अध्याय ८३ वा - श्लोक ३१ ते ३५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
एवं वृते भगवति मयेशे नृपयूथपाः । न सेहिरे याज्ञसेनि स्पर्द्धिनो हृच्छयातुराः ॥३१॥
श्रीकृष्ण म्यां वरिला ऐसा । तेणें भूपांच्या मानसा । लागला अपयशःकलंक कैसा । जेंवि कोळसा शुभ्रपटीं ॥२५५॥
थोर थोर जे नृपयूथप । परस्परें नोकिती भूप । म्हणती केव्हडें आमुचें पाप । अपयशोलेपें विलेपिलों ॥५६॥
वरिला असतां म्यां श्रीपती । नृपगण देखों न साहती । सज्ज जाहले युद्धाप्रती । दुष्ट दुर्मती अविचार ॥५७॥
आपण भेदूं न शकूं यंत्र । जाणत असतां हें सर्वत्र । कामक्षोभें अविवेकपात्र । जाले विचित्र तें ऐकें ॥५८॥
कामक्षोभाची विचित्र प्रौढी । जळतां आगीं घालवी उडी । न पाहे आपुली शक्ति केव्हढी । संपन्न बराडी न विचारी ॥५९॥
तस्मात कामक्षोभाचे भरीं । भूपीं नोकूनि परस्परीं । नधरत दुर्मद मिनले समरीं । हें देखोनि श्रीहरि निजनेत्रीं ॥२६०॥
मां तावद्रथमारोप्य हयरत्नचतुष्टयम् । शार्ङ्गमुद्यम्य सन्नद्धस्तस्थावाजौ चतुर्भुजः ॥३२॥
देखोनि नृपांचा रणोद्यम । तेव्हां मातें पुरुषोत्तम । रथीं वाहूनि तुरंगम । संयाजिले समरंगीं ॥६१॥
चारी अश्वरत्नें जिये रथीं । दारुका ऐसा कुशल सारथी । योद्धा श्रीकृष्ण प्रतापमूर्ती । सज्जूनि निगुती कोदंड ॥६२॥
आजौ म्हणिजे समराङ्गणीं । सन्नद्ध ठाकला प्रतापतरणी । मातें भयभीत जाणोनी । द्विभुजीं उचलोनी आलिङ्गी ॥६३॥
कमले समान मातें हृदयीं । कवळून ठाकला समरमही । शार्ङ्गकोदंड हस्तीं दोहीं । टणत्करिलें सज्जूनी ॥६४॥
माझें भयभीत अंतर । स्वयें जाणोनि द्वारकेश्वर । चत्रुर्भुज होऊनियां सत्वर । मजला धरिलें हृत्कमळीं ॥२६५॥
द्विभुजीं मातें आलिङ्गून । द्विभुजीं सज्जूनि चापबाण । मशकप्राय नृपांचा गण । लक्षिता जाला पद्माक्ष ॥६६॥
जाणोनि प्रभूचा समरोद्योग । दारुकनामा सारथि चांग । साट देऊनियां तुरंग । चार्ही चपळांग चेतविले ॥६७॥
दारुकश्चोदयामास काञ्चनोपस्करं रथम् । मिषतां भूभुजां राज्ञि मृगाणाम मृगराडिव ॥३३॥
केवळ कंठीरव तो रथ । सुवर्णोपस्करमंडित । नेत्रस्थानीं दारुक तेथ । कृष्ण हृदयस्थ परमात्मा ॥६८॥
भूभुज पाहतां मृगांचे परी । मृगेन्द्रा ऐसा मातें हरि । जवें जयश्री जातां समरीं । नृपशस्त्रास्त्रीं उठियले ॥६९॥
तेऽन्वसज्जन्त राजन्या निषेद्धु पथि केचन । संयत्ता उधृद्तेष्वासा ग्रामसिंहा यथा हरिम् ॥३४॥
मग ते भूपळींचे भूपती । हरिरथ जातां द्वारकापथीं । मागें धांवोनि वातगती । पाचारिती समरंगा ॥२७०॥
कोण्ही एक प्रतापवंत । करीं कोदंडें सज्जीकृत । पुढें वावळूनियां स्वरथ । त्रैलोक्यनाथा पडखळिती ॥७१॥
ग्रामसिंह म्हणिजे श्वान । भुङ्कती सिंहातें देखून । आडवे धांवती जेंवि दुरून । तेंवि आंगवण नृप करिती ॥७२॥
ते शार्ङ्गच्युतबाणौघैः कृत्तबाह्वंघ्रिकंधराः । निपेतुः प्रधने केचिदेके सन्त्यज्य दुद्रुवुः ॥३५॥
ऐसे वरवाळले जे राजे । त्यांतें देखोनि गरुडध्वजें । शार्ङ्गनिर्मुक्तमार्गणतेजें । शिरें सरोजें सम हरिलें ॥७३॥
शार्ङ्गनिर्मुक्तबाणप्रवाहो । माजले जैसे प्रळयमेहो । किंवा काळाग्निरुद्राक्ष दाहो । करित क्षोभले बहुसाळ ॥७४॥
शार्ङ्गनिर्मुक्तबाणौघ बहु । तिहीं छेदिले नृपांचे बाहु । कंधर छेदूनि केले राहु । अधरामृतेच्छु बहूतेक ॥२७५॥
जंघ्रि छेदिलिया अंघ्रिप । पडती तैसे समरीं नृप । शार्ङ्गच्युतबाणीं अमूप । खंडिले भूप यवसप्राय ॥७६॥
बाणीं खंडिती करपदतळें । जंघाजानुकटिमंडळें । गगनीं उसळती शिसाळें । वीरश्रीइसाळे खांखांत ॥७७॥
मारीं मारीं घे घे म्हणती । आवेशें शरसंधानें करिती । ते कृष्णाच्या मार्गणाघातीं । विखंड होतीं निमिषार्द्धें ॥७८॥
ऐसे बहु नृप आयोधनीं । पडतां प्रेतीं दाटे धरणी । कित्तेक विमुख समराङ्गणीं । प्राण घेऊनि पळाले ॥७९॥
पलतां एका नतके वाट । वेंगड्या वळतां पडलें भेट । यादवांचे म्हणविती भाट । करिती बोभाट बिरुदांचा ॥२८०॥
एकीं तोंडीं धरूनि तृणें । म्हणविती नंदाचीं गोधनें । पूर्वीं जैसीं रक्षिलीं कृष्णें । तेंव ये क्षणें रक्षावीं ॥८१॥
एक अक्षतचि समराङ्गणीं । प्रेतप्राय पडले धरणी । एक उदकारें भवानी । भूतें म्हणवूनि स्मरताती ॥८२॥
खेटकांचीं करूनि परडीं । खङ्ग दिवटीचे परवडी । उदो उदो म्हणती तोंडीं । मागती कवडी तैलार्थ ॥८३॥
ऐसें कृष्णें एकाङ्गवीरें । वीरां लाविलें धायकाविरें । सुरवर गर्जती जयजयकारें । हृदयीं श्रीधरें मज धरिलें ॥८४॥
प्रबळ भंगूनि भूभुजसेना । कैसा स्वपुरीं प्रवेश कृष्णा । यावरी अवधारीं त्या कथना । म्हणे कुरुरत्ना शुकयोगी ॥२८५॥
N/A
References : N/A
Last Updated : June 12, 2017
TOP