अध्याय ८६ वा - श्लोक ४६ ते ५०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्रृण्वतां गदतां शश्वदर्चतां त्वाऽभिर्वन्दताम् । नृणां संवदतामन्तहृदि भास्यमलात्मनाम् ॥४६॥

श्रवणनिष्ठ जे तव भक्त । तव पदप्रेमें भवविरक्त । त्यां तव दर्शन ध्यानीं प्राप्त । अमळचित्त म्हणोनियां ॥३३०॥
एवं तव गुणगणव्याख्याते । साधनधनसंपन्न विशुद्धचित्तें । तव दर्शन ध्यानीं त्यांतें । ध्यानीं एकान्तें फावतसे ॥३१॥
एक तव पदसपर्यानिरत । विषयप्रवाहीं निःशेष विरत । चित्तशुद्धिद्वारा प्राप्त । त्यां तव एकान्त हृत्कमळीं ॥३२॥
एक अन्वयबोधशाळी । सर्वभूतीं तव निहाळी । वंदनासक्त करूनि मौळी । प्रेमकल्लोळीं विराजती ॥३३॥
एक सम्यक् बरव्या परी । उपनिषद्वाक्यांचिया विवरीं । आत्मप्रत्ययें परस्परीं । अमळान्तरीं संवादती ॥३४॥
ऐसिया अमळान्तरा नरां । साधनसंपन्ना भक्तनिकरां । ध्यानींच दर्शनलाभ पुरा । प्रत्यक्ष न घडे मज ऐसा ॥३३५॥
मजला प्रकट तव दर्शन । अकस्मात रिघोनि सदन । दुर्लभ हाचि पूर्ण । जे प्रत्यक्ष गोगण सेवितसे ॥३६॥
सुखसंवादें सनाथ केलें । वियोगभेदातें निरसिलें । आत्मबोधें आनंदविलें । तें मी बोलें काय वदूं ॥३७॥
जरी तूं म्हणसी भो यदुवीरा । विश्वहृदयस्थ ईश्वरा । ध्यानीं दर्शन अमळान्तरा । सूर्यजलधरा समसाम्यें ॥३८॥
मेघें पिहित ज्याचे नयन । सूर्य न त्या प्रकाशमान । ज्यांची दृष्टि न रोधी घन । साङ्ग विकर्त्तन ते पाहती ॥३९॥
तैसीच येथ जीवोपाधि । अविद्यात्मक विपरीतबुद्धि । चिदाभासाचें वयुन रोधी । दर्शनसिद्धि तैं कैंची ॥३४०॥
अविद्यावरणाचा निरास । विपरीतभ्रमा तैं होय नाश । तरी हें न घडे सर्वगतास । एकदेशित्व आरोपिलें ॥४१॥
अविद्याभ्रमा माजिही काये । आत्मयावीण प्रकाशक आहे । तरी दर्शनावाप्ति होये । एका न होय कां म्हणसी ॥४२॥
यदर्थीं ऐकें भो श्रीधरा । देहात्मवंता श्रुतिज्ञा चतुरां । हृदयस्थ असोनि दूरतरा । कर्मठां नरां तूं अससी ॥४३॥

हृदिस्थोऽप्यतिदूरस्थः कर्मविक्षिप्तचेतसाम् । आत्मशक्तिभिरग्राह्योऽप्यन्त्युपेतगुणात्मनाम् ॥४७॥

वेद त्रैगुण्यविषयात्मक । पूर्वपक्षींच्या श्रुति सम्यक । विवरूनि विश्वस्त फळकामुक । करिती मख बहुविध पैं ॥४४॥
अपरोक्ष आत्मा हृदयस्थ असतां । उपनिषद्बोध न बाणे चित्ता । फलाभिलाषें ऋतुसुकृता । संपादितां न शिणती ॥३४५॥
इंद्र अग्नि सूर्य सोम । वरुणप्रमुख यथाकाम । यजिती पृथग्देवतानाम । मंत्रपठनें नममान्त ॥४६॥
तयां फळदाता तूं श्रीहरि । भाससी लोकलोकान्तरीं । श्रुतिविश्वासें अंतरीं । प्रतीति पुरी अवगमिती ॥४७॥
हृदयस्थ आसोनि दूरतर । तयां जाहलासि तूं ईश्वर । स्वपदप्रनतां निकटतर । असतां दूर अवगमसी ॥४८॥
हृदयस्थ आणि दूर कैसा । म्हणसी तरी ऐकें परेशा । आत्मशक्ति करूनि सहसा । अप्रपय म्हणूनि दूरतर ॥४९॥
आत्मा म्हणिजे अंतःकरण । तच्छक्ति त्या करणगण । तिहीं ग्राह्य विषयभान । त्या कोठून तव प्राप्ती ॥३५०॥
ऐसियाही अप्राप्तिवंतां । सप्रेम श्रीपदप्रणतां । श्रवणादि नवविधभजनासक्ताम । निकट तत्वता तूं होसी ॥५१॥
हेंचि प्रमेय विस्तारून । पुढती श्लोकें वक्ष्यमाण । चतुर्थ्यत करूनि नमन । वदला ब्राह्मण तें ऐका ॥५२॥

नमोऽस्तु तेऽध्यात्मविदां परात्मने अनात्मनें स्वात्मविभक्तमृत्यवे । सकारणाकारनलिङ्गमीयुषे स्वमाययाऽसंवॄतरुद्धदृष्टये ॥४८॥

तुजकारणें प्रणाम माझा । असो भो श्रीगरुडध्वजा । द्विविध भावी तयांतें सहजा । निकट दूरी द्विधात्मका ॥५३॥
अध्यात्मवेत्ते अपरोक्षज्ञ । निरसूनि देहात्मविद्यावरण । परमात्मा तूं प्रतीयमान । केला आपण होत्साते ॥५४॥
तयां कारणें परमत्मत्वें । प्रतीयमान तूं आत्मतत्वें । अविद्यावरणनाशासवें । कीं मोक्षद म्हणावें लागतसे ॥३५५॥
तया परमात्मया तुजकारणें । माझें नमन अनन्यपणें । अभेदबोधें निकट म्हणणें । लागे काय यावरीही ॥५६॥
अनात्मत्वेत्ते दूरतर । भेदभ्रमें ज्या आत्मविसर । तयांतें प्रतीतिगोचर । मृत्युसंसारभयभेदें ॥५७॥
भेदभ्रमें भांबावले । दृश्य सत्यत्वें भाविलें । तेथ जीवत्वें परिणमलें । त्या जीवचैतन्या तुज नमो ॥५८॥
माया कार्य अविद्यावरण । यालागिं अविद्या सकारण । स्वरूप स्वसंवेद्य परिपूर्ण । माया अकारण यास्त्व पैं ॥५९॥
भेदभ्रमासि अवसर नाहीं । यालागिं अकारण माया पाहीं । देहीं लिंगीं दोहीं ठायीं । द्विधा उपाधी माजिवडा ॥३६०॥
सकारणा अकारणा । उभयलिंगोपलब्धा पूर्णा । तुज नमो श्रीजनार्द्दना । उभयपणा नियमितया ॥६१॥
आपणा पासूनि उभयोपाधी । त्या उभयां वश्य जो बोधाबोधीं । तया जीवात्मया मी वंदीं । विभक्तप्रबोधीं मृत्युमया ॥६२॥
स्वमायेसि तूं अनावृत । यालागिं तूं नियंता श्रीभगवंत । स्वमायेकरूनि असंवृत । ऐसें संबोधी श्रुतिनिकर ॥६३॥
स्वमायेचें अनावरण । ज्यातें तो तूं श्रीभगवान । यालागीं अलुप्तैश्वर्यपूर्ण । नियंता म्हणोन मायेचा ॥६४॥
मायानियंतया तूतें । माझें नमन भो पूर्णातें । मायासंवृतां जीवांतें । दृष्टिरोधका तुज नमन ॥३६५॥
देहात्मजीवात्मपत्ययवंत । तो नियम्य ही तूंचि येथ । ईश्वर नियंता समर्थ । त्या तुज प्रणत नियंतया ॥६६॥
ऐसिया परीच्या परमेश्वरा । नमन माझें भो ईश्वरा । शिक्षीं आम्हां भृत्यनिकरा । आज्ञा करा सेवेची ॥६७॥
काय मी करूं तव सेवन । ऐसें कीजे आज्ञापन । इतुकें श्रुतदेवें प्रार्थून । बोलिला वचन तें ऐका ॥६८॥

स त्वं शाधि स्वभृत्यान्नः कि देव करवामहे । एतदन्तो नृणां क्लेशो यद्भवानक्षगोचरः ॥४९॥

पूर्वोक्तपरीचा तूं ईश्वर । नाट्यें नव्हसी मानवी नर । यास्तव माझा नमस्कार । प्रार्थना सादर अवधारीं ॥६९॥
आम्हां भृत्यां शिक्षित करीं । नियोजूनि यथाधिकारीं । करणीय कथावें तें शिरीं । धरूं श्रीहरि निर्धारें ॥३७०॥
मर्त्यांलागिं तोवरी क्लेश । जवंवरी तुझा हा सगुणवेश । गोचर नोहे इंद्रियांस । तंववरी अशेष भवदुःख ॥७१॥
तूं जरी अक्षगोचर भगवंत । तेव्हांचि भवक्लेशासि अंत । भाग्यें केलें मज सनाथ । कृपावंत होऊनियां ॥७२॥
इतुकी श्रुतदेवें प्रार्थना । सप्रेम केली जनार्दना । तें शुकें नृपासि कथूनि जाणा । वक्ष्यमाणा निरूपी ॥७३॥

श्रीशुक उवाच - तदुक्तमित्युपाकर्ण्य भगवान्प्रणतार्तिहा ।
गृहीत्वा पाणिना पाणिं प्रहसंस्तमुवाच ह ॥५०॥

शुक म्हणे गा कौरवाग्रणी । ऐकूनि द्विजाची विनवणी । बोलता जाला चक्रपाणी । तें तूं श्रवणीं अवधारीं ॥७४॥
षड्गुणैश्वर्यसंपन्न । यालागिं नामें श्रीभगवान । प्रणतजनांचा आर्तिहरण । हास्यवदनें बोलतसे ॥३७५॥
स्वहस्तें ब्राह्मणाचा हस्त । धरूनि तोषवी त्या प्रशस्त । वाक्यें वदला तीं समस्त । ऐकें समोक्त नृपनाथा ॥७६॥
महर्षि ब्रह्मनिष्ठ भले । आपणा सवें सदना आले । तुल्यभावें सम्मानिले । परि स्तवनें तोषविले आपणया ॥७७॥
प्रश्नादिकें सम्मुखीकरण । आपणा केलें हें जाणोन । दीर्घदर्शी श्रीभगवान । प्रश्नविवरण करूनि वदे ॥७८॥
स्वभृत्यातें शिक्षा करीं । ऐसें वदली द्विजवैखरी । तदनुसार शिक्षी हरी । तें रहस्य चतुरीं जाणावें ॥७९॥
आपुल्या ठायीं अधिकतर । देखूनि द्विजाचा परमादर । आपणाहूनि श्रेष्ठ भूसुर । शिक्षापर हें बोधी ॥३८०॥
लोकसंग्रहार्थ पूर्ण । आपुलें भूचक्रीं अवतरण । आपणाहूनि पूज्य बाह्मण । हें अनुशासन शिक्षितसे ॥८१॥
माझे भजनीं आदर मंद । मजहूनि वरिष्ठ वेदविद । जाणोनि भजे जो साधकवृंद । त्या मी मुकुंद प्रिय मानीं ॥८२॥
साद्यंत लक्षूनि हें रहस्य । मुखीं दावूनि मंदहास्य । शिक्षारूप ब्राह्मणास । बोधी परेश तें ऐका ॥८३॥

N/A

References : N/A
Last Updated : June 12, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP