अगस्त्यगीता - धन्यव्रत
अगस्त्य, एक वैदिक ॠषि होते. ते वशिष्ठ मुनिंचे वडील बंधू होत. यांचा जन्म श्रावण शुक्ल पंचमी (ई.पू. ३०००) ला काशीमध्ये झाला.
अध्याय सहावा
धन्यव्रत
अगस्ती म्हणाले -
आता मी तुम्हाला धान्यव्रतासंबंधी सांगतो, जे केले असता अगदी दरिद्री माणूसही लवकर श्रीमंत होतो. ॥१॥
मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेस विष्णुची अग्निरुपात रात्री पूजा करावी. ॥२॥
वैश्वानर समजून त्यांच्या पायाची, अग्निरूपाने उदराची, हविर्भूजरुपे छातीची, द्रविणोदरूपे हाताची, शीर्ष म्हणजे संवर्त आणि संपूर्ण शरीराची ज्वलन
म्हणून पूजा करावी. जनार्दनाची या प्रकारे पूजा करावी. ॥३-४॥
नंतर त्याच्यापुढे एक अग्रीची वेदी तयार करावी आणि त्यात होम करावा. या होमाचे वेळी वरील मंत्रोच्चार करावा. ॥५॥
नंतर यव आणि तूप यांचा आहार घ्यावा. त्या महिन्याच्या कृष्णपक्षातही अशीच पूजा करावी. असे चार महिने चालू ठेवावे. ॥६॥
चैत्रापासून पुढील चार महिने दुधाचे पदार्थ आणी तूप यांचा आहार घ्यावा आणि श्रावणापासून चार महिने सातूचा आहार घ्यावा. या
प्रकारे व्रताची सांगता करावी. ॥७॥
व्रताच्या सांगतेला अग्रीची स्वर्णप्रतिमा करून लाल वस्त्राच्या जोडीने ते आच्छादावे, लाल फुलांनी त्याला सजवून केशराचा लेप द्यावा.
कुंकुतिलक लावून ही स्वर्णप्रतिमा अव्यंग शरीर असलेल्या ब्राम्हणाची पूजा करून सोबत लाल वस्त्रजोडीही द्यावी आणि खालील मंत्र म्हणावा. ॥८-९-१०॥
मी धन्य आहे. मी धन्य कर्म केले आहे त्याचप्रमाणे मी धन्यचेष्ट आहे आणि धन्यवान आहे. या धन्यव्रताने मला सदैव सुख लाभेल. ॥११॥
असे म्हणून ती प्रतिमा आणि वर दक्षिणा ब्राम्हणाला द्यावी. याचा परिणाम म्हणजे व्रती, प्रत्यक्ष भोग किंवा दु:ख न घेता समाधानी होतो. ॥१२॥
या व्रतामुळेच व्रती आपल्य जीवनात खूप आनंद, संपत्ती आणि धान्य मिळवतो यात काहीच संशय नाही. ॥१३॥
व्रतातील अग्री पूर्वजन्मीचे पा; दग्ध करतो आणि परिणामी या जन्मात मुक्ती मिळते. ॥१४॥
जो कोणी हे व्रत भक्तीने ऐकेल आणि जो याचे पारायण करील, ते दोघेही कृपापात्र होतील. ॥१५॥
असे म्हटले जाते की, हे व्रत फार पूर्वी शूद्र स्त्रीच्या पोटी जन्मलेल्या धनद नामक व्यक्तीने केले. ॥१६॥
अगस्त्यगीतेमधील धन्यव्रत नावाचा सहावा अध्याय समाप्त ॥
N/A
References : N/A
Last Updated : March 04, 2018
TOP