अध्याय ६५ वा - श्लोक १ ते ५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
श्रीशुक उवाच - बलभद्रः कुरुश्रेष्ठ भगवान्रथमास्थिथ । सुहृद्दिदृक्षुरुत्कंठः प्रययौ नंदगोकुलम् ॥१॥
शुक म्हणे गा कुरुश्रेष्ठा । हरिगुणश्रवणसुखैकनिष्ठा । भागवतांमाजी वरिष्ठा । ऐकें अभीष्टा हरिचरिता ॥५॥
भद्र म्हणिजे कल्याणरूप । ज्याच्या वरिष्ठ बळप्रताप । बळभद्र ऐसा नामसंकल्प । करी सुतप गर्ग मुनि ॥६॥
दुष्टांआंगीं बळ वरिष्ठ । तें सज्जनालागीं दे कष्ट । बळभद्र हा साधुश्रेष्ठ । करी संतुष्ट निजबळें ॥७॥
दुष्ट बळिष्ठ संहारून । साधु सज्जन सुखसंपन्न । करी प्रजांचें पालन । म्हणूनि अभिधान बळभद्र ॥८॥
ऐसा ऐश्वर्यसंपन्न राम । स्यंदनीं योजूनि तुरंगम । सीर सौनंद चापोत्तम । पूर्ण इषुधि तालध्वज ॥९॥
सारथि बैसवूनियां धुरे । उत्कंठित स्नेहभरें । गोकुळा जाता झाला त्वरें । प्रेमादरें स्वजनाच्या ॥१०॥
कंसवधार्थ मथुरे आलों । तैंहूनि प्रासंगिकीं गुंतलों । यशोदानंदें प्रतिपाळिलों । तें विसरलों कृतघ्नवत् ॥११॥
ऐसी मानूनियां अवसरी । क्षणक्षणां अभ्यंतरीं । नंदयशोदा व्रजपुरीं । वांछा नेत्रीं पहावया ॥१२॥
पूर्ववयस्य आपुले सखे । तया भेटावें सप्रेम हरिखें । त्यांचीं ऐकावें सुखें दुःखें । आपुलीं स्वमुखें कथिजे त्यां ॥१३॥
ऐस अवसरी अंतरीं होती । परंतु कर्मीं उपस्थिती । आजिपर्यंत पडली गुंती । अवकाशप्राप्ति न फावोनी ॥१४॥
आतां द्वारकादुर्गमदुर्गीं । निर्भय वसतां सात्वतवर्गीं । भूपाळ भंगले समरंगीं । वीरश्री आंगीं नागविती ॥१५॥
दैत्य भौमप्रमुख बाण । निर्जरेंसहित संक्रंदन । जिंकिले स्वर्गीं प्रवेशोन । नर सामान्य तेथ किती ॥१६॥
अमर पामर द्वारकापुरीं । सेवा करिती किंकरापरि । असुर मारिले त्यांच्या नारी । कृतकामारी यदुसदनीं ॥१७॥
शत्रु कोणीच नुधवी माथा । त्रैलोक्यवैभव द्वारकानाथा । व्धिहरनिर्जरवदनीं कथा । त्रिजगीं त्रिपथा पडिपाडें ॥१८॥
कन्यापुत्रप्रपौत्रवरी । मंगल कृत्यें केलीं घरीं । सुहृद आप्त सहपरिवारीं । आनंदगजरीं दिन क्रमिती ॥१९॥
ऐसियामाजी अवकाश करून । गोकुळाप्रति रेवतीरमण । स्वजनस्नेहें उचंबळून । रथीं बैसोन प्रवेशला ॥२०॥
परिष्वक्तशिच्रोत्कंठैर्गोपैर्गोपीभिरेव च । रामोऽभिवाद्य पितरावाशीर्भिरभिनंदितः ॥२॥
रथनेमींच्या गजरेंकरूनी । वसंतोदयीं गोकुळभुवनीं । राम आला हें देखोनी । आले धावूनि व्रजवासी ॥२१॥
चिर उत्कंठा वाहतां पोटीं । अवचित प्रत्यक्ष झाली भेटी । परमानंदें अमृतवृष्टि । समेत घटी त्यां गमली ॥२२॥
उत्कंठित जे गोपगण । रामें त्यांसी देखतां दुरून । सवेग टाकूनियां स्यंदन । क्षेमालिङ्गन परस्परें ॥२३॥
चिरकाळ हृदयीं कवळूनि धरिती । आनंदाश्रु नेत्रीं स्रवती । वयस्यमांदी मिळाली भंवती । सुदिन म्हणती धन्य हा ॥२४॥
एकी कंठींची सोडिती मिठी । अपर घालिती तया पाठीं । एक धावूनि उठाउठी । कथिती गोठी नंदा पैं ॥२५॥
वार्ता कथितियांलागून । यशोदा म्हणे तुमचें वदन । शर्करेनें करीन पूर्ण । रामदर्शन लाधलिया ॥२६॥
स्नेहसंभ्रमें ते गोरटी । रामदर्शना उत्सुक पोटीं । तंव येरीकडे वयस्यथाटी । घालूनि मिठी आलिंगिती ॥२७॥
ऐसा गोपजनांचा मेळा । नावेक रामें आलिंगिला । तंव गोपींचा समूह आला । स्नेह पाहिला अनावर ॥२८॥
पूर्णचंद्रें भरे सागर । त्याहूनि हृदयीं प्रेमा सुभर । कोण कोणें नारी नर । ऐसा विचार नेणती ॥२९॥
चिरकाळ बळरामाच्या कंठीं । गाढालिंगनें घालिती मिठी । स्वकर्णानिकटीं मर्दिती मुष्टि । सवेग दृष्टी उतरूनियां ॥३०॥
एकी कुरवाळिती वदना । हनुवटि स्पर्शूनि चुंबिती आना । एकी परिमार्जिती नयना । मृगलोचना सप्रेमें ॥३१॥
एकी तृषिता चकोरनेत्रा । लक्षूनि प्राशिती रामगात्रा । एकी होऊनि भाषणपरा । मधुरोत्तरा अनुवदती ॥३२॥
ऐसा गोपींचा अमोघ प्रेमा । हृदयीं जाणवला बळरामा । जेणें मोहिलें निष्कामकामा । अवाच्यगरिमा स्वजनाची ॥३३॥
विसर्जूनियां बल्लवगण । पुढें प्रवेशला नंदसदन । नंदयशोदा कळवळून । आलीं धांवून भेटावया ॥३४॥
येरें देखोनि मातापितरां । साष्टाङ्ग घालूनि नमस्कारा । येरीं अवघ्राण करूनि शिरा । प्रेमाश्रुधारा प्रोक्षिलें ॥३५॥
अखिलकल्याणाचें स्थान । त्रैलोक्यविजयी होईं म्हणोन । ऐसें देवोनि आशीर्वचन । हृदयीं कवळून त्या धरिती ॥३६॥
चिरं नः पाहि दाशार्ह सानुजो जगदीश्वरः । इत्यारोप्यांकमालिंग्य नेत्रैः सिषिचतुर्जलैः ॥३॥
ऐसें देऊनि आलिंगन । मग सदनशाळा प्रवेशोन । पूर्वरचित जें रम्यासन । बैसली घेऊन त्या तेथें ॥३७॥
पूर्वीं कवळिती बाळपणीं । तयाचि प्रेमें तये क्षणीं । अंकीं घेऊनि सौनंदपाणि । शिंपिती मूर्ध्नि अश्रुजळीं ॥३८॥
अनुजेंसहित आम्हां वृद्धां । तुम्हीं रक्षिलें बा सर्वदा । आमुचा विसर नसावा कदा । इत्यादि शब्दां अनुवदती ॥३९॥
आमुच्या दैवें तुम्ही भूपति । दशार्ह म्हणिजे यादवनृपति । झाले असतां आम्हांप्रति । रक्षणें निश्चिती तुम्हां उचित ॥४०॥
नंदयशोदा ऐसें वदती । तंव व्रजवासियांची मांदी भंवती । मिळाली त्यातें रेवतीपति । कवणे रीति सम्मानी ॥४१॥
गोपवृद्धांश्च विधिवद्यविष्ठैश्चाभिवंदितः । यथावयो यथासख्यं यथा संबंधमात्मनः ॥४॥
गोपांमाजी गोपनायक । सुनंदोपनंदवृषभानुप्रमुख । एवं वडील ते सम्यक । भक्तिपूर्वक राम नमी ॥४२॥
आपणासमान वयसा ज्यांसी । क्षेमालिङ्गनें दिधलीं त्यांसी । धाकुटे वयस्य रामासी । नमिते झाले सप्रेमें ॥४३॥
जैसी वयसा ज्या शरीरीं । त्या तैसाचि सम्मान करी । पूर्वीं सख्य ज्यां जे परी । तदनुसारीं त्यांसी भजे ॥४४॥
ज्यांसीं मेहुणपणाचें नातें । विनयोत्तरीं तोषवी त्यांतें । मामा म्हणोनि मातुळातें । प्रेमभाषणें गौरवी ॥४५॥
पूर्वीं मानिले होते चुलते । काका म्हणोनि आळवी त्यांतें । एवं यथासंबंध समस्तांतें । भजता झाला सुस्निग्ध ॥४६॥
ऐसे भेटले पशुप सकळ । तदुपरि पूर्ववयस्यमेळ । आला त्यांसी भाषणशील । जाला केवळ तें ऐका ॥४७॥
समुपेत्याथ गोपालान्हास्यहस्तग्रहादिभिः । विश्रांतं सुखमासीनः पप्रच्छुः पर्युपागताः ॥५॥
मग त्या संवगडियांप्रति । सम्यक् म्हणिजे बरवे रीति । रामें येऊनि अतिप्रीती । केली विश्रांति संवादें ॥४८॥
हस्ता मेळवूनियां हस्त । संवादती आनंदभरित । विनोदवचनें हास्ययुक्त । पूर्वाचरितस्मारक जीं ॥४९॥
हुतुतु हमामाम हुमली । पूर्ववयसेची भोजनकेली । विटीदांडूं चेंडूफळी । क्रीडा पहिली आवडती ॥५०॥
ऐसिया विनोदीं सुविश्रान्त । सुखासनीं आनंदभरित । जे जे आले गोप तेथ । ते त्या पुसती अनामय ॥५१॥
म्हणती रामा लावण्यधामा । वयस्यवत्सला पूर्णकामा । यादवेंसहित पुरुषोत्तमा । अनामयगरिमा असे कीं ॥५२॥
ऐसें पुसोनि रेवतीरमणा । मग आठवूनियां श्रीकृष्णा । बोलती तें तूं कुरुभूषणा । करीं कां श्रवणा म्हणे मुनि ॥५३॥
N/A
References : N/A
Last Updated : May 10, 2017
TOP