अगस्त्यगीता - सार्वभौमव्रत
अगस्त्य, एक वैदिक ॠषि होते. ते वशिष्ठ मुनिंचे वडील बंधू होत. यांचा जन्म श्रावण शुक्ल पंचमी (ई.पू. ३०००) ला काशीमध्ये झाला.
अध्याय पंधरावा
सार्वभौमव्रत
अगस्त्य म्हणाले -
आता मी तुम्हाला सार्वभौमव्रत संक्षेपाने सांगतो, जे विधिपूर्वक केल्यास राजा लवकर सम्राट होतो. ॥१॥
कार्तिक शुद्ध दशमीस केवळ रात्री भोजन करावे, तसेच सर्व दिशांना पवित्र बली द्यावा. ॥२॥
अनेक प्रकारच्या फुलांनी भक्तिपूर्वक ब्राम्हणांची पूजा केल्यानंतर दिशांची या मंत्राने प्रार्थना करावी. ॥३॥
‘जन्मजन्मांतरी तुम्ही मला अनुकूल असावे’ असे म्हणून पवित्र मनाने बळी द्यावा. ॥४॥
रात्री अन्न घेऊ नये. पण चांगले शिजवलेले अन्न दह्यासह अगोदर आणि नंतर यथेष्ट भोजन करावे. ॥५॥
‘असे वर्षभर जो करतो त्याला अनेक दिशांत विजय मिळतो. जो हे व्रत मार्गशीर्ष शुद्ध एकादशीपासून उपवास करुन वर्षभर करतो त्याला प्रसन्न होऊन कुबेर अमाप वैभव देतो. ॥६-७॥
हे महान व्रत विष्णूशी संबंधित आहे मग ते शुक्ल किंवा कृष्ण एकादशीस उपवास करून आणि द्वादशीस पारणे करून केलेले असावे. ॥८॥
अशा प्रकारच्या केलेल्या व्रताने मोठमोठी पापे नष्ट होतात. ॥९॥
त्यानंतर एक धर्मव्रत म्हणून आहे, जे फाल्गुन शुक्ल त्रयोदशीस सुरु करावे. हे रौद्र व्रत असून माघ कृष्ण चतुर्दशीपासून सुरु करून वर्षभर करावे. ॥१०॥
जेव्हा अमावस्येला हे व्रत केले जाते तेव्हा ते पितृव्रत होते. हे सगळे हे राजा, मी तुला सांगितले आहे. ॥११॥
ही सर्व व्रते पंधरा वर्षे केली असता त्यांच्या त्यांच्या तीव्रतेप्रमाणे फळ मिळते. ॥१२॥
हे राजा ! विधीपूर्वक ही व्रते केली असता ती हजार अश्वमेध आणि शंभर राजसूय यज्ञांच्या बरोबरीची आहेत. ॥१३॥
यातील एक व्रतसुद्धा सर्व पापांचा नाश करण्यास समर्थ आहे. ॥१४॥
जो राजा ही सर्व व्रते करतो त्याला विराज नावाचा दिव्यलोक मिळतो. ॥१५॥
अगस्त्यगीतेमधील सार्वभौमव्रत नावाचा पंधरावा अध्याय समाप्त ॥
N/A
References : N/A
Last Updated : March 04, 2018
TOP