अध्याय ४६ वा - श्लोक ४१ ते ४५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
यथा भ्रमरिकादृष्ट्या भ्राम्यतीव महीयते । चित्ते कर्तरि तत्राऽत्मा कर्तेवाहं धिया स्मृतः ॥४१॥
जीवा आणि परमात्मया । भेद इतुकाचि बल्लवराया । ज्ञानस्वरूप जे कां माया । अधिष्ठूनिया ईशत्वें ॥६२॥
सृजनावनाप्ययादि करी । परी परमात्मा निर्विकारी । वास्तव स्वरूपाच्या अवसरीं । लीलावतारी होत्साता ॥६३॥
वास्तवस्वरूपाचें अज्ञान । तें अविद्यात्मक गुणबंधन । तेणें जीवासि विपरीत ज्ञान । विषयभान प्रकाशी ॥६४॥
मिथ्या विषय सत्य गमती । तदर्थ कामाची प्रवृत्ति । कामलोभें कर्में करिती । योनि भ्रमती फळभोगें ॥४६५॥
प्रपंचा जें अधिष्ठान । जेथें उमटे विपरीत ज्ञान । तें कल्पनारूप बोलिजे मन । जें वर्ते होऊन चतुर्धा ॥६६॥
बुद्धि निश्चय धूर धरी । चित्तें अनुसंधान करी । तदभिमानें अहंकारी । देहधारी दृढ होय ॥६७॥
इंद्रियद्वारा विषयभान । भावी सत्य सुखनिधान । तत्स्माधनीं कर्तेपण । चित्तीं जाण आविष्करे ॥६८॥
देहधारी जीव भिन्न । हेही विसरे आठवण । देहचि मी आत्मा म्हणून । धरी अभिमान विषयार्थ ॥६९॥
देहाभिमानावलिप्तबुद्धि । तये नांव म्हणिजे अहंधी । तिणें आवरिला कर्तृशब्दीं । आत्मा निरुपाधि तो म्हणवी ॥४७०॥
साच नसोनि साचासचिसें । मनादिइंद्रियव्यापारवशें । जीवचैतन्यालागी भासे । अविद्यापिसें या नांव ॥७१॥
ऐसें बोधितां तुजला न कळे । तरी हें दृष्टांतें मोकळें । प्रतीतीमाजी जैसें उजळे । तैशिया बोलें अवधारीं ॥७२॥
भंवतां भवंडी भरली देहीं । तो सपर्वत भ्रमतां मही । देखे साचाचि सारखी पाहीं । तेंविचि देही अहंभ्रमें ॥७३॥
तरी हा भ्रमचि सांडीं नंदा । आत्मावबोधें भज गोविंदा । तो कवणाचा नोहें कदा । त्या अनुवादा अवधारीं ॥७४॥
युवयोरेव नैवायमात्मजो भगवान्हरिः । सर्वेषामात्मजो ह्यात्मा पिता माता स ईश्वरः ॥४२॥
षड्गुणैश्वर्यसंपन्न । हर्ता जीवाचें अज्ञान । यालांगिं हरि हें अभिधान । त्रिजगीं जाण बुध गाती ॥४७५॥
हा तुमचाचि नोहे पुत्र । सर्वांचाहि प्रीतिपात्र । पुत्र आत्मा मातापितर । जगदीश्वर जगन्मय पैं ॥७६॥
जगन्मयत्वें प्रतिपादिला । तेव्हां अवघाचि जाण उगला । शत्रुमित्रादिभेदाथिला । परि तो संचला अभेद ॥७७॥
तरी तें अभेदत्व कैसें । नंदा ऐक निरूपीतसें । प्रतीति येतां भेद निरसे । चांदिणां जैसें मृगतोय ॥७८॥
दृष्टं श्रुतं भूतभवद्भविष्यत्स्थास्नुश्चरिष्णुर्महदल्पकं च ।
विनाऽच्युताद्वस्तु तरां न वाच्यं स एव सर्व परमार्थमूतः ॥४३॥
दृष्टीपुढें जें दृश्य दिसे । तें कृष्णाच्या चित्प्रकाशें । येर्हवीं वास्तव कांहींच नसे । विषयपिसें करणज्ञा ॥७९॥
दृष्ट म्हणिजे दृग्गोचर । श्रुत म्हणिजे इहामुत्र । एवं पंचधा विषयमात्र । प्रकटी सर्वत्र चित्प्रभा ॥४८०॥
तस्मात् चित्प्रभा नसतां देहीं । विषयप्रतीति कवणे ठायीं । कवणालागीं भासे पाहीं । यालागीं सर्वही कृष्णमय ॥८१॥
दृष्ट श्रुत उमजल्या कांहीं । कृष्णावेगळें उरलेंचि नोहीं । भूत भावी वर्तमानही । तैसेंचि पाही कृष्णमय ॥८२॥
स्थावर जंगम चेताचेत । स्वयंभ संचला श्रीकृष्णनाथ । गुरु लघु किंवा अणुत्व बृहत्त्व । प्रकटी समस्त हरिप्रभा ॥८३॥
अच्युताविण इतर कांहीं । बोलावया वस्तु पाहीं । तत्वनिर्धारें पाहतां नाहीं । एवं सर्वही कृष्णमय ॥८४॥
सूर्यचि सूर्यभामृगजळ । तैसाचि गोगोप्ता गोपाळ । ब्रह्ममयचि ब्रह्मांडगोळ । वस्तु केवळ अनिर्दिष्ट ॥४८५॥
वस्तुतः निर्विचनीय ऐसा । कृष्णप्रकाश बल्लवेशा । बोधूनि उद्धव पाहे निशा । तंव अरुणें दिशा उजळिलिया ॥८६॥
एवं निशा सा ब्रुवतोर्व्यतीता नंदस्य कृष्णानुचरस्य राजन् ।
गोप्यः समुत्थाय निरूप्य दीपान्वास्तून्समभ्यर्च्य दधीन्यमंथन् ॥४४॥
अरुणें सुरंग झाली प्राची । चेइली मंडळी व्रजौकसांची । जेथें वसती इंदिरेची । चर्या त्यांची शुभ सर्व ॥८७॥
एर्हवीं प्रसूतिसमयावधि । मन्मथमंदिर जे न शोधी । ऐसी जिची तांद्रिकबुद्धि । अरुण बोधी केंवि तये ॥८८॥
दिवस आलियाही प्रहरैक । घोरत निजे जे निःशंक । ते वळघली जयाचा अंक । तो नर शंख कां न करी ॥८९॥
असो अवदशेचीं चिह्नें । निद्रालस्यप्रमाद रुसणें । दुर्भगांचीं दुर्लक्षणें । तमोगुणें प्रियतम त्यां ॥४९०॥
व्रजीं अवतरला परेश । तैंहूनि तेथें कमलावास । रजतामदिदोषां नाश । शोभे विशेष सद्गुणश्री ॥९१॥
शुक म्हणे गा परीक्षिति । उद्धवनंदसंवादप्रीति । सरोनि गेली अवधी राती । व्रजजनयुवति चेइलिया ॥९२॥
सवेग उठिल्या द्विजांगना । शौचविधिदंतशोधना । संमार्जिती यज्ञायतना । प्रातःस्नाना सारूनी ॥९३॥
सुस्नात विप्र प्रादुषीकरणें । करूनि संध्यापात्रसाधनें । अध्यापकीं अध्यायनें । छात्रांलागूनि आदरिलीं ॥९४॥
एक प्रातःस्मरणें स्मरती । एक आत्मचिंतनें करिती । योगाभ्यासीं निश्चळवृत्ति । लक्ष्य साधिती पैं एक ॥४९५॥
समस्त व्रजींच्या गोपललना । दीप लावूनि गृहार्चना । सेकोपलेपसंमार्जना । गोदोहना सारिती ॥९६॥
एकी आस्तरणें काढिती । एकी प्रांगणें झाडिती । एकी गोपाळां वाढिती । वना धाडिती गोगोप्ते ॥९७॥
कंडनें पेषणें करिती एकी । बालकें हालविती पर्यकीं । कृष्णचरितें गाती मुखीं । होती सुखी तद्वेधें ॥९८॥
गाई वस्तां हुंबरती । वत्सें प्रतिशब्दें बोभाती । दोहनकाळीं बिडालपंक्ति । पायीं घोळती दुग्धार्थ ॥९९॥
एकी क्षाळूनि तनुभाजनें । शुद्ध करिती दधिशोधनें । एकी करिती दधिनिर्मथनें । गाती आननें हरिचर्या ॥५००॥
तिया गोपींची लावण्यगरिमा । कैशा मिरवती हेमललामा । एका श्लोकें कुरुसत्तमा । शुकमहात्मा निरूपी ॥१॥
द्वितीयश्लोकीं त्यांचीं गानें । आणि हरिचर्यावर्ननें । छंदें करिती दधिनिर्मथनें । तीं व्याख्यानें परिसावीं ॥२॥
ता दीपदीप्तैर्मणिभिर्विरेजू रज्जूर्विकर्षद्भुजकंकनस्रजः ।
चलन्नितंबस्तनहारकुंडलत्विषत्कपोलारुणकुंकुमाननाः ॥४५॥
क्षीरोद्भवा ज्या ललामललना । अमरपुरवविभूषणा । मुनिजनगंजन मन्मथसेना । या व्रजभुवनामाजी वधू ॥३॥
कनकलतिका लावण्यमूर्ति । कनकाभरणीं रत्नपंक्ति । दीपप्रभेच्या बिंबतां दीप्ति । शोभा मिरविती परस्परें ॥४॥
दीपप्रभेचीं प्रदीप्तकिरणें । तेणें भासुर ललनारत्नें । कांचनमंडित मणिभूषणें । तरुणी तारुन्यें मिरविती ॥५०५॥
हेमरत्नाभरणाभर्रण । व्रजवनितांचें तनुलावण्य । हें दृष्टांतें विचक्षण । न्यून पूर्ण परिस तूं ॥६॥
नकटीनाकीं मुक्ताफळ । कनकरत्नीं मणि सुढाळ । तद्वत् घ्रानें त्यांची किळ । होय समळ शोभवितां ॥७॥
नासा श्वित्री सर्वाभरणीं । कुंकुममंडित सुभगा तरुणी । न शोभे जैसा नर दुर्गणी । उत्तमवर्णी होत्सात्ता ॥८॥
दरिद्र्याआंगींच्या चातुर्यकळा । झांकी याञ्चेची अवकळा । कीं मद्यमृद्धट गंगाजळा । करी मंगळा अमंगळ ॥९॥
तैशा व्यंगांगा अंगना । न शोभविती वस्त्राभरणा । कीं धर्मजिज्ञासा कौळिका मलिना । पढतां रसना लाजतसे ॥५१०॥
तैशा नव्हती व्रजसुंदरी । ज्या दिव्यभूषणा भूषणकारी । शोभा मिरविती परस्परीं । निवती नेत्रीं पाहणारे ॥११॥
रज्जु कर्षितां दधिनिर्मथनीं । कंकणीं झळकती रत्नमणि । उठती मंजुळ वलयध्वनि । भूषा श्रवणीं तळपती ॥१२॥
बाहु चंचळ भूषायुक्त । मौळ नितंब कुच कंपित । कंठमाळा मणिमंडित । त्या डोलती तच्छंदें ॥१३॥
कांचनमंडित रत्नकांचि । रुणझुण क्षुद्रघंटिकांची । कटिप्रदेशीं शोभा त्यांची । दाविती साची तन्वंगी ॥१४॥
गंड मंडित कुण्डलकांति । कुंकुमें भालकपोलप्रांतीं । तेणें सुरंग आननपंक्ति । विशेष शोभती व्रजललना ॥५१५॥
वांक्या नुपुर अंदु वाळे । चरणीं रुणझुनती सुताळें । कृष्णशैशवचरितें बहळें । सुस्वरमेळें आळविती ॥१६॥
N/A
References : N/A
Last Updated : May 08, 2017
TOP