आदिप्रकरण - अध्याय तिसरा
निरंजन माधवांच्या कवितेतील काव्यस्फूर्ति उच्च दर्जाची असून, भाषेत रसाळपणा व प्रसाद सोज्वळता आहे.
चैतन्याश्रम रुक्मिणी उभयतां चिंतातुरें जाहलीं
झाली संतति चांगली परि पडे जातीकुळावेगळी ।
प्रायश्चित्त करणी निवारण करा तो कोण लोकी यया ? ॥१॥
तेव्हां ब्रह्मसभा बरी मिळविली चैतन्य सांगे तया
" आदेशें गुरुच्या यथेष्ट घडलें देवीं करावी दया ।
कामें लोभवशें कदापि घडलें नाही मायाभ्रमें
नाही लोलुप इंद्रियां वश नव्हे मी साच या अक्रमें ॥२॥
प्रायश्चित्त ययासि काय वदिजे तें आचरें मी सुखें
आह्मां पंडित जाणते सकळही शास्त्रार्थ सांगा मुखें ।
पाहा ग्रंथ निबंध आचरण तें साही जणें आचरुं
उद्धारा पतितांसि ब्राह्मन तुह्मी लोकत्रयाचे गुरु " ॥३॥
पापीही तरती अनेक जागृती स्वामीचिया दर्शनें
आम्हीं पामर उद्धरूं नवले हें नाही निवृत्ती ह्मणे ।
तैसा ज्ञाननिधी द्विजांसे विनवी सोपानही आदरें
यांचे भाषण ऐकतां द्विजवरां आश्चर्य चितीं भरे ॥४॥
हे चातुर्यनिधी बरे विलसती सारे कळांचे निधी
ऐशातें अकुलीन काय घडवी, दुर्वार मोठा विधी ! ।
हे बाळेंचि परंतु साच न तुळे यांसी सुरांचा गुरु
जातीमाजि उणें ययांसि नसतें होते जगाचे गुरु
तेव्हां ब्राह्मण पाहती बहुतसी सद्धर्मशास्त्रें बरीं
जेथें वैदिक धर्मनिष्ठ बसले शास्त्री सभाभ्यंतरीं ।
देहांतविण दूसरी न निरखों संन्यासिया निष्कृती
ऐसा निश्चय या यतीस समुदे अद्विप्र ते सांगती !! ॥६॥
चैतन्याश्रम तेधवां नमुनियां सद्भाव सद्वब्राह्मणां
आतां जाइन मी प्रयाग नगरा वेणींत देहार्पणा
पश्चाताप पुर:सरें मग निघे टाकोनि पुत्रांप्रती
पूर्वीही नहुती ययासि ममता शंका तदा कोणती ? ॥७॥
लोकां मात्र दिसे गृही वसतसे, वैराग्य चित्तीं असे
यातें सद्गुरुवाक्य पाश चरणीं बांधोनि पाडीतसे
तोही मुक्त यथार्थ आजि घडला झाडोनियां चालिला
वैराग्यसम कोण दंड दुसरा शास्त्रीं असे बोलिला ॥८॥
गेला हा यति तैं प्रयागसलिलिं हा देह तैं अर्पिला
झाला मुक्त निजानुभूतिविभवें चैतन्य तो पावला ।
जैसा तव घट फूटतां नभ मिळे जावोनियां कारणीं
तैसा हा निरहंकृतीस्तव मिळे ब्रह्मा जगत्कारिणी ॥९॥
जातां तो पति रुक्मिणी स्वपितरां अर्पोनि चौघे मुलें
चैतन्याश्रमपाठिसींच निघती झाली मनें निश्चळें ।
तेही जाउनियां प्रयाग नगरी वेणींत देहार्पणा
केलें ते पतिलोक पाउनि वसे सेवोनि नारायणा ॥१०॥
आतां हे चवघी मुलें विलसलीं बापाविना राहिलीं
आलीं ब्रह्मसभेसि वंदुनि पुढें जोडोनि ह्स्तांजुळी ।
आम्हां काय गती ह्नणोनि पुसती ज्ञानी निवृत्ती तयां
श्रीमंती कथिजे विचार सुचला आणोनि चित्तीं दया ॥११॥
प्रतिष्ठाना जावें म्हणति बुध ते या यतिसुतां
पतीतांचा तेथें घडेल तरी उद्धार पुरता ।
तुह्मी आणा पत्रें तरि आम्हिं मान्य करु समुद्रें
महाज्ञानी तेथें वसति तुहि जाव परमुदें ॥१२॥
दिल्हें विप्रीं हस्ताक्षर लिहूनियां पत्र वहिलें
तुह्मी जाएं तेथें कथन करिजे सर्व पहिलें ।
तदां आलीं चौघें बसति निजगेहीं सुजनीं ॥१३॥
ह्मणे ऐके ज्ञान्या ! अतिचतुर आहेसि बरवा
तुला सांगे माझा अनुभव तमोनाशक दिवा ।
नसे मातें कांही कुळ अकुळ मी ब्राम्हण नव्हे
नव्हे क्षेत्री वैश्यांतरि गृषलजाती न गणवे ॥१४॥
नव्हे मी ते कांही त्रिदशचरण गंधर्व ऋषि ते
नव्हे भूतें रात्रिंचर दितिज हो पुण्यजन ते
नव्हे पक्षी नोहे मृगगण पशू वृक्ष जड ही
बटू संन्यासी हो वनचर नव्हे आश्रम गृही ॥१५॥
अनादित्वें आहे निबिड म्हणती चिद्घन जया
विनाशातें नेणें स्थिति जनन नेणोचि प्रळया ।
निजाजंदी साक्षी स्वरुप अति माझें बुझ मनीं
नव्हे मी ते कांही नभ मरुत ते जाप धरणी ॥१६॥
नव्हों आम्हीं कांही त्रिगुणचि महतत्व अथवा
विराटात्मा नोहे अगुण तरि मी जाण बरवा ।
नव्हे काहीम जें जें वदति जन जें त्याहुनि पर
स्वरुपानंदी मी निखिल सुख चैतन्य सपुर ॥१७॥
अम्हां धर्माधर्मी किमपि तरि संपर्क न वसे
निषेधाचा हो कां किमपि विधि निर्बंध न दिसे ।
नसे भेदाभेदीं अढळ निजरुपी दिसतसे
अशा बोधानंदी सहजासहजी मी वसतसें " ॥१८॥
तदां बोले ज्ञानेश्वर " वदसि तूं गोष्टि बरवी
निहारीं लिंपेना उदित घडला निश्चय रवी ।
जसें सोनें माती न धरित तसा शुद्ध अगुणी
गुरु चैतन्यात्मा अससि परिसावी विनवणी ॥१९॥
करावी वेदाज्ञा प्रभु सकळ आचारविषयीं
धरी या सृष्टीत म्हणुनि वसिजे त्याच समयी
महाश्रेष्ठी कीजे प्रथम अपुला धर्म सकळीं
जसा आहे ज्याचा श्रुतिविहित ज्या उत्तम कुळीं ॥२०॥
अनाचारें नोहे जय भयचि दे त्या इहपरीं
म्हणोनी पाळावा नियतचि सदाचार चतुरीं ।
जरी ज्ञानी आहे तरिहि जनतांग्रह धरी
यथाशास्त्रें धर्माचरण करिजे उत्तम परीं" ॥२१॥
तदा त्या सोपानें सरस उभयांतें विनविलें
" जसें हे ज्ञानोबा वदति मम चित्तासि मिनलें ।
असावें धर्माच्या पथिं सहज कीं दुर्घट जरी
जयाचा तो तेणें करुनि वसिजे उत्तम परीं ॥२२॥
पहा त्या पंडूचे कुसर कुळ कोणा मिळतसे
वशिष्ठा दुर्वासा आणेक घटजन्मासि परिसें ।
तसा वाला कोळी घडत मुनि वाल्मिक बरवा
विराजे ब्रम्हर्षी म्हणुनि करिजे धर्म बरवा ॥२३॥
सदां सद्वैराग्यें अति भजन मार्गेचि वसिजे
स्वरुपानंदीही नियत निजधर्मेचि असिजे ।
ततें आहों आम्ही कुळ अकुळ कोठून गणिजे ? "॥२४॥
असा तीघांचाही नियम घडला निश्चय घरीं
प्रतिष्ठाना जावें शरण रिघिजे सज्जनवरी ।
तदा घेती विप्री लिखित बरवें पत्र अपुलें
निवृत्तीच्या मागे निघति मग तीघे लघु मुलें ॥२५॥
जनांच्या नेत्रांते लघु दिसति सर्वा वडिल हे
परेच्याही होती पर नव्हति आलीकडिल हे ।
असे तीघे गेले हळु हळुच ते पैठणपुरा
विधी तीर्थ स्नाना करिति अपणा योग्य सुकरा ॥२६॥
तदां प्रात:काळी निरखिति महाब्राह्मणसभे
नमोनी साष्टांगे निवसति तया सन्मुख उभे ।
मुखें विप्रेंद्रातें विनविति अह्मी दीन तुमचे
गुरु लोकां उद्धारक वडिल तुह्मीच अमुचे ॥२७॥
अह्मांते रक्षावें म्हणति बुडतों दु:खसलिली
नसे थांगा कोठें स्वकरिं धरिजे आजि वडिलीं
दिल्हें ते विप्रांचे लिखित बरवें पत्र सुजना
सुखें सारें केलें जनन कथना अंतर विना ॥२८॥
तदां त्या पत्राचें पठण करितां हेचि कळलें
यतीचीं हे बाळें पतित असती हें निवडलें ।
तदा या शास्त्रार्था बहु दिवस कीं घोर पडिला
नसे प्रायश्चित्तीं लिखित विधि कोठें निवडिला ॥२९॥
महाजनीं निर्णय हाचि केला । नसेचि कीं निष्कृति या मुलांला ।
या धर्मशास्त्रीं विधि आढळेना । तैं सांगिजे काय ययां कळेना ॥३०॥
न सांगतांही गति साच नाहीं । महास्थळी कीर्ति नुरोचि कांही ।
यां बोलिजे निष्कृति हेचि आतां । आहां तसे राहुनि राम चिंता ॥३१॥
अनन्यभक्ती हरि पादपद्मी । निष्ठा धरा केवळ सौख्यसद्मीं ।
तीव्रानुतापें भजनास सारा । टाकोनि मायामय हा पसारा ॥३२॥
श्रीकृष्णरुपें जग सर्व पाहा । द्विजादिचांडाळखरांत देहा ।
विलोकितां वंदन तें करावें । लेखों नये आप दुजें परावें ॥३३॥
चित्तीं चिदानंद धरोनि राहा । चैतन्य तें एक अखंड पाहा ।
या पद्धतीनेंच तराल लोकीं । यावेगळा मार्ग तुह्मां नसे कीं ॥३४॥
जितेंद्रियत्वेंचि वसा अखंड । न वाढवा संसृति कामबंड ।
वैराग्ययोगेंचि धरोनि पिंड । वर्ता तुह्मां निष्कृति हे उदंड ॥३५॥
हें सांडिता त्या नरकांत दंड । पावाल तो दुर्धर की वितंड ।
देखाल दृष्टी यमदूत चंड । याकारणें भक्ति कर अखंड ॥३६॥
सद्ब्रह्मचर्ये पितरांदिकांतें । ताराल तुम्हीं वसतां यथार्थे ।
तस्मात राहा तुह्मी ऊर्ध्वरते । नाहीं तरी यात घडे तुह्मांते " ॥३७॥
आदेश हा ऐकुनि सद्विजांचा । न माय संतोष जगांत त्यांचा ।
चौघें महा हर्षित पूर्ण झालीं । मनांतिली गोष्टी अह्मां मिळाली ॥३८॥
तैं वंदिले ब्राह्मण श्रेष्ठबुद्धि । पुनीत झालों तरलों भवाब्धी ।
मातापिता दैवत या जगाचे । दीनाजना रक्षक व्हा त्रिवाचे ॥३९॥
स्तवोनियां ब्राह्मण सभ्य ऐसें । चौघे न माती बोल युक्तां ॥४०॥
इति श्री मन्निरंजनमाधव विरचितज्ञानेश्वरविजयाभिधग्रंथे ॥
प्रथिष्ठानप्रवेश प्रायश्चित्तकथननांम तृतीयोध्याय: ॥ श्रीरामकृष्णाय नम: ॥
N/A
References : N/A
Last Updated : February 28, 2018
TOP