अध्याय ७६ वा - श्लोक १ ते ५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
अथान्यदपि कृष्णस्य शृणु कर्माद्भुतं नृप । क्रीडानरशरीरत्य यथा सौभपतिर्हतः ॥१॥
राजासूयमखाच्या व्याजें । मागध वधूनि सोडिले राजे । चैद्यवधान्तीं अधोक्षजें । केलें बीजें द्वारकेशी ॥६॥
धर्मयज्ञें त्रिजगा सुख । एका दुर्योधनासीच कां दुःख । ऐसा तुझा प्रश्न देख । म्यां सम्यक निरोपिला ॥७॥
यावरी आणिक श्रीकृष्णाचें । अद्भुत कर्मे ऐकें साचें । लीलेंकरूनि मनुष्याचें । अनुकरण जो संपादी ॥८॥
अद्भुत कर्में सांगों किती । जे हे लिहितां न पुरे क्षिती । जैसा मारिला सौभपती । तें प्रस्तुतीं अवधारीं ॥९॥
सौभ म्हणिजे कैसें काय । सौभपति तो कोण राय । कृष्णहस्तें मरण होय । कोण्या कारणास्तव त्यातें ॥१०॥
तें आख्यान सविस्तर । परिसें कुरुवर्या सादर । जेणें पापाचे गिरिवर । भस्म होती श्रोत्यांचे ॥११॥
शिशुपालसखः शाल्वो रुक्मिण्युद्वाह आगतः । यदुभिर्निर्जितः संख्ये जरासंधादयस्तथा ॥२॥
तरी सौभपति तो शाल्बराजा । पूवीं रुक्मिणीस्वयंवरकाजा । शिशुपाळस्नेहाचिया लाजा । भिडतां पैजा यादवेंसीं ॥१२॥
रुक्मिणीचें स्वयंवरकाळी । यादव येऊनि करिती कळी । मागधशाल्वप्रमुख बळी । चैद्यें स्वमेळीं मिळविले ॥१३॥
मागधप्रमुख पक्षपाती । चैद्यें आणिले अनेक नृपती । त्यांमाजी शाल्व महारथी । शिशुपाळाचा प्राणसखा ॥१४॥
असो उद्वाहीं अंबिकावना । भीमकी गेली श्रीपूजना । कृष्णें केलें रुक्मिणीहरणा । संकेतसंस्थि लक्षूनियां ॥१५॥
रुक्मिणीचिया सख्या निकटा । तिहीं तैं कोल्हाळ केला मोठा । शाल्व प्रतापी वीर लाठा । तेणें वैकुंठा पडखळिलें ॥१६॥
जरासंधादि प्रबळ राजे । वरवाळले संग्रामकाजे । रुक्मिणी हरिली गरुडध्वजें । ऐकोनि सलज्ज होत्साते ॥१७॥
यादववीरीं तीक्ष्ण बाणीं । केली नृपांची भंगाणी । मागधप्रमुख समरांगणीं । पाठी देऊनि पळाले ॥१८॥
तेथ शाल्व शिशुपाळसखा । म्हणे काळिमा लागला मुखा । यादवें दिधलें अपयशोदुःखा । सर्पासारिखा तें आठवी ॥१९॥
यादवीं संग्रामीं भंगिला । अपयश पाहूनि स्वदेशा गेला । तैं तो प्रतिज्ञा करिता झाला । तें कुरुपाळा अवधारीं ॥२०॥
शावः प्रतिज्ञामकरोच्छृण्वतां सर्वभूभुजाम् । अयादवीं क्ष्मां करिष्ये पौरुषं मम पश्यत ॥३॥
सकळ भंगले भूभुजभार । शाल्व बोले तयां समोर । करीन यादवांचा संहार । दृढ निर्धार हा माझा ॥२१॥
प्रतापें समग्र पृथ्वीतळीं । शून्य घालीन यादवकुळीं । आराधूनि शशाङ्कमौळी । यादव समूळीं निर्दाळीन ॥२२॥
माझा पहा हा पुरुषार्थ । जरी मी न करीं यदुकुळा अंत । तरी जननीजठरीं जन्मलों जंत । कीं जितचि प्रेत अपवित्र ॥२३॥
ऐसी समस्त नृपाचें मेळीं । शाल्वें स्वमुखें प्रतिज्ञा केली । परंतु मूर्खें न विचारिली । योग्यता आपुली तत्कर्मीं ॥२४॥
इति मूढः प्रतिज्ञाय देवं पशुपतिं प्रभुम् । आराधयामास नृप पांसुमुष्टिं सकृद्ग्रसन् ॥४॥
ऐसी प्रतिज्ञा करूनि मूढ । आराधिला चंद्रचूड । नियम केला अति अवघड । तोही अवघड अवधारीं ॥२५॥
एकमुष्टिमात्र धुळी । भक्षूनि आराधी चंद्रमौळी । अहोरात्र नियमशाली । करणीं सकळीं समाहित ॥२६॥
संवत्सरान्ते भगवानाशुतोषउमापतिः । वरेण च्छंदयामास शाल्वं शरणमागतम् ॥५॥
यादवांचा कुळक्षय । करावयार्थ गिरिजाप्रिय । आराधनीं नियतेन्द्रिय । शाल्व जाला चिरकाळ ॥२७॥
स्वल्पसेवनें जो संतुष्ट । उमापति नीळकंठ । आशुतोष हा नामपाठ । करिती वैकुण्ठ विधि शक्र ॥२८॥
आशुतोषही उमापति । शाल्वा तुष्टला वत्सरान्तीं । देखोनि तयाची दुर्मति । नोहें चित्तीं द्रवीभूत ॥२९॥
ते दुर्मति म्हणाल कैसी । शाल्व श्रीकृष्णाचा द्वेषी । यास्तव याच्या संकल्पासी । साफल्य नोहे कल्पान्तीं ॥३०॥
ऐसें जाणोनि उमारमण । शीघ्र नोहेचि त्या प्रसन्न । तथापि त्याचें अनुष्ठान । क्रूर देखोन प्रकटला ॥३१॥
कृष्णद्वेष धरिला चित्तीं । म्हणोनि अनुष्ठानमिषें मती । भ्रंशली यास्तव तोंडीं माती । घाली स्वहस्तीं मुष्टीभरी ॥३२॥
शंकर म्हणे हा मजला शरण । होऊनि चिन्ती माझें मरण । मम हृत्कमळ जो श्रीकृष्ण । द्वेष्टा पूर्ण हा त्याचा ॥३३॥
यास्तव संवत्सरपर्यंत । उदास झाला उमाकान्त । शाल्व नियतेन्द्रिय अत्यंत । देखोनि निवान्त प्रकटला ॥३४॥
याचा संकल्प नोहे सफळ । मूर्ख आणि नियमशीळ । म्हणवी शरणागत केवळ । तरी हा वोफळ टाळावा ॥३५॥
ऐसिया भावें हर प्रकटला । वरें प्रलोभविता झाला । म्हणे शाल्वा वर माग वहिला । देईन तुजला तो सद्य ॥३६॥
शाल्वें शंकरा याचिला वर । सावध परिसा तो सादर । कुरुवर्यातें योगेश्वर । करी सविस्तर व्याख्यान ॥३७॥
N/A
References : N/A
Last Updated : June 02, 2017
TOP