अध्याय ५९ वा - श्लोक १६ ते २०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
तद्भौमसैन्य भगवान्गदाग्रजो विचित्रवाजैर्निशितैः शिलीमुखैः ।
निकृत्तबाहूरुशिरोध्रविग्रहं चकार तर्ह्येव हताश्वकुंजरम् ॥१६॥
अचिंत्यैश्वर्याचा पुंज । तो श्रीभगवान गदाग्रज । शार्ङ्गनिर्मुक्त अमोघ वाज । प्रळयाग्नितेज वर्षला ॥२८५॥
वाज म्हणिजे शरांप्रति । तिहीं कर्मार शाणनिशितीं । शिलीमुखीं तैलमार्जितीं । पाडिली क्षिती भौमचमू ॥८६॥
जैं भौमाचें प्रचंड सैन्य । गजारोहणीं दैत्य निर्घृण । शार्ङ्गनिर्मुक्त वाज घन । निवटी वर्षोन गदाग्रज ॥८७॥
कृष्णहस्तींच्या तीक्षबाणीं । दैत्यमस्तकें उसळती गगनीं । बाहु छेदितां भासती फणी । समराङ्गणीं नभोगर्भीं ॥८८॥
जानु जंघा मांडिया संधि । बाणधारां तुटोनि युद्धीं । पडती त्यांची गगना विधि । न शके त्रिशुद्धि करावया ॥८९॥
ग्रीवा अंस वक्षस्थळें । कंधरा शिरोध्र कंठनाळें । छिन्न अवयव कृत वेगळें । रणीं कोथळे रिचवती ॥२९०॥
ऐसे अवयव खंडविखंड । पर्वतप्राय धडमुंड । आधीं करूनि गरुडारूढ । दावी कैवाड सुरासुरां ॥९१॥
त्यानंतरें तत्प्रेरितें । शस्त्रें छेदिलीं कृष्णनाथें । परमाश्चर्य हें निर्जरांतें । आणि दैत्यांतें दाखवी ॥९२॥
कुर्वन्वयभूज्वळीकरणा । शशाङ्करूपा यशःकीर्तिकिरणा । यालागीं कुरोद्वहसंबोधना । हरिगुणश्रवणा तूं योग्य ॥९३॥
श्रीकृष्णाचें करचापल्य । मनःपवनादि नव्हती तुल्य । कालकलनाशक्ति अतुल्य । तें कौशल्य अवधारीं ॥९४॥
यानि यौधैः प्रयुक्तानि शस्त्रास्त्राणि कुरूद्वह । हरिस्तान्यच्छिनत्तीक्ष्णैः शरैरेकैकशस्त्रिभिः ।
उह्यमानः सुपर्णेन पक्षाभ्यां निघ्नता गजान् ॥१७॥
परमाश्चर्य केलें कैसें । अपारदैत्यीं समरावेशें । शस्त्रास्त्रांच्या प्रलयवर्षें । वर्षतां रोषें क्षोभोनी ॥२९५॥
श्रीकृष्णाच्या करलाघवें । प्रबळ दैत्यसैन्यचि आघवें । छेदूनि विखंड केलीं शवें । जंव भेदावें तच्छस्त्रीं ॥९६॥
शस्त्रस्त्रप्रेरक योद्धे रणीं । आधीं खंडूनि पाडिले बाणीं । मग तीं शस्त्रास्त्रें छेदूनी । पाडिलीं धरणीं कौतुक हें ॥९७॥
अपारदैत्यांची शस्त्रवृष्टि । एकलें शार्ङ्ग कृष्णमुष्टी । एकैक शस्त्र तीं तीं कांठीं । छेदूनि भूतटीं पाडियलीं ॥९८॥
परम तीक्ष्ण मार्गणधारा । जवें वर्षतां शार्ङ्गधरा । तीं तीं बाणीं एकैक शस्त्रा । छेदूनि धुळोरा उधळिला ॥९९॥
सुपर्ण म्हणिजेतो खगेंद्र । कृष्ण वाहतां चपळतर । समरीं भ्रमरी देतां चतुर । वारणभार विध्वंसी ॥३००॥
सादी पडिले कृष्णबाणीं । खगेंद्रपक्षें गजभंगाणी । झाली तें तूं ऐकें श्रवणीं । चातुर्यखाणी कुरुवर्या ॥१॥
गरुत्मता हन्यमानास्तुंडपक्षनखैर्गजाः । पुरमेवाऽऽविशन्नार्ता नरको युध्ययुध्यत ॥१८॥
मदोन्मत्त कुंजरभार । तीक्ष्ण गरुडाचें नखाग्र । रुततां समरीं झाले किर । सहसा धीर न संवरे ॥२॥
तुंडें विदारितां गंड । कुंजरीं भावूनियां भैरुंड । लपती एकमेकां आड । टाकिती धडें भूपृष्ठीं ॥३॥
गरुडपक्षांचा महामार । तेणें भंगला कुंजरभार । धाकें कांपती ते थरथर । दुःखें स्वपुर प्रवेशले ॥४॥
कुंजरभार भंगल्यावरी । भौमसुर क्षोभला भारीं । समरी कृष्णातें पाचारी । भिडे निकरीं तें ऐका ॥३०५॥
दृष्ट्वा विद्रावितं सैन्यं गरुडेनाऽऽर्दितं स्वकम् । तं भौमः प्राहरच्छक्त्या वज्रः प्रतिहतो यतः ॥१९॥
खगेन्द्र क्षोभोनि पक्षघातीं । स्वसैन्य भंगिलें समरक्षिती । हें देखोनि भौम दुर्मति । परम निघातीं क्षोभला ॥६॥
काळाग्निज्वाला धगधगित । तैसा खगेन्द्रा शक्तिघात । करिता झाला भौम दैत्य । वज्रप्रतिहत जेंवि शरें ॥७॥
जिये शक्तीकरूनि बळी । समरीं अमरेन्द्र वज्र वळी । भंगी तृणप्राय दंभोलि । खगेन्द्रमौळी तत्प्रहारें ॥८॥
हाणितां तिये शक्तीचा प्रहर । खगेन्द्र मानी अर्कतूळाग्र । चंचळ न होतां अणुमात्र । झडपिला कुञ्जर भौमाचा ॥९॥
नाकंपत तया विद्धो मालाहत इव द्विपः । शूलं भौमोऽच्युतं हंतुमाददे वितथोद्यमः ॥२०॥
दिग्गज हाणितां माळाघातें । भयाची शंका न मनी चित्तें । शक्तिप्रहार खगेन्द्रातें । भौमहस्तें तत्तुल्य ॥३१०॥
शक्तिप्रहार वृथा गेला । रसरसित भौम ठेला । वीरश्री आवेश भंगला । मनीं शंकला ते काळीं ॥११॥
गरुडें झडपितां भौमगजा । संघट भौमा अधोक्षजा । अच्युतातें हाणी पैजा । सतेज शूळें भूपुत्र ॥१२॥
शूळ उचली जंव करतळीं । तंव सुदर्शनचक्रें श्रीवनमाळी । भौमासुराचा छेदी मौळि । समरशाळी तें ऐका ॥१३॥
N/A
References : N/A
Last Updated : May 10, 2017
TOP