अध्याय ८५ वा - श्लोक १६ ते २०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
यदृच्छया नृतां प्राप्य सुकल्पामिह दुर्लभाम् । स्वार्थे प्रमत्तस्य वयो गतं त्वन्माययेशर ॥१६॥
जैं शुभाशुभकर्मा समता । तैं नरदेह लाहे तत्वता । येर्हवीं चौर्यांयशी लक्ष भ्रमतां । विवेकार्हता दुर्लभ पैं ॥१४५॥
विवेकोदया नरदेह मात्र । अपरा योनि कर्मतंत्र । होती कर्मफळाचें पात्र । प्रारब्धसूत्रपतनान्त ॥४६॥
ऐसा दुर्लभ मनुष्यदेह । लाधल्या वयं वेंचे अहरह । मूढ रुग्ण कां व्यंग होय । तरी मग काय लाभोनी ॥४७॥
तेथ ही दैवें अवयवपटुता । इंद्रियपाटव अनामयता । असोनिही नर न करी स्वहिता । हे तत्वता तव माया ॥४८॥
दुर्लभ ऐसा नरदेह प्राप्त । विषयीं भुलोनी न करी स्वहित । तयाची वयसा गेली व्यर्थ । तव मायेनें भुलविलिया ॥४९॥
भो ईश्वरा तुझी माया । कैसी समर्थ भुलवावया । जाणत जाण नेणतिया । माजि बुडवी भवभ्रान्ति ॥१५०॥
म्हणसी आश्चर्य येवढें काय । जाणोनि प्रमत्त कोणा न्यायें । तरी बहुधा पाशीं तां बांधिलों आहें । यास्तव न लाहें उमजातें ॥५१॥
कैसे कोणते पाश म्हणसी । अल्प कथितों ते तुजपासीं । जगज्जगदात्मा तूंचि होसी । परि नेणसी बद्धातें ॥५२॥
असावहं ममैवैते देहे चास्याध्वयादिषु । स्नेहपाशैर्निबघ्नानि भवान्सर्वमिदं जगत् ॥१७॥
हा देह मी ऐसी देहीं । तादात्म्याहंता स्फुरे पाहीं । देहाचिये अन्वयविषयीं । ममता स्फुरे स्नेहभरें ॥५३॥
मी देह म्हणोनी अहंता वेठे । तदभिमानें बांधला खुंटें । तेथ लागलीं जियें चर्हाटें । श्रवणपुटें तीं ऐका ॥५४॥
मी कुळशीळवंत सुकृती । अपर अकुळी दुःशीळदुष्कृती । इत्यादि विद्या वयसा जाती । देहाहंमती दृढावी ॥१५५॥
ऐसा देहीं निबद्ध होय । मग सुखदुःखाचे सोसी घाय । ममतास्नेहपाशांची सोय । कैसी काय ते कथितों ॥५६॥
माझी वृत्ति माझी भूमी । दास दासी माझिये धामीं । कन्यापुत्र कलत्र नामीं । स्नेहपाशें हे जाणावे ॥५७॥
माझे आप्तस्वजनसुहृद । माझे हय गज रथ गोवृंद । स्वार्थ रोधूनि देती खेद । शत्रु विशद ते माझे ॥५८॥
ब्रह्माहमस्मि अद्वयबोध । देहतादात्म्य अहंममभेद । पाश होवोनी वोपी खेद । अनेकविध भासोनी ॥५९॥
मी माझें हा भेद मुळींचा । तूं तुझें हा पर्याय त्याचा । हा याचें हें म्हणतां वाचा । होय भेदाचा विरतार ॥१६०॥
तेणें गालिप्रदान केलें । प्रतिकारीं म्यां फडसाविलें । तें बीज कलहरूपें फळलें । भोगणें पडलें चीथूचें ॥६१॥
स्नेह स्नेहें द्वेषें द्वेष । सुहृदीं आप्तीं तोष रोष । ऐसे बांधिती भवभ्रमपाश । चित्सुखास विसरविती ॥६२॥
ऐसिया परि अवघें जग । पाशनिबद्ध गुंतलें साङ्ग । येर्हवीं जगदात्मा तूं अभंग । नित्य निःसंग भगवान् ॥६३॥
जरी तूं आश्चर्यें म्हणसी हरी । तव पुत्र आम्ही राममुरारी । ईश्वरत्व आमुचे शिरीं । कवणे परी आरोपिसी ॥६४॥
तरी तूं ऐकें इये विशीं । स्वमुखें वदलासि आम्हांपासीं । तैं तव वाणीच तुजपासीं । निःश्चयेसीं मी कथितों ॥१६५॥
युवां न नः सुतौ साक्षात्प्रधानपुरुशेश्वरी । भूभारक्षत्रक्षपण अवतीर्णौ तथात्थ ह ॥१८॥
तुम्ही आमुचे पुत्र नोहां । ऐसा प्रत्यय माझिया जीवा । साक्षात्प्रधानपुरुषां देवां । पासूनि श्रेष्ठ ईश्वरेश्वर ॥६६॥
येथ मानुषी अवगणी । धरूनि क्रीडतां माझिये सदनीं । जें भूभारक्षत्रियांच्या क्षपणीं । धर्मस्थापनीं अवतरला ॥६७॥
म्हणसी तुज हें कोठोनि कळलें । तरी हें तुवांचि साकल्य कथिलें । तेंही जाईल निरूपिलें । प्रस्तुत प्रार्थिलें तें ऐका ॥६८॥
तत्ते गतोऽस्म्यरणमद्य पदारविन्दमापन्नसंसृतिभयापहमार्त्तबंन्धो ।
एतावतालमलमिद्रियलालसेन मर्त्यात्मदृक्त्वयि परे यदपत्यबुद्धिः ॥१९॥
तुम्ही नव्हतां पैं माझे कुमर । प्रधानपुरुष ईश्वर । उतरावया धराभार । क्षत्रिय अघोर मारूनियां ॥६९॥
अवतरलेति माझिये सदनीं । म्हणोनि शरण मी तुमच्या चरणीं । बिरुदावळी वेद वाखाणी । तें ऐकोनि श्रवणीं दृढ जालों ॥१७०॥
चरणां शरण जे जे आले । ते संसृतिभया वेगळे केले । यास्तव म्यांही दृढतर धरिले । निजार्तिहरणा लागूनी ॥७१॥
दुःखितांचें दुःखनिरसन । करिसी म्हणोनि तुजलागून । आर्तबंधु हें संबोधन । शुक भगवान स्वयें वदला ॥७२॥
यदर्थीं म्हणसी जरी भगवंता । मी दुःखिताचा दुःखहर्ता । परी तुजलागीं तों दुःखवार्ता । नसतां वृथा कां शिणसी ॥७३॥
तरी ऐकें गा चक्रपाणी । इंद्रियलाम्पट्यें करूनी । मनुष्यदेह आत्मपणीं । स्पष्ट मानूनी चेष्टतसें ॥७४॥
आणि तूं परात्पर ईश्वरेश्वर । हें गुह्य बोलिलासी साचार । त्या तुझ्या ठायीं आत्मकुमर । मानूनि अपत्यबुद्धि मज ॥१७५॥
तुम्हां ईश्वरेश्वरां प्रती । अपत्य मानी माझी मती । यावरी पुरे आतां श्रीपती । इतुकें प्रार्थीं मी तुजला ॥७६॥
पाञ्चभौतिकीं आत्मबुद्धी । सुतधनकलत्र आत्मीयधी । अपत्यमति ईश्वरावधी । इंद्रियलंपटें म्यां केली ॥७७॥
ते येथूनि पुरे आतां । इतुकें प्रार्थितसें अनंता । तुझ्या उपदेशें तत्वता । तुझी ईश्वरता मज कळली ॥७८॥
जरी तूं म्हणसी श्रीमुरारी । कैं तुज वदली मम वैखरी । माझें ऐश्वर्य कवणे परी । तुज अंतरीं अवगमलें ॥७९॥
यदर्थीं ऐकें जगत्पती । सुतीगृहीं निज संभृती । दावूनि बोधिली माझी मती । तें मम चित्तीं स्मरत असे ॥१८०॥
सूतीगृहे ननु जगाद भवानजो नौ सञ्जज्ञ इत्यनुयुगं निजधर्मगुप्त्यै ।
नानातनूर्गगनवद्विदधज्जहासि को वेद भूम्न उरुगाय निभूविमायाम् ॥२०॥
पूर्वीं सूतीगृहाच्या ठायीं । प्रतियुगीं मी होतसें देही । धर्मरक्षणालागीं पाहीं । ऐसी नवाई वदलासी ॥८१॥
मी निःसंग जन्मरहित । तुमच्या ठायीं प्रतियुगीं मूर्त । अवतरलों हे वदलासि मात । तैं कैं असत्य हों शके ॥८२॥
आमुच्याचि ठायीं युगीं युगीं कैसा । म्हणसी तरी तूंचि परेशा । स्वयें वदलासी जगदीशा । ते परिभाषा अवधारीं ॥८३॥
अनुयुगं म्हणिजे युगयुगाप्रती । तुम्ही सप्रेम दंपती । सुतपानाम तूं प्रजापती । पृश्नि निश्चित देवकी हे ॥८४॥
तैं मी पृश्निगर्भनामा । तुमच्या ठायीं लाहोनि जन्मा । निजजनकत्व दिधलें तुम्हां । स्वयें अजन्मा होत्साता ॥१८५॥
त्यानंतरे कश्यप अदिती । तुम्हींच दोघें पूर्वदंपती । तुमच्या ठायीं वामनमूर्ती । मी श्रीपती स्वयें जालों ॥८६॥
आतां तियेंच दंपती तुम्ही । वसुदेवदेवकी ऐसिया नामीं । मी हाइ जगत्कल्याणकामी । तुमच्या सद्मीं अवतरलों ॥८७॥
ऐसें वदलासि सूतिकालयीं । तें स्मरतसे माझ्या हृदयें । झणें तूं म्हणसी तो शेषशायी । होतसे देही चतुर्भुज ॥८८॥
तरी हा निश्चय नाहीं हरी । तूं निःसंग गगनापरी । सुरकायार्थ नानापरी । बहुधा शरीरीं नट धरिसी ॥८९॥
नभ निःसंग जेंवि निर्लेप । घट मठ नटनाट्यें अमूप । धरूनि सांडी निर्विकल्प । तव तनुजल्प तैसाची ॥१९०॥
भूमन् म्हणिजे सर्वगत । उरुगाय अमळशय विस्तृत । दोंहीं संबोधनीं अनंत । वसुदेव तेथ संबोधी ॥९१॥
अमळकीर्ति जनार्दना । भो भगवंता अपरिच्छिन्ना । मायाविभूतिरूपें नाना । तुझीं हीं कोणा जाणवती ॥९२॥
शुक म्हणे गा परीक्षिति । स्वयें वासुदेव वृष्णिपति । बोलिला तें जगत्पति । परिसोनि वदला तें ऐक ॥९३॥
N/A
References : N/A
Last Updated : June 12, 2017
TOP