ज्येष्ठ शु. ६

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


सिंहगड व जसवंतसिंग

शके १५८६ च्या ज्येष्ठ शु. ६ रोजीं जसवंतसिंगानें सिंहगडचा वेढा उठविण्याचें ठरवून सिंहगडावर डागलेल्या तोफा खालीं आणिल्या.
शाहिस्तेखानाचा समाचार घेऊन शिवराय सिंहगडास परतले. पहाट झाल्याबरोबर मोंगली फौजा त्वेषानें सिंहगडावर चाल करुन आल्या. मोंगल अगदी नजीक आल्याबरोबर वरुन शिवाजीनें तोफांचा मारा सुरु केला. बरेच लोक जखमी झाले. खान मोठया विचारांत पडला. वेढा घालून बसावें तरी पुढें पाऊसकाळ नजीक आला; शिवाजी दगेबाज आहे, तोफखाना आल्याशिवाय यशप्राप्ति नाहीं; बरें तोफखाना आणावा तरी अडचणीच्या जागेंत मराठे सहज त्याचाच नाश करतील, या चिंतेन खान असतांच किल्ल्यावरील गोळयानें त्याचा हत्ती ठार झाला. शाशिस्तेखान नाउमेद झाला. आपली उरलीसुरली फौज घेऊन शिवाजीच्या जवळ राहणें ठीक नाहीं असें समजून औरंगाबाद येथें छावणींत जाऊन राहिला. त्यानंतर जसवंतसिंगानें सिंहगडास वेढा घातला. हा जसवंतसिंग औरंगजेबाचा मोठा मित्र होता. सहा महिनेपर्यंत जसवंतसिंगानें पुष्कळ यत्न केला. दारुगोळा आणि माणसें यांची फारच हानि झाली आणि येत चाललेल्या अपयशाबद्दल इतरांना दोष देऊन त्यानें कोंडाण्याचा वेढा उठविला. अर्थात्‍ कोणत्याहि प्रकारचा फायदा त्याला झाला नाहीं.
जसवंतसिंग हा मारवाडच्या गजसिंहाचा धाकटा मुलगा. तो जसा शूर होता तसा उत्तम लेखकहि होता. ‘आनंदविलास’, ‘अनुभवप्रकाश’, ‘अपरोक्षसिध्दांत’, ‘सिध्दातबोध’, ‘भाषाभूषण’ वगैरे ग्रंथ यानें लिहिले आहेत. हिंदी साहित्यांतील तो मुख्य आचार्य होता. ‘भाषाभूषण’ नांवाचा ग्रंथ पाठय पुस्तक म्हणून प्रसिध्द आहे. औरंगजेब बादशहाची मर्जी याजवर फार होती. काबूलच्या स्वारींत त्यानें चांगलाच पराक्रम केल्यावर बादशहानें त्याला ‘राजा’ ही पदवी दिली. शेवटी औरंगजेबाचें व त्याचें पटेना. तेव्हां त्याची रवानगी दूर काबूल येथें झाली. तेथेंच जमरुद येथें त्याचा अंत झाला. जसवंतसिंगानें आपल्याजवळ गुहिलोत चतुराजी या कृषिविद्याविशारदास ठेवलें होतें. त्याच्याच संमतीनें यानें काबूलचें डाळिंब मारवाडांत आणलें.
- २० मे १६६४

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP