अध्याय ६६ वा - श्लोक ३१ ते ३५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


इत्यादिष्टस्तथा चक्रे कृष्णायाभिचरन्व्रती । ततोऽग्निरुत्थितः कुण्डान्मूर्तिमानतिभीषणः ।
तत्पताम्रशिखाश्मश्रुरंगारोद्गारिलोचनः ॥३१॥

शिवें आज्ञापिला होत्साता । तैसाचि झाला तो आचरता । कृष्णाकारणें अभिचार घाता । इच्छूनि तत्वता व्रतस्थ ॥३९॥
अभिचारयज्ञीं जे जे नियम । ते ते आचरला सकाम । तेणें अभिचार देवता विकराळ परम । संपतां होम प्रकटली ॥२४०॥
कुण्डापासूनि भयानक । प्रकतला मूर्तिमंत पावक । पिङ्गट शिखा श्मश्रु तिख । तप्त ताम्र प्रतिभाती ॥४१॥
खदिराङ्गारसदृश डोळे । बाहेर पडों पाहती बुबुळें । प्रळयरुद्राचे नेत्रखोळे । पासोनि ईशाळ क्षोभला ॥४२॥
तयाचे साङ्ग अवयव राया । सावध होईं परिसावया । ऐसें प्रार्थितां कौरववर्या । शुक आचार्या कौतुकें ॥४३॥

दंष्ट्रोग्रभ्रुकुटीदंडकठोरास्यः स्वजिह्वया । आलिहन्सृक्किणी नग्नो विधुन्वंस्त्रिशिखं ज्वलत् ॥३२॥
पद्भ्यां तालप्रमाणाभ्यां कंपयन्नवनीतलम् । सोऽभ्यधावद्बृतो भूतैद्वारिकां प्रदहन्दिशः ॥३३॥

दंष्ट्रा दण्ड अतिकठोर । भृकुटी कुटिल भयंकर । तिहीं करूनि क्रूर वक्त्र । जिह्वा उग्र लाळीतसे ॥४४॥
जिह्वा लळलळी ताम्रतिख । तेणें विशाळ विक्राळ मुख । चाटित सृक्किणी सम्यक । श्रवणपर्यंत चपलत्वें ॥२४५॥
सूर्यबिम्बाच्या उदयकाळीं । ज्वाळा भासती उदयाचळीं । तैसा त्रिशिख त्रिशूळ करतळीं । विद्युन्माळी झेलीतसे ॥४६॥
उच्चताल वृक्षप्रमाण । दीर्घ भयंकर दोन्ही चरण । मूर्धा भेदूनि गेला गगन । भासती ग्रहगणसम नेत्र ॥४७॥
जयाच्या विक्रमतळवटीं । भूतळ कांपे थरथराटी । वेष्टित भूतगणाची घरटी । नग्न कटितटीं पिङ्गरोम ॥४८॥
डोंगरीं प्रज्वळला वडवाग्नि । तैसा सर्वाङ्गीं प्रदीप्त वह्नि । असंख्यात प्रमथगणीं । द्वारकादहनीं प्रवर्तला ॥४९॥
पश्चिम दिशा जाळावया । धाविन्नला कौरवराया । पर्वतपृष्ठीं क्षोभोनियां । वज्रकल्लोळ जेंवि पडे ॥२५०॥
द्वारकाभुवनीं अकस्मात । जैसा पडे विद्युत्पात । तैसा क्षोभला भूतां सहित । पुरी जाळीत चालिला ॥५१॥
उच्चतरें प्रासादशिखरें । माद्या मंदिरें दामोदरें । त्वष्ट्टनिर्मितें पुरगोपुरें । प्रळयाङ्गारें धडकलीं ॥५२॥
अट्टाळिया सभास्थानें । पण्यवीथि दीर्घ दुकानें । अमूल्य वैदूर्यमणिरत्नें । कपटकृषानें जळताती ॥५३॥
हाहाकार द्वारकापुरीं । आक्रंदती नरनारी । म्हणती पडलों प्रळयाङ्गारीं । स्मरती हरि आकान्तीं ॥५४॥

तमाभिचारदहनमायांतं द्वारकौकसः । विलोक्य तत्रसुः सर्वे वनदाहे यथा मृगाः ॥३५॥

अभिचार प्रयोगजनिताग्नि । क्षोभें आला प्रज्वळोनी । द्वारका धडकली देखोनी । आकान्त पुरजनीं मांडिला ॥२५५॥
अग्नि देखोनि भयंकर । द्वारकावासी नारीनर । प्राणिमात्र लहान थोर । त्रासले समग्र प्रानभयें ॥५६॥
पळूनि जावया नाहीं ठाव । आतां कैसे वांचती जीव । म्हणती क्षोभला वासुदेव । कांहीं उपाव या न करी ॥५७॥
मृग श्वापदें वणवयामाजी । पडलिया कोंडूनि जळती सहजीं । तैसी अवस्था आम्हांसी आजी । धूम्रध्वजीं वरपडिलों ॥५८॥
गगनीं झळंबती प्रचंड आह्या । पाषाण फुटोनि होती लाह्या । कोठें ठाव न दिसे राह्या । द्वारकराया मग स्मरती ॥५९॥
प्रयोजनिताभिचारवह्नि । क्षोभें पेटला द्वारकाभुवनीं । रत्नखचितां हेमसदनीं । धडके तृणीं जियापरी ॥२६०॥
ऐसिया जोहरीं जनसंघाट । जयासि जिकडे सांपडे वाट । पळत आले दाटोदाट । करिती बोभाट राजसभे ॥६१॥
जिये राजसभेच्या ठायीं । यादव वृष्णि भोज सर्वही । उग्रसेनप्रमुख पाहीं । शेषशायी उपविष्ट ॥६२॥
तंव जनाचा हाहाकार । एकसराचि ऐकिला गजर । कोण्या प्रकारें तो विचार । ऐक साचार परीक्षिति ॥६३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 11, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP