अध्याय ८० वा - श्लोक १ ते ५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
राजोवाच - भगवन्यानि चान्यानि मुकुन्दस्य महात्मनः । वीर्याण्यनन्तवीर्यस्य श्रोतुमिच्छाम हे प्रभो ॥१॥
श्रीयोगीन्द्रा भो भगवंता । यावत्काळ मुकुन्दचरिता । तुवां कथिलें तें ऐकतां । न बणे चित्ता संतृप्ति ॥५॥
यावत्काळ जितुकीं चरितें । मजला कथिलीं कृपावंतें । तयां वेगळीं जीं उर्वरितें । सुकृतभरितें मज सांगा ॥६॥
रामचरितप्रश्नावडी । ते तां पूर्ण केली फुडी । या वरी मुकुन्दचरिता गोडी । चाखवा रोकडी मम श्रवणा ॥७॥
म्हणसी जन्मापासूनि सकळ । कथिला श्रीकृष्णकथारोळ । कोणते उरले या वेगळ । कथूं केवळ तुज ते मी ॥८॥
अनंतवीर्य जो श्रीहरी । त्याचीं वीर्यें अनंतपरी । वदतां वेदाची वैखरी । न पवे पारी पूर्णत्वें ॥९॥
अनंताचीं अनंत वीर्यें । मर्त्यनाट्यें केलीं कार्यें । मज कथवीं योगिवर्यें । जीं अमर्त्यभुवनीं स्पृहमानें ॥१०॥
वीररसाचें पारणें । हरिचरितात्मक केलें श्रवणें । या वरी सप्रेम रसाकारणें । अंतःकरण लिप्साळु ॥११॥
म्हणसी तुझिया मनोगता । सारखी मज कैंची वक्तृता । भगवन्संबोधना अतौता । कथिला पुरता तव महिमा ॥१२॥
आणि प्रभो या संबोधनें । तुझें प्रभुत्व मजकारणें । कळलें असाधारणपणें । म्हणोनि श्रवणेच्छा उपजे ॥१३॥
भूतभविष्यद्वर्तमान । परिच्छिन्न अविच्छिन्न । हें तुज विदित अद्यतन । तो तूं सर्वज्ञ योगीशा ॥१४॥
म्हणसी श्रवणीं रसोत्पत्ति । तेणें घडे विषयावाप्ति । तन्निरासें कैवल्यप्राप्ति । चिद्रसरति अंतरते ॥१५॥
तरी यदर्थीं अकें स्वामी । ऐसा महिमा मुकुन्द नामीं । मुकुन्ददात्री ऐसी वाग्मी । मोक्षकामीं आश्रयितीं ॥१६॥
मुकुन्दनामश्रवनपठनें । अविरतस्मरणें ध्यानें स्तवनें । नेदी निःश्रेयसाविणें । हे मी जाणे तव कृपा ॥१७॥
कर्मकर्त्ता तो देहात्मा । तत्फलभोक्ता तो जीवात्मा । कर्मविमोचक परमात्मा । जातें महात्मा श्रुति म्हणती ॥१८॥
त्या महात्म्याचें अवतारचरित । परिसतां श्रवण विषयासक्त । होतां होतीं भवनिर्मुक्त । विषयातीत विश्वग पैं ॥१९॥
विषयसेवनें विषयनिवृत्ती । फावतां विमुख कैं कोण होती । यदर्थीं ऐकें माझी विनती । म्हणे भूपती मुनिवर्या ॥२०॥
को नु श्रुत्वा सकृद्ब्रह्मन्नुत्तमश्लोकसत्कथाः । विरमेत विशेषज्ञो विषण्णः काममार्गणैः ॥२॥
उत्तमश्लोक जो श्रीधर । तच्चरिताचे कथनोद्गार । श्रवण करूनि एकवार । कोण पां चतुर विरमेल ॥२१॥
म्हणसी एकवार हरिगुणश्रवणें । चतुर विराम न पवती मनें । तरी वारंवार श्रवणें पठनें । विराम पावणें घडे कीं ॥२२॥
तरी ऐकें गा ब्रह्मनिष्ठा । पुण्यश्लोकावतारचेष्टा । वारंवार श्रवणाविष्टा । भवभ्रमकष्टा विसरविती ॥२३॥
सच्छब्द जें शाश्वत ब्रह्म । मर्त्यनाट्यें तें कुढावी धर्म । तैं शोभवी रूपनाम । सगुण सप्रेम मन मोही ॥२४॥
श्रवणगोचर रसाळ गमती । प्राकृतजनमनाप्रति वेधिती । विषयतृष्णा विच्छेदिती । निर्वाणप्राप्तिकर कीं ना ॥२५॥
त्याचिया कथा त्या सत्कथा । भवभ्रम भंगिती ज्या ऐकतां । गमती प्राकृत जनपदवार्ता । परि त्या तत्वता श्रुतिगम्या ॥२६॥
विषयरसाचे अभिज्ञ । अभ्यासनिष्थ शब्दशास्त्रज्ञ । त्यांहूनि अध्यात्मप्रवीण प्राज्ञ । अपरोक्षज्ञ त्यांही वर ॥२७॥
शाब्द अध्यात्म अपरोक्ष । साद्यन्तप्रवीण कुशल दक्ष । विशेषज्ञ तेचि मुमुक्ष । रस अशेष अनुभविती ॥२८॥
ऐसिये विशेषज्ञकोटी । माजि विषयरसज्ञपरिपाटी । विवरूनि निश्चयात्मक जे गोठी । करूनि पोटीं दृढ धरिली ॥२९॥
विषयरसाचिया सेवनें । कैवल्यसुखा आंचवणें । विषयत्यागें जिताचि मरणें । तेव्हां वरणें अमृतत्व ॥३०॥
यत्तदग्रेविषमिव । विषयत्यागें भावी जीव । पूर्ण लाभतां विरागविभव । तैं हें वास्तवसुख जोडे ॥३१॥
ऐसा निश्चय कैवल्यलाभा । तेथ हरिगुण शाब्दिक विषयशोभा । केंवि दाविती कैवल्यप्रभा । श्रवणवल्लभा होऊनियां ॥३२॥
इंद्रियां जितकें रसाळ रुचे । तितुकें बीज भवभोगाचें । तरी हरिगुणश्रवणें साधकां साचें । केंवि मोक्षाचें फळ लाभे ॥३३॥
तरी ऐकें गा देशिकाग्रणी । इन्द्रियें सकाम विषयग्रहणं । तिये रंगतां हरिगुणश्रवणीं । निष्काम होऊनि उपरमती ॥३४॥
हरिगुण कामाचे नाशक । भववैरस्यें चिन्मात्रसुख । देती ऐसा पूर्ण विवेक । निश्चयात्मक बुध गाती ॥३५॥
चिमकराबुसादिकांच्या कंदा । तैलाभ्यंगवणी देती प्रमदा । तें जीवनचि परि तन्मूलच्छेदा । करी विरुद्धा भजूनियां ॥३६॥
तेंवि हरिगुण विषयरूप । इंद्रियां रुचतां ससाक्षेप । तैं कामाचें करपे रोप । निष्काम चिदूप स्वयें करी ॥३७॥
काममार्गणीं जे गांजले । सुख भावूनि दुःखा भजले । तापत्रयावळें भाजले । जे निर्वुजले भवभंवरा ॥३८॥
तेथूनि आपुली व्हावया सुटिका । त्रासें बोभाती कारूणिका । म्हणती धांव धांव गा देशिका । सोडवीं रंका भवग्रस्ता ॥३९॥
तो ऐकूनि करुणास्वरू । कृपाळु पेलूनि कृपेचें तारूं । स्वयें होऊनि कर्णधारु । काढी सत्वरु भवभग्ना ॥४०॥
काममार्गणीं पूर्वीं त्रासिले । हें न विसरे कांहीं केले । अतद्बोधें प्रणतपाळें । बोधितां उपजलें वैरस्य ॥४१॥
ऐसा साद्यंत अपरोक्षज्ञ । काममार्गणीं परम विषण्ण । सारवेत्ता विषयवितृष्ण । केंवि हरिगुण न सेवी ॥४२॥
तस्मात हरिगुणश्रवण त्याचें । विषयविरागें जीवन साचें । नवविधभजनें इन्द्रियांचें । साफल्य वाचे नृप बोले ॥४३॥
सा वाग्यया तस्य गुणान्गृणीते करौ च तत्कर्मकरौ मनश्च ।
स्मरेद्वसन्तं स्थिरजङ्गमेषु शृणोति तत्पुण्यकथाः स कर्णः ॥३॥
मृत्युलोकीं जन्मती प्राणी । विराजमान पटुतरकरणीं । त्यांमाजि धन्य तेचि वाणी । जे हरिगुणगणीं रंगली ॥४४॥
जिनें हरिगुणांचें कथन । करूनि अनुग्रहिले सज्जन । तेचि वाचा धन्य धन्य । म्हणे विचक्षण परीक्षिति ॥४५॥
अपर वाचा ते कुत्सित । निन्दादोषपंकें लिप्त । जगाचें उपसी नरकमूत । धिग् धिग् पतित वक्तृत्व तें ॥४६॥
धन्य धन्य तेचि कर । जे कां हरिभजनीं सादर । अनलस्यें निरंतर । करिती व्यापार भक्तीचा ॥४७॥
चळा अचळा हरीच्या मूर्ति । जिये क्षिती तयांची वसती । तेथ मंदिरें निर्माण करिती । सप्रेम स्वहस्तीं संतोषें ॥४८॥
किंवा आयतीं सम्मार्जून । टाकिती उत्कर विसर्जून । रंगवल्ली रेखिती पूर्ण । परम धन्य ते हस्त ॥४९॥
पादार्चनीं उद्वर्तनीं । अर्ध्यपाद्याद्युपचारदानीं । स्रक्चंददनपुष्पार्पणीं । विलसती पाणी ते धन्य ॥५०॥
विप्र प्राज्ञ अथवा गुरु । यांच्या दास्यीं जे तत्परु । यथाशक्ति परोपकारु । करिती ते कर धन्यतम ॥५१॥
जे श्रान्तांचे श्रम परिहारिती । याचकाभीष्ट अवंचक देती । भीता अभयप्रद जे होती । धन्य त्रिजगतीं ते हस्त ॥५२॥
जे पद तुळसीवृंदावना । कीं जे हरि गुरु वसत्या सदना । सत्क्षेत्रात्मक पुरपट्टना । प्रदक्षिणा करिताती ॥५३॥
कीं चालतां तीर्थाटनीं । हरिकीर्तनीं गमनागमनीं । सद्यज्ञाच्या अवभृथस्नानीं । करिती धांवणी ते धन्य ॥५४॥
अनाथाचिया रक्षणा । धांवूनि पावती तत्क्षणा । क्षुधिता तृषिता अन्नजीवना । सादर दाना पद चलती ॥५५॥
धन्य धन्य तेचि पद । याहूनिही जे सुकृतप्रद । पदोपदीं पाहूनि विशद । जीवां दुःखद न होती जे ॥५६॥
हरिभजनार्थ अधोद्वारें । जियें पवित्रें शौचाचारें । अस्पृष्ट कामादि दुर्विकारें । धन्यतरें म्हणिपती तीं ॥५७॥
ऐसें पंचधा कर्मकरण । यातें प्रवर्तक जें कां मन । तेंही तेव्हांचि धन्य धन्य । संकल्पशून्य जैं होय ॥५८॥
स्थावरजंगमीं ज्याचा वास । सर्वात्मक जो जगन्निवास । तदनुलक्षें भवभ्रमास । विसरे भेदास ग्रासूनी ॥५९॥
जलावबोधें जलतरंग । भिन्न दिसतां भेदभंग । स्थावरजंगमात्मक जें जग । अभेद श्रीरंग जें जाणें ॥६०॥
तयाचि बोधें हरिगुणश्रवण । सप्रेम करिती धन्य ते कर्ण । जेणें वेधे अंतःकरण । पुण्यपावन जिया कथा ॥६१॥
हरिगुणकीर्तनश्रवणापुढें । कैवल्यसुखही ज्यां नावडे । प्रेमोन्मादें होती वेडे । धन्य निवाडे ते श्रोते ॥६२॥
उवरितें जीं ज्ञानकरणें । धन्य होतीं ज्या आचरणें । जें नृप सांगे शुकाकारणें । सावध परिसणें तें श्रोतीं ॥६३॥
शिरस्तु तस्योभयलिङ्गमानएत्तदेव यत्पश्यति तद्धि चक्षुः ।
अङ्गानि विष्णोरथ तज्जनानां पादोदकं यानि भजन्ति नित्यम् ॥४॥
स्थावरजंगमलिंगमात्र । व्यापक जो कां सर्वेश्वर । त्याते लक्षूनि निरहंकार । नमी तें शिर धन्यतम ॥६४॥
याजुष नामक रौद्रीयसूक्तीं । वेदीं नमिल्या ज्या ज्या व्यक्ति । चराचरात्मक अभेदमूर्ति । एकात्मस्थिति लक्षूनि ॥६५॥
तयाचि बोधें सचराचर । नमी लक्षूनि सर्वेश्वर । निरसूनि भेदात्मक अहंकार । तें धन्य शिर श्रुतिमान्य ॥६६॥
म्हणाल करणत्व नाहीं शिरा । तरी येथ लक्षिलें अहंकारा । सर्वग लक्षूनि सर्वेश्वरा । सचराचरा नत जो कां ॥६७॥
चक्षुरिन्द्रिय तेंचि धन्य । स्थावरजंगमीं हरि लक्षून । अभेदबोधें समसमान । विवर्तमान अनादरी ॥६८॥
विद्याविनयसंपन्न विप्रीं । धेनुश्चपचश्वानसूकरीं । समदर्शीं ते पंडा खरी । पंडितांमाझारी प्रशंसिली ॥६९॥
तस्माच्चराचरीं समदर्शन । लक्षिती ते धन्य नयन । विवर्तजनितभेदभान । अप्रमाण जिये दृष्टी ॥७०॥
लोकसंग्रहार्थ मात्र । प्रवृत्तिबोधें कर्मसूत्र । लक्षूनि होती कर्मतंत्र । येर्हवीं सन्मात्र स्वप्रसिद्ध ॥७१॥
अविभक्तंच भूतेषु । विभक्तापरी जो परेशु । लक्षूनि भजती जे चक्षु । तेचि डोळसु मी मानीं ॥७२॥
तैसेंचि धन्य त्वगिन्द्रिय । सचेताचेत प्रतिमाद्वय । लक्षूनि केवळ विष्णुमय । कवळी अद्वय जाणोनी ॥७३॥
विष्णूचें कां वैष्णवाचें । पादोदक जें स्पर्शे साचें । तेंचि त्वगिन्द्रिय भाग्याचें । हरिभजनाचें फळ लाहे ॥७४॥
विष्णुपदजल भागीरथी । तेथ गात्रें जीं निमज्जती । तेंवि धन्यतम होती । विष्णुभक्तधिकारें ॥७५॥
भागीरथी एके प्रान्तीं । वैष्णवांची सर्वत्र गति । त्यांच्या पादोदकें जीं भिजती । तियें अंगें होतीं धन्यतमें ॥७६॥
व्यापनशीळ जो कां विष्णु । वैष्णव तद्बोधें परिपूर्णु । विष्णुमयचि जग अभिन्नु । जाणोनि निमग्न जे होती ॥७७॥
सर्व विष्णुमय जगत । ऐसा निश्चय ज्यांचा सत्य । तेचि यथार्थ विष्णुभक्त । पदजल पूत तयांचें ॥७८॥
तेणें जीं जीं आंगें भिजती । तीं तीं धन्यतमें म्हणिजती । ऐसी दृढतर माझी मती । म्हणोनि विनती करितसें ॥७९॥
विष्णुपादोद्भवा जाह्नवी । स्थूळबुद्धी तीर्थगौरवीं । विश्वतस्पात् इये नांवीं । जो गोसावी सर्वगत ॥८०॥
त्यातें लक्षूनि भजती भक्त । ते सर्वत्र पदजलपूत । भेदभ्रमें भ्रमती भ्रान्त । अल्पज्ञ अभक्त एकदेशी ॥८१॥
अभक्तांचिया तरणोपाया । पूर्णही तीर्थाटनादिचर्या । करिती धर्म स्थापावया । परि ते आर्या आर्यतम ॥८२॥
असो त्वगिन्द्रिय जें कां धन्य । तें हें केलें निरूपण । यावरी रसना तेचि धन्य । प्रसादसेवनें संतृप्त ॥८३॥
घ्राणही धन्यतम तेंचि । हरिपादार्पित श्रीतुळशीची । सौरभ्यता सेवूनि साची । लाहे सुखाची संतृप्ति ॥८४॥
एवं करणसमुच्चय । सर्वदा विष्णुभजनमय । विलसे तोचि धन्य होय । हा अभिप्राय येथींचा ॥८५॥
यालागीं श्रीकृष्णाचें चरित । मज निरूपा अतंद्रित । ऐसें शुकेंद्रा प्रार्थित । कौरवनाथ सप्रेमें ॥८६॥
म्हणूनि शौनका नैमिषवनीं । सूत निरूपी सत्रसदनीं । तें परिसावें श्रोतृजनीं । सावध होऊनि क्षण एक ॥८७॥
सूत उवाच - विष्णुरातेन सम्पृष्टो भगवान्बादरायणिः । वासुदेवे भगवति निमग्नहृदयोऽब्रवीत ॥५॥
विष्णुभजनीं इंद्रियवृत्ति । सर्वही रतल्या सप्रेमभक्ति । यालागिं विष्णुरात परीक्षिति । व्यासादि म्हणती मुनिवर्य ॥८८॥
तया विष्णुरातें नृपवरें । सम्यक बरविया प्रकारें । प्रश्न केला अत्यादरें । कथिला विस्तारें जो हा तुम्हां ॥८९॥
ऐसिया प्रश्नें बादरायणि । पुसिला असतां सादरपणीं । मानसें निमग्न जाहला कृष्णीं । प्रेमा देखूनि भूपाचा ॥९०॥
सप्रेम सादर मिळतां श्रोता । पूर्णानंदें न भरे वक्ता । तैं तो जाणिजे अवधा रिता । वृथा वक्तृता पैं त्याची ॥९१॥
इक्षुदंडनिष्पीडना । काष्टयंत्रें करितां जाणा । कर्कश शब्द गोचर श्रवणा । तेंवि व्याख्याना जो बोधी ॥९२॥
क्षूरसाची नेणे चवी । कर्कश भ्रमणें ध्वनी उपजवी । तैसा वक्ता निमग्न भवीं । श्रोत्या गोंवी जठरार्थ ॥९३॥
तैसा वक्ता नव्हे शुक । श्रोत्या करूनि श्रवणोन्मुख । चाखवी बोधें चिदात्मसुख । परम पीयूष पूर्णत्वें ॥९४॥
स्वयें निमग्न परमानंदीं । तन्मय करी जो संवादी । तो परीक्षितीच्या प्रश्नवादीं । हृदयारविन्दीं निवाला ॥९५॥
N/A
References : N/A
Last Updated : June 06, 2017
TOP