अध्याय ६० वा - श्लोक ४१ ते ४५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


यद्वांछया नृपशिखामणयों‍ऽगवैन्यजायंतनाहुषगयादय ऐकपत्यम् ।
राज्यं विसृज्य विविशुर्वनमंबुजाक्ष सीदंति तेऽनुपदवीं त इहास्थिताः किम् ॥४१॥

ज्या तुमचिया भजनासाठीं विरक्त भूप कोट्यानकोटी । भववैभवा देवोनि पाठी । लागले वाटीं भजनाचे ॥१६॥
तया नृपांचे शिखामणि । श्रेष्ठ श्रेष्ठ वदती वाणी । ते परिसावे चक्रपाणि । जे पुराणीं विख्यात् ॥१७॥
अंगनामा पृथूचा आजा । वैन्य पृथूचि गरुडध्वजा । जायंतनामें भरत सहजा । अंबरीषादि सर्वही ॥१८॥
नाहुष नाम यदूचा जनक । गयभूपाळ पुण्यश्लोक । ऐसे तव मार्गा अनेक । आश्रयूनियां राहिले ॥१९॥
ते दुःखाचें पात्र झाले । ऐसें कोणीं कैं ऐकिलें । तव पदपद्मामृतें धाले । ते समरसले सायुज्यीं ॥३२०॥
आमुच्या मार्गा जे आश्रयिती । ते दुःखाचें पात्र होती । ऐसी गोष्टी जे अघडती । शोभे निश्चिती स्वामींतें ॥२१॥
असो आणिकी ऐकें परी । आढ्यां अकिंचनां न घडे सरी । आपणा अनुरूप भूप विचारीं । कां हे वैखरी मंद नव्हे ॥२२॥

काऽन्यं श्रयेत तव पादसरोजगंधमाघ्राय सन्मुखरितं जनताऽपवर्गम् ।
लक्ष्म्यालयं त्वविगणय्य गुणालयस्य मर्त्यासदोरुभयमर्थविविक्तदृष्टिः ॥४२॥
तं त्वाऽनुरूपमभजं जगतामधीशमात्मानमत्र च परत्र च कामपूरम् ।
स्यान्मे तवांघ्रिररणं सृतिभिर्भ्रमंत्यां यो वै भजंतमुपयात्यनृतापवर्गः ॥४३॥

तूं जो अनंतगुणपरिपूर्ण । अनंत अमोघ नामेंकरून । कालत्रयीं विराजमान । जगदुद्धरण यशोगानें ॥२३॥
यश वर्णितां उरगपति । पार न पावोनि झाला सुपति । मौनावल्या श्रुति स्मृति । नव नव कीर्ति नाकळतां ॥२४॥
ऐसिया तुझा पादाब्जगंध । तव पदभजकां मोक्षप्रद । लक्ष्मीचें जें स्थान विशद । सज्जनवृंद ज्या वर्णी ॥३२५॥
त्यातें करूनि अवघ्राण । ऐसियातेंही अवगणून। कोणती वधू असज्ञान । मर्त्यालागून भजतसे ॥२६॥
अर्थीं अविविक्त दृष्टि जिची । यास्तव मर्त्यां न जाणेचि । जेथ संपदा बहु भयाची । तया अन्याची प्रीत तिये ॥२७॥
यास्तव मरणधर्मिका तेही । पडूनि बहळभवप्रवाहीं । सदैव निमग्न दुःखडोहीं । निश्वरनिरता म्हणोनियां ॥२८॥
अगुणत्वदोष आपणाकडे । बोलिलां तेंही वचन कुडें । अचिंत्यानंतगुनपडिपाडें । येर बापुडें कोण तुके ॥२९॥
अनुरूप वरीं म्हणोनि वदलां । तरी अनुरूप जाणोनि पूर्वींच वरिलां । त्रिजगदधीश जो दादुला । इहामुष्मिककामद जो ॥३३०॥
तया तुम्हांहूनियां थोर । बहळभयाकुळ पामर । अनुरूप वरीं हें उत्तर । जाड्यतर कीं नाहीं ॥३१॥
तवांघ्रिपद्माप्रति शरण । मजकारणें हें अनुरूप पूर्ण । असो ऐसें मम प्रार्थन । स्वामीलागोन नित्यत्वें ॥३२॥
सृतिशब्दें संसृतीमाजी । देवतिर्यड्मर्त्यराजी । अक्षयसुखार्थ तव पदकंजीं । न भजोनि झाली भ्रमग्रस्त ॥३३॥
तया भमाचें कारण । वेदार्थफळवाद करूनि श्रवण । इहामुष्मिक अभिवांछून । करिती भ्रमण भवस्वर्गीं ॥३४॥
पशुबंध सोमचयन पौण्ड्रक । वाजपेय गोमेध हयमेध मुख्य । ज्योतिष्टोमादि मख सम्यक । करूनि याज्ञिक भवीं भ्रमती ॥३३५॥
इहामुष्मिक नश्वर फळ । यज्ञाचरणीं क्लेश बहळ । वेदार्थवादांचें देवोनि बळ । संसृतिव्याकुळ त्रिविधत्वें ॥३६॥
देवतिर्यड्मानव भ्रमती । त्यांमाजी कोणी तव पदभक्ति । अनुसरतां तो अमृतावाप्ति । लाहे निश्चिती पदभजनें ॥३७॥
भवाभास जो हा अनृत । करणगोचर विवर्तभूत । त्याचा अपवर्ग म्हणिजे अंत । इत्थंभूत पदभजनें ॥३८॥
ज्या पदभजनास्तव भवनाश । भजकां आत्मत्वीं समरस । ते तव चरण भवभीतांस । शरणागतांस शरण्य ॥३९॥
अनुरूप म्हणिजे भजनायोग्य । सर्व भयाचा जेथ भंग । जाणोनि म्यां वरिला श्रीरंग । जडतां ममाङ्ग न शिवे पैं ॥३४०॥
आणिक प्रभूची विपरीत उक्ति । रोषें निरूपी भीमकी सती । लोकपाळांच्या नृपविभूति । त्या तुज वांछिती सप्रेम ॥४१॥
बलाढ्य धनाढ्य गुणाढ्य भूप । रूपें स्मराचा करिती लोप । ज्यांचा अचाट वीर्यप्रताप । गुणगण अमूप जयांचे ॥४२॥
ऐसे ही जे तुज वांछिती । उपेक्षूनियां तयांप्रति । आम्हां वरिलें हें निजमतीं । अयुक्त सर्वांर्थीं क्दलेती ॥४३॥
याचें उत्तर देतिये समयीं । ईर्ष्या उदेली भीमकीहृदयीं । सशाफ अंगुलिभंगें पाहीं । वदती दोहीं श्लोकार्थीं ॥४४॥

तस्याः स्युरच्युत नृपा भवतोपदिष्टाः स्त्रीणां गृहेषु खरगोश्वबिडालभृत्याः ।
यत्कर्ममोलमरिकर्षण नोपयायाद् युष्मत्कथा मुडविरिंचसभासु गीताः ॥४४॥
त्वक्श्मश्रुरोमनखकेशपिनद्धमंतर्मांसास्थिरक्तकृमिविट्कफवातपित्तम् ।
जीवच्छवं भजति कांतमतिर्विमूढा या ते पदाब्जमकरंदमजिघ्रती स्त्री ॥४५॥

जळो तें दुर्भगेचें वदन । म्हणे अंजलि भंगून । जे विषयान्ध मूर्ख अज्ञान । ते तीलागून वर होत ॥३४५॥
ते कोण ऐसें म्हणाल स्वामी । जे उपदेशिले प्रेमसंरंभीं । जे निरंतर स्त्रियांचे सद्मीं । वर्तती कर्मीं तिर्यग्वत् ॥४६॥
अच्युतैश्वर्यविराजमान । यालागीं अच्युत संबोधन । देऊनि निरूपी नृपांचे गुण । परमसज्ञान वैदर्भी ॥४७॥
तुम्हीं उपदेशिले जे राय । तयांचें ऐश्वर्य सांगों काय । स्त्रियांचे सदनीं तिर्यक्प्राय । वर्तती सोय ते ऐका ॥४८॥
केवळ रासभाचिये परी । प्रपंच ओझें वाहती शिरीं । किम्वा बलीवर्दाचे परी । गृहव्यापारीं कृषीवलवत् ॥४९॥
वेसणीसहित विषाणीं दोरा । लावोनी जुंपिती नांगरा । पूर्व पश्चिम प्रपंचफेरा । करवितां प्रहारा करिताती ॥३५०॥
किंवा श्वानाचिये परी । नित्य जागती स्त्रियेचिये द्वारीं । अपर देखोनियां गुरगुरी । स्त्रीशरीरीं लुलुवत ॥५१॥
धिक्कारिल्या दुरी न वचे । निर्भर्त्सिल्या मनीं न कांचे । लुलूकरूनि बोले वाचे । जेंवि श्वानाचे कुयीं शब्द ॥५२॥
तुकडा देखोनि पुसाटी हलवी । तेंवि स्त्रियेच्या रुचिरावयवीं । वक्रकटाक्षें नयन गोवी । मानी नयनीं श्लाघ्यत्व ॥५३॥
हाडी म्हणतां लोळण घाली । चुचुकारितां गोंडा घोळी । मिटक्या देवोनि चाटी अवाळी । स्त्रीमुखाजवळी श्वानवत् ॥५४॥
डोळे मिचकावूनि पाहे । अवमानिलें तितुकें साहे । पुढतीं आश्रयूनियां पाय । श्वानप्राय लुडबुडती ॥३५५॥
छो म्हणतां पाठी लागे । हाडी म्हणतां राहें उगें । तैसे स्त्रियेच्या वचनासंगें । होती सवेगें रुष्ट तुष्ट ॥५६॥
मारूं जातां पायीं लोटे । तोंडें विचकूनि होय उफराटें । लोटूनि देतां बळेंचि भेटे । अनेक कूटें सोसूनी ॥५७॥
असो ऐसे श्वानापरी । अवमान साहती स्त्रियांचे घरीं । याहूनियां नीचतरीं । साम्य मार्जारीं अनुकरिती ॥५८॥
ताटाभोंवतें मांजर फिरे । तेंवि भोंवते घालिती फेरे । मेऊं शब्दाच्या अनुकारें । नर्मोत्तरें टोंकती ॥५९॥
याहूनि नीचतर राहटी । मांजर जैसें पोटासाठीं । वधी क्षुद्रजीवांच्या थाटी । तसे सृष्टी हिंसक जे ॥३६०॥
एके स्त्रियेची पुरवितां आशा । भंगिती बहुतांच्या मानसा । न मानिती हिंसादोषा । भोगलालसाव्यापारीं ॥६१॥
अथवा स्त्रियांचिये घरीं । नीचकार्यें किंकरापरी । अष्टौ प्रहर ओरबारीं । जे संसारीं रबडती ॥६२॥
ऐसे जे हे क्षुद्र नृपति । स्वमुखें बोधिले जे यदुपति । ते त्या दुर्भगा स्त्रियांचे पति । असोत निश्चिती दैवबळें ॥६३॥
त्या दुर्भगा म्हणाल कैशा । जेणें श्रवणीं तुमचिया यशा । ऐकोनि महिमा तव मानसा । नाहीं आपैसा अनुभविला ॥६४॥
तंव तव महिमा गोचर नेसा । नृपवल्लभता प्रियतम असो । तवगुणकीर्तनविमुखां भासो । विषय पीयूषापडिपाडे ॥३६५॥
म्हणसी मत्कथा कोणा रुचती । तरी मृडानीमृड कैलासपति । स्कंद नंदिकेश्वर अगस्ति । संवादती शिवसदनीं ॥६६॥
तैसेचि विरंचिसभेमाजी । सनकादि नारद तुम्बुरु सहजीं । वर्णितां तच्छ्रवणें हृदयाब्जीं । महर्षिप्रमुख निवताती ॥६७॥
शक्रसदनीं बृहस्पति । प्रह्लादप्रमुखां शुक सुमति । भोगभुवनीं वासुकीप्रति । निरूपिती कमलाश्व ॥६८॥
विष्णुभक्तीं भूमंडळीं । तव गुणगरिमा स्थळोस्थळीं । वाखाणितां सप्रेमळीं । सावध श्रवणीं प्राशिजेत ॥६९॥
ऐसें तव गुणकथामृत । जीचिया श्रवणीं नाहीं प्राप्त । ते नश्वर नृपातें कान्त । करूनि एकान्त भोगो पैं ॥३७०॥
तवपदकमळींचा मकरंद । श्रवणमानसा अनुपलब्ध । घ्राणें सेविती जेंवि षट्पद । तेंवि तन्मोद जी नेणे ॥७१॥
तेचि वनिता मूढमति । भुलूनि नृपाचिये संपत्ती । कान्त मानूनि जीवत्प्रेतीं । सप्रेमरतिरुचिरत्वें ॥७२॥
जैसे मृत्तिकेचे गोळे । पुरुषाकारें करकौशल्यें । लेप्यें श्रृंगारिताति कुशलें । भुलती अबळें लावण्या ॥७३॥
तैसें सजीव नरवरमडें । चर्में मढिलें चहूंकडे । मूर्धज कुंतळ स्मश्रु खांडें । समांस हाडें माजिवडीं ॥७४॥
लावण्य भासे श्याम गौर । तो त्वच्चारंग बाह्याकार । माजी भरलें कुत्सिततर । तोही प्रकार अवधारा ॥३७५॥
रक्तपूर्ण शिरांच्या सूत्रें । आपाद वेष्टिलीं सर्वगात्रें । आंत भरलीं विष्ठामूत्रें । दुर्गंधीपात्रें ज्यापरी ॥७६॥
वातपित्तकफादि रोग । शरीरमात्रीं यांचा योग । न्यूनाधिक्यें होती सरोग । सुखदुःखभोग अनुभविती ॥७७॥
वदनीं प्रवाह चाले लाळे । सर्वदा घ्राणें श्लेष्मा गळे । चिपडीं चिपडी होती डोळे । श्रवणीं मळें दुर्गंधि ॥७८॥
शिश्नद्वारें मूत्र पाझरे । स्त्रीचिंतनें वीर्य क्षरे । श्वास सांदितां अधोद्वारें । घ्राण घाबरें त्यां गंधें ॥७९॥
कृमि जंतु यूका लिखा । सबाह्य बुचबुचिती पैं देखा । ऐसियांच्या आश्लेषसुखा । भजती मूर्खा मंदमती ॥३८०॥
तव पदकंजींचा सुवास । अवघ्राण नाहींच ज्यांस । त्याचि सजीवा नरकुणपास । भजती संतोष मानूनी ॥८१॥
आढ्या टाकूनि औदासीन्य । वरणें तेंचि अनुचित पूर्ण । ऐसें बोलिले श्रीभगवान । ऐका वचन तद्विषयीं ॥८२॥

N/A

References : N/A
Last Updated : May 10, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP