । कृष्ण केवळ उपादान । सांख्यसिद्धांतीं व्याख्यान । ऐसेंचि जाणा केलेंसे ॥३३५॥
रासभचक्रादि उपसंपत्ति । निमित्तकारण यातें म्हणती । उपादान तें केवळ माती । घटदृष्टांतीं समजावें ॥३६॥
निमित्तकारणे मातीच घट । तेंवि विश्व हें ब्रह्मचि स्पष्ट । भ्रमनिमित्तें दृष्टादृष्ट । कर्म प्रकट रूढवी ॥३७॥
कुलाल कर्ता जेवीं मृद्धटा । संकल्पकर्ता ब्रह्मांडमठा । एवं घटमठदृष्टांतवाटा । वास्तव निष्ठा टाकाव्या ॥३८॥
संकल्पशुद्ध सत्व ईश्वर । तो हा बळराम रोहिणीकुमर । उपादान जें निर्विकार । कृष्ण साचार परब्रह्म ॥३९॥
एवं अभेद वस्तु एक । परंतु विधि कृतसंस्थापक । काळकुळनानुरूप विवेक । लेऊनि सम्यक अवतरती ॥३४०॥
तोचि अवतरता प्रकार । ऐकें नंदा सविस्तर । करावया जगदुद्धार । करूणाकार काय करी ॥४१॥
आपुली अभिन्न चिदात्मशक्ति । सत्तामात्र निर्गुण ज्ञप्ति । जीतें म्हणती अभेदभक्ति । तीतें विभक्ति उपजवी ॥४२॥
निर्विषयिक चिदात्मरति । निरुपाधिक सुखविश्रांति । चिद्विलासीं अभेदस्फूर्ति । द्विधा व्यक्ति पावोनि ॥४३॥
एकमेकांसाठीम झुरती । एकमेकांची आवडी धरिती । परस्परें उपजे प्रीति । स्वविस्मृतीमाजिवडी ॥४४॥
नारी नरातें मानी प्रिय । रमता प्रेमा सर्वांतरीं । कीर्ति नोहे जगदुद्धारीं । तैं द्विधा करी निजभक्ति ॥३४५॥
ऐसी क्रीडा परस्परीं । रमतां प्रेमा सर्वांतरीं । कीर्ति नोहे जगदुद्धारीं । तैं द्विधा करी निजभक्ति ॥४६॥
एकी नामें आराधनी । दुजी बोलिजे विरोधिनी । सवेग पक्षद्वय धरूनी । समस्त जनीं विरूढल्या ॥४७॥
विरोधभक्ताचा विभाग । आसुरी संपत्ति असुरा चांग । दैवी संपत्ति यथासांग । आराधनांग दैवपक्षीं ॥४८॥
भक्ति विरोधी एक मुख्य । तेथ मिळे तो असुरपक्ष । ते अवघेचि विरोधिभजक । करिती सम्यक एकवळा ॥४९॥
आराधकांसि विधिविरोध । करिती धर्माचा उच्छेद । ते ते पावोनियां खेद । स्मरती गोविंद संकटीं ॥३५०॥
तेव्हां आराधकांच्या कैवारें । विरोधियांच्या आविष्कारें । युगीं युगीं स्वयें अवतरे । तद्विकारें उपयुक्त ॥५१॥
सुखदुःखादि भयाभय । यश अयश आपणचि विये । वांटूनि दोघां देता होय । तेही सोय अवधारीं ॥५२॥
आराधकासि अयश आपणचि विये । वांटूनि दोघां देतां होय । तेही सोय अवधारीं ॥५२॥
आराधकासि विधीचें भय । विरोधी धृष्ट आणि निर्भय । विरोधियांचें सुख तें विषय । भक्त निर्विषय वैराग्यें ॥५३॥
आराधकांसि यश निर्मळ । विरोधकांसि अपयश समळ । दोहीं रूपें एक गोपाळ । मोडल्या खेळ स्वयें निवडे ॥५४॥
भक्त मोक्षाचे अधिकारी । विरोधी कैसेनि पां संसारी । ज्यांसि अवतरोनि देव मारी । ते नरकीं घोरीं कें पचती ॥३५५॥
एवं देवासुरपक्षग । यथाधिकारें अवघेंचि जग । प्रसवले रामकृष्ण हेचि दोघ । प्रधान पुरुष जगज्जनक ॥५६॥
ऐसें जनकत्व प्रतिपादिलें । आतां ईशत्व कवण्या बोलें । तेंही पाहिजे श्रवण केलें । जैसें कथिलें मुनिवर्यें ॥५७॥
विरोधियां आणि भक्तां । दोघां द्विविध ज्ञानदाता । नंदा म्हणसी कोण तत्वता । निर्धारितां ईश्वर हे ॥५८॥
जे जे मुकुंद संकर्षण । कथिले पुरुष आणि प्रधान । तेचि नियंते ईश्वर जाण । द्विविधज्ञानप्रेरक ॥५९॥
श्लोकार्ध पोरोवश्लोकस्य ।
अन्वीय भूतेषु विलक्षणस्य । ज्ञानस्य चैशात इमौ पुराणौ ॥३१॥
पंचधाप्रकृतिजनित भूतें । अनुप्रवेश करूनि तेथें । गौण ज्ञान इंद्रियांतें । विषयस्वार्थें प्रेरक हे ॥३६०॥
गुणानुसार देवासुर । भक्त आणि विरोधकर । प्रवृत्तिसारिखे ज्ञानांकुर । उद्बोधकर बळकृष्ण ॥६१॥
भूतें होऊनि भूतीं प्रविष्ट । तत्प्रवृत्तिज्ञान श्रेष्ठ । गुणानुरूप जें अभीष्ट । इष्टानिष्टद्योतक हे ॥६२॥
आणि प्रवृत्तीहूनि विलक्षण । निवृत्तिरूप जें अपरोक्षज्ञान । तदुद्बोधक हेचि पूर्ण । रामकृष्ण जाणावे ॥६३॥
एवं प्रवृत्ति निवृत्ति । बहुविध ज्ञानें जीवांप्रति । त्यांचे नियंतार ज्ञानदाते नियामक । ईश्वर निष्टंक केवीं हे ॥३६५॥
तरी हे पुराणपुरुष आद्य । वेदवेदांतीं प्रतिपाद्य । इयें अवतारनाट्यें विशद । करिती विबुधकैवारें ॥६६॥
हे अनादि विश्वकारण । तरी सहजचि यातें जनकपण । आणि उभयज्ञानप्रेरक जाण । नियंते म्हणोन ईश्वर हे ॥६७॥
जरी तूं म्हणसी जीवांप्रति । प्रजाजनें जनकत्वप्राप्ति । तरी सृष्ट्यादिकर्मावेशगति । जगदुत्पत्तिकारक हे ॥६८॥
कर्मवासनाबीजें जीव । जन्ममरणें भोगिती भव । तेंवि यांतेंही गर्भीं प्रभव । तैं विशेष गौरव यां कैसें ॥६९॥
तरी तूं नंदा ऐसें न म्हण । यांचें अवधारीं महिमान । श्लोकद्वयें तें निरूपण । श्रोतीं श्रवण करावें ॥३७०॥
यस्मिञ्जनः प्राणवियोगकाले क्षणं समावेश्य मनो विशुद्धम् ।
निर्हृत्य कर्माशयमाशु याति परां गति ब्रह्ममयोऽर्कवर्णः ॥३२॥
जनासमान कैसे नव्हती । तें तूं ऐकें बल्लवपति । जनामाजि जो विशुद्धमति । तो प्राणांतीं स्मरे ज्या ॥७१॥
ज्याचे रूपीं विशुद्ध मन । क्षणैक प्रवेशूनि सज्जन । अंतकाळीं सोडी प्राण । पद निर्वाण तो पावे ॥७२॥
आंगीं असतां जीवदशा । निर्वाणपदवी पावे कैसा । ऐसी शंका तव मानसा । तरी तूं व्रजेशा अवधारीं ॥७३॥
कर्मवासना बीजरूप । हेंचि जीवांचें स्वरूप । तो त्यागोनि कर्मलेष । ब्रह्मेस्वरूप मग होय ॥७४॥
रूपनाम ब्रह्मीं नाहीं । तरी ब्रह्मस्वरूप कैसा काई । परोक्षज्ञानवंत पाहीं । शुद्ध लक्ष्यांशें निवडला ॥३७५॥
विश्व केवळ अर्कवर्ण । शुद्धसत्त्वात्मक होऊन । परांगति जें पद निर्वाण । शीघ्र सन्मय तेथ मिळे ॥७६॥
ज्याचे रूपीं मन निमग्न । करूनि जो जन सोडी प्राण । तो वासनाक्षय करून । ब्रह्म निर्वाण पद पावे ॥७७॥
त्यासि जीवासमान गणणें । तेव्हां मूर्खत्वा काय उणें । तुम्ही कृतकृत्य दोघे जणें । कवण्या गुणें तें ऐका ॥७८॥
तस्मिन्भवंतावखिलात्महेतौ नारायणे कारणमर्त्यमूर्तौ ।
भावं विधत्तां नितरां महात्मन्किंवाऽवशिष्टं युवयोः सुकृत्यम् ॥३३॥
अखिलचराचरात्मक बीज । नारायण तो मायामनुज । तो भावूनि आत्मतनुज । भजलां सहज अनुरागें ॥७९॥
आजवरी तुमचाचि बाळक । आतां तैसाचि वसुदेवतोक । न तो कवणाचा निष्टंक । आदिपुरुष परमात्मा ॥३८०॥
तो अवतारी मानवमूर्ति । त्याचे ठायीं तुमची रति । जडली तेणें भवविरक्ति । आणि उपरति साधली ॥८१॥
इहामुत्रार्थफळसाधन । प्रवृत्ति प्रकटी वेदविधान । ते प्रवृत्तीचेंचि अस्तमान । मन निमग्न जें कृष्णीं ॥८२॥
तो तुम्हांसि कृष्णानुराग । त्यालागीं इहामुत्रार्थभोगविराग । नित्यानित्यवस्तु चांग । तुम्हींच सांग विवरिली ॥८३॥
नित्यवस्तु ब्रह्म निर्गुण । तो हा जगदात्मा श्रीकृष्ण । ईश्वरपर्यंत प्रपंचभान । अनित्य म्हणोनि विसरलां ॥८४॥
ईश्वर अनित्य म्हणाल कैसा । तरी कर्ता ज्ञाता हे ईशत्वदशा । लेवविली ते माये सरिसा । अनित्य ऐसा जाणावा ॥३८५॥
मायोपाधीचें निरसन । जालिया कैंचें ईश्वरपण । प्रतिबिंबेंसीं बिंबा जाण । अस्त्तमान एकचि ॥८६॥
वट मानूनि अनित्य । वटबीजातें म्हणती नित्य । भव अनित्य ईश्वर नित्य । हा सिद्धान्त तयांचा ॥८७॥
यावरी शंका न संभवे । तथापि कोणी बालिशभावें । म्हणती कृष्णीं नित्यत्व फावे । तरी अनित्य मानावें कां ईशां ॥८८॥
कृष्ण मायामय मानव । पूर्वींच निरूपिलें हें सर्व । मायातीत वासुदेव । ब्रह्म वास्तव अविरोध ॥८९॥
हा नित्यानित्यवस्तुविचार । तुम्ही न करितां घडला सार । साधनषट्काचा प्रकार । तो सविस्तर अवधारा ॥३९०॥
कृष्णीं लागतां अनुराग । भवविषयात्मकवासनात्याग । न लगे दमावा इन्द्रियवर्ग । शमदम सांग सहजेंचि ॥९१॥
तुमचें मानस कल्पनाशून्य । कृष्णाकार झालें पूर्ण । प्रपंचापासूनि प्रत्यक्प्रवण । कोण ते जाण याहूनी ॥९२॥
कृष्णीं विरोनि गेलिया चित्ता । द्वंद्वतापसहिष्णुता । घडली साक्षी चिंतनसत्ता । कोण जाणता द्वंद्वातें ॥९३॥
आतां श्रद्धा म्हणिजे प्रीति । तिणें कृष्णें केली रति । तेणें पारुषली प्रवृत्ति । एकान्तभक्ति फावली ॥९४॥
विश्वास गुरुवेदान्तवचनीं । ते परोक्षश्रद्धा षट्कासाधनीं । अपरोक्षप्रेमा तुमचा कृष्णीं । मोक्षामूर्ध्नीं जो मिरवे ॥३९५॥
कृष्णवियोगें पावतां शीण । यालागीं कथिलें कृष्णमहिमान । तें विवरून माझें वचन । एकाग्र मन करावें ॥९६॥
श्रीकृष्णरूपीं एकाग्रमन । यापरौती समाधि कोण । एवं न करितां षट्साधन । तुम्हीं संपूर्ण साधिलें ॥९७॥
कृष्णविक्योगें असहिष्णुता । हेचि मुख्य मुमुक्षुता । ज्ञानें मोक्ष सिद्ध तत्वता । तेंचि आतां विवरा हो ॥९८॥
अन्वयव्यतिरेकेंकरून । कृष्णरूपीं विरतां मन । साधिलें सिद्धान्त अपरोक्षज्ञान । झालां म्हणोनि कृतकृत्य ॥९९॥
कृष्ण परब्रह्म सुनिश्चित । तेथ क्षणमात्रही थारतां चित्त । प्राणि होय कृतकृत्य । हा सिद्धान्त श्रुतिमाथां ॥४००॥
ज्याचें क्षणैक कृष्णीं मन । स्थिर होय समरसोन । तेणें सांग सर्व यज्ञ । केले संपूर्ण व्रजपाळा ॥१॥
ब्रह्मांडींचिया तीर्थीं सकळीं । तदुचित माहात्म्य पर्वकाळीं । यथाविधानें स्नानें घडलीं । जैं कृष्णीं जडली मति राहे ॥२॥
देश काळ पात्र शोधूनी । वेदविहितविधिविधानीं । कनकरत्नीं भरूनि अवनी । दिधली दानीं पैं तेणें ॥३॥
तेणें समस्त पितृगण । तारिले संसारापासून । पावविले ब्रह्मसदन । कृष्णीं मन स्थिर होतां ॥४॥
सर्वव्रतें अनुष्ठिलीं । सर्व तीर्थीं स्नानें केलीं । जेव्हां कृष्णीं स्थिर झाली । चित्तवृत्ति क्षण एक ॥४०५॥
रत्नीं भरूनि पृथ्वी दिधली । पितृमंडळी मोक्षा नेली । जेव्हां कृष्णीं स्थिर झाली । चित्तवृत्ति क्षण एक ॥६॥
सर्ववेदाध्ययनें केलीं । तपश्चर्या सिद्धी नेली । जेव्हां कृष्णीं स्थ्रिर झाली । चित्तवृत्ति नावेक ॥७॥
यालागीं तुमची चित्तवृत्ति । कृष्णीं रंगोनि ठेली पुरती । तेणें झाली भवनिवृत्ति । विषयभ्रांति पारुषली ॥८॥
क्षणैक कृष्णीं राहतां मन । तेणें कृतकृत्य होती जन । तुम्हांसि अवशिष्ट कृत्य कोण । कृष्णीं संपूर्ण रंगलिया ॥९॥
जागृतिस्वप्नसुषुप्तीआंत । कृष्णाकार तुमचें चित्त । सबाह्य साधला एकान्त । कृतकृत्यार्थ सर्वत्र ॥४१०॥
आतां असो हा परमार्थ । कृष्णें ज्यालागीं धाडिलें येथ । तो कृष्णाचा निज गुह्यार्थ । तुम्हीं यथार्थ मानावा ॥११॥
आगमिष्यत्यदीर्घेण कालेन व्रजमच्युतः । प्रियं विधास्यते पित्रौर्भगवान्सात्वतां पतिः ॥३४॥
अदीर्घ म्हणिजे स्वल्पकाळान्तीं । अच्युत येईल व्रजाप्रति । ऐश्वर्यसंपन्न सात्वतपति । देईल विश्रांति तुम्हां पितरां ॥१२॥
हत्वा कंसं रंगमध्ये प्रतीपं सर्वसात्वताम् । यदाहं वः समागत्य कृष्णः सत्यं करोति तत् ॥३५॥
कंस यदुकळाचा द्वेष्टा । र्म्गीं मारूनि तया दुष्टा । कृष्नें येऊनि तुम्हां श्रेष्ठां । स्वमुखें निष्ठा हे कथिली ॥१३॥
जें ताता जावें व्रजाप्रति । मी ही येईन शीघ्रगति । स्निग्ध यादव दुःखावाप्ति । त्यांसि विश्रान्ति देऊनी ॥१४॥
तें यथार्थ करील शौरी । सत्य मानीं हे मम वैखरी । प्रतीक्षा करितां शिणलों भारी । म्हणाल तरी अवधारा ॥४१५॥
कृष्ण कधीं येईल न कळे । वियोगें विलंब असहनशीळें । वाट पाहतां शिणले डोळे । तरी तुम्हांचि जवळी हरि नांदे ॥१६॥
N/A
References : N/A
Last Updated : May 08, 2017
TOP