अध्याय ६४ वा - श्लोक ४१ ते ४४
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
विप्रं कृतागसमपि नैव द्रुह्यत मामकाह । घ्नंतं बहु शपंतं वा नमस्कुरुत नित्यशः ॥४१॥
सापराधही विप्र देखोनी । द्रोह न करावा मामकीं जनीं । सम्मानिजे अभिवंदूनी । हे मम वाणी ध्रुव माना ॥३१५॥
मारिता अथवा शाप देता । पैशून्य दुरुक्ति बहुवस वदता । न्यून पूर्ण उपपादिता । तरी तो तत्वता द्विज वंद्य ॥१६॥
नुच्चारूनि त्याचें दोष । सम्मानूनि देइजे तोष । नित्य नमस्कारिजे त्यास । मामकांस हे ममाज्ञा ॥१७॥
मामकीं चालिजे माझिये चाली । ज्यातें जितुकी आज्ञा केली । ते पाहिजे चालविली । सूचना कथिली जातसे ॥१८॥
यथाऽहं प्रणमे विप्राननुकालं समाहितः । तथा नमत यूयं च योऽन्यथा मे स दंडभाक् ॥४२॥
मी कृष्ण ब्राह्मणाप्रति । नमस्कारितों ऐसिये रीती । समाहित करूनि इंद्रियवृत्ति । विनयभक्ति समर्याद ॥१९॥
उषःकाळापासूनि विप्र । पुढती शयनीं लागे नेत्रे । तंववरी यथाकाळीं द्विजवर । नमिजे सर्वत्र ममाज्ञा ॥३२०॥
जिये काळीं जिये ठायीं । विप्र भेटले असतां पाहीं । नमस्कारूनि प्रेमप्रवाहीं । भजिजे सर्वांहीं मामकीं ॥२१॥
ऐसी ममाज्ञा वंदूनि शिरीं । जो विप्रांचा सम्मान करी । त्याहूनि प्रियतम मज निर्धारीं । नाहींच वैखरी हे सत्य ॥२२॥
शङ्कर अभिन्न मम हृदयस्थ । त्याहूनि मज तो प्रियतम आप्त । केवळ आत्माचि तो यथार्थ । म्हणतां किमुत परिहार ॥२३॥
देवकीवसुदेवपदांची शपथ । करूनि वदतों इत्थंभूत । ब्राह्मणभजनें जो सिद्धार्थ । मी सनाथ त्याचेनि ॥२४॥
ऐसी माझी आज्ञा न मनी । केवळ विषयी देहाभिमानी । ब्रह्मद्वेष्टा ब्रह्मस्वहरणी । ब्राह्मणभजनीं विमुख जो ॥३२५॥
ऐसी माझी आज्ञा न मनी । केवळ विषयी देहाभिमानी । ब्रह्मद्वेष्टा ब्रह्मस्वहरणी । ब्राह्मणभजनीं विमुख जो ॥२६॥
तो दण्डार्ह सर्वांपरी । सर्वदा दंडिजे यमकिंकरीं । यक्षपिशाचापस्मारीं । भूतीं खेचरीं दण्डावा ॥२७॥
सृष्टिसृजन ब्रह्मा कर्ता । शेवटीं रुद्र तत्संहर्ता । मी सृष्टीचा प्रतिपाळिता । तो मज तत्त्वता अपाल्य ॥२८॥
पाल्यमान सृष्टींतून । ब्रह्मद्वेष्टा तो दुर्जन । म्यां उपेक्षिला हें जाणून । विघ्नप गृहगण दण्डित त्या ॥२९॥
दरिद्र दुर्दशा अवदशा । कलह कर्कशा क्षुधातृषा । चिरकाळ तयाचिया सहवासा । तृष्णा दुराशा सह जाती ॥३३०॥
निंदा तयाचे वदनीं वसे । अपयश तया व्यापूनि असे । त्याच्या दर्शनें सुकृत नासे । समस्त दोषें वरिला तो ॥३१॥
असो त्या ब्रह्मद्वेष्ट्याची कथा । विशेष ममाज्ञेचा हंता । तद्व्याख्यानीं वाग्देवता । कंपायमान होतसे ॥३२॥
यालागीं मामकीं सर्व जनीं । मस्तकीं ममाज्ञा अभिवंदूनी । सादर असतां विप्रार्चनीं । विघ्नें देखूनि त्यां पळती ॥३३॥
ते होत कां भलते याति । त्यांच्या स्मरणें विजयावाप्ति । दर्शनमात्रें जड उद्धरती । ते द्विजभक्ति मजतुल्य ॥३४॥
हृदयीं दक्षिणदेशीं जाण । मी मिरवितसें ब्राह्मणचरण । द्विजार्चकाचें पदभूषण । वामभागीं धरूं इच्छीं ॥३३५॥
असा ऐसी सहस्रवरी । विप्रार्चकांची वदता थोरी । तृप्ति न मनी मम वैखरी । म्हणे श्रीहरि स्वानंदें ॥३६॥
यावरी नृगकथोपसंहार । ब्रह्मस्वहरणाचें अनुस्मरण । देऊनि बोले जनार्दन । कीजे श्रवण तें संतीं ॥३७॥
ब्राह्मणार्थो ह्यपहृतो हर्तारं पातपत्यधः । अजानंतमपि ह्येनं नृगं ब्राह्मणगौरिव ॥४३॥
नेणोनिही ब्राह्मणार्थ । जरी अपहरिला होऊनि भ्रान्त । तरी हर्तयातें अधःपात । देईल निश्चित नृपगोपरी ॥३८॥
नृगें ब्राह्मणा दिधली धेनु । ते पळाली त्यापासून । कळपीं मिळाली हें नेणून । ते दिधली दान अन्यविप्रा ॥३९॥
इतुक्या अज्ञात दोषासाठीं । अंधकूपीं दुःखकोटी । सरठदेहाची अवगूनि यष्टि । म्हणे जगजेठी कळलें कीं ॥३४०॥
द्वारकावासियांलागूनी । प्रत्यक्ष प्रत्यय दावूनि नयनीं । ब्रह्मस्वहरणाची काहणी । उपसंहारिली ते ऐका ॥४१॥
एवं विश्राव्य भगवान्मुकुन्दो द्वारकौकसः । पावनः सर्वलोकानां विवेश निजमंदिरम् ॥४४॥
एवं म्हणिजे ऐसियापरि । ब्रह्मस्वहरणदोषाची थोरी । नेऊनि घाली नरकीं घोरीं । हें श्रीहरि बोलूनी ॥४२॥
द्वारकावासियां सर्व जनां । आणि समस्तां यदुनंदनां । भूमंडळींच्या भूपाळगणां । केलें श्रवणा ऐकवणें ॥४३॥
षड्गुणैश्वर्यसंपन्न । सकळ सुखाचें अधिष्ठान । तो मुकुंद पुण्यपावन । आत्मभुवन प्रवेशला ॥४४॥
चारुदेष्ण साम्ब प्रद्युम्न । इत्यादि अवघे निज नंदन । वेष्टित समस्त यादवगण । स्वकीय भुवनाप्रति गेला ॥३४५॥
नृगचरित्रचमत्कार । ठायीं ठायीं नारीनर । कथिती ऐकती आश्चर्यतर । म्हणती अपार हरिगरिमा ॥४६॥
ऐसी श्रीमद्भागवतीं । दशमस्कंधीं श्रीशुकोक्ति । परमाश्चर्यें परीक्षिती । ऐकोनि चित्तीं संतुष्ट ॥४७॥
म्हणे म्यां अपराध केला थोर । ब्राह्मणकंठीं सर्पशरीर । घातलें तद्दोषा परिहार । शापही सत्वर पावलों ॥४८॥
तेणें होतों अनुतापवंत । जाणोनि तुष्टला श्रीभगवंत । तुमच्या मुखें इत्थंभूत । श्रीभागवत परिसतसें ॥४९॥
आतां देइजे आशीर्वचन । मम वंशजांहीपासोन । न घडो ब्राह्मणाचें हेळण । विप्रार्चन घडो तयां ॥३५०॥
ऐकोनि तथास्तु म्हणे शुक । तेणें संतुष्ट कुरुनायक । पुढिलिये कथेचा विवेक । ऐका सम्यक् संदर्भ ॥५१॥
पांसष्टाविया अध्यायामाजी । रेवतीरमण जावोनि व्रजीं । नंदप्रमुखां भेटूनि सहजीं । गोपीसमाजीं क्रीडेल ॥५२॥
तिये कथेचें करितां श्रवण । मात्रागमनादिदोषक्षालन । श्रवणमात्रें कैवल्यसदन । सुकृतसंपन्न लाहती ॥५३॥
प्रतिष्ठानीं गोदातटीं । एकनाथ साम्राज्यपीठीं । चिदानंदाचिये ताटीं । स्वानंदखोटी अमृताच्या ॥५४॥
गोविन्दहस्तें ते रसकवळ । सेवूनि दयार्णव लदिवाळ । श्रोतयांलागीं रसाळ बहळ । भरवी प्राञ्जळ श्रवणमुखीं ॥३५५॥
तें हें हरिवरदाख्यान । स्वानंदसुधारसभोजन । श्रवण करितां श्रोतेजन । परीक्षितीसमान तृप्त होती ॥३५६॥
इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्नवानुचरविरचितायां नृगाख्यानं नाम चतुःषष्टितमोऽध्यायः ॥६४॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥४४॥ ओवी संख्या ॥३५६॥ एवं संख्या ॥४००॥ ( चौसष्टावा अध्याय मिळून ओवी संख्या ३०५१९ )
अध्याय चौसष्टावा समाप्त.
N/A
References : N/A
Last Updated : May 10, 2017
TOP