चैत्र वद्य ३०
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
सतीच्या अश्रूंचें मोल !
चैत्र व. ३० या दिवशीं राम - रावण युध्द समाप्त होऊन लंकेचा बलाढय व दुष्ट राजा रावण मारला गेला.
मरीन वा मारीन या निश्चयानें रावण पुन्हा रणांगणावर आला. रामावर बाणांचा वर्षाव सुरुं केला. राम - रावणांचें व्दंव्द - युध्द सुरुं झालें. मातलीनें दिलेल्या रथावर रामचंद्र आरुढ झाले. अनेक अस्त्रांचे प्रयोग एकमेकांनीं एकमेकांवर केले. शेवटी आपल्या एका बाणानें रामानें रावणाचें शिर उडाविलें. परंतु, चमत्कार असा कीं, रावणास दुसरें शिर उत्पन्न झालें. असें शंभर वेळां झाल्यावर अगस्त्य ऋषींच्या सांगण्यावरुन रामानें सूर्यांचें स्तवन केलें. आणि ब्रह्मदेवानें त्रैलोक्याच्या जयासाठीं केलेला बाण सज्ज केला. त्या बाणाच्या पिसार्यांत वायुतत्त्व होतें. आणि त्याच्या फाळांत अग्रि व सूर्य यांचें तेज भरलें होतें. असा दिव्य बाण श्रीरामचंद्रांनीं रावणाच्या वक्ष: स्थलावर मारला. तेव्हां तो बाण त्याच्या हृदयांतून निघून जमिनींत घुसला. रावण गतप्राण होऊन रथांतून धाडकन् खालीं आला.
बिभीषणास बंधुनिधनाचें भयंकर दु:ख झालें, पण बिभीषणाचें सांत्वन करतांना रामाच्या मुखांतून भारतीय संस्कृति बोलली: “बिभीषणा, शोक करुं नकोस. क्षत्रिय शूराला असेंच मरण यावें. आमचें वैर त्याच्या मरणाबरोबरच संपलें. जसा हा तुझा भाऊ तसा माझाहि आहे.” एवढयांत रावणाच्या स्त्रिया शोक करीत आल्या. त्यांच्या शोकाचा सृर असा होता की, “परम पतिव्रता सीता हिला तुम्ही जबरदस्तीनें आणलें हेंच पातक तुम्हांला घातक झालें. पतिव्रतेचे अश्रु जमिनीवर कधीं फुकट पडत नाहींत.”
रावण ही पुलस्त्यपुत्र विश्रव्याचा पुत्र. याच्या आईचे नांव केशिनी. गोकर्ण क्षेत्रांत यानें दहा हजार वर्षे तपश्चर्या केली होती. शंकराकडून अवघ्यत्वाचा वर घॆतल्यानंतर यानें अनेक जुलूम करण्यास सुरुवात केली. इंद्रादि देवांना त्रास दिला. वेदवतीवर जबरी केली. एकदां तर त्यानें कैलास पर्वतच आपल्या बाहुबळानें हालविण्यास सुरुवात केली. तेव्हां शंकरांनीं त्याला पायाच्या अंगठयानें दाबून धरलें. शेवटीं सामगायनानें त्यानें शंकराला प्रसन्न करुन घेतले.
-----------
चैत्र व. ३०
म्हैसूरच्या वाघाचें निधन !
शके १७२१ च्या चैत्र व. ३० रोजी म्हैसूरचा वाघ, हैदर अल्लीचा थोरला मुलगा टिपू सुलतान याचें निधन झालें.
टिपूचा जन्म शके १६७५ मध्यें फकिरुन्निसा नांवाचा सरदारकन्येच्या पोटीं झाला. मराठयांशीं झालेल्या अनेक सामन्यांत त्यानें पराक्रम गाजविला आहे. इंग्रजांशीहि त्यानें अनेकवार सामना दिला होता. सुरुवातीपासून फ्रेंचांशीं त्याचें संगनमत असे. हिंदुस्थानवर स्वारी करण्याच्या नेपोलियनच्या महत्त्वाकांक्षेत टिपूचें साहाय्य होतें. त्याचप्रमाणें इराण, तुर्कस्तान वगैरे देशांत वकील पाठवून त्यानें संबंध जोडलेले होते. सतराअठरा वर्षे त्यानें राज्यकारभार केला. एक नवीन धर्म स्थापना करुन पैगंबर होण्याची महत्त्वाकांक्षा त्यानें धरलेली होती. नवीन कालगणना सुरु करुन मापें, वजनें, नाणीं यांचीहि व्यवस्था त्यानें नव्यानेंच केली. त्याचा राज्यकारभार मोठया शिस्तींत चालला होता. मुलकी व लष्करी सुधारणा त्यांत पुष्कळच झाल्या होत्या. फार्सी, कानडी व उर्दू या भाषा त्यास चांगल्याच अवगत होत्या. संकटाच्या काळीं तो ब्राह्मणांना अनुष्ठानें बसविण्यास सांगे व देवाची प्रार्थना करावयास लावी. कलाकौशल्य व वाड्गमय यांचाहि त्याला मोठा शोक होता. त्याचा ग्रंथसंग्रह बराच मोठा होता. त्यानें स्वत:हि दोन ग्रंथ लिहिले होते. एकाचें नांव फर्मान - बनाम - अलीराज व दुसर्याचें नांव फतह - उल् मजाहिदीन असें आहे. टिपूचें सिंहासन फार मौल्यवान् व शोभिवंत होतें. त्याच्या आठहि बाजूंस वाघाचीं तोंडें बसविलीं असून त्यांतील दांत व डोळे रत्नांचे होते. वाघ हें टिपूचें आवडतें जनावर होतें. “विजयी पुरुष हा ईश्वराचा वाघ आहे” असें त्याचें ध्येयवाक्य होतें. टिपूची रत्नजडित तलवारहि ‘विंडसर कँसल’ मध्यें पहावयास मिळते. मराठयांचा एक जासूद टिपूबद्दल म्हणतो: “रंग गोरा, मध्यम आहे. निळया घोडयावर बसला होता. पागोटें चक्रिदार, ... मिशा मध्यम गालावर.” शके १७२१ च्या इंग्रजांच्याबरोबर झालेल्या लढाईत पट्टणच्या वेशींत इंग्रजांना अडवीत असतां डोक्यांत गोळा लागून टिपू ठार झाला.
- ४ मे १७९९
N/A
References : N/A
Last Updated : September 08, 2018
TOP