चैत्र शु. १०

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहा्सीक महत्व.


आदर्श बंधु भरत !

चैत्र श. १० या दिवशीं श्रीरामचंद्राचा एकनिष्ठ बंधु भरत याचा जन्म झाला.
दशरथाची पत्नी कैकेयी हिचा हा पुत्र. शत्रुघ्नासह हा आजोळी असतांना रामाला राज्याभिषेक करण्याचा बेत दशरथ राजानें केला. परंतु कैकेयीच्या विरोधामुळें तो बेत रद्द होऊन रामास चौदा वर्षे वनवासास जावें लागलें. त्यायोगें दशरथ मृत्यु पावला. ही सर्व बातमी भरतास समजतांच त्यानें आपल्या आईची निर्मर्त्सना केली. आणि राज्याचा त्याग करुन रामाचें दर्शन घेण्यासाठी अयोध्येहून तो निघाला. चित्रकूटावर रामाची गांठ पडल्यावर राज्यपद स्वीकारण्याची विनंति त्यानें रामास केली. पण ती गोष्ट अशक्य असल्याचें रामानें सांगितल्यावर भरतानें निग्रहानें रामास सांगितलें कीं, “मी तुझ्या पादुकांच्या नांवानें राज्य चालवीन, वनवासांत असणार्‍या तुझ्याप्रमाणें जटावलकलें धारण करीन आणि फलमूलांशिवाय कांहींहि खाणार नाहीं. चौदा वर्षेपर्यंत तुझी वाट  पहात गांवाच्या बाहेर राहीन आणि जर तूं आला नाहींस तर शेवटीं अग्नीत प्रवेश करीन.” या निग्रहाप्रमाणें भरत चौदा वर्षेपर्यंत अयोध्येबाहेर नंदिग्रामांत राहून रामाच्या नांवानें राज्यकारभार पाहात होता. कोणतेहि, राजोपचार त्याने स्वीकारले नाहींत, छत्रचामरें, नजराणे, वगैरे सर्व पादुकांना दिले जात असत शेवटीं चौदा वर्षे संपल्यानंतर राम परत आल्याची बातमी या तपस्वी बंधूल हनुमानाकडून कळली, तेव्हां भरताला अत्यंत आनंद झाला. त्यानें मारुतील पुष्कळ बक्षिसें दिली. भरतानें सर्व नगर उत्तम प्रकारें शृंगारुन रामाचें स्वागत केलें. आणि आजपर्यंत ठेवीप्रमाणें असणारें राज्य रामाला. परत केलें.
अशा प्रकारें वडील बंधूवर अनन्यपूर्ण निष्ठा ठेवून तपस्वी वृत्तीनें राहण्यांत भरतची योग्यता समजून येते. सबंध आयुष्यांत त्याचेवार युध्दाचा प्रसंग एकदांच आला होता. रामाच्या आज्ञेवरुन आपल्या दोन मुलांसह सिंधु नदीकांठी असणार्‍या गंधर्वाचें पारिपत्य भरतानें केलें, आणि तक्षशिला व पुष्कल अंशं नगरांची स्थापना केली.

N/A

References : N/A
Last Updated : August 29, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP