धृतराष्ट्र उवाच - यथा वदति कल्याणीं वाचं दानपते भवान् ।
तद्याऽनया न तृप्यामि मर्त्यः प्राप्य यथाऽमृतम् ॥२६॥

भो भो दानपते अक्रूरा । जैसी वदे हे तव गिरा । यथार्थ कल्यानवती चतुरा । नाहीं परिहारा स्थळ येथें ॥७६॥
ईतें ऐकतां न म्हणवे पुरे । तुझीं ऐसीं अमृतोत्तरें । इये वाणीनें बोधितां निकरें । तृप्ति श्रोत्रें मी न मनीं ॥७७॥
मर्त्यलोकींचा वर्ष्मधारी । भाग्यें अमृतपान जैं करी । तैसी तयाची वैखरी । अलं उत्तरीं असमर्थ ॥७८॥

तथापि सूनृता सौम्य हृदि न स्थीयते चले । पुत्रानुरागविषये विद्युत्सौदामनी यथा ॥२७॥

शास्त्रसंमत विवेकयुक्त । सत्यसुललित उद्वेगरहित । तीतें बोलिजे सूनृत । येर ते अनृत भवचर्चा ॥७९॥
ऐसी वाणी प्रियतम तुझी । परिसतां धणी न पुरे माझी । तथापि न थरे हृदयकंजीं । माहाझंझीं दीपवत् ॥३८०॥
सौम्य ऐसें संबोधन । तुझें सौम्यनस्य अक्षोभ पूर्ण । यास्तव हृदयींचें दोषगुण । करितों कथन स्वमुखें मी ॥८१॥
इहपर सर्वत्र कल्याणरूपा । हितावह सुखकर सद्गुरुकृपा । तैसेसे भारती तुझी बापा । हृदया कां पां न रुचावी ॥८२॥
परम चंचळ माझें हृदय । व्यवसायरहित अनिश्चय । पुत्रमोहें विषम स्नेह । पालट होय क्षणक्षणा ॥८३॥
पांडवांचे लक्षूनि गुण । क्षणैक होय तुष्टमान । पुत्रस्नेहें जाकळूनि । क्षणें क्षोभोन पालटे ॥८४॥
स्वपुत्र केवळ दुर्गुणखाणी । तथापि प्रियतम वाटती मनीं । यास्तव सूनृत तुझी वाणी । न थरे नलिनीदलजलवत् ॥३८५॥
कीं सुष्ठु म्हणिजे शुभलक्षणीं । मेघमाळा जे कादंबिनी । सुमादशब्दें लीलागूनी । श्रेष्ठीं कविजनीं बोलिजे ॥८६॥
विद्युत्प्रकाश तीच्या ठायीं । लखलखूनि लपे पाहीं । तैसी तव वाणी मम हृदयीं । न थरे कांहीं तमःपटलीं ॥८७॥
श्रीधरस्वामींची व्युत्पत्त्ति । सुदामस्फटिकाचे पर्वतीं । लवोनि हारपे विद्युज्ज्योति । तेंवि तवोक्ति मम हृदयीं ॥८८॥
कीं मुक्तादि सोज्वळ माळा । माजि फांकोनि लपे चपळा । विद्युत्प्रभेचिया उजाळा । सरिसी किळा जेंवि स्फुरे ॥८९॥
जंव ते विद्युद्भाझगमगी । तंव र्रोदसी विविधारंगीं । भा भंगतां तमाढ्यलिंगीं । दशदिग्भागीं प्राचुर्य ॥३९०॥
ऐसियासी करणें काय । यदर्थी अक्रूरा अनुपाय । अदृष्टप्रेरक ईश्वर होय । ते तूं सोय अवधारीं ॥९१॥

ईश्वरस्य विधिं को नु विधुनोत्यन्यथा पुमान् ।
भूमेर्भारावताराय योऽवतीर्णो यदोः कुले ॥२८॥

म्हणसी जाणोनि विचार सर्व । तुझ्या ठायीं हा केंवि मोह । तरी ईश्वरेच्छेचा प्रवाह । मतिनिर्वाह तद्रूप ॥९२॥
जो कां ईश्वराचा विधि । ते हे माया ईश्वरोपाधि । तदनुरूप चेष्टे बुद्धि । प्राणिवृंदीं सर्वत्र ॥९३॥
ईश्वराचें विधिविधान । क्षाळी अन्यथा करून । ऐसा पुरुष असे कोण । जो विधिलंघन करूं शके ॥९४॥
म्हणसी ईश्वर सर्वीं सम । तो कां प्रेरी हें वैषम्य । यदर्थीं दानपा ऐकें वर्म । प्रेरणानियम तो ऐसा ॥३९५॥
सृजन पालन संहरण । त्रिविध ईश्वरविधिक्रीडन । तदनुसार तत्प्रेरण । भासे भिन्न वैषम्यें ॥९६॥
स्वधर्माचें संस्थापन । अधर्माचें उच्छेदन । तदनुसार प्रेरी उपकरण । करी सृजन विधितंत्र ॥९७॥
ईश्वरेच्छे नाम विधि । तो अनुकूळीं सृजी समृद्धि । तदनुसार प्रेरी बुद्धि । भासे तत्संधी सम विषम ॥९८॥
तो तूं ईश्वर म्हणसी कोण । जो यदुकुळीं रामकृष्ण । अवतीर्ण रूपद्वय धरून । भूभारशमन करावया ॥९९॥
त्याची उपकरणसामग्री । पांडव प्रमुख आम्ही क्षत्री । द्विधा होऊनि द्यूताकारीं । करील धरित्री निर्भार ॥४००॥
तत्प्रेरणेसारिख्या बुद्धि । स्फुरती अस्मादादि सर्वांहृदीं । यालागिं अक्रूरा मी त्या वंदी । अन्यायबुद्धिक्षमापना ॥१॥
कैसें तयाचें स्वरूप । स्वयंभतेचा प्रताप । स्वमुखें म्हणे कौरवभूप । ऐकें संक्षेप श्लोकार्थ ॥२॥

यो दुर्विमर्शपथया निजमाययेदं सृष्ट्वा गुणान्विभजते तदनुप्रविष्टः ।
तस्मैं नमो दुरवबोधविहारतंत्रसंसारचक्रगतये परमेश्वराय ॥२९॥

जो निजमायकरूने । हें विश्व करी निर्माण । प्रविष्टवत् अनुप्रवेशोन । फळ कर्में गुण विभागीं ॥३॥
कैसी म्हणसी ते निज माया । जिचा अवितर्क्य पथ तर्काया । समर्थ नाहीं या गुणमया । माजि ईश्वरपर्यंत ॥४॥
शुद्धसत्वात्मक ईश्वर । जियेवांचूनि चराचर । सृजूं न शकेचि अणुमात्र । ना स्वयेंही ज्ञाता रहों न शके ॥४०५॥
यालागिं अघटितघटनापटी । जीतें म्हणती श्रुति वाक्पुटीं । जे निराकारीं ब्रह्मांडकोटी । सृजूनि एकटी नावगमे ॥६॥
तियेमाजि जेव्हां स्वप्रकाश । अनुप्रविष्ट चिजाभास । भासे तेव्हां योनि अशेष । चराचरास उत्पादी ॥७॥
तेथ तमःप्रचुर योनि हिंस्र । तदनुसार कर्में क्रूर । तत्फळभोग नरक दुस्तर । तिर्यक् तामिस्र अंधतम ॥८॥
सत्वगुणें स्वर्गावधि । सकामसत्कर्मसुकृतसिद्धि । आभिजात्यादि अष्टमदीं । ज्ञानसमृद्धि दिविभोग ॥९॥
सत्वतमाची मिश्रदशा । तो रजोगुण संमिश्र ऐसा । मिश्रकर्मीं फळाभिलाषा । वलघोनि क्लेशा सुख मानी ॥४१०॥
सुकृत मानूनि आचरे दोष । तत्फळ सुखबुद्धि भोगी क्लेश । तो हा मर्त्यलोक अशेष । विश्वाभास त्रिधा ऐसा ॥११॥
गुणानुरूप हे कर्मरचना । न्यूनपूर्णविवंचना । तत्फळ भोगी योनि नाना । कैशा भोगवी न तर्कवे ॥१२॥
ऐसी दुर्बोध ज्याची क्रीडा । स्मरण नेदी स्वरूपाकडां । मायाचक्रीं संसारगाडा । चाळी घडघडां गतिरूप ॥१३॥
एवं संसारचक्रगति । जो मायावी विहारस्थिति । क्रीडोनि न कळे कोणाप्रति । तो परमेश्वर मी नमितों ॥१४॥
माझें अंतर तयासि विदित । तत्सत्तेनें मम चेष्टित । ऐसें बोलिला अंबिकासुत । अक्रूरें समस्त अवगमिलें ॥४१५॥
इतुकें हस्तिनापुरींचें वृत्त । अक्रूरें राहोनि मास बहुत । निर्धारिलें हृदयाआंत । झाला उदित प्रयाणीं ॥१६॥

श्रीशुक उवाच - इत्यभिप्रेत्य नृपतेरभिप्रायं स यादवः । सुहृद्भिः समनुज्ञातः पुनर्यदुपुरीमगात् ॥३०॥

योगीश्वरकृतकपर्दकळा । कीं ब्रह्मविद्येचा पुतळा । जो पर्णूनि विरक्तबाळा । भोगी स्वलीला सर्वांगीं ॥१७॥
तो शुक स्वमुखें स्वानंदभरित । मत्स्यजाशुक्तिगर्भींचें मुक्त । श्रवणरंध्रीं हरिगुण प्रोत । करूनि कर्षित स्वभूषणा ॥१८॥
कुरुकुळक्षीराब्धिसंभवसोमा । ऐकें राया सार्वभौमा । ऐसी धृतराष्ट्रवक्तृत्वसीमा । धर्मा अधर्मा संमत जे ॥१९॥
परिच्छिन्न टाकली साटी । ते हे वदला प्रकट गोठी । येरें घेऊनि श्रवनपुटीं । पुन्हा वाक्पुटीं त्या न वदे ॥४२०॥
झडझडूनि सभास्थानीं । उभा ठाकला स्वभूथगणीं । आज्ञा मागे जुहारूनी । बाल्हीकभीष्मप्रमुखांतें ॥२१॥
टकाली साटी कैसी कोण । राजा करूं पाहे प्रश्न । शुकें नृपांतर जाणोन । करी ते कथन प्रकटार्थें ॥२२॥
सहस्र शूळ कृतागस एक । कीं सहस्रशस्त्रांचा एक मस्तक । तेंवि यादव कां यदुनायक । बिभीषाजनक कोठवरी ॥२३॥
अलोट ईश्वरांची करणी । मानूनि शिकवण नेघे कर्णीं । वदले हलधरचक्रपानि । तर्‍ही दुर्गुणी सुत न म्हणे ॥२४॥
ऐसें धृतराष्ट्राभिप्रेत । साद्यंत अभिप्राय तो समस्त । जाणोनि यादव श्वफल्कसुत । कांहीं न वदत ऊठिला ॥४२५॥
नमूनि बाल्हीक सपुत्रपौत्र । गौतमद्रौणिद्रोणादिविप्र । भीष्मप्रमुख प्रज्ञानेत्र । येर सर्वत्र जुहारिले ॥२६॥
आज्ञा घेऊनि मथुरे जातां । सदना जाऊनि नमिली पृथा । युधिष्ठिरप्रमुख पांडुसुतां । पुसोनि निघता जाहला ॥२७॥
विदुरपादुका स्पर्शोनि करीं । अंतःपुरींच्या वृद्धा नारी । चेटिकाद्वारा अनुज्ञोत्तरीं । सहगांधारी वंदिल्या ॥२८॥
वारुणीदिग्वप्रगोपुर । पर्यंत अनुयायी गांधार । कर्ण शकुनि द्रोणकुमार । पांडववीर पुरजनही ॥२९॥
मग ते राहवूनि समस्त । रथीं बैसला गांदिनीसुत । कृष्णस्मरणें मथुरापंथ । सेनावेष्टित चालिला ॥४३०॥
विदुर - पांडव त्रिगव्यूति । रथीं बैसोनि सवें जाती । कृष्णभेटीची सप्रेम आर्ती । विदित करिती पुन्हा पुन्हा ॥३१॥
आणि कौरवकृत हृच्छल्यें । अक्रूरा कथूनि कौशल्यें । वस्त्राभरणें परमामौल्यें । जें सम तुल्यें हरिभूषा ॥३२॥
रामकृष्णार्थ अक्रूराहातीं । अर्पूनियां सप्रेमभक्ति । अक्रूर नमिला उतरूनि क्षितीं । वियोगार्तिवैकल्यें ॥३३॥
परस्परें पुसती नेत्रें । अक्रूर पाहूनि पांडवक्त्रें । सात्विकाष्टकें विह्वळगात्रें । हृदयीं सुभरें आलिंगी ॥३४॥
एवं सुहृदीं अनुज्ञात । अक्रूर पुन्हा वळघला रथ । विदुरेंसहित पांडुसत । आज्ञागृहीत थाबविले ॥४३५॥
श्वाफल्किरथ दृग्गोचर । तंव वरी पांडव होते स्थिर । मग परतोनि सहित विदुर । निजमंदिर प्रवेशले ॥३६॥
अक्रूर पंथीं क्रमूनि वसती । सवेग आला मथुरेप्रति । सभे भेटूनि सर्वांप्रति । रामकृष्ण वंदिले ॥३७॥

N/A

References : N/A
Last Updated : May 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP