अध्याय ५७ वा - श्लोक २६ ते ३०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
उवास तस्यां कतिचिन्मिविलायां समा विभुः । ततोऽशिक्षद्गदां काले धार्तराष्ट्रः सुयोधनः ॥२६॥
तिये मिथिलेच्या ठायीं बळ । राहिला होत्साता निश्चळ । जनकसंगें क्रमिला काळ । कित्तेक वर्षेंपर्यंत ॥९६॥
षड्गुणैश्वर्यसंपन्न । विभु समर्थ संकर्षण । आला मिथिलेस हें ऐकोन । स्वयें दुर्योधन पातला ॥९७॥
बैसोनि जनकाचिये सदसीं । रामा गुरुत्वें उपासी । होऊनियां अंतेवासी । स्वयें अभ्यासी गदायुद्ध ॥९८॥
करूनि जनकाचा सहवास । रामापासीं गदाभ्यास । दुर्योधनें सावकाश । केला विशेष कौशल्यें ॥९९॥
मानितः पीतियुक्तेन जनकेन महात्मना । केशवो द्वारकमेत्य निधनं शतधन्वनः ॥२७॥
जनकसहवासें गान्धार । राहिला असतां अभ्यासपर । जनकें सम्मान केला थोर । प्रीतिपुरस्सर नृपयोग्य ॥२००॥
विवर्तरोधें आत्मावबोधें । विवेक वैराग्य जनकीं नांदे । म्हणोनि महात्मा या अनुवादें । सज्जनवृदें संबोधिती ॥१॥
तेणें गौरविला गान्धार । प्रेमें अर्पी राजोपचार । असो मिथिलेचा विस्तार । ऐका श्रीधर काय करी ॥२॥
गरुडध्वज रथेंसहित । द्वारके येऊनि जगन्नाथ । शतधन्व्याचा वृत्तान्त । कथिला समस्त सत्यभामे ॥३॥
अप्राप्तिं च मणेः प्राह प्रियायाः प्रियकृद्विभुः । ततः स कारयामास क्रिया बंधोर्हतस्य वै ॥
साकं सुहृद्भिर्भगवान्या याः सांपरायिकाः ॥२८॥
परम प्रियकर सत्यभामा । तिचिया संतोषजननकमा । विभु समर्थ जो परमात्मा । स्वकृतकर्मा निरूपी ॥४॥
शतधन्व्याचा केला वध । त्यापें मणीचा करितां शोध । परंतु स्यमंत अलब्ध । ऐकोनि क्रुद्ध बळ जाला ॥२०५॥
आम्हांसि पाठवूनियां नगरा । राम गेला मिथिलापुरा । इत्यादि वचनीं वंचूनि दारा । करवी सत्कारा श्वशुराच्या ॥६॥
सत्राजित रहितपुत्र । यालागिं तत्क्रिया कमळामित्र । करविता जाला हें चरित्र । बदलें वक्त्र शुकाचें ॥७॥
सहित सपिंड सुहृद आप्त । तनुसंबंधी गोत्रें सप्त । साम्परायिकाक्रियाव्याप्त । ते ते समस्त मिळोनियां ॥८॥
पारलौकिक ऐसियापरी । सत्राजिताचे करवी हरि । तैसीच शतधन्व्याच्या घरीं । करिती जाली अंत्येष्टि ॥९॥
इतुकी कथिली भगवच्चर्या । सत्राजिताची उत्तरक्रिया । यानंतरें वर्तलें राया । तें कुरुवर्या अवधारीं ॥२१०॥
अक्रूरः कृतवर्मा च श्रुत्वा शतधनोर्वधम् । व्यूषतुर्भयसंत्रस्तौ द्वारकायाः प्रयोजकौ ॥२९॥
ऐकोनि शतधन्व्याचें मरंण । अक्रूर कृतवर्मा मिळोन । कृष्णाभेणें संत्रासोन । प्राण घेऊन पळाले ॥११॥
काय कारण भयासि म्हणसी । तरी या दोघीं शतधन्व्यासी । प्रयोजिलें मणिहरणासी । वधावयासि सत्राजिता ॥१२॥
अंतरवेत्ता श्रीभगवान । आमुच्या अपराधा जाणोन । सहसा घेईल आमुचे प्रान । यास्तव पलायन आदरिले ॥१३॥
द्वारकेपासोनि बाहेरी । पळोनि गेले सहपरिवारीं । त्यांमाजि उभयतांची परी । पृथक्प्रकारीं कथिजेते ॥१४॥
अक्रूर गेला कृष्णानुमतें । भयें कवळिलें कृतवर्म्यातें । तेणें न कळतांचि कोण्हातें । द्वारावतीतें उपेक्षिलें ॥२१५॥
कीं भक्तपक्षपाती श्रीहरि । हे बिरुदाची प्रकट थोरी । भक्तकैपक्षें कृतागस मारी । ऐसिया विचारीं गुप्त पळे ॥१६॥
श्रोते शंका करिती येथें । जे अकूर पळाला कृष्णानुमतें । संमत आणि पलायनातें । तैं विरोध ज्ञाते मानिसी ॥१७॥
तरी कृष्णा न कळत पळाले म्हणतां । वृथा हरीची सर्वज्ञता । विदित असतां पळणें वृथा । या वृत्तान्ता अवधारा ॥१८॥
शतधन्व्यातें निराकरिलें । तैं त्या हरीचें ऐश्वर्य कथिलें । ईश्वरा वंचूनि पलायन केलें । कोण्या बोलें हें साच ॥१९॥
ईश्वर सर्वज्ञ श्रीकृष्णनाथ । त्यां कळलीच होती मात । यालागिं घेऊनि तदनुमत । पळाले त्वरित पुरीहूनी ॥२२०॥
निजानुमतें कां पळवी हरि । हें परिसावें विचारचतुरीं । जे बळरामाचा संशय दुरी । व्हावया करी कैवाडें हें ॥२१॥
म्हणाल सत्यभामावंचन । करिता जाला कां भगवान । यदर्थीं ऐका सावधान । शंकानिरसन होआवया ॥२२॥
शाधन्व्याचे प्रयोजक । हेही दोघे शत्रु देख । तद्वत यांचा वध निष्टंक । भामा सशोक करवील ॥२३॥
जरी प्रियेचें मानस धरूं । तरी निजभक्तातें केंवि मारूं । ऐसा विवरूनियां विचारु । कृष्णें अक्रूर पळविला ॥२४॥
न मारितां अक्रूराप्रति । भंगेल सत्यभामेची प्रीति । यावजन्म विकल्पावाप्ति । हें जाणोनि श्रीपति त्यां पळवी ॥२२५॥
भक्तकैपक्षी श्रीहरि । हे बिरुदाची प्रकट थोरी । भक्तापराधिया अवश्य मारी । तर्की अंतरीं कृतवर्मा ॥२६॥
शतधन्व्यासि आमुचा बोध । तेणें सत्राजिताचा केला वध । सर्वज्ञ जाणे श्रीमुकुंद । तैं मरणखेद कीं आम्हां ॥२७॥
कृतापराधाची धुकधुक । केंवि हरीतें दाविजे मुख । यालागिं होऊनि सशंक । न कळत देख पळाला ॥२८॥
विकल्पाचे हेतु इतुके । क्षाळावया जगन्नायकें । कैवाड रचिलें तें हें निकें । नृपा श्रीशुकें निरूपिलें ॥२९॥
तें हें स्यमंतकाख्यान । मणिप्रसंगकथाकथन । मणि लक्षून निरूपण । अक्रूराकडील परिसा हो ॥२३०॥
राहो कृतर्म्याची गोठी । अक्रूरें जाऊनि जाह्नवीतटीं । काशीक्षेत्रें केली रहाटी । संमत श्रेष्ठीं सर्वत्र ॥३१॥
तेचि रहाटी म्हणाल कैसी । अक्रूरें वसोनि वाराणसी । दानपति या अभिधानासे । प्रकट केलें सर्वत्र ॥३२॥
अहरह कनकभार अष्ट । स्यमंतकमणि प्रसवे श्रेष्ठ । अकूर परम स्वधर्मनिष्ठ । तेणें अभीष्ट मख यजिले ॥३३॥
दानपतिनामा पैं यजमान । र्क्मवेदिकामंडित यज्ञ । साङ्गोपाङ्गविधानज्ञ । करी म्हणोन जन वदती ॥३४॥
पुन्हा कोण्ही म्हणती ऐसें । येथें कृष्णेंचि स्थापिला असे । दिव्ययज्ञांच्या उद्देशें । गुह्य आपैसें हें कथितो ॥२३५॥
ऐसी जनाची गुजगुज । येथें कृष्णाचें रहस्य गुज । तेंही राया कथितों तुज । ऐकें सहज सिंहदृशा ॥३६॥
जें सत्यभामा संकर्षण । इत्यादिकांचें समाधान । जनसंग्रहार्थ वृद्धवचन । मान्य करूनि श्रीकृष्णें ॥३७॥
बाहूनि अक्रूराकारणें । त्यापें मणि मागूनि घेणें । शंका सर्वांची परिहरणें । भगवत्संमत व्याख्यान हें ॥३८॥
आच्छादूनि हें भगवन्मत । कित्तेक ऋषि लापनिकार्थ । अक्रूरानयनीं वदती हेत । तो वदोनि दूषित शुकवक्ता ॥३९॥
तोचि हेतु म्हणाल कैचा । तरी श्रवणीं सादर होऊनि परिसा । अक्रूर गेलिया द्वारकौकसां । ऊठिला वळसा विघ्नांचा ॥२४०॥
अक्रूरे प्रोषितेऽरिष्टान्यासन्वै द्वारकौकसाम् । शारीरा मानसास्तापा मुहुर्दैविकभौतिकाः ॥३०॥
शारीर विघ्नें परोपरी । विविध ज्वर सीतें शारीं । वातपित्तकफविकारीं । द्वारकापुरीं जनक्लेशी ॥४१॥
चिंता हृद्रोग संताप । तिरस्कार विषाद कोप । मानसविघ्नांचा प्रताप । नाना विकल्प संचरले ॥४२॥
विघ्नें दैविकें दारुण । प्रयत्न होती लाभशून्य । उल्कापात विद्युत्पतम । अवर्षण दुर्वृष्टि ॥४३॥
भौतिकें विघ्नें प्रकट जालीं । सर्पवृश्चिकभयें उठिलीं । नगरीं श्वानें पिसाळलीं । कलहाथिलें मार्जारें ॥४४॥
महिष भांडती चौबारां । अजा अविकां गोधना वारा । क्षोभ श्वापदां व्याघ्रादि हिंस्रां । महाभेदरा पुरगर्भीं ॥२४५॥
वारंवार दुखणीं बहाणीं । वारंवार बहुधा विघ्नीं । द्वारकेमाजि हे जाचणी । होतां वचनीं जन तर्की ॥४६॥
अहो अक्रूर येथूनि गेला । तैंहूनि विघ्नां उदय जाला । अनिष्टांचा पूर पेटला । प्रलय मांडला पुरौकसां ॥४७॥
ऐसें प्राचीन एक ऋषि । वाखाणिती त्यां शुकेन्द्र दूषी । इये श्लोकीं तें परिसावयासी । श्रोतयांसी हे सूचना ॥४८॥
N/A
References : N/A
Last Updated : May 09, 2017
TOP