ज्येष्ठ शु. १४
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
“गंगा मातुश्री साक्ष आहे !”
शके १७७९ च्या ज्येष्ठ शु. १४ रोजीं सत्तावनच्या समराच्या ज्वाला सर्व उत्तर हिंदुस्थानांत पसरुं लागल्या. मीरत, दिल्ली येथें लढा सुरु झाला होताच. कानपूरच्या लढयाला महत्त्व येण्याचें कारण कीं, दुसर्या बाजीरावाचे दत्तक पुत्र नानासाहेब पेशवे हे या संग्रामांत सामील झाले. कानपूरचा कलेक्टर हिलर्डसन् हा नानासाहेबांचा मित्र होता तरी सुध्दां इंग्रज अधिकारी मनांत ओळखून होतेच कीं, “नानासाहेब बिथरलेले दिसतात.” परंतु हिलर्डसन् यांच्या सांगण्यावरुन नानासाहेबांची योजना दारुगोळा व पैसा यांवर झाली होती.कानपूर येथील पलटणींत दंगलीला सुरुवात होत होती. कटवाल्यांतील टिकासिंग वगेरे प्रमुख व्यक्ति नानासाहेबांकडे आल्या. बर्याच वाटाघाटी होऊन नावेमध्यें कटवाले व नानासाहेब यांच्यात शपथविधि झाला. नानांनीं अभिवचन दिलें, “मी तुमच्या म्हणण्याबाहेर नाहीं, जर इतके लोक धर्माकरितां मरुन जाण्यास तयार आहेत तर मीहि आपल्या बायकांमुलांवर पाणी सोडतों.यास गंगा मातुश्री साक्ष आहे. !” आणि त्याप्रमाणें नानासाहेबांनीं कानपूरच्या रेसिडेन्सीवर ज्येष्ठ शु. १४ रोजीं हल्ला चढविला. इंग्रजांनीं बरेच दिवस टिकाव धरिला. परंतु शेवटीं नानासाहेबांपुढें कांहीं चालत नाहीं हें पाहून बायकामुलांचें रक्षण व्हावें म्हणून इंग्रजांनीं शस्त्रें खालीं ठेविलीं आणि ते क्रांतिकारकांना शरण आले. नानासाहेब क्रांतिवीरांना मिळाल्यामुळें सरकारी खजिन्यांतील अडीच लक्ष रुपये व सर्व दारुगोळा क्रांतिकारकांच्या हातीं आला. इंग्रज लोक मोठया शौर्यानें लढले, पण नाइलाजास्तव त्यांना तह करणें भाग पडलें. नानासाहेबांना एक लक्ष रुपये देऊन इंग्रजांनीं बचावासाठीं योजना स्वीकारली व प्रयागास नावेंत बसून जाण्यास इंग्रजांना परवानगी मिळाली. सत्तावनच्या क्रांतियुध्दांत ज्यांनीं प्राणपणानें सामना दिला त्यांत नानासाहेबांची योग्यता मोठी आहे. परंतु दुर्दैवानें शेवटीं त्यांना यश मिळालें नाहीं.
- ६ जून १८५७
N/A
References : N/A
Last Updated : September 19, 2018
TOP