अध्याय ९० वा - श्लोक ५१ ते ५५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
चित्रं xx चैतदुरुगाय पवित्रलीलाविध्वस्तकल्मषकदम्बकमुक्तिरूपम् ।
स्त्रीणाम् सुदुस्त्यजकृतान्तजवापवर्गम् ग्रामाद्वनम् क्षिनिभुजोऽपि ययुर्यदर्थाः ॥५१॥
तापरहित शशी निश्चित । कीं दैन्यातीत श्रीसंतत । ध्वान्ता वेगळा सविता नित्य । किंवा संत भ्रमहीन ॥९४॥
तैसी पवित्र लीला पुण्यमय । तये करूनि कल्मषनिचय । विध्वंसिले तमप्राय । जेंवि प्रळय तेजोदयें ॥५९५॥
तें मुक्तिरूप निजधाम । सच्चिदानंद मूर्त परम । उरुगायाचें अत्युत्तम । वास्तव निस्सीम स्वरूप ॥९६॥
उरुगाय म्हणिजे बहु गाइला । वेदीं पुराणीं जो दादुला । परंतु न सरे ज्याची लीला । जे त्रिजगाला उधारी ॥९७॥
अमृताची जे कां सरिता । प्राप्त जाली जाणतां नेणतां । तेथें जाण नेण लाचावतां । पावती सर्वथा अमृतत्व ॥९८॥
वस्तुमहिमाचि हा सहज । कष्णस्वरूप पुण्यपुञ्ज । सांवळें परब्रह्मचि निज । शान्तिबीज केवळ ॥९९॥
गृहसुतस्वजनासक्ता रामा । स्वभावें केवळ विषयकामा । तिहीं देखोनि मेघश्यामा । मधुमक्षिकासमा विनटल्या ॥६००॥
नित्यानित्यविवेकें वीण । विटल्या गृहसुतादिकीं पूर्ण । त्यांसि दुस्त्यज अत्यंत जाण । स्वरूप चिद्घन कृष्णाचें ॥१॥
वेधें तन्मय जाल्या अबळा । त्या निस्तरल्या दुस्तरकाळा । सायुज्य पावल्या प्रेमशीळा । हे प्रतापकाळा कृष्णाङ्गीं ॥२॥
जरी कोटीसवाणा अग्निदीप । तरी ध्वान्त नाशे सप्रताप । तेंवि सगुणविग्रह कृष्णरूप अविद्यापाप विध्वंसी ॥३॥
अतएव काळजवापवादक । श्रीकृष्णधाम अतिसम्यक । ज्या कारणें क्षितिभुज रंक । होऊनि वनौक जाहले ॥४॥
विपुळैश्वर्यें विराजित । संपन्न सर्वविषययुक्त । असतां महंतां मुखें क्कचित । ऐकतां निश्चित हरिधाम ॥६०५॥
कुरवंडूनि तें ऐश्वर्य । चक्रवर्ती ही वनीं आर्य । गेले एकान्ताप्रति निर्भय । एकले सकाय मात्र स्वयें ॥६॥
ऐसें दुर्लभ असाधारण । तें सुलभ करितां श्रवण कीर्तन । मानव पावे न्सिह्चयें करून । दृढचिन्तन केलिया ॥७॥
इतुके न हा चरमाध्याय । समाप्ति पावला सुप्रमेय । एथ दशमस्कंध विद्वत्प्रिय । जाला सान्वय संपूर्ण ॥८॥
श्रोत्या वक्त्यांचे मनोरथ । येणें सिद्ध जाले यथार्थ । जीणीं पातला परमार्थ । विश्वीं समस्त विपुळत्वें ॥९॥
कृन्तातभयें भयभीत राजा । केवळ साकांश अभयकाजा । त्या कृष्णप्रभाव बोधूनि ओजा । निर्भय केला मुनीश्वरें ॥६१०॥
म्हणाल पुढें कृतकृत्याता । कैसी नृपाची तत्वता । अलं जाला संवाद वदतां । तुष्णीम्भूतता कोटि शुका ॥११॥
तरी एकादशस्कंध समस्त । आणि पंचाध्यायपर्यंत । द्वादशस्कंधीं व्याससुत । वदला निवान्त नृपनाथा ॥१२॥
त्यांमाजि एकादशस्कंधीं । कथा पंचाध्यायावधी । नारद वसुदेवातें बोधी । जें जनकसंसदीं नरीं कथिलें ॥१३॥
पुढें यदु अवधूतसंवाद । कथिल्या नंतर श्रीमुकुन्द । उद्धवाप्रति तत्व विशद । कथिता शुद्ध जाहला ॥१४॥
तो सविस्तर संपूर्ण अर्थ । वोवीप्रबंधें उघड अत्यंत । महाराष्ट्र वदला श्रीएकनाथ । जगीं प्रसिद्ध तद्योगें ॥६१५॥
द्वादशस्कंधींचे पंचाध्याय । तेथील ऐका क्रमें अन्वय । प्रथमें नृपति पुसता होय । शुकासि सोय पुढील ॥१६॥
कीं निजधामा गेलिया कृष्ण । पुढें क्षात्रवर्ण चिरकाळीन । कळीमाजि राहिला कोण । तो संपूर्ण कथावा ॥१७॥
तेणें मुनीन्द्रें कथिलें भूपा । इतरवंश पावल्या लोपा । मागध राहती कळीकाळकल्पा । माजि अल्पसे अल्पकाळ ॥१८॥
सोमवंशींच्या अनेक शाखा । त्यांमाजि मागधशाखा देखा । कांहीं पुढें राहिल्या सुमुखा । मग ते ही अशेखा भ्रंशेल ॥१९॥
पुढें शूद्रीगर्भज राजे होती । त्यावरी शूद्रचि राज्य करिती । शेखीं केवळ यवन शासिती । अन्यायरीती प्रजांतें ॥६२०॥
ते शूद्र आणि यवन राजे । नाममात्रचि त्यां विराजे दस्यूत्पथाचरण ओजें । अधर्मभोजें नाचविती ॥२१॥
अनृती अधर्मी फल्गु दाते । तीव्र क्रोधिष्ठ हिंस्र पुरते । गोद्विजस्त्रीबाळहंते । वृथा हिंसेतें संपादिती ॥२२॥
प्रजा पीडिती शत्रुप्राय । मोडिती शिष्टसंप्रदाय । प्रजा ही तैशाचि अन्याय - । कारक निर्द्दय होतील ॥२३॥
हा इतुका प्रथमीं अर्थ । पुढें जो कथिला द्वितीयांत । तोहि कथिजेल श्रीशुकोक्त । परिसा यथार्थ निरूपणें ॥२४॥
शुक म्हणे राया परीक्षिती । दिवसें दिवस पुढें जगती । सत्य शौच दया नीती । निःशेष भ्रंशती कळिकाळें ॥६२५॥
आयुष्य बळ वयुन स्मृती । अत्यंत ह्रासें अल्पवती । कामानुसार प्रचारती । विषयां वरुती बहु प्रीति ॥२६॥
दांपत्यभावा कारण रुची । कपटव्यवहार अवघाची । तेथ वर्णाश्रमा वोळखी कैंची । अन्योन्यापत्तिदर्शनीं ॥२७॥
वर्णांमाजि जो कां बळी । तोचि नृपति तये वेळीं । एवं कळिअभ्रें धर्महेळी । लुप्त मंडळीं पृथ्वीचे ॥२८॥
तेव्हां विषमवातातपर्जन्यें । क्षुधातृषारोगादि दैन्यें । प्राणी पीडती स्वदौर्जन्यें । संतापचिन्तनें हळहळीत ॥२९॥
तीस अथवा वीस वर्षें । नरां आयुष्य कळिप्रदोषें । हेंचि परमायुष्य विशेषें । तेंही क्लेशें भोगिती ॥६३०॥
शूद्रप्राय होती वर्ण । सदा दुर्भिक्षें सौख्यहीन । प्रकर्षेंसीं पाखंडपूर्ण । आचारहीन सर्वस्वें ॥३१॥
छागप्राय होती धेनु । बटुसमान मानवतनु । अन्वनुकाळें परम सानु । होतील क्षीणु केवळ ॥३२॥
चौर्यानृत व्यभिचार दोष । दाटती मानवीं विशेष । अणुप्राय औषधि अशेष । नाशती निःशेष पुण्योर्जितें ॥३३॥
तेव्हां कळीचिये अंतीं । चराचरगुरु ईश्वरमूर्ती । पूर्णसत्वें लक्ष्मीपति । धर्मसंस्थिति रक्षावया ॥३४॥
शम्भलग्राममुख्यस्य ब्राह्मणस्य महात्मनः । भवने विष्णुयशसः कल्किः प्रादुर्भविष्यति ॥५२॥
तो शंभलग्राxx मुख्य । ब्राह्मण विष्णुयशःप्रख्य । तद्गृहीं प्रकटेल दशमसंख्य । कल्की सौख्यप्रदायक ॥६३५॥
परम जवशीळ देवदत्त । अश्वावरी बसोनि सत्य । हातीं घेऊनि असि त्वरित । मारील समस्त दुरात्मे ॥३६॥
दुराभिमानी दस्यु दुष्ट । अनाचार ज्यां केवळ इष्ट । तयां वधूनि धर्म स्पष्ट । स्थापील नीट जगदात्मा ॥३७॥
मग मळयानिळसंसर्गें । तरु सुगंधित होती वेगें । किंवा वैरागरप्रसंगें । कंकर अवघे रत्नाभ ॥३८॥
कीं तिमिरावरुद्ध जैसे नेत्र । जैं तदधिदैवत उगवे मित्र । ठायींच्या ठायींच स्वतंत्र । तेजाकार प्रकाशती ॥३९॥
तैसा सत्वमूर्ति रमाधीश । तदंगपुण्यानिळस्पर्श । होतां तत्काळ जन अशेष । होती निःशेष सत्वमति ॥६४०॥
त्यावरी होईल कृतयुग । प्रजा जन्मती सात्विक साङ्ग । जये समयीं गुरु चंद्र भग । पावती संयोग पुष्पक्षी ॥४१॥
एके समयींच तीन्ही ग्रह । समागमेंचि कर्कग्रह । अधिष्ठिती कां सुखावह । तैं प्रारंभ होय कृतयुगा ॥४२॥
आणि हे सप्त देवऋषी । वर्तती केवळ मघाऋक्षीं । तेव्हां प्रकते कळिकाळ दोषी । परिमितवर्षीं द्वाद्शशत ॥४३॥
द्वादश शतें सुरवत्सरें । तीं चतुर्ल्लक्ष बत्तीस सहस्रें । वर्षें मानवांचीं निर्द्धारें । गणनासूत्रें होताती ॥४४॥
जेव्हां मघांहून पूर्वाषाढे । जाती सप्तर्षि निवाडें । तेव्हां कळिप्रसिद्धीचे पवाडे । गाजती गाढे भूमंडळी ॥६४५॥
जोंपर्यंत श्रीकृष्णभानु । होता भूनभीं देदीप्यमान । तोंवरी कळिध्वान्त निपटून । नव्हतें हीन अणुमात्र ॥४६॥
जेव्हां कृष्ण गेला वैकुण्ठासी । तैंहूनि प्रवृत्ति कळिधर्मासी । पृथ्वी अधिष्ठिली दोषीं । जन पापासी वश जाले ॥४७॥
तथापि पंध्रा शताब्दें पूर्ण । ऊर्ध्व गेलियावरीही कृष्ण । प्रबळ कळीचेन होय जाण । कीं क्षात्रशासन करूनियां ॥४८॥
मग वाढेल दिवसेंदिवस । उच्छेद धर्माचा निःशेष । मोडिती पाखंडें सत्पथांस । जन अनुचितास अनुसरती ॥४९॥
क्रमल्या दिव्यसहस्राब्दें । उपरि चौ वर्षान्तीं मोदें । कृतयुगारंभ पूर्वानुविधें । जैं मानसें शुद्धें जनांचीं ॥६५०॥
म्हणाल दिव्य द्वादशशत । वर्षें कलियुग हें परिमित । सहस्रान्तींच कैसे कृत । होईल निश्चित अलीकडे ॥५१॥
तरी कळिप्रचुर सहस्र वर्षें । उरलीं दोन शतें जीं शेषें । तो संध्यासमय युगयोगांशें । उदित प्रकाशें कृताच्या ॥५२॥
तैं कळिकाळाचा केवळ ह्रास । कृतधर्म प्रकटती अशेष । यास्तव तैंहून कृतयुगास । प्रारंभ ऐसें जाणिजे ॥५३॥
प्रत्यक्ष सूर्योदयापूर्वीं । दोनी घटिका दिनोदय जेंवी । तैं अह्निकीं वर्तिजे सर्वीं । सुकृतप्रभवीं तो काळ ॥५४॥
तैसेंचि हेंही जाणावें । शोधकीं धिषणागौरवें । आधीं ही चौ अब्दान्तीं प्रभवें । कळीप्रभावें पापात्मकें ॥६५५॥
अंतीं चतुर्थोत्तर सहस्र । अब्दें क्रमिलियानंतर । कळि उपशमें पापप्रचुर । पुढें प्रचार कृताचा ॥५६॥
शुकें हें नृपा कथिल्यावरी । सृष्टिपरिणाम सविकारी । सांगे उद्देशें निर्द्धारीं । विरक्तिकारी विवेकियां ॥५७॥
म्हणें राया हा मानववंश । तुज म्यां सांगितला अशेष । विप्रक्षाप्रादि सविशेष । जैसा प्रवृत्त युगीं युगीं ॥५८॥
तो अवघाचि पावला नाश । त्यामाजि नामाङ्कित जे विशेष । पुण्य प्रतामें आगळे पुरुष । शौर्यें पौरुषें औदार्यें ॥५९॥
त्यांची कीर्ति मात्र राहिली येथ । कथा उरल्या कथावयार्थ । परि राजसंतानादि समस्त । पावले अस्त संपूर्ण ॥६६०॥
म्हणसी पुन्हा कृतोदयीं । वर्णव्यवस्था सान्वयीं । कैसी वर्तेल यथान्यायीं । भविष्य तेंही ऐसें असे ॥६१॥
देवापिः शन्तनोर्भ्राता मरुश्चेक्ष्वाकुवंशजः । कलापग्राम आसाते महायोगबलान्विती ॥५३॥
सोमवंशज नृप देवापी । सूर्यवंशज मरु प्रतापी । महायोगबळें निर्विकल्पी । असती कलापग्रामांत ॥६२॥
योगेश्वरांचा जो निवास । कलापग्राम नाम त्यास । जैं कल्की होय जगन्निवास । दुष्पथांस संहर्त्ता ॥६३॥
तैं कलियुगाचिये प्रान्तीं । कृतयुगाचिये आदिस्थिती । तया वासुदेवाज्ञेनें पुढती । उभयतां येती भूमंडळीं ॥६४॥
ते यथापूर्ण वर्णाश्रम । प्रवर्त्तवितील उक्तागम । एवं चौं युगांचे अनुक्रम । वर्तती विषम नृपाळा ॥६६५॥
राया जितुके प्रतापशीळ । कथिलें त्ज अवनीपाळ । भूमीचे ठायीं ममता पघळ । करूनि सकळ निमाले ॥६६॥
मत्पूर्वजीं हे भोगली । म्यांही बळें अनुशासिली । पुढें पुत्रादि भोगिती वहिली । हें मानूनि गेली नृपराजि ॥६७॥
पंचभूतात्मक देहाकार । मी आणि माझी इळा समग्र । भावूनि मूढीं ते मृत्युतंत्र । दोन्ही मृद्विकार सांडिले ॥६८॥
राजसंज्ञा जया देहा । जया पोषिते पावूनि मोहा । त्याचे कृमि कीं पावतां दाहा । भस्मही पहा परिणाम ॥६९॥
तस्माद्देहभावें अहंता ममता । धरणें मूढत्वें विष्णुराता । हें द्वितीयाध्यायीं श्रीशुक वक्ता । जाला कथिता नृपतीतें ॥६७०॥
पृथ्वी आपुले ठायीं ममता । देखोनि नृपाची विस्मिता । उपहासे जाणोनि मूढता । जे वास्तव स्वहिता विसरले ॥७१॥
जलधिवेष्टित जिंकूनि पुरी । इच्छिती जिंकूं समुद्रांतरीं । परि मोघ घडे कामना सारी । काळा उदरीं पडतांची ॥७२॥
पृथु पुरूरवा गाधि । नहुष भरतार्जुन सुधी । सगर मान्धाता पुण्यनिधि । राम सद्विधि प्रतिपादिता ॥७३॥
खट्वाङ्ग धुन्धुहा आणि रघु । इक्ष्वाकुहूनि शर्याति लघु । तृणबिन्दु ययाति गय नृगु । शंतनु आणि भगीरथ ॥७४॥
ककुत्स्थ कुवलयाश्व नैषध । हिरण्यकशिपु सुरविरुद्ध । लोकां रडवितां रावण अबुध । वृत्र प्रसिद्ध ब्रह्मिष्ठ ॥६७५॥
नमुचि आणि शंबरासुर । हिरण्याक्ष दितीचा पुत्र । भौम नामक महा क्रूर । तारक विचित्र पराक्रमी ॥७६॥
इत्यादि आणिकही बहुत । ऐश्वर्यवंत राजे दैत्य । सर्वही शूर सर्वजित । अपराजित सर्वज्ञ ॥७७॥
परि ममताबद्ध कामाङ्कित । शेवटीं अपूर्णमनोरथ । कालाग्निवदनीं तृणवत । पडिले कृतार्थ न होतां ॥७८॥
तयांच्या कथामात्रचि राहिल्या । ज्यां म्यां नृपा तुजला कथिल्या । परंतु कोण्ही दावावयाला । नाहीं उरला भूमंडळीं ॥७९॥
तस्मात् देहादि विभव नाशवंत । तुज व्हावया प्रतीतिगत । बोलिलों मृतकथा या प्रशस्त । कारण येथ इतुकेंची ॥६८०॥
संसार निःसार हा केवळ । कळावया हें ऐकिजे पघळ । वांचूनि मोक्षदानी नव्हे निखळ । वैराग्य सबळ यांचेन ॥८१॥
तरी पारमार्थिक कोणतें कथन । ऐसें पुससी जरी निक्षुण्ण । जेणें समूळ तुटे जन्ममरण । ते सावधान परियेसीं ॥८२॥
यस्तूत्तमश्लोकगुणानुवादः सङ्गीयतेऽभीक्ष्णममङ्गलघ्नः ।
तमेवनित्यं शृणुयादभीक्ष्णं कृष्णेऽमलां भक्तिमभीप्समानः ॥५४॥
जो उत्तम श्लोकगुणानुवाद । तुज म्यां कथिला श्राव्य विशद । तोचि निरंतर गायिजे शुद्ध । त्यांतेंचि अखंडित ऐकिजे ॥८३॥
कृष्णीं इच्छी अमळ भक्ति । तेणें तद्गुणानुवादचि प्रीती । गावा ऐकावा दिवाराती । कीं अमंगळ नाशीं साद्यंत ॥८४॥
अमंगळ जें जन्मादिदुःख । समूळ संहारी निःशेख । श्रीकृष्णाचें चरित सम्यक । निश्चयात्मक नृपाळा ॥६८५॥
यावरी मुनीन्द्रा पुसे परीक्षिती । कीं कळी माझारी जे जन्मती । ते कळिदोषा केंवि निस्तरती । उपाय निश्चिती मज सांग ॥८६॥
युगें आणि युगधर्म पृथक । कवण्या प्रकारींचे सकळिक । हेंहि उमजवीं मज सम्यक । विशद नावेक कृपेनें ॥८७॥
प्रश्न ऐकूनि ऐसा मुनी । वदे नृपातें कृपा करूनी । म्हणे ऐक राया चित्त देऊनि । तव प्रश्न दोन्ही सांगतों ॥८८॥
जाण धर्माचे चारी पाद । सत्य दया तप दान शुद्ध । इहीं करूनि धर्म प्रसिद्ध । वर्ते विशद कृतयुगीं ॥८९॥
सदा संतुष्ट करुणावंत । मौत्र समदर्शी शान्त दान्त । सुज्ञ क्षमस्वी आत्मरत । जान निवान्त ते काळीं ॥६९०॥
त्रेतायुगीं धर्मपादांचा । चतुर्थांश भंगे साचा । सत्य तोडी अनृतवाचा । दयेतें हिंसा उपमर्दी ॥९१॥
असंतोषें तप क्षीण । विग्रहें र्हास पावे दान । तैं कर्म आणि तपोनिष्ठ जन । साधिती पूर्ण त्रैवर्गिक ॥९२॥
द्वापरीं धर्मपाद चारी । क्षीण होती अर्द्ध निर्धारीं । तैं स्वाध्यायाध्ययनीं पुरी । आथा अंतरीं द्विजांचे ॥९३॥
यशस्वी आढ्य कुटुंबी स्वस्थ । सर्वदा सुरार्चनीं निरत । ब्राह्मण क्षत्रिय वैश्य समस्त । तुष्ट निश्चित केवळ ॥९४॥
कलियुगीं चतुर्थ चरण । धर्म वर्तेल संक्षीण । अधर्महेतूंहीं संपूर्ण । तोही नाशेल शेवटीं ॥६९५॥
तैं जन केवळ दुराचारी । निर्द्दय क्षुब्ध शुष्क वैरी । दुर्भग तृष्णावंत भारी । कार्तघ्न्यकारी मूढात्मे ॥९६॥
युगपरत्वें काळानुसार । पुरुषीं दिसती गुणविकार । तैसतैसा क्रियाप्रसर । पृथगाकार प्रवर्ते ॥९७॥
जेव्हां सत्वीं सर्वेन्द्रियें । वर्तती जनांचीं पुण्यमयें । तयीं ज्ञानास्था होये । तैं जाणिजे स्वयें कृतयुग ॥९८॥
जेव्हां काम्यकर्माचे ठायीं । भक्ति होय प्राणियां पाहीं । तैं रजोवृत्ति त्रिवर्गदायी । जाणिजे हृदयीं त्रेतायुग ॥९९॥
जेव्हां असंतोष लोभ दंभ । मान मत्सर मनीं स्वयंभ । काम्यकर्मींच अवलंब । तैं रजतममिश्र द्वापर ॥७००॥
जैं कपट लटिकें निद्रा तंद्रा । हिंसाविषादशोकादि वीरा । मोह दैन्य भय दरारा । कळि तो सारा तामस ॥१॥
त्यामाजि क्षुद्रदर्शी मर्त्य द्वाड । करंटे आणि बहु खादाड । कामी वित्तहीन उघड । पुंश्चळी उदंड कामिनी ॥२॥
दस्यु उत्कृष्ट अन्यायवंत । आम्नाय पाखंडें दूषित । प्रजाभक्षक राजे व्रात्य । द्विज शिश्नोदरपरायण ॥३॥
व्रता वेगळे ब्रह्मचारी । शौचहीन अनाचारी । भिक्षु कुटुंबी निर्द्धारीं । ग्रामा भीतरी तपस्वी ॥४॥
संन्यासी ही अर्थलोलुप । तीक्ष्णभाषी शीघ्रकोप । पुण्यानुकारें करिती पाप । निरपत्रप शठ धूर्त ॥७०५॥
निंद्य व्यवसाय मानिती बरा । निर्धन पति सांडिती दारा । सांडूनि पितृभातृनिकरा । स्त्रीपरिवारा जन भजती ॥६॥
नीच घेती उत्तम वेष । जीविकेस्तव करिती दोष । उत्तम तेणें पावती भ्रंश । करिती उपदेश नीचोत्तमा ॥७॥
उत्तमासनीं अघर्मज्ञ । बैसोनि म्हणविती सर्वज्ञ । धर्म म्हणती कृतप्रतिज्ञ । झळकविती अज्ञ - जनांप्रति ॥८॥
पाखंडी नीच गुरुत्वें मान्य । उतम शिष्यत्वें त्यांलागून । भजती ऐसें कलिमहिमान । अत्यंत हीन नारकी ॥९॥
कपर्दिकेसाठीं जन । भांडूनि सांडिती सुहृद पूर्ण । आप्त जिवलग केवळ प्राण । टाकिती क्षोभून स्वार्थास्तव ॥७१०॥
वृद्धपितरांतें ही सहज । न रक्षिती सहसा मनुज । राखिती शिश्नोदराची वोज । विषयभोज नाचविती ॥११॥
राया परम गुरु जो सर्वोकृष्ट । त्याचिया चरणारविन्दा प्रकट । त्रैलोक्यनाथ ही वंदिती श्रेष्ठ । पूर्णाभीष्ट लक्षूनी ॥१२॥
त्या भगवंता अच्युतातें । कळीचे जन सांडूनि चित्तें । पाखंड मतें क्षुद्र दैवतें । भजती आर्त्तें बहुतेक ॥१३॥
यन्नामधेयं म्रियमाण आतुरः पतन्स्खलन्वा विवशो गृणन्पुमान् ।
विमुक्तकर्मार्गल उत्तमां गतिं प्राप्नोति यक्षन्ति नतं कलौ जनाः ॥५५॥
जयाचें नाम मंगळकर । अवचटें म्रियमाण आतुर । पडतां अडखळती विवशतर । घे जो नर कैसा तर्ही ॥१४॥
रोगें जाला परम क्षीण । वपुवैकल्यें सौख्यहीन । तेणें दुःखें जाजावून । म्हणे नारायण सहजगति ॥७१५॥
किंवा अंतकाळीं प्राण । व्याकुळ होती सोडितां स्थान । तये वेदनेनें पैं श्रमून । स्मरे निर्विण्ण रामकृष्ण ॥१६॥
अथवा चालतां पडला भूवरी । कीं अडखळतां विशेष भारीं । आंगें ठेंसलीं भूविकारीं । तेणें हरि हरि जर्ही म्हणे ॥१७॥
तरी ते प्राणि दुःखप्रचुर । तत्काळ कर्मबंध जो दुर्धर । तेथूनि सुटे जड पामर । पुन्हा संसार न भोगी ॥१८॥
संचित प्रारब्ध क्रियमाण । त्रिविधकर्मात्मक बंधन । तो मुक्त होय तयापासून । नामस्मरण करितांची ॥१९॥
त्यावरी उत्तमगतीतें पावे । ऐसा महिमा ज्याचा स्वभावें । त्या पुरुषोतमातें हीनदैवें । जन कळीचे न भजती ॥७२०॥
N/A
References : N/A
Last Updated : June 13, 2017
TOP