लेखणी तलवार भांडण

इतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.


शिवरायाच्या दोन स्त्रियांचा, वाद लागला गमतीचा । सवती सवती भांडण करिती, न्याय असे हा जमतीचा ॥
दोन सवतिचे भांडण ऎका, घरोघर भांडति बायका । कोण सवति ह्या असाव्यात हा, सवाल कविचा तुम्ही ओळखा ॥
खरे पतीचे प्रेम कुणावर, भांडणास या सुरवात । चवताळुनि जाऊनी भांडती, एकमेकिवर करि मात ॥
पहिली म्हणे दुसरीस पतीचे खरे प्रेम गे मजवरती । म्हणुनि ठेवितो मलाच संन्निध संरक्षण करण्यासाठी ॥
अधिक प्रेम मजवरती पतीचे, म्हणुनि ठेवितो कानाशी । गुजगोष्टी मी सदैव करिते जवळी बैसुनि त्यांच्याशी ॥
लुडबुड करिशी उगाच म्हणुनी, कापुनि टाकली तव जिभली । व्यर्थ कशाला वटवट करिशी, तुजहुनि पुष्कळ मीच भली ॥
नावडती तू कोण पुसे सदा ठेवि पति बंदीत । ऎट कशाला उगीच दाविशी, कोंडुन घे जा म्यानांत ॥
खरे पतीचे प्रेम म्हणूनि मज, नग्न ठेविगे मज शेजेला । कृष्ण मुखी अप्रीय म्हणुनि तुज, घेत नाहि पति शेजेला ॥
राजकारणीं क्षण ना पतिचा, माझ्या विण गे चालतसे । हुकूम तुजला मीच सोडिते, बटिक माझी तूच असे ॥
तूच बाटिक ठेविती म्हणुनि तूज रात्रीं कोंडुनि खोलींत । मीच खरी आवडती म्हणुनी, रात्रीं घेइ मज महालांत ॥
दासि म्हणुनि तुज पती समजतो, म्हणुनि ठेवि तुज महालांत । मला पूर्ण विश्रांती घेण्या, मुभा पतीच्या मर्जित ॥
रात्रिं कोण पाहील ढुंकुनी, तुजसम कृष्णमुखी स्त्रीला । म्हणुनी तुजवरी मुळीच नाहीं, पति प्रेमा ठाऊक मला ॥
दिल्लीपती सम बादशहाला, मीच सोडिते हुकुमाला । भर दरबारीं म्हणुनी लाभतो, सदापती, सहवास मला ॥
अफ़जुल्याला लोळवुनी मी, पतिचे संरक्षण केले । म्हणुनि खूष पति आहे मजवरि, पट्टराणी मी खरी ठरले ॥
शहाजिचे मी रक्षण केले, आदिलशहाच्या हातून । किती जाहला मोद पतीला, प्रिय़ मी झाले तुजहून । सदा लावतो नाक घासण्या, म्हणुनी नकटी झालीस । ऎट कशाला उगीच करिशी, कर जा काळ बालीश ॥
पांढर्‍याव काळे करणे, हा तर माझा गे धंदा । जीव घेण्याचा हिसवृत्ति हा, कोण चांगला म्हणे धंदा ॥
दुष्टांचे निदलिन करणे, ही हिंसा कां वाईट । कळली अक्कल तोंड बंद कर, पुरे आता ही वटवट ॥
तुजवरी हा म्यानात रांहुनी, गंजजरी इतका चढला । पट्टराणि मी म्हणुनि मिरविशि, फ़ुकट कां ग त्या तोर्‍याला ॥
वाद मिटेना म्हणुनि शेवटी, बेत शेवटी काय केला । धाडुनि खलिता पतिराजाला, विनंती शिवबाला ॥
प्रेम कुणावर खरे आपले, निकाल सांगा आम्हाला । न्यायि खरे तुम्ही विनवितो आम्ही स्वीकारा या विनंतीला ॥
चांद रोहिणी सवे कराया, त्र्किडा उतरे गगनात ।
किंवा शंकर पार्वती बैसे, हिमालय आरसे महालांत ॥
तैसे होते सईबाई सह, शिवबा आपुल्या महालांत ।
सुख दु:खाच्या गोष्टी राज्यातिल, बोलत एकमेकांत ॥
तोंच पातला दूत घेऊनी, पत्र आपल्या हातात ।
पत्र वाचुती मौज वाटली, हसू लागले गालात ॥
पट्टराणी सईबाई बिचारी, प्रश्न असें कां हसलात ।
प्रिय काय मी सांगु तुला गे, ऎकुनि येशिल रागास ॥
राग नाही येणार मुळीही, वचन देतसे तुम्हाला । आहे त्या खलित्यात काय ते, लवकर कळुद्या की मजला ॥
ऎक प्रिये सांगतो मी तुला, सवती भांडण या काला । राग परि येणार नाही हे, वचन मघा दिधले मजला । खरे पतीचे प्रेम कुंणावर, भांडण ऎसे सुरु झाले । वाद मिटेना म्हणुनि मजकडे । आले भांडण हे सगळे ॥
सवति कोण ह्या असे मनाशी, सईबाई चिंतन करिते । तोंच शिवाजी म्हणे प्रियेला, हिरमुसली कां गे दिसते ॥
मजवर नाहीं प्रेम आपुले, म्हणुनि चिडवता काय मला । बोलणार मी नाहि शब्दही, गुढ काय कळु द्या मजला ॥
पहा राग तुज खरेच आला, वचन पार विसरुनी गेली । सवती मत्सर तुझ्यामध्येही, यास्तव रागाला आली ॥
सर्वात मत्सर राम धाडिला, कैकयिनें वनवासाला । सवति मत्सरें प्रिये आजवर, राज्ये किती गेली धुळील, माझ्यावर आपले प्रेम हा गर्व मनीचा अजि जिरला । आतातरि बोलावे कोण ह्या, दोन सवति मजशी झाल्या ॥
प्रिये असे वेड्या सम बोलशी, ऎक सवतिची तव नावे ॥
एक लेखणी दुजि तलवार, आहे कां हे तुज ठावे ॥
आता कां तुज हसू आले, प्रेम तुजवरी म्हणुनी ना । खरे प्रेम परि या दोघीवर, म्हणुनि जाहलो मी राणा ॥
बरे तर जा त्यांचे संगे, संमति माझी तुम्हाला । सवति अशा तुम्हि कितीक केल्या, भीत नाही मी कोणाला ॥
चांद रोहिणी सह असताना, कितिक चांदण्या सवति तिजला । तेज तिचें परि होत नाहि कमि, ठाऊक हा सिध्दांत मला । तुझ्या अधि त्यांच्याशी झाले, लग्नतुला कुठे ठाऊक । म्हणू न जाहला मुक्त देश हा, त्याच जाहल्या सहायक ॥
त्यांच्या संमतीनें मी केले, तुझ्या बरोबर हे लग्न । त्यांच्याविण ना काही चाले, जर राज्यावर आले विघ्न ॥
मान्य मला ह्या श्रेष्ठ मजहुनी जगात आहे मान । त्यांच्याविण जे जगात असती, त्यांच्या माथीं अपमान ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 10, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP