ज्येष्ठ वद्य १२
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
“लोपलासे भानु पडला अंधार !”
शके १२१९ मधील ज्येष्ठ व. १२ रोजीं प्रसिध्द संत ज्ञानदेव यांचे थोरले बंधु निवृत्तिनाथ यांनीं समाधि घेतली.
तेराव्या शतकांत ज्ञानेश्वरादि भावंडांनीं भागवत धर्माच्या संघटणेचें आपलें अवतारकार्य संपविलें. १२१९ शकामध्यें अवघ्या आठ महिन्यांच्या अवधींत या चारहि भावंडांची अवतारसमाप्ति झाली. ज्ञानदेवांनीं समाधि घेतल्यावर सोपानदेव, मुक्ताबाई यांनीं आपला कारभार आटोपला. सर्वात वडील असे निवृत्तिनाथ मागें राहिले ! सारें विपरीतच होतें.
ज्येष्ठाच्याहि आधीं कनिष्ठाचें जाणें । केलें नारायणें उफराटें ॥
उफराटें फार कळलें माझे मनीं । वळचणीचें पाणी आढया आलें ! ॥
असे उद्गार निवृत्तिनाथांच्या मुखांतून निघाले. एदलाबादेशेजारच्या माणेगांवी मुक्ताबाईस मुक्त करुन निवृत्तिनाथ तेथून निघाले. वाटेंत सप्तशृंगीच्या डोंगराला प्रदक्षिणा घातली, देवीचें दर्शन घेतलें आणि त्र्यंबकेश्वरास आल्यावर ज्येष्ठ व. १२ स त्यांनीं आपला देह ठेविला ! ज्ञानदेवांनीं आपले श्रीगुरु निवृत्तिनाथ यांचा गौरवपूर्ण उल्लेख ज्ञानेश्वरींत अनेकवार केला आहे. नाथपंथांतील गैनीनाथ यांचा उपदेश निवृत्तिनाथांना होता. तरीहि त्यांच्या पंथाला वैष्णव संप्रदायच म्हणणें इष्ट आहे. निवृंत्तिनाथांच्या समाधीनंतर नामदेवांनीं उचित अशा शब्दांत म्हटलें कीं,
“लोपलासे भानु पडला अंधार । गेला योगेश्वर निवृत्तिराज ॥१॥”
“गेल्या त्या विभूति अनादि अवतार । आतां देवा ! फार आठवते ॥२॥”
निवृत्तिनाथांआ लहानपणापासूनच पूर्वसंस्कारबलामुळें उत्तम बोध प्राप्त झालेला होता. लहानपणीं चुकून निवृत्तिनाथ अंजनी पर्वताच्या गुहेंत शिरले. त्या गुहेंत श्रीगैनीनाथ तप आचरीत बसले होते. निवृत्तिनाथांनीं त्यांच्या पायावर लोटांगण घातलें. गैनीनाथांनाहि हा अधिकारसंपन्न बालशिष्य पाहून संतोष वाटला. त्यांनीं निवृत्तिनाथांना महावाक्याचा बोध देऊन योगमार्गाची दीक्षा दिली. गैनीनाथ हे आदि सांप्रदायांतील होते. त्यांनीं निवृत्तिनाथास आपल्या सांप्रदायांत मिळवून घेऊन श्रीकृष्णाची उपासना दिली व नामस्करणाचा प्रसार करण्याची आज्ञा दिली.
- १७ जून १२९७
N/A
References : N/A
Last Updated : September 23, 2018
TOP