चैत्र शु. ६

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहा्सीक महत्व.


‘साम्राज्य - संकल्पका’ चें निधन !

शके १६४२ च्या चैत्र शु. ६ रोजीं हिदुपदपादशाहीची स्थापना करुन तिचा विस्तार करणारे, मराठे लोकांस नवीन उद्योगाचे  पराक्रमक्षेत्र दाखवून देणारे, पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांचें निधन झाले.
बाळाजी विश्वनाथांचें मूळ देशमुख घराणें कोंकणांतील श्रीवर्धनचें. पण तेथील हबशांच्या अमलास कंटाळून बाळाजी सन १६७९ मध्यें  देशावर आले आणि त्यांनीं सातार्‍यास नोकरी धरली.  तेथील त्यांची हुशारी पाहून सेनापति धनाजीनें त्यांस आपल्याजवळ घेतलें. पुढें वाढतां वाढतां ते पुणें प्रांताचे सुभेदार झाले. शाहू महाराजांना यांनीं कठीण प्रसंगी मदत केल्यामुळे, आणि फौजेंतील त्यांच्या कर्तबगारीवरुन शाहूनें त्यांस सेनाकर्ते असा किताब दिला. बाळाजींचें सर्वात महत्त्वाचें कार्य म्हणजे त्यांनीं दिल्लीहून आणलेल्या चौथाई - सरदेशमुखीच्या सनदा हें होय. त्या वेळीं उत्तरेंत फर्रुख्सियर बादशाहा व सय्यदबंधु यांचें भांडण सुरु होतें. तेव्हां बादशाहानें मराठयांची मदत मागितलीइ. ती बाळाजीनें केली आणि त्याबद्दल जिंकलेल्या मुलुखांतून चौथाई, सरदेशमुखी वसूल करण्याचा हक्क मिळविला. यामुळें गृहकलहांत गुंग झालेले मराठे बाहेर लक्ष देऊं लागले. त्यांचें कार्यक्षेत्र वाढून दिल्लीच्या पातशाहीस मदत करणारी सत्ता दक्षिणेंत असल्याचें जाहीर झालें. बाळाजीची कामगिरी अनेकविध आहे ...
“त्यानें घरोघर सेनानायक निर्माण केले. दिल्लीस जाऊन मराठयांची राज्यघटना सिध्द केली. निर्धन महाराष्ट्रास सधन होण्याचा मार्ग दाखविला ... वसुलाची व्यवस्था उत्तम ठेवली ... आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यानें शाहू छत्रपतीच्या व्दारें हिंदुराष्ट्राचं संघटन केलें.”
मराठी राज्याच्या विस्तारासाठीं त्यांनीं जी दगदग घेतली आणि काळजी केली ती वृध्दावस्थेंत दु:सह होऊन सासवड येथें चैत्र शु. ६ ला बाळाजी एकाएकीं मृत्यु पावले. बाळाजी बुध्दिमान, उत्तम सेनापति, मुत्सद्दी व धोरणी होता.
- २ एप्रिल १७२०

N/A

References : N/A
Last Updated : August 29, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP