अध्याय ६६ वा - श्लोक ११ ते १५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


पौण्ड्रकोऽपि तदुद्योगमुपलभ्य महारथः । अक्षौहिणीभ्यां संयुक्तो निश्चक्राम पुराद्द्रुतम् ॥११॥

आपण द्वारके धाडूनि दूत । कृष्णसंग्राम आणिला उदित । ऐसें देखोनि उद्योगवंत । झाला त्वरित पौण्ड्रक तो ॥७९॥
रथियांमाजी महारथ । कारुष महावीर विख्यात । दोनी अक्षौहिणींसहित । समरा त्वरित निघाला ॥८०॥
पुरापासूनि बाहेरी । द्वय अक्षोहिणी दळभारीं । निघाला विद्युल्लतेचे परी । प्रतापगजरीं वाद्यांच्या ॥८१॥
छत्रें चामरें निशाणें । ध्वज पताका आतपत्राणें । महावीरांचीं आस्फोटनें । सिंहनाद किङ्काळिया ॥८२॥
मदें मातले कुंजर । गर्जना करिती भयंकर । अश्वहेषितें परम क्रूर । करिती केकार रथनेमि ॥८३॥
प्रतापें झणाणिल्या गजभेरी । अपरा क्रमेळपृष्ठीवरी । अश्वढक्के ठोकिती गजरीं । अम्बर रणतुरीं । कोंदलें ॥८४॥
पणव टिविटिवीं तिडिमिडी । शृंगें बुरगें बांकें त्रिमोडी । शंख भेरी काहळा डफडीं । कडोविकडी मृदंग ॥८५॥
ताळ घोळ चंग वीणा । वाजताती रणप्रवीणा । वीरश्रीद्योतक वाद्यें नाना । वाजतां सेना मातली ॥८६॥
ग्रीष्मकाळींचे मेघ उठावे । तैसे वीर दाविती यावे । यंत्रध्वनींच्या भयानक रवें । कांपे आघवें भूचक्र ॥८७॥

तस्य काशीपतिर्मित्रं पार्ष्णिग्राहोऽन्वयान्नृप । अक्षौहिणीभिस्तीसृभिरपश्यत्पौण्ड्रकं हरिः ॥१२॥

प्रबळवाहिनीवेष्टित भंवती । कारुषें ठाकिली समरक्षिति । तयाचा मित्र काशीपति । तत्पक्षपातीं निघाला ॥८८॥
तीन अक्षौहिणी दळ । काशीपतीचें महाप्रबळ । पृष्ठभागीं रक्षणशीळ । झाला केवळ पौण्ड्रक तो ॥८९॥
द्व्यक्षौहिणी कारुषी सेना । तदर्ध काशिपतीची पृतना । एवं त्र्यक्षौहिणीगणना । एक व्याख्याना या करिती ॥९०॥
एवं ऐसा वेष्टितचमू । पौण्ड्रकातें पुरुषोत्तमु । आयुधें आभरणेंही कृत्रिम । देखता झाला तें ऐका ॥९१॥

शङ्खार्यसिगदाशार्ङ्गश्रीवत्साद्युपलक्षितम् । बिभ्राणं कौस्तुभमणिं वनमालाविभूषितम् ॥१३॥
कौशेयवाससी पीते वसानं गरुडध्वजम् । अमूल्यमौल्याभरणं स्फुरन्मकरकुण्डलम् ॥१४॥

कृत्रिम शंख पाञ्चजन्य । अरि म्हणिजे सुदर्शन । नंदकनामा जो कृपाण । असि म्हणूनि बोलिला ॥९२॥
शार्ङ्ग कोदंड कौमोदकी गदा । इत्यादि कृत्रिम वैष्णवायुधां । कौस्तुभ ललाम भृगूच्या पदा । मिरवी सर्वदा हृत्कमळीं ॥९३॥
माळा आपाद वैजयंती । वनमाळादि चिह्नें समस्तीं । मंडित देखे कारुषाप्रति । स्वयें श्रीपति समरंगीं ॥९४॥
कौशय परिधान पीताम्बर । उत्तरीय केला अपर । ध्वजीं रेखिला विनताकुमर । कुण्डलें मकराकृति घडणी ॥९५॥
अमूल्य मोलागळीं आभरणें । मुकुट मुद्रिका करकंकणें । केयूराङ्गदें पदभूषणें । मेखळे खेवणें रत्नांचें ॥९६॥
इत्यादि कृत्रिमाभरणायुधीं । पौण्ड्रकातें कैवल्यनिधि । सम्मुख देखोनियां युद्धीं । हांसे त्रिशुद्धि घनघोषें ॥९७॥

दृष्ट्वा तमात्मनस्तुल्यवेषं कृत्रिममास्थितम् । यथा नटं रंगगतं विजहास भृशं हरिः ॥१५॥

आपुली प्रतिभा जैसी अपर । तैसा कृत्रिम वेष समग्र । बाणला ऐशातें श्रीधर । देखोनि गंभीर हांसतसे ॥९८॥
रंगामाजी यथासांग । नाटकी नटोनि दावी सोंग । विडम्ब आपणातुल्य अव्यंग । देखोनि श्रीरंग हास्य करी ॥९९॥
ऐसा समरीं पौण्ड्रकाप्रति । आत्मतुल्य कृत्रिमाकृति । पाहोनि हांसिला श्रीपति । स्फुरिला निगुती मग शंख ॥१००॥
पाञ्चजन्याची गर्जना । ऐकोनि क्षोभली पौण्ड्रकसेना । घ्या घ्या म्हणती हाणा हाणा । शस्त्रें खणखणा प्रेरिती ते ॥१॥
कैसीं शस्त्रें कोणे रीती । अरिवर्ग हरीतें हाणिती । तें तूं ऐकें परीक्षिति । म्हणे सुमति शुक वक्ता ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : May 11, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP