अध्याय ५९ वा - श्लोक २१ ते २५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


तद्विसर्गात्पूर्वमेव नरकस्य शिरो हरिः । अपाहरद्गजस्थस्य चक्रेण क्षुरनेमिना ॥२१॥

शूळप्रेरणापूर्वींच कृष्णें । क्षुरपर्वें सुदर्शनें । गजस्था नरकासुराचें यत्नें । शिर छेदून उडविलें ॥१४॥
बालार्ककोटिप्रभाभासुर । सुदर्शनचक्र सहस्रार । क्षुरपर्वतीक्ष्णधार । लागतां प्रहार तयाचा ॥३१५॥
शिर उडालें गगनोदरीं । कबंध पडिलें पृथ्वीवरी । विमानीं देखिलें सुरवरीं । कवणेपरी तें परिसा ॥१६॥

सकुण्डलं चारुकिरीटभूषणं बभौ पृथिव्यां पतितं समुज्ज्वलम् ।
हाहेति साध्वित्यृषयः सुरेश्वरा माल्यैर्मुकुंदं विकिरंत ईडिरे ॥२२॥

अभेद वज्र किरीटमूर्ध्नि । अनर्घ्य जडित श्रवणीं । गण्ड मंडित उभयकर्णीं । भासुर सुरवर विलोकिती ॥१७॥
भुजंग भंगूनि भूतळवटीं । खगेन्द्र संचरे गगनपृष्ठी । पुन्हा झेंपावे जगजेठी । तेंवि भूतटीं उतरले ॥१८॥
विमानीं देखोनि सुरवरीं । दिव्यलोचनीं ऋषीश्वरीं । पुष्पवृष्टि कृष्णावरी । जयजयकारीं वर्षले ॥१९॥
दिव्यकुण्डलकिरीटवंत । नरकासुराचा मस्तक पतित । भूमंडळीं उज्वळित । देखती दैत्यअनुयायी ॥३२०॥
हाहाकार करिती असुर । म्हणती भ्मला भौमासुर । शेष यूथप पलायनपर । रडती किंकर सभोंवते ॥२१॥
निर्जर करिती पुष्पवृष्टि । साधु म्हणती सुखसंतुष्टि । आशीर्वादप्रणितमुष्टि । मंत्राक्षतांच्या मुनिहस्तें ॥२२॥
गगनीं लागल्या सुरदुंदुभि । दिव्यपताका फडकती नभीं । सुमनवृष्टीचा सुगंध सुरभि । पंकजनाभीवरी वर्षे ॥२३॥
दैत्यदानवां महापळणी । भौमपरिवार विलपे रणीं । निर्जर मुनिवर नाना स्तवनीं । कृष्णालागूनि स्तविताती ॥२४॥
ऐसिये समयी भौममाता । भूमिदेवी सशोक मुदिता । येऊनि भेटली श्रीभगवंता । तें गुरुनाथा अवधारीं ॥३२५॥

ततश्च भूः कृष्णमुपेत्य कुंडले प्रतप्तजांबूनदरत्नभास्वरे ।
सवैजयंत्या वनमालयाऽर्पयत्प्राचेतसं छत्रमथो महामणिम् ॥२३॥

तनयभंगें शोकाकुळा । स्वामिदर्शनें आह्लाद बहळा । सवेग येऊनि कृष्णाजवळा । विनीत गोपाळा भेटली ॥२६॥
सत्यभामारूपें आपण । कृष्णेसहित अवलोकून । म्हणे त्वां पाळिलें मम प्रार्थन । वधिला नंदन मम प्रेमें ॥२७॥
कुण्डलें अदितीचीं भास्वरें । ललामरचितें दिव्य रुचिरें । जियें जाम्बूनदकार्तस्वरें । कुशलत्वष्टारें निर्मिलीं ॥२८॥
वैजयंतीवनमाळेसहित । कृष्णा अर्पिती झाली त्वरित । वरुणच्छत्र अत्युद्भुत । अमृतस्रावी समर्पिलें ॥२९॥
तैसाचि अर्पिला महामणि । स्वतेजें लाजवी जो दिनमणि । मंद शिखररत्नखाणी । मेर्वंश म्हणोनि वजमय ॥३३०॥
इत्यादि अनेक रत्नसंपत्ति । समर्पूनियां कृष्णाप्रति । बधाञ्जळि नम्र क्षिति । स्तविती झाली तें ऐका ॥३१॥

अस्तौषीदथ विश्वेशं देवीदेववरार्चितम् । प्रांजलिः प्रणता राजन्भक्तिप्रवणया धिया ॥२४॥

बुद्धिपूर्वक प्रेमभरिता । कृष्णचरणारविंदीं प्रणता । स्तविती झाली मंगलमाता । कुरुभूकान्ता तें ऐक ॥३२॥
अकारमात्रामुकुरान्तरीं । स्फारिली जितुकी दृश्य लहरी । बुद्ध्यादि उदान चक्षु वेह्रीं । परादि व्यापारीं श्रुतिगदिता ॥३३॥
समष्टिकारण देवतामापें । उमाणितां सत्य संकल्पें । शब्दस्पर्शरसगंधरूपें । विश्व या पडपें ठी केली ॥३४॥
तया विश्वाचें ईशितव्य । जया आंगीं वर्ते सर्व । म्हणोनि विश्वेश ऐसें नांव । बोलती सर्व सुरवर्य ॥३३५॥
तयासुरवरपूज्याप्रति । अनन्यभावें स्तविते क्षिति । क्षणैक सावध होऊनि श्रोतीं । श्रवण परीक्षितीसम कीजे ॥३६॥

भूमिरुवाच - नमस्ते देवदेवेश शंखचक्रगदाधर । भक्तेच्छोपात्तरूपाय परमात्मन्नमोऽस्तुते ॥२५॥

देव म्हणिजे द्योतमान । अमळ अबाधित वास्तव ज्ञान । भूत भविष्य वर्तमान । नोहे कालीन आधुनिक जें ॥३७॥
कालकलनेचा प्रवाह । त्रिकालीन जो तदनुभव । केवळ कालज्ञानोद्भव । नव्हे तो वास्तव तव बोध ॥३८॥
तस्मात्स्वबोधें द्योतमान । देव ऐसें त्या अभिधान । त्या देवांचा देव पूर्ण । त्या तुज नमन देवदेवा ॥३९॥
निःस्वासोद्भव वेदजनन । यथापूर्व विधिविधान । ब्राह्मण निगमकर्माचरण । प्रणवप्रसवन जें केलें ॥३४०॥
तदाचरणें त्रिविध फळ । इष्टानिष्ट मिश्र केवळ । प्रकटी त्रयीविद्या प्राञ्जळ । जें कां मूळ त्रिभुवना ॥४१॥
अभीष्टसुकृतभोक्ते दैव । मिश्रफळभोक्ते मानव । अनिष्टकर्मफळासि जीव । तिर्यक सर्व तामिस्र ॥४२॥
ऐसी स्वधर्मसंस्थापना । भंगावया दानव विघ्ना । करिती तेव्हां संरक्षणा । साधुपालना अवतरसी ॥४३॥
देव सांगती गार्‍हाणें । आविष्करसी तदभिमानें । यालागीं देवेश या संबोधनें । तुज कारणें मी नमितें ॥४४॥
स्वधर्मसेतु भंगिती दैत्य । तयांचा करावया निःपात । शंखचक्राब्जगदाभृत । हा नामसंकेत मी नमितें ॥३४५॥
वेदत्रयीच्या कर्माचरणें । फलभोगार्थी तिन्ही भुवनें । तें कर्म नसतां तुजकारणें । रूपा येणें भक्तेच्छा ॥४६॥
भक्तेच्छोपात्तरूपाय । म्हणोनि नमितें तुझे पाय । यावरी वास्तव जैसें होय । ते स्मरोनि सोय भू नमिते ॥४७॥
पंचकोशातीत परम । चित्सुख सन्मात्र निःसीम । सर्व सर्वग पुरुषोत्तम । तो पूर्णकाम मी नमितें ॥४८॥
परात्पर जो मायातीत । तो परमात्मा अनुस्यूत । अखिलात्मकत्वें ओतप्रोत । तो भगवंत मी नमितें ॥४९॥
राया कुरुकुलव्यंजकमुकुरा । पूर्वीं कुन्तीनें श्रीधरा । स्तविलें त्याचि जपोनि मंत्रा । नमिते धरा तें ऐक ॥३५०॥

N/A

References : N/A
Last Updated : May 10, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP