अध्याय ४९ वा - श्लोक १ ते ५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
श्रीशुक उवाच - स गत्वा हास्तिनपुरं पौरवेंद्रयशोंऽकितम् ।
ददर्श तत्रांबिकेयं सभीष्मं विदुरं पृथाम् ॥१॥
सहपुत्रं च बाह्लीकं भारद्वाजं सगौतमम् ।
कर्णं दुर्योधनं द्रौणिं पाण्डवान्सुहृदोऽपरान् ॥२॥
शुक म्हणे गा श्रोतृरत्ना । कुरुकुळमलयाचलचंदना । यशःसौरभ्यें निवविसी जना । सुरसज्जनां गुणतिलकीं ॥५३॥
कृष्णानुज्ञा वंदूनि शिरीं । अक्रूर सानुराग सहरहंवरीं । हस्तिनापुरा प्रयाण करी । हृदयीं श्रीहरि चिंतूनी ॥५४॥
हरिस्मरणें दोषनिवृत्ति । तैशा वसती क्रमूनि पंथीं । तीर्थभ्रम कीं द्वारावती । तेंचि कुंती पहावया ॥५५॥
पुढें जाऊनि हस्तिनापुरा । आत्मागमन चारद्वारा । विदित केलें अंबिकाकुमरा । प्रेरी सामोरा प्रधान तो ॥५६॥
ययातीचा तनयोत्तम । पूरु ऐसें जयासि नाम । तदन्वयीं ज्याचें जन्म । प्रतापधाम पौरव ते ॥५७॥
महाभिश दुष्यन्त भरत । शंतनु भीष्म विचित्ररथ । पांडुधृतराष्ट्रपर्यंत । यशोमंडित पुरशोभा ॥५८॥
पौरवीं निर्मिलीं देवागारें । ब्राह्मणायतनें अग्रहारे । हयमेधप्रमुख यज्ञागारें । विश्रांतिकरें सर्वत्र ॥५९॥
अन्नाच्छादनकृतनैश्चित्य । ब्राह्मण स्ववर्णाश्रमनिरत । व्रतीं गृहस्थ वानप्रस्थ । स्वधर्ममंडित पुरगर्भीं ॥६०॥
वेदाध्यायी ब्रह्मचारी । श्रौतस्मार्तें घरोघरीं । पुराणश्रवणें गंगातीरीं । प्रजा व्यापारीं भयरहिता ॥६१॥
वनें उपवनें वाटिका । तपोधनांच्या गुहा मठिका । स्वधर्मनिर्नयधर्मपीठिका । हाट वटिका चौबारें ॥६२॥
रत्नखचितकलशश्रेणी । ध्वजा पताका झळकती गगनीं । मखरीं तोरणीं वितानीं । वैडूर्यमणि लखलखिती ॥६३॥
पौरवेंद्र यशोंऽकित । अक्रूर नगर पाहत पाहत । पातला राजभुवना आंत । अंबिकासुत जे ठायीं ॥६४॥
यान विसर्जूनि लवलाहीं । प्रवेशोनि सभालयीं । मौळ ठेवूनियां पायीं । भीष्मद्रोण वंदिले ॥६५॥
तिहीं देतां आलिंगन । नमिले गौतमद्रोणनंदन । बाहूलीक भूरिश्रवा कर्ण । क्रमेंकरून भेटले ॥६६॥
प्रज्ञाचक्षु तो धृतराष्ट्र । त्रिकालज्ञ क्षत्ता विदुर । पृथेसहित पांडुकुमर । आणि गांधार अवघेचि ॥६७॥
शकुनिप्रमुख सुहृद आप्त । गांधारदुर्योधनांसहित । देखतां झाला गांदिनीसुत । त्यातें यशोचित आळंगी ॥६८॥
यथावदुपसंगम्य बंधुभिर्गांदिनीसुतः । संस्पृष्टस्तैः सुहृद्वार्तां स्वयं चापृच्छदव्ययम् ॥३॥
निजानुयायी यूथपति । तिहींसीं अक्रूर कौरवांप्रति । भेटला आणि साधुवृत्ति । तिहीं समस्तीं मानिला ॥६९॥
समस्तीं पुसिलें सुस्वागत । कुशल यादवकुल समस्त । त्यांतें कथूनि यथावृत्त । स्वयेंही पुसत त्या कुशळ ॥७०॥
कृष्णें कथिल्या वृत्तांतास । विवराया निजमानस । तेथें राहिला कित्तेक मास । तें रायास मुनि सांगे ॥७१॥
उवास कंतिचिन्मासान्राज्ञो वृत्तविवित्सया । दुष्प्रजस्याल्पसारस्य खलच्छंदानुवर्तिनः ॥४॥
राजा धृतराष्ट्र अंबिकासुत । दुष्टपुत्रेंसिं पुत्रवंत । दुर्मति आणि धैर्यरहित । छंदें वर्तत खळांचिया ॥७२॥
दुर्योधन दुःशासन । परमान्यायी निजसंतान । मोहे म्हणवी पुत्रवान । न करी शासन कृतागसां ॥७३॥
पुत्रमोहें व्याकुळित । विशेष खळच्छंदें वर्तत । कर्ण शकुनि जयद्रथ । स्वयें संमत या दुष्टां ॥७४॥
स्वयें आपण रहितनेत्र । दुष्टव्चतुष्टयकथितमंत्र । ऐकोनि वर्ते तदनुसूत्र । खंडूनि पवित्र धर्मपथा ॥७५॥
त्याचें पाहावया चेष्टित । सरळ कुटिळ मनोरथ । अक्रूर राहिला मास बहुत । कीं उमजे वृत्त सहवासें ॥७६॥
दुष्ट मंत्र म्हणसी कैसा । तो तूं ऐकें कुरुनरेशा । सद्गुणीं आरोप करूनि दोषा । कपटें नाशा प्रवर्तती ॥७७॥
तेज ओजो बलं वीर्यं प्रश्रयादींश्च सद्गुणान् । प्रजानुरागं पार्थेषु न सहद्भिश्चिकीर्षितम् ॥५॥
पृथाशब्दें बोलिजे कुंती । तिच्या पुत्रां पार्थ म्हणती । कुंतीसुतांची संपत्ति । ऐकें नृपति गुणवंता ॥७८॥
तेज ओज वीर्य बळ । प्रश्रयादि सद्गुण बहळ । पांडवीं देखोनि प्रजा सकळ । भजती स्नेहाळ मानूनी ॥७९॥
तेज म्हणिजे प्रभावशक्ति । स्वयंभ आंगींची ऐश्वर्यवृत्ति । ओज म्हणिजे शस्त्रास्त्रमति । अभ्यासयुक्ति पटुतरता ॥८०॥
वीर्यशब्दें बोलिजे शौर्य । शत्रुसमरीं न भंगे धैर्य । न पाहता आश्रयसाह्य । बुद्धि निर्भय नैसर्ग्य ॥८१॥
स्वयंभ शरीरशक्ति तें बळ । तनुठकार अभ्यासशीळ । बाहु सदट मंदराचळ । कवळूं पाहती उन्मळना ॥८२॥
प्रश्रय म्हणिजे विनयभाव । नीतिनैपुण्य स्नेहलाघव । सेना सेवक प्रजा सर्व । निजगौरवें वर्त्तवणें ॥८३॥
दया दाक्षिण्य वदान्यता । प्रताप प्रागल्भ्य दुधर्षता । दीनानुकंपा मितवक्तृता । मिष्ट अमृतासम वदती ॥८४॥
ऐसे सद्गुणमंडित पार्थ । देखोनि कौरव दुष्पथनिरत । न साहोनि पांडवचरित । म्हणती अनर्थ हे आम्हां ॥८५॥
स्वगुणीं प्रजा करूनि वश्य । आम्हां नेमिती आपुलें दास्य । कैंचें राज्य कैचें यश । करूनि पोष्य वर्तविती ॥८६॥
आपुलिया कल्याणाकार्रणें । तिहीं दुष्टीं जो विचार करणें । चिकीर्षित ऐसें त्यातें म्हणणें । तें ऐकणें श्लोकार्थें ॥८७॥
N/A
References : N/A
Last Updated : May 08, 2017
TOP