छ. राजाराम महाराजांचा पोवाडा

इतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.


छ. राजाराम महाराजांचा पोवाडा
चौक १ ला
धन्य धन्य धन्य छत्रपती । राजाराम नृपति । पराक्रमी अति । दाविला हात औरगजेबास । घेतला सूड तयाचा खास । राखिलें छत्रपतिच्या नावास ॥धृ.॥
शिवाजीच्या मागें संभाजी । झाले रणगाजी । कलुशा परि पाजी । राज्य अधिकार ज्यांचे हातांत । गुंग केला । राजा त्यानें व्यसनांत । व्यसन नाही करित कुणाचा घात ? ॥
संभाजी संगमेश्वरांत । गुंग व्यसनांत । विषय ख्यालांत । दंग झाले म्हणूनि औरंगजेबास । सिंहाच्या धरितां आले छाव्यास । शूर परि भीत नाहीं कवणांस ॥
बादशहा ह्मणे संभाजी । पिंजर्‍यांमाजी । गवसला आजी । मोकळ करुनि देतों जिवदान । सोडुनी स्वधर्माचा अभिमान । हात जरी असाल आता मुसलमान ॥
चाल १ ली हे बोल ऐकुनी खोल हृदयांत टोचले शल्य । फिरवुनी नयन गरागर बोलला संभाजी वीर । मुसलमान होतों सत्वर । दे बंटी तुझी गुलजार ॥
चाल २ री॥ ऐकुनी खवळला बादशहा म्लेछांचा । खुपसुनी सळया डोळ्यांत लाल लोहाच्या । काढुनी नयन डोळ्याच्या केल्या दोन खाचा । अद्याप कर स्वीकार यवनधर्माचा । ऐकुनी खवळला पुत्र शिवाजी राजाचा । प्राण गेला तरी बेहेत्तर नाही डरायाचा । स्वधर्मी बरें मरण याच तत्वाचा ।सुंभ जळाले परि राहतो पीळ हो त्याचा । केला अमानुष वध डोळे काढूनी त्याचा । जसा टोपिवाल्यानें केला तात्या टोप्याचा । हाहा: कार झाला चहुकडे । राष्ट्र खडबडे । शत्रूचें नरडें । कापण्या सर्वे झाले तय्यार । स्वातंत्र्य युध्द ज्यांच्या निर्धार । धनाजी संताजी झाले पुढियार ॥१॥
चौक २ रा
राजाराम नजर कैदेंत । रायगडांत । ऐकुनी वृत्त । कष्ठी जाहले तोंच किल्यांत ।  लोक अधिकार देती हातांत ज्यांनी केलीं बादशहावरी मात ॥
बालशिवाजी राजा समजोनी । साक्षी भवानी । राजा रामांनी । शपथ घेतली सर्वां देखत । देह जहो राहो देशाप्रीत्यर्थ । तशी सर्वांनी केली शपथ ॥
बंदोबस्त करुनि रायगडी । निघाले तातडी । सेना फाकडी ठेउनी बाल शिवाजी किल्यांत ।  यसूबाई माता त्यांच्या सांगांत । चतुर मोठी होती राजकारणांत (चाल १) झुल्फिकारखान रायगडी आला । जोराचा चढविला हल्ला ॥
बळकट रायगड किल्ला । नाही भेद त्याचा लागला ॥ सूर्याची पिसाळ वश केला । सत्वर किल्ला घेतला ॥ (चाल २ री )
दाविल्या स्वार्थी पिसाळानें शत्रूला वाटा । स्वार्थाध फिरवितो देशावर वरवंटा । पकडुनी नेले बालशिवाजी येसुबाई माता । ऐकुनी खवळले राजाराम ही वार्ता । लागले शत्रू त्यांच्याच पाठिशीं आतां । पन्हाळा गेला तत्काळ शत्रूच्या हातां । गडामागून गड शत्रूनें घेतले हातां । (चाल मोडते) बादशहा ह्मणे अंतरी । कामना पुरी । झाली खरोखरी । दख्खनदेश जिंकण्याची । शिवाजीवर सूड उगवण्याची । भरतभूमालक होण्याची ॥२॥
चौक ३ रा
खंडो बल्लाळ धनाजी संताजी । प्रल्हाद निराजी । खंडेराव गाजी । पातले सर्व रांगण्यावर । फौज जमऊनि झाले तय्यार । स्वामीरक्षण हाच निर्धार ॥
राजाराम रांगण्यावर । यवन पाठीवर होते चिंतातूर ।सुचली तत्काळ नामी शक्कल ॥
वेषांतर करावे सर्वांनी । राजारम वाणी । ऐकुनी कर्णीं । यात्रेकरु बनले सर्व सरदार । जिंजीगड होता मोठा आधार । जिंजीचा रस्ता धरिल सत्वर (चाल १ ली) बंगलूर गांवी मुक्काम । घॆतला तेथें आराम । गांवच्याधर्मशाळेत । मुक्काम त्याच वेषांत । सेवक पाणी घालीत । राज चरणा होते चोळीत । राजाचे तेज पाहात । पाहुनी लोक चकीत (चाल २ री) संशय पाहूनी आला गांवच्या लोकांना । बोलत होते कानडी एकमेकांना । कानडी बोली ठाऊक होती थोड्यांना । ऐकुनी खंडो बल्लाळ ह्मणे राजाला । बोभाटा होईल गावांत लागा मागीला । काढला पळ राजाचे पाहून हे रांना । धावतो चांद पाहून राहुकेतूना (चाल मोडते ) स्वामीनिष्ठ खंडोबल्लाळ । यवनांचा काळ । स्वराज्य तळमळ । प्राणाचें मोल स्वामी प्रीत्यर्थ । होळी स्वार्थाची केली निस्वार्थ । राहिला तेथे देशकार्यार्थ ॥३॥
चौक ४ था
चौकीत वर्दी हेरांनी । दिली त्या क्षणी । सुभेदारांनी पलायन केलेम धाव ठाकीत । मुसक्या बांधूनी नेलें चौकीत । तीन इममास नेले ठोकीत (कटाव) तुम्ही कोण कुठें चालला । कोठूनी आला बाकीचे बोला । कोणत्या गावाला कोणकोण गेला । चोरांनो बोला । वेळ चालला । सांगा आह्मांला ।बोला बोला खरें नाही तर मुकाल प्राणाला ॥
आह्मी गरीब यात्रेकरु खचित । लिंगायत जात । रामेश्वरी जात आमुच्या सांगात । गोसावी सात । होते मागत पान विडा कात । वेळ लइ झाला । ते गेले कुठें तें ठाव नाही आह्माला ॥
सुभेदार ह्मणे हे चोर । दरोडेखोर । चाबकाचा मार । दिला अनिवार । दगड डोईवर ।तोंडी भरपूर । राख कोंबून बुक्यांचा मारा अनिवार तोंड दाबून । तिन दिवस अन्नावाचून हाल सोसुन । हात जोडुन । गयावया करुन । यात्रेकरु म्हणून । बोल बोलून । खातरी झाली । सर्वांची सुभेदारांनी सुटका केली ॥ (चाल १ ली ) उपाशी तीन दिवसांचे । सोडिले वाघाचे बच्चे । चणे खावे लोखंडाचे । तेव्हां ब्रह्म पदी हो पातले वायुवेगानें । स्वामीचरणांशीं । मन गेले आधि मग तेथे येऊन केलें खलबत स्वामिनिष्टांसी । संताजी धनाजी सोडिले शत्रूपाठिशी । रामचंद्रपंत देशांत किल्ले पाहाणीशी । अष्टप्रधान दर्दी नेमिले राज्य व्यवस्थेशी वेवस्था केली जिंजीत खंडोजीनें खाशी ।  (चाल मोडते ) वेवस्था अशी सुंदर केली । भराभर । सर्व सरदार । मिळाले एका चढिस हो एक । मावळे स्वामिनिष्ठ अनेक । औरंग्यासारिके लोळविले कैक ॥४॥
चौक ५ वा
 रामचंद्रपंत पटाईत । अंतर्व्यवस्थेत । महाराष्ट्रांत । मावळे जमा करुनी एक जूट । देश उध्वस्त केली लुटा लूट । यवनसेन्यांत दहशत फूट ॥
संताजी धनाजी खंबीर । वीर रणधीर । सैन्य भरपूर । ठोकिले यवन धरुनिया शिस्त । धान्याचे लुटले तांडे दरोबस्त । सळो की पळो यवन झाले त्रस्त ॥
राजाराम राजकारणी । मोठे धोरणी । ऐकुनी कर्णी । उकळला वसुल यवनमुलखांत । वतन मराठयांस त्याच मुलखांत । वतनानें यवन राजावर मात ॥ (कटाव १ ला ) संताजी धनाजी जोडी । निघाली तातडी । गोदावरी थडी । शिस्त फार करडी । मावळे गडी । फौज फाकडी । घॆति रणि उडी । पाहुनी यवन । हर हर महादेव बोलून केलें कंदन ॥
दोघांची झाली चकमक ।यवन मस्तक । उडाली कैक । कैकाचें नाक । कान आणि मुख । कितीक नायक । तसेंच सहायक । आणि सैनिक । हजारोंवर । कापून केला यवनांच्या रक्ताचा पुरा ॥ (कटाव २ ) मराठयांचा अचूक मारा । केला मुलुख उध्वस्त सारा । अन्नावाचुनि यवन सारा । झाला त्यांचा जीव घाबरा । धनाजीने यवस सामोरा । बादशहाचे तंबूवर मारा । तंबुच्या दोर्‍या करकरा । सोन्याचे कळस बारा । कापुन आला माघारा । असा धनाजीचा दरारा । कापे यवन थरथरा । घोडयाला सुध्दां दरारा । पाणी पाहुनी घोडा खरखरा । जमिन उकरी टाच भरभरा । पाहतो कावरा बावरा । मालक विचारी मैतरा । जलिं दिसतो धनाजी कां खरा । मराठयाचा असा उज्वल र्कीर्तीचा डंका ॥ (चाल १ ली) मराठयांचा गनीमी कावा । यवनांस नव्हता हो ठावा ॥  यवनानीं करावा मारा । मराठयांनी करावा पोबारा ॥
जाताच यवन माघारा । शिरकाण करिती चरचरा ॥ (चाल २री ) पकडून यवन लूटला धान्याचा तांडा । जाऊन शत्रू तंबूत कापिला झेंडा ॥
यवनांची दाढी कापूनी केला हो भुंडा । यवनाची केली दूर्दशा दरारा त्रीखंडा । पाऊस नाही अंधार देंशाचा वंदा । बैसुनि घोडयावर खाति भाकर कांदा । हातांत बर्ची तरवार धनुष्य खांदा । शत्रुची हडी नरम करण्याचा धंदा । (चाल मोडते ) पराक्रम वर्णावा किती । यवन फजिती । त्याची नाही गणति । खवळला यवनराजा अनिवार । राजाराम  पकडण्याचा निर्धार । धाडिले खास खासे सरदार ॥५॥
चौक ६ वा
झुल्पिकार जिंजि वेढयांत । होता लढत । वर्षे पुरी सात । आलि मग फौज खाशी ताब्यांत ।  सिंह गवसला जणू जाळ्यांत । राजाराम तसा जिंजि किल्यांत ॥
राजाराम सर्व सरदार । झाले चिंतातूर । शत्रूचा घेर । फोडूनि जाऊ ह्मणे देशांत । जबर मरांठयांची तेथे यवनांत । सातारा राजधानी झॊकात ॥
खंडो बल्लाळ म्हणें राजाला । सोडा चिंतेला । सिंह निसटला । जसा उंदीर साहय  घेऊन । तसे शिर्क्याचे साहय घॆंऊन । जाउं शत्रुचे जाळे तोडून । (चाल १ ली ) तात्काळ शत्रुसैन्यांत । खंडोजी गेला निर्धास्त ॥
जाऊनी शिर्के -गोटात । कळविला मनाचा हेत ॥ शिर्के म्हणे खंडोजीपंत तुम्ही वेडे आहांत ॥
संभाजी होते करीत । शिरकाण डोळ्यांदेखत ॥ होवो त्या कुळाचा अंत । मज नाही तयाची खंत । (कटाव १ ला ) खंडोजी म्हणें शिर्क्याला । ऐक वचनाला । माझ्या बापाला । संभाजीने दिला । हत्तीपायाला । पायाखाली मेला ।  मेला तो गेला । आम्ही हिंदु राज्यरक्ष्णीं झटतो या काला ॥
तुम्ही त्याचे नातेवाईक । देशोध्दारक । काबिले सेवक । नेण्या झटा ऐका । असें कराल तरी वाजेल कीर्तीचा डंका (कटाव २ रा) शिर्क्याने केला मूजरा । धन्य धन्य खंडोजी वीरा । देशार्थ पाणी घरदारा । पितृघात विसरलां वरा । मूर्तिमंत देशप्रेमी वीरा । स्वामिनिष्ठ तुझ्यासम दुसरा । त्रिभुवनी नसे चतुरा । विनवितो तुला मैतरा । दाभोळचे वतन उदारा । देतूंच माझा आसरा । स्वाथध जाणिना समया । दिलें वचन त्याच समयाला । झाला तयार शिर्का देशांत राजा नेण्याला । (कटाव १ ला ) मध्यान रात्री समयाला । वसूदेव गेला घॆऊन कृष्णाला । जसा गोकुळाला । आनंद झाला । तसा राजाला । खंडोजीने नेला । सातारा शहराला ।दैवाने केली खैरात आनंद झाला । (चाल २ री ) मदतीस खानाच्या सैन्य आलें धाऊन । खान चढला होता गवीस सैन्य पाहून । सर केला किल्ला नेटाचा हल्ला चढवून । गर्वांचे घर परि होते खाली मागुन । घेतला गड परी सिंह गेला निसटुन । य अल्ला म्हणति भिस्मिल्ला तोंड वासून । जसा चांद होतो मोकळा ग्रहण संपुन । राजाराम झालें मोकळें संकटातुन । राजधानी केली सातारा तेव्हांपासून (चाल मोडते ) आनंदी आनंद झाला । सर्व जनतेला । पाहून राजाला । जयाचा चरणरजाचा वास । लाभतो आत्माराम - तनयास । आणि या महाराष्ट्रा देशास ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 15, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP