अध्याय ९० वा - श्लोक ९१ ते ९५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
देवता मुनयः सिद्धाः पितरो मनवो नृपाः । यच्छन्ति कामान्गृणतः श्रृण्वतो यस्यकीर्तनात् ॥९१॥
राजा जालिया कृपावंत । नियोगी करिती आदर बहुत । तेंवि येणें तुष्टे रमाकान्त । यास्तव समस्त आदरिती ॥४७॥
इंद्रादि देवता संपूर्ण । महर्षि आदि मुनि सर्वज्ञ । अर्यमादिक पितृगण । तैसेच मनु नरपति ॥४८॥
हे श्रीभागवताचा गाता ऐकता । तयाच्या सर्व कामांतें तत्वता । पुरविती सर्वथा न मागतां । भजती सर्वथा आस्थेनें ॥४९॥
कीं येथ भागवतीं हरिकीर्तन । तें हा निरंतर करी सुसेवन । जेथ कीर्तन तेथ भगवान । यास्तव संपूर्ण आदरिती ॥९५०॥
श्रीभागवतोपजीवी नर । त्या न स्पर्शे दुःख दरिद्रे । चार्ही पुरुषार्थ अच्छिद्र । लाभे निरंतर यथेष्ट तो ॥५१॥
यास्तव श्रीभागवतीं प्रीती । जयासि जाली अनन्यरीती । त्या सुलभ सर्वार्थ वोळगती । हे निश्चयोक्ती निर्द्धारें ॥५२॥
पुराणसङ्ख्या सम्भूतिमस्य वाच्य प्रयोजने । दानं दानस्य माहात्म्यं पाठादेश्च निबोधत ॥९२॥
आतां पुराणसंख्यासंभूति । आणि येथींचें वाच्य यावत्समाप्ति । तेंविच प्रयोजन ही तुम्हां प्रति । कथितों सद्रीती यथार्थ ॥५३॥
आणि जैसें करावें याचे दान । आणि माहात्म्य दानाचें संपूर्ण । आणि पारायणाचें लक्षण । जाणा निक्षुण्ण मद्वचनें ॥५४॥
ब्रह्मपद्मविष्णुपुराण । शिवनारदमार्कंड वान्ह । भविष्यब्रह्मवैवर्त्ताभिधान । लिंगपुराण तें दाहावें ॥९५५॥
वाराहस्कंदवामन । कूर्ममत्साख्य पुराण । गरुडब्रह्माण्डनामक पूर्ण । श्रीभागवत अठरावें ॥५६॥
एवं पुराणसन्दोहश्चतुर्ल्लक्ष उदाहृतः । तत्राष्टादशसाहस्रं श्रीभागवतमिष्यते ॥९३॥
ऐसा हा पुराणसमुच्चय । चतुर्ल्लक्षसंख्याक होय । त्यामाजि श्रीभागवताह्वय । श्लोक सहस्र अष्टादश ॥५७॥
इदं भगवतापूर्व ब्रह्मणे नाभिपङ्कजे । स्थिताय भवभीताय कारुण्यात्सम्प्रकाशितम् ॥९४॥
पूर्वीं कल्पादिकाळीं विधि । हरिनाभिकंजीं रजोनिधी । जन्मला जैं प्रळयान्तसंधी । राहिला स्तब्धधी पद्मासनीं ॥५८॥
कांहीं नुमजेचि परावर । जल मात्र अगाध सर्वत्र । मग निर्बुजला अधिकतर । भवभय घोर पावला ॥५९॥
ऐसिया ब्राह्मया कारणें । कारुण्यास्तव करुणापूर्णें । हें सम्यक्प्रकारें नारायणें । परमदयेनें प्रकाशिलें ॥९६०॥
आतां श्रीमद्भागवतीं । वाच्य संपूर्ण यथानिगुती । तेंही परिसा सावधवृत्ती । संक्षेपोक्ती वरूनियां ॥६१॥
आदिमध्यावसानेषु वैराग्याख्यन संयुतम् । हरिलीलाकथाव्रातामृतानन्धितत्सुरम् ॥९५॥
आदि मध्यावसानीं येथ । आख्यानें जीं कथिलीं शस्त । तीं सर्वही वैराग्ययुक्त । श्रवणें विरक्त मन होय ॥६२॥
माजि हरिलीलासमूह । तेंचि अमृतरूप निःसंदेह । तेणें शिवादिसुरसमुच्चय । आनंदमय सर्वदा ॥६३॥
ऐसें सर्वानंदकर केवळ । जगत्पावन सार निखळ । श्रीमद्भागवत स्वानंदमूळ । ऐका प्रांजळ प्रयोजन ॥६४॥
N/A
References : N/A
Last Updated : June 13, 2017
TOP