अध्याय ६० वा - श्लोक ३१ ते ३५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
अयं हि परमो लाभो गृहेषु गृहमेधिनाम् । यन्नर्मैर्नीयते यामः प्रियमा भीरु भामिनि ॥३१॥
कोपसंचार जिये शरीरीं । भामिनी म्हणिजे तिये सुंदरी । यालागीं संबोधी श्रीहरि । भामिनीनामें भीमकिये ॥१३॥
गृहमेधी जो गृहस्थधर्मी । वर्तत असतां गृहस्थाश्रमीं । तो कैवल्यसुखासमान उपमीं । हाचि लाभ रतिरस जो ॥१४॥
गुणलावण्या चातुर्यखाणी । शयनीं संप्रपत असतां रमणी । हास्यनर्मोक्तिभाषणीं । जो काळ क्रमिती चारुतर ॥२१५॥
प्रेमकलहें वदती ललना । तद्युक्त आवेशचिह्में वदना । ऐकोनि पाहों श्रवणा नयना । लाभ यूना परम हा ॥१६॥
प्रेमसंरंभीं ज्या व्यंगोक्ति । हारपोनि जाती तितुक्या सुरतीं । विशुद्धमानसें प्रिय दंपती । आनंदती परस्परें ॥१७॥
नातरी पश्चादि श्वानसूसर । रमतां करिती गुरगुर क्रूर । रामभादि लत्ताप्रहार । मन्मथसमरप्रसंगीं ॥१८॥
तेंवि संसारीं प्राकृत नर । मनुष्यरूपें श्वानसूकर । नेणती मन्मथक्रीडासार । करिती संसार वैरस्यें ॥१९॥
यालागीं नरवर अमरांसम । जाणती रतिरसविलासक्रम । नर्मव्यंगोक्तींचें प्रेम । भाषणकाम परस्परें ॥२२०॥
असो ऐसिया नर्मोत्तरीं । उपहासिलीस वो सुंदरी । तें नेणोनि अभ्य़ंतरीं । दुःखलहरी अनुभवैली ॥२१॥
आतां सांदोनि मनींचा खेद । निःशंक करी प्रेमानुवाद । तेणें होईल परमानंद । म्हणे मुकुन्द भीमकिये ॥२२॥
श्रीशुक उवाच - सैवं भगवता राजन्वैदर्भी परिसांत्विता । ज्ञात्वा तत्परिहासोक्तिं प्रियत्यागभयं जहौ ॥३२॥
कुरुजलधिभवसुधारसा । ऐकें हरिकीर्तनलालसा । ऐशिया प्रकारीं मृगडोळसा । परमपुरुषें सान्तविली ॥२३॥
मानस निवविलें प्रेमोत्तरीं । शरीर स्पर्श्नोनि शंतमकरीं । चुंबनालिङ्गनें बाह्यान्तरीं । आनन्दलहरी प्रकटिली ॥२४॥
मग ते वैदर्भी निजमनीं । परिहासोक्ति भगवद्वचनीं । मद्वाक्यश्रवणाची शिराणी । ऐसें जाणोनि हरिखेली ॥२२५॥
पूर्वीं व्यंग्योक्ति निष्ठुरा । ऐकोनि भयाचा भेदरा । झळंबला जो अभ्यंतरा । तो तैं बाहेरा बोळविला ॥२६॥
माझिया विवाहाचिये क्षणीं । अवघीं प्रतिकूळ देखोनी । मग म्यां केली अघटित करणी । पत्र प्रेरूनि हरि वरिला ॥२७॥
ऐसें ढालगजपण जें माझें । हृदयामाजी गरुडध्वजें । ठेविलें होतें तें आजि सहजें । विषम हृदयींचें उपशिलें ॥२८॥
आतां शाल्वमागधचैद्या । भजें म्हणोनि वदला शब्दा । अयोग्य जाणोनियां प्रमदा । रुचला मुकुन्दा मम त्याग ॥२९॥
पक्कान्नपरवडी अमृतप्राय । त्यांमाजी विष जैं भोक्ता खाय । तें दुःख हृदयांमाजी तो वाहे । मग करी उपाय त्यागार्थ ॥२३०॥
वमनरेचनपाचनयोगें । निरुज होय विषाच्या त्यागें । तैसेंचि मजलागीं श्रीरंगें । परिहासप्रसंगें आदरिलें ॥३१॥
भाग्यें पत्रलेखनावरी । प्रियतम वरिला श्रीमुरारि । तया आनंदें आजिवरी । होत्यें अंतरीं प्रफुल्लित ॥३२॥
आजि ऐकूनि व्यंग्योत्तरें । त्यागभयाचें आले शारें । पुढती सान्तवितां श्रीधरें । प्रेमोपचारें तें हरिलें ॥३३॥
ऐसें प्रियत्यागाचें भय । सांडूनि वैदर्भी निर्भय । होवोनि वल्लभा वदती होय । हे रससोय शुक वर्णी ॥३४॥
बभाष ऋषभं पुंसां वीक्षंती भगवन्मुखम् । सव्रीडहासरुचिरस्निग्धापांगेन भारत ॥३३॥
सांडूनि भयाचा भेदरा । चेतना प्राप्त करणनिकरा । कृष्णसान्त्वनें सुंदरा । प्रेमाधिकारा पावली ॥२३५॥
कृष्णसान्त्वनोक्तीवरी । पूर्वोक्तीचें कारण चतुरीं । विवरूनि पूर्वापर अंतरीं । अभिप्राय अवगमिला ॥३६॥
अयं हि परमोलाभ । ऐसें बोलिला पंकजनाभ । या वचनाचा जाणोनि गर्भ । स्मितापाङ्गें अवलोकी ॥३७॥
पूर्व नर्मोक्ती स्वत्यागपर । तैं भंगलें होतें अंतर । कृष्णसान्त्वनें प्रेमादर । झाला निर्धार अभयाचा ॥३८॥
माझिया मुखें स्निग्धोत्तरें । ऐकावया परमेश्वरें । बोलिल्या नर्मोक्ती आदरें । नव्हतीं निष्ठुर क्रोधवाक्यें ॥३९॥
ऐसें विवरोनि पूर्वापर । जाणोनि स्वामीचें अंतर । निर्भयभावें परम सधीर । झाली सादर प्रतिवचना ॥२४०॥
सलज्ज सस्मित रुचिरापाङ । कटाक्षविक्षेप भृकुटी चांग । इत्यादि लक्षणीं नाथोत्तमाङ्ग । नयनभृंगें प्राशीतसे ॥४१॥
पुरुषांमाजी उत्तम पुरुष । तो श्रीकृष्ण जगदीश । अंतरीं पावोनि परमोल्लास । भाषण करीत तेणेंसी ॥४२॥
रुक्मिण्युवाच - नन्वेवमेतदरविंदविलोचनाऽऽह भवान्भगवतोऽसदृशी विभूम्नः ।
क्व स्वे महिम्न्यभिरतो भगवांस्त्र्यधीशः क्वाहं गुणप्रकॄतिरज्ञ गृहीतपादा ॥३४॥
आपुले ठायीं दोष सोळा । घेऊनि वदला घनसांवळा । उभय दोषीं भीमकबाळा । बुद्धिमंदत्वें नोकिली ॥४३॥
दोषारोपित श्रीकृष्णशब्द । करूनि तद्दोषापवाद । गुणगणमंडित स्तवनानुवाद । त्यामाजी विशद प्रतिपादी ॥४४॥
म्हणे अरविंदलोचना । जें तूं वदलासि भो सर्वज्ञा । आम्हां असमां कोण्याकारणा । राजपुत्रि त्वां वरिलें ॥२४५॥
तरी तें यथार्थ अन्यथा नोहे । तुझा महिमा केवढा पाहें । तेथ मज किंमात्रेची सोय । कैसेनि ये समतेसी ॥४६॥
तुजसीं समान न सजे भाज । तुशीं रमतां परम लाज । यथार्थ वदले गरुडध्वज । परिहासबीज हें स्पष्ट ॥४७॥
तुझा महिमा कोणीकडे । ब्रह्मादि त्रिदेवां नियमिसी दंडें । तेथ प्राकृत जड मूढ वेडें । कोण्या तोंडें सम म्हणवूं ॥४८॥
तुझी स्वगत जे पूर्णश्री । गुणसाम्यप्रकृति ऐश्वर्यधात्री । जियेतें सनकादि सर्वत्रीं । त्रिविधा नरीं भजिजेत ॥४९॥
बद्ध मुमुक्षु आणि मुक्त । विषयी साधक सिद्ध स्वरत । तव वल्लभा भेदरहित । जाणोनि संतत भजताती ॥२५०॥
तेही समता तुजसीं न करीं । तेथ मी प्राकृता गुणविकारी । गुणमयी प्रकृति तुजसी सरी । सहसा न करीं हें सत्य ॥५१॥
अज्ञ म्हणिजे मूर्ख जन । प्रपंचीं निरत विषयाभिज्ञ । ते आराधिती माझे चरण । विरक्त सर्वज्ञ उपेक्षिती ॥५२॥
रात्रीदिसा समता न घडे । चैतन्यसमता न कीजे दगडें । हें सर्वांसी कळों ये उघडें । नोहे वांकुडें वदलां तें ॥५३॥
पूर्वोक्तीचा वास्तव बोध । विवरूनि निरसिला अपवाद । हें ऐकोनि श्रीमुकुंद । मानी कोविद वैदर्भी ॥५४॥
यावरी हरीचें द्वितीयोत्तर । दोष निरसूनि ऐश्वर्यपर । प्रतिपाद्ती झाली चतुर । बोधी मुनिवर तें राया ॥२५५॥
सत्यं भवादिव गुणेभ्य उरुक्रमांतः शेते समुद्र उपलंभनमात्र आत्मा ।
नित्य कदिंद्रियगणैः कृतविग्रहस्त्वं त्वत्सेवकैर्नृपपदं विधुतं तमोंऽधम् ॥३५॥
हेंही सत्य हो मुरारि । भय पावलियाचे परी । शरण समुद्रा गेलों हरि । म्हणसी वैखरी हे उचित ॥५६॥
तरी परिसा जी उरुक्रमा । तुम्हांसि भयाची न शिवे गरिमा । तो तूं रायांच्या पराक्रमा । भेणें धामा जळीं करिसी ॥५७॥
शब्दस्पर्शादिक जे गुण । राजे राजताति हे म्हणोन । यांपासोन भय पावोन । हृदयसमुद्रीं दुर्गम तूं ॥५८॥
भय पावलासि हें भासे मूढां । येर्हवीं निर्भय तूं धडफुडा । अंतरसमुद्रामाजी गूढा । गूढ होवोनि वसतोसी ॥५९॥
समुद्राहूनि अगाधतर । विषय राजयां अगोचर । जेथ निश्चळ प्रकाशकर । समुद्रान्तर वसविशी ॥२६०॥
उपलंभननामें मात्रा । तिहीं अनुमेय तूं स्वतंत्रा । आत्मा चैतन्यघन या विचारा । प्रतिपादिती अनुमानें ॥६१॥
आणि बळिष्ठांहीं केला द्वेष । ऐसें बोलिले परमपुरुष । तेंही सत्यचि हा विशेष । सावकाश अवधारा ॥६२॥
कुत्सित इंद्रियांचा जो गण । बाह्यज्ञानें बळिष्ठ पूर्ण । ते द्वेषिती तुजलागून । अप्राप्त म्हणून अप्रिय त्यां ॥६३॥
अप्रिय म्हणोनि द्वेषनिष्ठ । प्रवृत्ति मानिती परम मिष्ठ । भेदें विषयीं रत पापिष्ठ । भोगिती कष्ट यास्तव ते ॥६४॥
आम्ही त्यक्तनृपासन । ऐसें बोलिले जें भगवान । ऐका तयाचें निरूपण । सत्य म्हणोन प्रतिपादी ॥२६५॥
तुझे सेवक जे विरक्त । विषयीं विमुख निजात्मरत । तिहें नृपासन जें त्यक्त । गाढ ध्वान्त मानूनी ॥६६॥
परम दुष्कृत निरयस्थान । गाढ अन्धतम नृपासन । तें तव सेवक त्यजिती पूर्ण । मां तूं कोठून स्वीकरिसी ॥६७॥
अस्पष्टमार्गगामी आम्ही । नाकळो लौकिकमार्गधर्मीं । हेंही बोलिलां सत्य स्वामी । नेणिजे अधर्मी पथ तुमचा ॥६८॥
N/A
References : N/A
Last Updated : May 10, 2017
TOP